उत्सव हवा... पण!

सुनील माळी 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

एका बाजूने गर्दी अजिबात न करणे, कडकडीत लॉकडाउननंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत करताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या कोरोनाशी मुकाबला करताना कटाक्षाने पाळणे आवश्‍यक असलेल्या गोष्टी... तर दुसऱ्या बाजूने तोंडावर आलेला लाखोंची गर्दी खेचणारा अन तब्बल १२८ वर्षांची परंपरा असलेला वैभवशाली गणेशोत्सव... 
वेळ आहे भान राखण्याची! 

एका बाजूने गर्दी अजिबात न करणे, कडकडीत लॉकडाउननंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत करताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या कोरोनाशी मुकाबला करताना कटाक्षाने पाळणे आवश्‍यक असलेल्या गोष्टी... तर दुसऱ्या बाजूने तोंडावर आलेला लाखोंची गर्दी खेचणारा अन तब्बल १२८ वर्षांची परंपरा असलेला वैभवशाली गणेशोत्सव... 

या पेचातून सुवर्णमध्य काढण्यासाठी गरजेचे आहे विवेकी समाजमन, उत्सवाच्या कर्त्या-धर्त्यांनी दाखवणे अपेक्षित असलेले सामाजिक भान; तसेच गर्दी न करताही म्हणजे नागरिकांना अगदी घरबसल्या गणेशदर्शन घडवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याची समयसूचकता... 

‘उत्सवच रद्द करा’, अशी एकारलेली मागणी काही जण करण्याची शक्‍यता असली तरी उत्सव साजरा करणे आवश्‍यकच आहे, असे ठामपणाने म्हणता येते. देशातली कोरोनाबाधितांची संख्या रोज पन्नास-पन्नास हजारांनी आणि मृत्यू पाचशे-सहाशेंनी वाढत असतानाही उत्सव झालाच पाहिजे. अशा स्थितीत, उत्सव झालाच पाहिजे, असे म्हणण्याचे कारण काही धार्मिक नाही की सार्वजनिक गणेशपूजनाची परंपरा पाळलीच पाहिजे, अशी परंपरावादी वृत्तीही नाही. कोरोनाच्या मुकाबल्यासाठीच गणेशोत्सव होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी औषधे आणि येऊ घातलेली लस ही जशी गरजेची आहे, तशीच आवश्‍यक आहे सकारात्मक वृत्ती! कोरोनाने समाजमनाला मरगळ आलेली आहे, अनिश्‍चिततेच्या ढगांनी त्याच्यावर गर्दी केली आहे. एका भयाने समाजाला ग्रासलेले आहे. विविध प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या, चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या कोरोनाच्या स्थितीच्या (त्याच त्या पठडीतल्या) बातम्यांचीच चर्चा सर्वत्र होते आहे. एका बाजूने कोण कधी बाधित होईल, याची खात्री नाही. बाधा झाली तर रुग्णालयांत बेड मिळेलच, याचा भरवसा नाही. मिळाला तरी वैद्यकीय लढ्यातून आपण वाचू, याची निश्‍चिती नाही. दुसऱ्या बाजूने लॉकडाउनने कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे रोजगार जाण्याची भीती आहे, रोजचे उत्पन्न कमी झाले आहे आणि भविष्यात दिसणारा अंधार कधी हटणार, हे माहिती नाही. यांतून समाजाला बाहेर काढायचे तर होरपळलेल्या सामान्य माणसाच्या मनावर फुंकर घालण्याची आवश्‍यकता आहे, त्याला आशेची वाट दाखविण्याची, त्याच्या मनाला उभारी देण्याची, त्याला सावरण्याची, या संघर्षात लढण्यासाठी हिंमत देण्याची गरज आहे. हा मानसोपचार गणेशोत्सव समर्थपणे करू शकतो. 

गणेशोत्सवाने समाजमन कोरोनाशी खंबीरपणाने लढू शकतो, हे खरे असले तरी नेहमीच्याच डामडौलात, नेहमीच्याच वातावरणात, दरवर्षीप्रमाणेच गर्दी करून उत्सव साजरा करता येणार नाही, हेही वास्तव आहे. गर्दीने होईल सर्दी म्हणजे सर्दीसारखाच असलेला कोरोना विषाणू फोफावू शकतो आणि सामूहिक संसर्गाची पुढची पायरी आपण वेगाने चढू शकतो, याचेही भान आपल्याला असले पाहिजे. फुटबॉलची मॅच असो, चर्चचा किंवा तबलिगी जमातचा मरकज कार्यक्रम असो, त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढतो, हे जगातील अनेक देशांमधील गेल्या सहा महिन्यांतील घटना पाहता आपल्याला निश्‍चितपणे सांगता येते. त्याच्यापासूनच बोध घेऊन नुकत्याच झालेल्या रमजान ईदच्या सामूहिक नमाजाच्या प्रथेला फाटा देण्याचे सामाजिक दायित्वही पुण्यासारख्या शहरातील समाजाने निभावले आहे. तसेच भान येत्या गणेशोत्सवातही दाखवण्याचे कर्तव्य नागरिकांनी दाखवणे आवश्‍यक आहे. मग ते शहर पुणे असो, मुंबई असो वा कोल्हापूर असो. 

