मनमोऽऽर  हुआ मतवाला

लीना पाटणकर
सोमवार, 25 जुलै 2022

पावसाचा ऋतू हा मुळी प्रणयाचाच ऋतू. तो, ती आणि पाऊस एवढे तिघंच. आत्ता तो दोघांत तिसरा होऊन मुळीच येत नाही, सहवासाची धुंदी वाढवायला येतो. बाकीच्या जगापासून दूर दूर, दोघांच्याच, दोघांसाठीच असलेल्या सुंदर कोपऱ्यात लपायला मदत करायला सखा होऊन येतो.

अनेक, खरं म्हणजे बहुतांश लोकांना पावसाळी कुंद वातावरण आवडत नाही. मला मात्र, आभाळ भरून आलं की आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. (ऐन आषाढातला, जुलैमधला जन्म असल्यामुळे असेल का?) 
दुर्गाबाईंनी ‘पैस’ मधल्या एका लेखात आपल्याला पाऊस किती आवडतो पहिल्यापासून, ते सांगितलं आहे. ‘ज्येष्ठातले मेघमंडळ पाहिले की मी सगळे सोडून मलबार हिलवर मोकाट हिंडत असे.’ हे त्यांचं वाक्य, मुळातलं. तेव्हाची मलबार हिल किंवा फर्ग्युसन हिल माझ्या लहानपणीही काही प्रमाणात होती शाबूत. आता कुठून आणू!
पण नुसतं वातावरण नाही, पावसाचं निसर्गसंगीत आणि माणसांनी निर्मिलेलं वर्षाऋतुसंगीत पण मला अतिशय आवडतं!
ठरावीक गाणी, कजऱ्या, सारंगाचे आणि मल्हाराचे प्रकार, दुर्गा वगैरेसारखे राग मी फार हौसेनं ऐकते दर वर्षी, न चुकता.
मागे एकदा मी ‘मल्हार महोत्सव’च साजरा केला होता फेसबुकवर.
मला आवडणाऱ्या पाऊसविषयक हिंदी - मराठी गाण्यांची यादी चांगलीच लांबलचक आहे.
शीर्षकातलं सुरैयाचं १९५० सालच्या ‘अफसर’ मधलं ‘मनमोऽऽर हुआ मतवाला, किस ने जादू डाला’. १९४०च्या ‘पुनर्मिलन’ मधलं ‘नाचो नाचो प्यारे मन के मोर’- पारुल घोष. १९४३च्या ‘तानसेन’ मधलं खुर्शीदचं ‘घटा घन घोर घोर’ (आहा, ती सुरुवातीला वाजणारी बासरी!). १९४४च्या ‘रतन’ मधलं जोहराबाई अंबालावालीचं ‘रुमझुम बरसे बादरवा’. १९५५ च्या ‘आजाद’ मधलं लताचं ‘जा री जा री ओ कारी बदरिया.’ १९५५चंच गुरुदत्तच्या ‘मिस्टर ॲन्ड मिसेस ५५’ मधलं वृंदगान- ‘ठंडी हवा काली घटा आ ही गयी झूम के’. १९५९च्या ‘सुजाता’ मधलं आशाचं ‘काली घटा छाय मोरा जिया तरसाय’. समूह/ वृंदगीतं अगणित - ‘उमड घुमड कर छायी रे घटा’, ‘दुख भरे दिन बीते रे भय्या’, ‘ऊदी ऊदी छायी घटा जिया लहराये...’
द्वंद्वगीतंही मोजली तर किती ती! ‘झूले में पवन के आयी बहार’, ‘सांवले सलोने आये दिन बहार के’, ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये’, ‘हम तुम ये बहार देखो रंग लाया प्यार’, ‘बदरा की छांवतले ( सुरैया- मुकेश- सिनेमा ‘लेख’)- किती आठवावी तेवढी कमीच!
प्रसाद सावकारांचं ‘सावन घन गरजे..’ (पंडितराज जगन्नाथ) आणि मन्ना डेंचं ‘घन घन माला’ (वरदक्षिणा) कोण विसरेल?
