आयपीएलचा रणसंग्राम

किशोर पेटकर
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आयपीएल क्रिकेट स्पर्धा झाली नसती, तर भारतीय क्रिकेटला अतोनात आर्थिक नुकसान सोसावे लागले असते. पण सुदैवाने ही स्पर्धा आता रंगात आली आहे... युवा खेळाडू मिळालेल्या संधीचे सोने करताहेत आणि आयपीएल होणार की नाही, ही चर्चा आता विजेतेपदाचा दावेदार कोण याकडे वळली आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात लोकप्रिय असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे लागू झालेले लॉकडाउन, तसेच आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील निर्बंध यामुळे ठरलेल्या कालावधीत या वर्षी मार्च-मे दरम्यान स्पर्धेचा धमाकेदार फड रंगू शकला नाही. भारतातील पावसाळा, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नियोजित असलेली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा यामुळे २०२० मध्ये आयपीएल स्पर्धा न होण्याचे संकेत मिळत होते. सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धीर सोडला नाही. 

कोविड-१९ प्रादुर्भावाचा धोका ओळखून ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वकरंडक स्पर्धा घेण्यास रस दाखविला नाही. मेलबर्न शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वकरंडक होणार नाही ही बाब स्पष्ट झाली. कोविड-१९ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) टी-२० विश्वकरंडक लांबणीवर टाकण्याचे ठरविले. यामुळे बीसीसीआयचा फायदा झाला. त्यांना आयपीएल स्पर्धेसाठी कालावधी उपलब्ध झाला, मात्र देशातील कोविड बाधितांची संख्या आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने भारतात आयपीएल खेळविणे कठीणच होते. अखेरीस संयुक्त अरब अमिरातीने बीसीसीआयला मदतीचा हात दिला. शारजाह, दुबई, अबुधाबी ही शहरे जवळच्या अंतरावर असल्याने जैवसुरक्षा वातावरणात (बायो बबल) आयपीएल खेळविणे सोईस्कर होते. त्या तुलनेत भारतातील शहरांत सामने खेळण्यासाठी खेळाडूंना खूप प्रवास करावा लागला असता, त्यामुळे बायो बबलचा फज्जा उडण्याचा धोका होता. अमिरातीत स्पर्धा घेणे खर्चीक असूनही बीसीसीआयने धाडस केले आणि अखेरीस १९ सप्टेंबरपासून स्पर्धेचे बिगुल वाजले. आयपीएल क्रिकेटमुळे केवळ भारताच्याच नव्हे, तर जगभरातील क्रिकेट अर्थकारणास दिशा गवसली आहे. २०२० मधील आयपीएल रद्द करणे भाग पडले असते, तर बीसीसीआयबरोबरच सहभागी फ्रँचायजींचेही करोडो रुपयांचे नुकसान झाले असते. तसे झाले असते, तर बीसीसीआयवर आर्थिक संकट ओढवून भारतीय क्रिकेटचे अतोनात नुकसान झाले असते हे नक्की.

काटेरी वाट
यावेळच्या आयपीएलचा शुभारंभ करण्यापूर्वी बीसीसीआयला काटेरी वाट मागे सारावी लागली. स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्जचे काही खेळाडू कोरोना बाधित आढळले. आरोग्यविषयक कडक सुरक्षा उपाययोजनांमुळे कोरोनाची साथ आयपीएलमध्ये पसरली नाही. बाधित खेळाडूही निगेटिव्ह झाले. स्पर्धेपूर्वी खेळाडूंचे विलगीकरण अतिशय कडक होते. त्यातच संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह, दुबई आणि अबुधाबी या तिन्ही शहरांतील नियम वेगवेगळे असल्याने बीसीसीआयला स्पर्धेचे वेळापत्रक ठरविताना तारेवरची कसरत करावी लागली. सारी प्रक्रिया सुरळीत होऊन विलगीकरण सफल ठरले. आयपीएलची वाट मोकळी झाली. कोरोना विषाणू महामारीमुळे त्रस्त क्रिकेटप्रेमींनाही दिलासा मिळाला. स्टेडियमवर जाऊन सामने पाहणे शक्य नसले, तरी घरबसल्या थेट प्रक्षेपणाद्वारे क्रिकेटची लज्जत लुटणे शक्य झाले. 