काय करता येईल ? 
... अत्याधुनिक तंत्रज्ञान आता बदलत्या काळानुसार आपल्या हाताशी आले आहे. त्याचा फायदा घेऊन उत्सव अधिक नेटकेपणाने करता येईलच, पण त्याचबरोबर लोकसहभाग हा उत्सवाचा आत्माही साधता येईल. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. गणेशमूर्तीचे दर्शन घेणे, हात जोडून प्रार्थना करणे हा जसा महत्त्वाचा भाग असतो तसाच मंडळांच्या देखाव्यांचा आनंद लुटण्याचाही असतो. या दोन्ही गोष्टी नव्या तंत्राने करता येऊ शकतील. कोरोनाच्या साथीमुळे अनेक कार्यालयातील कर्मचारी वर्क फॉर्म होम म्हणजेच घरून काम करू लागले. कार्यालयातील बैठका बंद पडल्या, तसेच विविध विषयांवरील प्रत्यक्ष परिसंवाद-मेळावे-चर्चासत्रे-व्याख्याने-कार्यशाळांवरही गदा आली. नव्या तंत्रज्ञानाने तिथेही मदत केली. झूमसारख्या ॲपने शंभर जण एकाच वेळी एकत्र येऊ लागले, एकमेकांना पाहू लागले, बोलू लागले. परिसंवाद-मेळावे-कार्यशाळा आदी निर्विघ्नपणे सुरू झाल्या. ‘माझा वेबिनार आहे आज,’ यांसारखी वाक्‍ये आजूबाजूला ऐकू येऊ लागली. काही ॲपवर तर दोन-दोन हजार जण एकाच वेळी एका व्यासपीठावर येऊ शकतात, जॉईन होऊ शकतात. या तंत्राचा उपयोग आपल्याला आपले देखावे सादर करताना होऊ शकतो. 

पुण्यासारख्या शहरातील गणेशोत्सवातील गेल्या काही वर्षांमधील देखावे पाहिले, तर कलाकारांनी सादर केलेले म्हणजेच जिवंत देखावे बऱ्याच ठिकाणी करण्यात आल्याचे लक्षात येईल. या देखाव्यांचे चित्रीकरण करून ते ‘झूम’सारख्या साधनांनी रोज दाखवणे शक्‍य आहे. त्यासाठी पुणेकरांना देखाव्याच्या मांडवापर्यंत यायची गरज उरणार नाही. 

प्रत्येक मंडळाने झूम किंवा तत्सम ॲपवरची मिटींग रोज ठरावीक वेळांना बुक करायची आणि प्रत्येक मिटिंगचा पासवर्ड जाहीर करायचा. दर अर्ध्या तासासाठी वेगळी मिटिंग आणि वेगळा पासवर्ड असेल. त्यात येणाऱ्या पहिल्या शंभर जणांना देखावा पाहता येईल. यापेक्षा अधिक जण सामावून घेतले जाणारे ॲपही आपल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहेत. 

उत्सवात फिरताना, उत्सवातील उत्साही कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे आयटीमधील अनेक तंत्रज्ञ, अभियंते मंडळांचे कार्यकर्ते म्हणून महिनामहिना राबतात. ते याहीपुढचे उपाय सुचवू शकतील. तसेच मंगलमूर्तींचे दर्शन ‘फेसबुक लाइव्ह’सारख्या माध्यमांतून आपल्याला भाविकांना घडवता येऊ शकते. अनेक मंडळांनी आपल्या मूर्ती वर्षभर ठेवण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे. त्याच ठिकाणी मूर्तीची पूजा मांडली जाऊ शकते, वेगळा उत्सवाचा मांडव टाकण्याचीही गरज नाही. काही जणांकडे मूर्तींसाठी अशी व्यवस्था नसेल तिथे मांडव उभारावा लागेल, मात्र मांडव उभारला तरी किंवा उभारला नाही तरी दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी होणार नाही आणि शारीरिक अंतर ठेवूनच भाविक दर्शन घेतील, अशी खास व्यवस्था करावी लागेल. 