एक वेगळंच गीत आहे शंभू मित्रांनी दिग्दर्शित केलेल्या राज कपूरच्या ‘जागते रहो’मध्ये. ‘ठंडी ठंडी सावन की फुहार, पिया आज खिडकी खुली मत छोडो’ -पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे, आणि रूढ अर्थानं ते पावसाचं गाणं नाही. दोन गाण्यांविषयी इथे विस्तारानं बोलते. ती मला अक्षरशः जीवघेणी सुंदर वाटतात.
एक नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात कल्पना लाजमीनं काढलेल्या ‘रुदाली’मध्ये आहे. विलक्षण सुरेख चित्रपट. राजस्थानात मृत्युप्रसंगी शोकप्रदर्शनासाठी ‘रुदाली’, म्हणजे पैशाच्या मोबदल्यात रडणाऱ्या स्त्रियांना बोलावण्याची पद्धत आहे. त्यांचा व्यवसायच तो. आनंदसोहळ्यात नाचणारणी, तशाच या पण, भाडोत्री! तर डिंपल कपाडिया आणि तिची आई राखी या पण रुदाली. डिंपल‌ राहते त्या गावचा जमीनदार राज बब्बर या सुंदर दिसणाऱ्या रुदालीच्या आकर्षणात गुंतलेला आहे. तिलाही माहितीये ते. पण तिला एक (नगण्य का असेना) नवरा आहे, मुलगा आहे. मात्र, रुदाली असली; दरिद्री असली, तरी तीही स्त्रीच आहे. तिलाही त्याची ओढ वाटते. पण परिस्थिती तिला प्रतिसाद देण्याची मुभा देत नाही. हे अबोल‌ नातं ‘दिल हुम हुम करे’ या गाण्यात फार सुंदर, सूचकरितीनं दर्शवलं गेलंय. डिंपलचं वय वाढलंय खरं,पण तिचे ते मधाचे ठिपके टाकल्यासारखे डोळे सगळं सगळं दाखवण्याची क्षमता राखून आहेत, अजूनही! 
तर, राजस्थानात दुर्मीळ असणारा पाऊस येतो, एका रात्री. गर्जत, बरसत, झोपलेल्यांना जागं करत. डिंपलच्या (अक्षरशः) चंद्रमौळी झोपडीतही तो अनाहूतपणे प्रवेश करतो. (चंद्रमौळी!) छताला छिद्रं आहेतच! ती जागी होते.आणि दार सताड उघडून त्या सुखाला दोन्ही हात पसरून सामोरी जाते.
जे ती प्रत्यक्षात करू शकत नाही, ते ती इथे करते!
पुरेपूर आनंद लुटते त्या दुर्लभ सुखाची चिंब बरसात करणाऱ्या पावसाचा! डिंपल ही नर्तिका नव्हे. पण राजस्थानी पद्धतीचं नृत्य तिनं छानच केलंय. या चित्रपटातलं अमजद खानचं दहा मिनिटांसाठी होणारं दर्शन विसरण्याजोगं नाही. सगळ्यांच्याच भूमिका देखण्या. पण माझ्या लेखी खरे हीरो हे बुजुर्ग संगीतकार भूपेन हजारिका. काय संगीत दिलंय त्यांनी! हा आसामी संगीतोपासक बाहेरच्या जगाला फार उशिरा माहीत झाला. हिंदी चित्रपटसृष्टीला तर ‘रुदाली’मुळेच. त्यांनी गायनही केलंय या चित्रपटासाठी. वृंदावनी सारंगातलं हे गीत तर कहर सुंदर आहे. गुलजारजींचं काव्य नेहमीप्रमाणेच अप्रतिम. मला खरं म्हणजे शब्द सापडतच नाहीयेत वर्णनासाठी. हे संगीत अद्रभुत आहे... दैवी आहे. सतार हे वाद्य मला अतिप्रिय आहे. ते वाहत्या पाण्याच्या प्रवाहासारखं मला बरोबर ओढून नेतं, खेचून नेतं. काहीच करता येत नाही मला! यातली सतार, यातली बासरी, तबला- पखावजचं आलटून पालटून केलेलं उपयोजन... काही बोलणंच अशक्य!  हे गाणं ऐकणं हा केवळ स्वर्गीय आनंद आहे!
‘झूटी मूटी मितवा आवन बोले,
भादों बोले,कभी सावन बोले!’