स्पर्धेपूर्वी आयपीएल पुरस्कर्त्याचा मोठा अडथळा बीसीसीआयसमोर उभा ठाकला. लडाख सीमेवरील चीनची अरेरावी, देशाच्या शूर जवानांना पत्करावे लागलेले हौतात्म्य यामुळे देशभरात चीनविरोधी लाट असताना आयपीएलसाठी चिनी मोबाइल कंपनीचे प्रायोजकत्व अजिबात मान्य नव्हते. चिनी पुरस्कर्त्यांमुळे आयपीएलला परदेशात नेण्यासाठी केंद्र सरकारकडूनही परवानगीस आडकाठी अपेक्षित होती. अखेरीस चिनी कंपनीने प्रायोजकत्व मागे घेतले आणि बीसीसीआयने आयपीएलसाठी नवा पुरस्कर्ता शोधला. त्यामुळे केंद्र सरकारकडून परवानगी मिळणे सोपे झाले आणि १० नोव्हेंबरपर्यंत सामने खेळण्यासाठी आयपीएल स्पर्धेचा लवाजमा अमिरातीकडे रवाना झाला. 

तुलना अशक्यच...
सारे जग कोरोना विषाणूविरोधात लढा देत असताना, इंग्लंडने स्पर्धात्मक क्रिकेट मैदानावर आणण्याचा प्रयोग यशस्वी ठरविला. जैवसुरक्षा वातावरण, रिकाम्या स्टेडियमवर इंग्लंडने अगोदर वेस्ट इंडीजविरुद्धची, तर नंतर पाकिस्तानविरुद्धची बायो बबल मालिका सफल ठरविली. इंग्लंडचा आदर्श बाळगत वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने कॅरेबियन क्रिकेट लीग उरकली. इंग्लंडमधील मालिका, तसेच कॅरेबियन लीग कोरोनाचा अटकाव न होता झाली. त्यामुळे आयपीएल आखातात घेण्यासाठी बीसीसीआयला स्फूर्ती मिळाली. जैवसुरक्षा वातावरणातील इंग्लंडमधील मालिका आणि आयपीएल यांची तुलना अशक्यच आहे. आयपीएल स्पर्धेचा आवाका फार मोठा आहे, त्यासमोर कॅरेबियन लीग दुय्यमच. आयपीएलमध्ये भारताच्या विविध भागातून आलेले क्रिकेटपटू, इतर देशांतील क्रिकेटपटू यांचा समावेश असल्याने आरोग्यविषयक सुरक्षेचा प्रश्न खडतर होता. एक साधी चूक विनाशास कारणीभूत ठरली असती. आयपीएल संकटग्रस्त ठरली असती, तर बीसीसीआयवर टीकेची प्रचंड झोड उठली असती. धोका ओळखून बीसीसीआयने सारी प्रक्रिया नियोजनबद्धपणे हाताळली, त्यासाठी त्यांचे कौतुक करायलाच हवे. अमिरातीतील उष्ण-आर्द्र हवामानाची जोखीम पत्करून स्पर्धा सध्या सुरू आहे. प्रतिकूल हवामानामुळे क्रिकेटपटू मैदानावर थकत आहेत, पण क्रिकेटचा जोश कमी झालेला नाही. 

