स्टार्टअप

प्रा. डॉ. माधुरी कर्णिक 
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

कव्हर स्टोरी

स्टार्टअप हा परवलीचा शब्द बनलेला असताना, नव्या कल्पना घेऊन येणाऱ्या स्टार्टअपसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’ २७ आणि २८ तारखेला पुण्यात होत आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (सीओईपी) आयोजित करीत असलेल्या या तिसऱ्या फेस्टमध्ये स्टार्टअपना आपल्या कल्पना गुंतवणूकदार, मार्गदर्शक तसेच या विषयात आस्था असणाऱ्या नागरिकांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. या निमित्ताने सीओईपीच्या आंत्रप्रेन्युअरशिप सेलच्या सल्लागार व फेस्टच्या आयोजन समितीच्या प्रमुख समन्वयक प्रा. डॉ. माधुरी कर्णिक यांनी घेतलेला स्टार्टअप या विषयाचा आढावा. 

‘उद्योजकता विकास या श्रेत्रातील माझी आवड जोपासण्याची संधी मला २०१३ मध्ये पहिल्यांदा मिळाली. आमच्या महाविद्यालयातील आंत्रप्रेन्युअरशिप सेलची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली तेव्हा एकच गोष्ट मनात होती की अभियांत्रिकी महाविद्यालयातला फारसा महत्त्व नसलेला किंवा दुर्लक्षित म्हणू शकतो असा हा भाग आहे. आपल्याला जमेल तेवढे त्यात लक्ष घालून काही बदल घडवता आला तर बघावे. पहिली दोन वर्षे अगदी कुठल्याच स्तरावर या क्लबला फारसे महत्त्व नव्हते. सदस्यही शंभरच्या वर नसायचे. पण मुठभर मुले खूपच उत्साही असायची. त्यांच्यामुळे माझाही उत्साह वाढला आणि बघता बघता छोट्या अंकुराचे रोपट्यात रूपांतर झाले. या निमित्ताने आलेले अनुभव आणि सर्वसामान्यांच्या मनात असलेले प्रश्‍न याबद्दल थोडक्यात लिहीत आहे. 

मॅन्युफॅक्चरिंग जोपर्यंत महत्त्वाचे होते, तोपर्यंत छोटे, पूरक उद्योगधंदेसुद्धा महत्त्वाचे होते. पण जेव्हापासून माहिती तंत्रज्ञान खूपच प्रगल्भ झाले आणि त्यावर आधारित छोटे उद्योगधंदे अस्तित्वात आले, नफा कमवू लागले, जगामध्ये खळबळ (Disruption) माजवू लागले, तेव्हापासून ‘स्टार्टअप’ हा शब्द खूपच प्रचलित झाला. आता सगळ्या क्षेत्रातल्या नवीन उद्योगधंद्यांना स्टार्टअप म्हणतात, कारण प्रत्येकजण स्टार्टअपची व्यवसाय करण्याची पद्धत, व्यवसाय प्रारूप (Business model) वापरण्याचा प्रयत्न करतात. 

त्यामुळे स्टार्टअपची व्याख्या करायची म्हटल्यास, ‘असा एक नवउद्योग जो एखादे नवे, पूर्वी कधी नसलेले उत्पादन किंवा सेवा विकसित करून बाजारात आणतो आणि ज्यासाठी सुरुवातीला त्याच्या कुटुंबाने, नातेवाइकांनी, मित्रांनी किंवा गुंतवणूकदारांनी आर्थिक मदत केलेली असते. सुरुवातीला नफा किंवा परतावा फारसा नसतो, परंतु आपले उत्पादन/सेवा बाजारात आणण्याची जबरदस्त इच्छा असते. हे उत्पादन/सेवा पूर्णपणे नवीन असल्याने ग्राहकांना त्याचा पूर्वानुभव नसतो. त्यामुळे ग्राहकांना आपल्या उत्पादनाची/सेवेची उपयुक्तता पटवणे हे या उद्योजकांपुढे एक मोठे आव्हान असते. तसेच आपले उत्पादन/सेवा ग्राहकांच्या पसंतीस उतरेलच, शिवाय उत्तरोत्तर आपला उद्योग वाढून नफाही वाढत जाईल, हे गुंतवणूकदारांच्या गळी उतरवणे या दिव्यातून या उद्योजकांना जावे लागते,’ आपण असे म्हणू शकतो.