‘रुदाली’तलं हे गाणं खूपच अलीकडचं, म्हणजे तरी तीसेक वर्षांपूर्वीचं.
दुसरं त्यापेक्षा खूपच जुनं आहे.गीता दत्तचं ‘हौले हौले हवाएं डोले...’ काय मेळ जमलाय शब्दसुरांचा इथे! गीता दत्तचा अनेकदा मादक, मदमस्त रूप धारण करणारा सूर इथे अगदी साजेसा लागलाय. पंडित भरत व्यास तर उत्कृष्ट कवी होतेच. त्यांच्या शब्दांना निखिल घोषांनी अप्रतिम स्वरसाज चढवला आहे. सुरुवातीच्या गिटारच्या सुरावटीतच अक्षरशः खेचून घेण्याची ताकद आहे. पहा.. ‘हौले हौलेऽऽ, हाय डोलेऽऽ... आहा!’ बेभान करणारी साद येते...आणि मग ॲकॉर्डियन, बोंगो, व्हायोलिन (खूप नाहीत. दोन, फार तर तीन) जोडीनं बेभान कोसळू लागतात! श्वास कोंडतोय की काय, असं वाटायला लागतं काही क्षण... आणि मग गीताचे सूर बरसू लागतात पाठोपाठ...
‘हौले हौले हवाएं डोले,
कलियों के घूंघट खोले,
आ जा मेरे मन के राजा,
पिहू पिहू पपीहा बोले,
हौले हौले हवाएं डोले!’

पावसाचा ऋतू हा मुळी प्रणयाचाच ऋतू. तो, ती आणि पाऊस एवढे तिघंच. आत्ता तो दोघांत तिसरा होऊन मुळीच येत नाही, सहवासाची धुंदी वाढवायला येतो. शृंगाराची रंगत वाढवायला येतो. बाकीच्या जगापासून दूर दूर, दोघांच्याच, दोघांसाठीच असलेल्या सुंदर कोपऱ्यात लपायला मदत करायला सखा होऊन येतो.
रिमझिम के तराने ले के आई बरसात,
याद आये किसी से वो पहली मुलाकात!

ओघानंच, एकट्या पडलेल्या विरहिणीला आणखीनच उदास करतो तो. मग विरहिणी आळवल्या जातात- भाषा वेगवेगळ्या असतील, भावना तीच असते.
फांद्यांवरी बांधिले ग मुलिंनी हिंदोळे,
पंचमिचा सण आला, डोळे माझे ओले!

गदिमांच्या शब्दांमधली हीच व्याकुळ भावना भरत व्यासांच्या या रचनेत उतरली आहे. पण ती फक्त व्याकुळ, हतबल मात्र नाही! ती कमालीची आक्रमक आहे! ‘आ जा मेरे मन के राजा, पिहू पिहू पपीहा बोले’ -गीता ते शब्द कसे उच्चारतेय, ऐका. ती विनवणी नाहीये, हुकूम आहे तो! कुठे गेलाहेस तू? 
काले काले बादर छाये,
कौन संदेसा लाये,
सावन सुहावन आया,
पिया मेरे तुम ना आये!

तुझ्या गैरहजेरीत येणारा पाऊस छळवादी वाटणार नाही, तर काय?
बिरही गगन रोये,
मेरे दो नयन रोये,
पिया तुम पास नहीं,
कहां किस देस खोये?

जाब विचारतेय जणू.
घन घन बादरा गाजे,
झन झन पायल बाजे,
छायी छायी हाये बहार,
तुमबिन जिया ना लागे!