नवोदितांना मिळाले व्यासपीठ
आयपीएल स्पर्धेने सुरुवातीपासून नवोदित क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. सुरुवातीस या स्पर्धेकडे मनोरंजनाचे लेबल लावून नाके मुरडण्यात आली. मात्र स्पर्धेचे बस्तान बसल्यानंतर साऱ्यांनीच आयपीएलचे महत्त्व मान्य केले आहे. आयपीएल स्पर्धेमुळे केवळ भारतीयच नव्हे, तर इतर देशातील क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीसही सकारात्मक दिशा गवसली आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे देशातील क्रिकेट ठप्प आहे, ते कधी सुरू होईल याचा नेम नाही. वयोगट क्रिकेट या वर्षी खेळले जाण्याची शक्यताच नाही. कोविड-१९ च्या धास्तीने बीसीसीआयने अजून देशांतर्गत क्रिकेटची रूपरेषा ठरवलेली नाही. महामारीमुळे युवा क्रिकेटपटूंची कारकीर्द खुंटलेली आहे. प्रगतीस चाप लागलेला आहे. या परिस्थितीत आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या भारताच्या युवा क्रिकेटपटूंना संधीचे सोने करण्यासाठी वाव मिळाला आहे. 

यावेळच्या आयपीएल स्पर्धेत नवे चेहरे छाप पाडत आहेत. भारतीय क्रिकेटसाठी ही बाब खूपच आश्वासक आहे. १९ वर्षांखालील वयोगटात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबरोबर खेळण्याचा अनुभव लाभत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अपवाद वगळता इतर सर्व संघांनी युवा गुणवत्तेवर विश्वास दाखविला आहे आणि या क्रिकेटपटूंनी त्यास तडा जाऊ दिलेला नाही. या युवा खेळाडूंची क्रिकेट मैदानावरील बहारदार कामगिरी पाहता, भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल असल्याचे स्पष्ट होते. नव्या चेहऱ्यांना प्रकाशमान करण्याचे श्रेय आयपीएलने वेळोवेळी मिळविले आहे. जसप्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांच्यासारखे कितीतरी चेहरे आयपीएलमुळे नावारूपास आले, त्यामुळे भारतीय क्रिकेटचा फायदाच झाला. यंदाच्या स्पर्धेतील प्रारंभिक कामगिरीचा कल पाहता, संजू सॅमसन, मयांक अगरवाल, शुभमन गिल, ईशान किशन यांना भारतीय संघात येण्यासाठी मोठी संधी प्राप्त झाली आहे. देवदत्त पदिक्कल, राहुल चहर, प्रियम गर्ग, रवी बिष्णोई, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, अभिषेक शर्मा आदी नव्या चेहऱ्यांना निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी चांगला मंच उपलब्ध झाला आहे. आयपीएल स्पर्धेमुळे झटपट क्रिकेटसाठी भारतीय संघ निवडताना निवड समितीसमोर भरपूर पर्याय उपलब्ध होतात; यंदाही असेच सकारात्मक चित्र आहे. नवोदितांनी कामगिरीत सातत्य राखताना, दुखापतींना दूर ठेवण्यास यश मिळविल्यास केवळ त्यांच्या कारकिर्दीची नव्हे, तर भारतीय क्रिकेटचीही भरभराट होईल.