एक छोटा उद्योगधंदा आणि स्टार्टअप यात काही महत्त्वाचे फरक आहेत. 

स्टार्टअपचे ‘व्यवसाय प्रारूप’ हे वृद्धिंगत (Scalable) होणारे असते व पुनरावृत्ती करण्याजोगे असते. तर छोटा उद्योग एक ठराविक ‘व्यवसाय प्रारूप’ घेऊन आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविण्यापुरता असतो. हे प्रारूप वृद्धिंगत होईलच असे नसते. किराणामालाचे दुकान, बेकरी, एखाद्या मोठ्या कंपनीला ठराविक पार्ट तयार करून विकणारे उद्योजक हे छोट्या उद्योगाचे उदाहरण होऊ शकतात. त्याचबरोबर छोट्या उद्योगांचे वैशिष्ट्य असे की हे बऱ्याच वेळा कुटुंबीयांकडूनच चालवले जाणारे (Family run) व्यवसाय असतात. 

पण स्टार्टअप हा वाढत जाणारा, नवनवीन पायऱ्या गाठणारा, परताव्याचे नवीन उच्चांक गाठणारा व्यवसाय असतो. गुगल, उबर व फेसबुक याची उत्तम उदाहरणे होऊ शकतात. स्टार्टअपच्या संस्थापकांचा सुरुवातीपासूनच हा उद्देश असतो, की त्यांच्या उत्पादनामुळे/सेवेमुळे जगामध्ये काहीतरी बदल घडेल. त्याकरिता हे संस्थापक नेहमीच उत्तमोत्तम कौशल्य आणि ज्ञान असलेले व विविध प्रकारच्या क्षमता असलेले लोक आपल्याकडे खेचून घेत असतात. भांडवल मिळवून व्यवसाय वाढवत राहतात. स्टार्टअपची अशीही एक व्याख्या आहे, की ज्यांच्याकडे १०० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी नाहीत, ५ कोटींपेक्षा जास्त परतावा नाही. स्टार्टअप संस्थापकाला उत्पादनशास्त्र, आपल्या उत्पादनाला अनुसरून शास्त्रीय माहिती, तंत्रज्ञान अवगत असणे जरुरी असते. तसेच उत्पादन करणे, विपणन (marketing) करणे, ग्राहकांपर्यंत पोचवणे अशी आणि इतर सर्व कामांशी संस्थापकांनाच सामना करायचा असतो. एकाच माणसाकडे प्रत्येक गोष्टीत प्रावीण्य असणे कठीण. त्यामुळे सर्वसाधारणपणे स्टार्टअप हा तीन-चार संस्थापक मिळून सुरू करतात. खूपसे स्टार्टअप अपयशी होतात, अशी म्हटले जात असले तरी यशस्वी स्टार्टअपचीही खूप उदाहरणे आहेत. मायक्रोसॉफ्ट (बिल गेट्स), मॅकडोनाल्ड (रे क्रोक) ही स्टार्टअपची अतिशय लोकप्रिय उदाहरणे असून त्यांच्यामुळे स्टार्टअपला एक वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण व्याख्याही मिळाली आहे. ती म्हणजे, ‘ज्याचा नफ्याचा आलेख सतत उंचावत आहे’  तो उद्योग म्हणजे स्टार्टअप! 