किंचित,अगदी किंचित व्याकुळ छटा... आणि पुन्हा हट्टी आग्रह- आलंच पाहिजे तुला! 
पारंपरिक कजऱ्या अगदी वेगळ्या.
बरसन लागीं, सावन बुंदियां.....
प्यारे बिना....
लागे ना मोरी अखियां.....

या सवयीच्या विरहगीतांना छेद देणारं हे वेगळं गीत, त्याच्या वेगळेपणामुळेच मला अतिशय आवडतं!
निखिल घोष हे तबलिये. तपस्वी तालसम्राट. तबल्यावर‌ तर त्यांची अफाट हुकमत होतीच. पण आपल्याकडचे गायक- वादक कलावंत फक्त गातात किंवा वाजवतात, असं कधीच नसतं. गायकांचे, वादकांचे हात तालवाद्यांवर सफाईनं चालतातच. पूर्वी तर गायकांना सारंगीचीच साथ असे आणि बहुतेक गायक मुळात सारंगिये होते! विलायतखाँ आणि शुजातखाँ या पितापुत्रांनी सतार बाजूला ठेवून सुरेल गाऊन दाखवण्याचे किती प्रसंग! सगळं संगीत कोळून प्यालेली ही माणसं. निखिलबाबूंनी दिलेलं संगीत ऐका. तबल्याला कमी जागा देऊन बोंगोला दिलेलं प्राधान्य पाहा. ॲकॉर्डियन, गिटार, व्हायोलिन या मूळ पाश्चात्य वाद्यांचा आपल्या संगीतकारांनी अतिशय सुंदर उपयोग करून घेतला आहे, वेळोवेळी. तसाच इथेही झालाय. वाद्यांची संख्या फार नाही. पण त्यांचा मेळ अद्‍भुत आहे! 
सुरुवातीला वाजणारी गिटार - हौले हौले.… कसं ते हौले हौले दाखवतेय पाहा! हाऽऽय डोले....वा वा वा वा वा!
आणि मग सुरू होतो धुवांधार, मुसळधार, अंगावर चालून येणारा पाऊस! तुफान कोसळणाऱ्या पावसाचं, समोर धारारूपी भिंत उभी ठाकल्याचं, मधेच चमकून जाणाऱ्या मूर्तिमंत चपला विजेचं, कडकडाटाचं, गडगडाटाचं, काळ्या दाट मेघांच्या दाटीचं, त्यांनी आक्रमिलेल्या नभाचं दृश्य ऐकणाऱ्यांसमोर साकार झालंच पाहिजे! मन आणि दृष्टी, कान, सगळ्या संवेदनांचा अक्षरशः ताबा घेणाऱ्या पावसाचा काय कमाल अनुभव दिला आहे निखिल घोषांनी या गीतात!
आणि आणखी विलक्षण प्रयोग लयबदलाचा!
एकदा दोन्ही कडवी ऐकवतात ते, द्रुतलयीतच.पण ते गीत तिथे संपतं न संपतं, तोच परत गिटार वाजते, परत गीताची साद येते,आणि व्हायोलिन- ॲकॉर्डियन- बोंगोचा झपाटा सुरू होतो, अतिद्रुत लयीत! पावसाचा मारा, पुराचा तुफान लोंढा! झाडं बेफाम डोलताहेत, माणसं आणि जनावरं हेलपाटताहेत, मधेच विजेचा भयचकित करणारा कडकडाट, शरणागती पत्करून उखडल्या जाणाऱ्या एखाद्या वृक्षाचं कोसळणं- सगळं दृश्य आणि श्राव्य, अनेकदा अनुभवलेलं, केवळ वादक आणि संगीतकार साक्षात समोर उभं करतात! त्या कुशल वादकांची तर आता आपल्याला नावंसुद्धा नाही कळणार. पन्नासच्या दशकात हे गीत साकारणाऱ्यांपैकी कोणीही आता असणार नाही. गायिका,कवी, संगीतकार, वादक सगळे जग सोडून गेलेत.
पण गेले तरी कसं म्हणावं!
ही आणि अशा शेकडो निशाण्या आहेत ना आपल्याजवळ!

संबंधित बातम्या