यंदा कोण जिंकणार?
कोविड-१९ मुळे आयपीएल सुरू होण्यापूर्वी, स्पर्धेस कधी प्रारंभ होणार याची विचारणा होत असे. आता स्पर्धेतील चुरस वाढू लागल्यानंतर विजेता कोण असेल या प्रश्नाच्या उत्तरासाठी चर्चा झडत आहे. स्पर्धेच्या मागील १२ वर्षांच्या कालावधीत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळविले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गतविजेताही आहे. २०१३ पासून त्यांची कामगिरी पाहता, मुंबईचा संघ दर एका वर्षाच्या अंतराने विजेता ठरलेला आहे. यंदा ते ही परंपरा खंडित करणार का याबाबत उत्सुकता आहे. कागदावरील संघाची ताकद अजमावता, मुंबईचा संघ पाचव्यांदा आयपीएल करंडकासाठी प्रमुख स्पर्धक असेल, मात्र त्यांना सातत्य राखावे लागेल. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा विजेतेपदास गवसणी घातली आहे. गतवर्षी ते उपविजेते होते. संयुक्त अरब अमिराती येथील त्यांची प्रारंभिक कामगिरी पाहता, धोनीप्रमाणे त्याचा संघही वयस्कर वाटत असून हा संघ विजेता ठरल्यास ते एक आश्चर्यच असेल. तरुण दमाच्या संघांचे आव्हान पेलणे चेन्नईला अवघड ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सफल आणि प्रेरित कर्णधार या नात्याने विराट कोहलीने मोठी लोकप्रियता मिळविली आहे, पण त्याचे नेतृत्व असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ एकदाही आयपीएलमध्ये बाजी मारू शकलेला नाही. तब्बल तीन वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी विराट कोहली विजेतेपदाची उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्नशील नक्कीच असेल. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये शुभारंभी आयपीएल स्पर्धा जिंकली. ही त्यांची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. स्टीव स्मिथच्या नेतृत्वाखाली संघात विजेतेपदासाठी दावा सांगण्याइतपत ताकद यंदा आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघही विजेतेपदाच्या शर्यतीत असेल. त्यांनी दोन वेळा स्पर्धा जिंकली आहे, पण शेवटचे विजेतेपद सहा वर्षांपूर्वी मिळविले होते. हैदराबादचा संघ दोन वेळा विजेता ठरलेला आहे. यंदा हा संघ डार्क हॉर्स असू शकेल. दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब हे संघ आश्वासक आहेत. यंदा पंजाब संघ चमत्कार घडवू शकेल असे जाणकारांना वाटते. भारताचे महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखालील संघात कर्नाटकी खेळाडूंचे वर्चस्व आहे. पंजाबच्या संघाने एकदाच अंतिम फेरी गाठलेली आहे, मात्र उपविजेतेपदापर्यंत त्यांची प्रगती राहिली. दिल्ली, पंजाब, बंगळूर यापैकी एखाद्या संघाने बाजी मारल्यास आयपीएलला यंदा नवा विजेता मिळेल. मुंबईच्या संघाने विजेतेपद राखल्यास चेन्नई सुपर किंग्जनंतर (२०१०, २०११) सलग दोन वर्षे चँपियन होणारा रोहितचा संघ दुसराच असेल.

प्रतीक्षा देशांतर्गत क्रिकेटची
बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे शिवधनुष्य पेलण्यात यश मिळविले, मात्र भारतीय क्रिकेटचा मजबूत पाया असलेले देशांतर्गत क्रिकेट कधी पूर्ववत होईल याची प्रतीक्षा आहे. कोरोना विषाणू महामारीचा धोका ओळखून बीसीसीआय तरुण क्रिकेटपटूंच्या जीवनाशी नक्कीच खेळणार नाही. लस उपलब्ध झाल्याशिवाय देशात स्पर्धात्मक क्रिकेट अशक्य असल्याचे मध्यंतरी सौरव गांगुली यांनी नमूद केले होते. भारत हा खंडप्राय देश आहे. राज्य-संघराज्य-संस्था मिळून ३८ क्रिकेट संघ विविध पातळीवरील क्रिकेट स्पर्धांत सक्रिय असतात. स्पर्धेच्या कालावधीत क्रिकेटपटूंना भरपूर प्रवास करावा लागतो. आयपीएलसारखी स्पर्धा किंवा एखादी क्रिकेट मालिका जैवसुरक्षा वातावरणात शक्य आहे, पण देशांतर्गत क्रिकेट बायो बबलमध्ये खेळविणे खूपच जोखमीचे आहे. त्यामुळेच इतर वयोगट स्पर्धा रद्द करून यंदा केवळ रणजी स्पर्धा खेळविण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे, त्यासाठीही जास्तीत जास्त प्रवास कसा टाळता येईल यावर खल सुरू आहे. भारतातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, २०२० मध्ये देशांतर्गत क्रिकेट सुरू होणे अवघडच आहे. २०२१ च्या सुरुवातीस कोविड-१९ ची परिस्थिती सुधारू लागल्यास थोडेफार देशांतर्गत क्रिकेट शक्य आहे, सध्यातरी ठोस काहीच नाही. बीसीसीआयही द्विधा मनःस्थितीत असून त्यांनी सद्यःस्थितीत सारे लक्ष आयपीएलच्या आयोजनावरच एकवटले आहे.   

संबंधित बातम्या