सध्या सरकारच्या पातळीवर ‘नवनिर्माण व उद्योजकता‘ ह्या विषयांना खूप महत्त्व आहे. आणि उच्चशिक्षण संस्थांना हे विषय शिकवणे सरकारी पातळीवर अनिवार्य केले गेले आहे. हे विषय आणि त्याला अनुसरून असणारे कार्यक्रम उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये होतात ती नाही याकडे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संस्था डोळ्यात तेल घालून लक्ष देत असते. हा बदल कशामुळे झाला, ते पाहू... 

कॉर्नेल युनिव्हर्सिटी, इनसिड (INSEAD), वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन आणि अन्य काही संस्था मिळून जागतिक स्तरावर प्रत्येक देशाची ‘नवनिर्माण क्रमवारी‘ (Global Innovation Index- GII) ठरवत असतात. वर्ष २००७मध्ये पहिल्यांदा ही जागतिक क्रमवारी मांडली गेली आणि त्यानंतर दरवर्षी ती मांडली जाते. ह्या यादीतील स्थान निश्चित करताना ढोबळमानाने त्या त्या देशाचा नवनिर्माण गुंतवणूक निर्देशांक (input index) व उत्पादन निर्देशांक (output index) लक्षात घेतले जात असतात. आर्थिक क्षेत्र, शाश्वत विकास व बौद्धिक संपत्ती इत्यादी विषयांबाबत धोरणे ठरवणे व धोरणात्मक निर्णय घेणे यासाठी या क्रमवारीचा उपयोग होतो. नवनिर्माणातल्या एककांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासही ही क्रमवारी उपयुक्त ठरते. तसे केल्यास ज्या क्षेत्रांमध्ये देशाची प्रगती होणे अपेक्षित असते त्या क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष घालून, धोरणात्मक बदल करून, प्रगती साधता येते व देशाचे जागतिक क्रमवारीतील स्थान सुधारता येते. 

या क्रमवारीत २०१५मध्ये भारत ८१व्या स्थानावर होता. ताज्या, म्हणजे २०२०च्या क्रमवारीनुसार भारताचे या यादीतील स्थान ४८वे आहे. भारताला पायाभूत सुविधा व सर्जनशील उत्पादने (creative output) व व्यवसाय परिष्कार (business sophistication), व्यवसायाभिमुख मानवीभांडवल ह्या मुद्द्यांवर खूप सुधारणा करण्याची गरज आहे, तर ज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने, बाजार परिष्कार (market sophistication) ह्या मुद्द्यांवर भारत अग्रेसर आहे असा निष्कर्ष या क्रमवारीवरून काढता येतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शैक्षणिक धोरणात नवनिर्माण, उद्योजकता विकास यांना प्राधान्य देण्यात आले आहे, व हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण केली गेली आहे. 

ज्याप्रमाणे विविध देशांचा जीआयआय असतो त्याचप्रमाणे भारतात प्रत्येक राज्याची नवनिर्माण क्षमता नीती आयोग ठरवत असतो. सध्याच्या परिस्थितीवर एक नजर टाकली तर या यादीत कर्नाटक पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिल्या क्रमांकावर दिल्ली तर दुसऱ्या क्रमांकावर चंदीगड आहे. 

‘नवनिर्माण व उद्योजकते‘च्या परिपोषणासाठी योग्य ते पर्यावरण निर्माण करणे व देशाच्या शाश्वत प्रगतीचा मार्ग सुकर करणे हा केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया‘ कार्यक्रमाचा उद्देश आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे संकेतस्थळ बघितल्यास असे दिसून येते की महाराष्ट्रात स्टार्टअपसाठी सगळ्यात जास्त संधी उपलब्ध आहेत. त्यातही सर्वाधिक संधी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये आहेत. स्टार्टअप इंडियाच्या संकेतस्थळानुसार देशात विविध क्षेत्रात १,३०,६३६ स्टार्टअप काम करीत आहेत. देशभरात ६५७ मार्गदर्शक (mentor), ९४ गुंतवणूकदार, ६९२ इनक्युबेटर आणि १५६ ॲक्सिलरेटर या स्टार्टअपना जोडलेले आहेत. 

