श्रीगणेश चतुर्थी 

ओंकार दाते 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

गणपती विशेष

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे माहात्म्य अधिक असते. 

या दिवशी गणपतीची मातीची व रंगीत मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा करतात. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी. उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे. ‘सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना’ असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही, तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते. दुकानातून गणपतीची मूर्ती ८-१५ दिवस आधी आणून घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही. 

पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रातःकालापासून माध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग इत्यादी वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत. गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवितात. या प्रसंगी त्याची दहा नावे गुंफलेला पुढील मंत्र म्हणून त्यास एकवीस दूर्वा अर्पण कराव्यात. 

गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन ।
एकदन्तेभवक्त्रे च तथा मूषकवाहन ।। 
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । 
कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।। 

हा उत्सव प्रामुख्याने दीड दिवस असतो. म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजिलेला गणपती दुसऱ्या दिवशी सायंकाळी विसर्जित करतात. कित्येक घरी पाच, सात, नऊ व दहा दिवसही गणपती ठेवून त्याची पूजा करतात. कित्येक कुटुंबात ज्येष्ठा गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन होते. 

प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढावी व तिचे पाण्यात विसर्जन करावे. वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टॅंकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. तसेच मातीची किंवा शाडूची ३ - ४ इंच उंचीची लहान मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून पूजन करता येईल आणि कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सवमूर्ती म्हणून पूजन करता येईल. पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचे करावे आणि धातूची श्रीगणेश मूर्ती पुन्हा शोकेसमध्ये ठेवून द्यावी. 

गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस - 

  • २२ ऑगस्ट २०२०, शनिवार - श्रीगणेश चतुर्थी 
  • या दिवशी पहाटे ४.३० पासून दुपारी १.३० पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल. 
  • २५ ऑगस्ट २०२०, मंगळवार - गौरी आवाहन 
  • दुपारी १.५९ नंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे. 
  • २६ ऑगस्ट २०२०, बुधवार - गौरी पूजन 
  • २७ ऑगस्ट २०२०, गुरुवार - गौरी विसर्जन 
  • दुपारी १२.३७ नंतर गौरी विसर्जन करावे. 
  • १ सप्टेंबर २०२०, मंगळवार - अनंत चतुर्दशी 

यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या स्वरूपात काही बदल करावे लागणार आहेत. त्यानुसार, यावर्षी बाजारात जर मूर्ती मिळाली नाही तर स्वतः माती आणून आपल्याला जमेल तशी लहान मूर्ती तयार करावी. ‘उत्सवमूर्ती’ धातूची असली तरी चालते. कारण मुख्य पूजन किंवा प्रत्यक्ष विसर्जन त्या धातूच्या मूर्तीचे नसते, ती वर्षानुवर्षे तशीच वापरता येते. आपण बनवलेल्या मातीच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करावे. एखाद्या बादलीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात विसर्जन करून माती विरघळल्यावर ते पाणी घरातल्या कुंड्यांमध्येसुद्धा टाकता येते. असे केल्याने विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळता येईल. 

बाजारात मूर्ती मिळत असेल तर साधारणपणे एक वीतभर उंचीची मूर्ती पूजेसाठी घ्यावी आणि गणेशोत्सव नेहमीप्रमाणे करावा. मात्र ही मूर्तीसुद्धा माती किंवा शाडूची घेण्याचा आग्रह धरावा. 

अनेकजण दरवर्षी उत्सवासाठी आपल्या गावी जातात. यावर्षी त्यांना गावी जाणे शक्य नसल्यास राहत्या घरी वरीलप्रमाणे गणेशोत्सव करून आपली गणेशपूजनाची परंपरा त्यांना अखंडित ठेवता येईल. कोरोनामुळे ज्या प्रमाणे अनेक बदल आपण अंगिकारले त्या प्रमाणे गणेश उत्सवातसुद्धा आपणास बदल करावा लागेल, तेव्हा अशा प्रकारे श्री गणेशाचे पूजन करून त्या विघ्नहर्त्याकडे कोरोनाचे संकट जावे अशी प्रार्थना करू या! 

पुढच्या वर्षी १० सप्टेंबर २०२१ रोजी शुक्रवारी श्रीगणेश चतुर्थी आहे.

संबंधित बातम्या