सुरुवातीच्या काळात स्टार्टअपना जागा उपलब्ध करून देणे, विविध विषयांवर सल्ला देणे, स्टार्टअप इंडियातर्फे आलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना मदत करणे, गुंतवणूकदारांशी आणि त्या त्या क्षेत्रातील यशस्वी, जबाबदार आणि ज्ञानी लोकांशी त्यांची भेट घडवून आणणे अशा प्रकारची मदत इनक्युबेटरकडून नव्या स्टार्टअपना होत असते. एखादा स्टार्टअप व्यवस्थितपणे स्थापन होऊन काम करू लागेल, या दिशेने इनक्युबेटरचे प्रयत्न असतात. या मदतीच्या आधारे स्थापन झालेल्या स्टार्टअपना वृद्धिंगत होण्यासाठी ॲक्सिलरेटरची मदत होत असते. आपल्याकडे विविध क्षेत्रांतील योजनांसाठी जवळ जवळ पंचावन्न सरकारी संस्था कार्यरत आहेत. एकुणातच स्टार्टअप/ नवा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न सरकारकडून होत आहेत. 

उच्चशिक्षण संस्थांचा विचार केल्यास, तंत्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांकडे जशा नवनिर्माणासाठी खूप नवीन कल्पना असल्याचे दिसते तसेच अन्य संस्थांमधल्या विद्यार्थ्यांकडेही उद्योग चालवण्यासाठी आवश्यक ठरणारी जीवनकौशल्ये व प्रावीण्य असल्याचे दिसते. या दोघांचा मिलाफ घडल्यास आपल्याकडे नवनिर्माण व उद्योजकतेला खूप चांगले दिवस येऊ शकतील. तंत्रशिक्षण संस्थांमध्येही आंतरशाखीय प्रकल्पांना उत्तेजन देण्याची गरज आहे.

 

आत्मनिर्भर उद्योजक होण्यासाठी पालकांचीही मानसिक तयारी असावी लागते. कितीतरीवेळा घरच्या जबाबदाऱ्यांमुळेही उद्योजक होण्याची संधी सोडून, नोकरी शोधावी लागते. उद्योजक होण्यासाठी एखादे यशस्वी गणिती सूत्र किंवा हातखंडा यश देणारी एखादी रेसिपी तयार नसली तरी जिद्द आणि हुनर असेल तर सध्याचे वातावरण त्यासाठी पोषक आहे. 

सध्या कुठलाही विषय, कोविड-१९च्या उल्लेखाशिवाय संपू शकत नाही. जगात उलथापालथ करणाऱ्या या साथीने खूप लोकांना अडचणीत आणले, व्यवसाय बंद पडले, अनेकांचे अपरिमित नुकसान केले; तशाच खूप नवीन संधीही निर्माण केल्या आहेत. वैद्यकीय उपकरणे, सेवा या क्षेत्रांमध्ये या साथीने आमूलाग्र बदल घडवले, माहिती व तंत्रज्ञानक्षेत्रही नेहमी प्रमाणे विविध अनुप्रयोग (applications) बनवून आघाडीवर राहिले. औषधनिर्माण, संशोधन क्षेत्रानेही कोविडचे आव्हान स्वीकारून कोविडसाठीच्या चाचण्या, लसनिर्मिती या क्षेत्रांत मोठी कामगिरी नोंदवली आहे.

सीओईपीचे संचालक डॉ. बी.बी. आहुजा, प्रा. डॉ. कर्णिक आणि प्रा. राहूल अढाव यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी झालेल्या दुसऱ्या पुणे स्टार्टअप फेस्टमध्ये १२५ हून अधिक स्टार्टअप सहभागी झाले होते. या फेस्टला ८५हून अधिक गुंतवणूकदार व मार्गदर्शक लाभले होते व स्टार्टअपना सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची हमी आणि ५००हून अधिक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधीही मिळाली होती. 
फेस्टच्या अधिक माहितीसाठीः www.punestartupfest.in

 

संबंधित बातम्या