मांडवात पाच किंवा दहा जणांनाच एकावेळी प्रवेश देण्याचे बंधन पाळावे लागेल. समाधानाची, कौतुकाची अन आनंदाची बाब पुण्यातील गणेशोत्सवाच्या अनेक प्रमुखांशी बोलल्यानंतर पुढे आली आणि ती म्हणजे सद्यस्थितीचे अचूक भान पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना आहे. प्रत्यक्ष उत्सवाच्या कितीतरी आधीपासूनच अनेक मंडळांचे कार्यकर्ते कोरोनाच्या युद्धात उतरले होते. हातावर पोट असणाऱ्या असंघटित घटकांना रेशन, रोजचे जेवण पुरवणे असो, डॉक्‍टरांना वैद्यकीय किट देणे असो किंवा मास्कचे वाटप करणे असो.. आपापल्या परीने उत्सवाचे कार्यकर्ते कार्यरत असल्याचे दिसत होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर मानाच्या सात गणेश मंडळांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील कोव्हिड केअर सेंटर चालवून या कामावर कळसच चढवला. तसेच कोरोनाबाधितांचा संपर्क झालेल्या व्यक्तींना शोधण्याच्या म्हणजेच ट्रेसिंग करण्याच्या कामामध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी २७५ मंडळांच्या कार्यकर्त्यांची फौजही तयार झाली. बाधित ज्या भागात असतील, त्या भागातील रहिवाशांशी त्या त्या भागातील कार्यकर्त्यांची ओळख असल्याने त्या कार्यकर्त्यांमार्फत त्या व्यक्तींना शोधणे सोपे जाते. त्यामुळे आपापल्या भागात अशी मदत करण्यास कार्यकर्ते तयार झाले, हीसुद्धा खूपच मोठी गोष्ट होती. अनेको कार्यकर्ते स्पेशल पोलिस ऑफिसर म्हणून काम करू लागले. 

प्रत्यक्ष उत्सवही यंदा आरोग्य उत्सव म्हणूनच साजरा होईल, अशीच तयारी सुरू असून ती स्वागतार्हच आहे. दरवर्षीप्रमाणेच मोठा मांडव न उभारता लहान मांडव उभारण्याचा मनोदय अनेकांनी बोलून दाखवला आणि तो प्रत्यक्षातही आणला जात असल्याचे उत्सवाला काही दिवसच बाकी असताना दिसू लागले आहे. ‘ज्या मंडळांचे गणपती वर्षभर मंदिरांत विराजमान झालेले असतात, त्या मंडळांनी मांडव न उभारता आहे त्या मंदिरांतच श्रींची प्रतिष्ठापना करावी,’ या व्यक्त केलेल्या अपेक्षेला पहिला प्रतिसाद दिला तो मानाच्या अखिल मंडई मंडळाने. उत्सवाच्या सुमारे तीन आठवडे आधीच त्यांनी तसे जाहीर केले आणि त्याबद्दल त्या मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आणि त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. मंडई मंडळाची शारदा-गजाननाची मूर्ती वर्षभर कायमस्वरूपी मंदिरात असते आणि त्या मंदिरात भाविकांना सामावून घेतले जाईल, एवढी जागाही आहे. ‘दर्शनासाठी एका वेळी केवळ पाचच जणांना प्रवेश देणार, दर तासाने मंदिरात जंतूनाशकाची फवारणी करणार, रांगेतील भाविकांना एकमेकांपासून लांब राहण्याच्या सूचना देण्यासाठी कार्यकर्ते उभे करणार,’ ही त्यांची योजना इतर मंडळांना आदर्श अशीच ठरली. अर्थात, त्यानंतर अनेक मंडळांनी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरणही केले. हत्ती गणपती मंडळानेही अशाच प्रकारे मांडव रद्द केला आणि कायमस्वरूपी मंदिरातच प्राणप्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे. ‘लॉकडाउनमध्ये अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून या काळात कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करणे योग्य राहील. नोकऱ्या गेलेल्या अनेकांना मदत आवश्‍यक आहे,’ असेही मानकर यांनी सुचविले. 

पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती उत्सवाने नेहमीप्रमाणे मोठा मांडव न उभारता छोटा मांडव उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. या मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणतात, ‘हा लोकोत्सव साध्या पद्धतीने करायचे आम्ही ठरवले. प्राणप्रतिष्ठेची तसेच विसर्जनाची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. उत्सवाआधी धान्यवाटप-अन्नवाटपाचे काम मंडळाने केलेच, पण प्रत्यक्ष उत्सवातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. गणेशाच्या प्रत्यक्ष दर्शनाला न येताच भाविकांना गणेशदर्शन घडेल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. फेसबुकवरून अभिषेकाचे प्रक्षेपण होईल. फर्ग्युसन महाविद्यालयातील कोरोना केंद्राची व्यवस्था आठ मंडळांनी उचलली असून तेथील कोरोनाबाधित तसेच संशयितांना जेवण, चहा-नाश्‍ता, आयुर्वेदाचे उपचारही करण्यात येत आहेत. 
त्याचप्रमाणे त्यांची मानसिक शक्ती वाढण्यासाठी प्राणायाम, योगासने, ध्यानधारणा आदींचेही नियोजन केले आहे.’ 

पुण्यातील सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणपती. त्या ट्रस्टनेही कोरोना वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पावले उचलली. ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संकेतस्थळावरून तसेच फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींच्या माध्यमांतून घरबसल्या गणेशदर्शन घडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे,’ असे या ट्रस्टचे महेश सूर्यवंशी सांगतात. या ट्रस्टने ससून रूग्णालयात तीन हजार जणांच्या भोजनाच्या व्यवस्थेबरोबरच कोरोना साथीशी लढण्यासाठी सात रुग्णवाहिका मोफत दिल्या आहेत. यंदाच्या उत्सवात सजावट रद्द करण्यात आली असून साधा मांडव उभारला जात आहे. त्यात केवळ दर्शन घेण्यासाठीच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. ‘एका वेळेला किती भाविकांना प्रवेश द्यायचा, गर्दी टाळण्यासाठी काय करायचे, याबाबत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या आदेशांची काटेकोररित्या अंमलबजावणीही आम्ही करणार आहोत,’ अशी ग्वाहीही सूर्यवंशी यांनी दिली. 

उत्सव साधेपणाने होणार असल्याची झळ अनेक व्यवसायांना, लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला बसली. उत्सवातील उलाढाल यंदा वीस टक्‍क्‍यांपर्यंत कमी होईल, असा या उत्सवात प्रदीर्घ काळ सक्रियतेने भाग घेणारे कार्यकर्ते आनंद सराफ यांचा अंदाज आहे. अनेक मूर्तिकार, सजावटकार, शिल्पकारांना वर्षातून एकदा हक्काचे मिळणारे काम यंदा मिळणार नसल्याने मंडळांनी तसेच समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी त्याची दखल घ्यावी, अशी तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर यांची अपेक्षा आहे. ते म्हणतात, ‘उत्सवातील मूर्तिकार, सजावटकार, शिल्पकार यांना हा फटका आहेच, पण या कलाकारांना मदत करणाऱ्या अनेक कुटुंबांवरही त्याचा परिणाम झाला आहे. उत्सवात एका मंडळामध्ये साठ ते पासष्ट जणांचे पथक चार महिने काम करत असते. त्यांचे आर्थिक गणित त्यावर अवलंबून असते. मंडळांनी आपल्या कलाकारांना यथाशक्ती मदत केल्यास त्यांनी ती उपयोगी पडेल.’ 

सजावट न करता छोटा मांडव उभारून गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी तुळशीबाग मंडळ घेणार आहे. मांडव उभारला तरी त्याचा वापर सोशल डिस्टन्सिंगसाठी करण्याचे नियोजन काही मंडळांनी केले आहे. तांबडी जोगेश्‍वरी मंडळानेही त्याचाच अवलंब केला आहे. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे राजाभाऊ टिकार देतात.. ‘मांडवाच्या शेजारी रक्तदानासाठी स्वतंत्र मांडव उभारला जाणार असून नऊ दिवस रक्तदान शिबिर घेतले जाईल तसेच मास्क, होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटपही मांडवात करण्यात येईल.’ लक्ष्मी रस्त्यावरील गुरूजी तालीम मंडळानेही सोशल डिस्टन्सिंगच्या पालनावर भर देऊन साधेपणाने उत्सव करण्याचे ठरवल्याचे मंडळाचे प्रवीण परदेशी सांगतात. 

वेधक देखाव्यांबरोबरच सामाजिक उपक्रम राबवणारी अनेक मंडळेही कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवामध्ये वेगळा विचार करत असल्याचे दिसून येते. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, रवींद्र बरिदे यांनी ‘दहा दिवसांत आरोग्याशी निगडित दहा उपक्रम’ करण्याचा संकल्प सोडला आहे, तर आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी मंडळाच्या परिसरातील सर्वांची अँटिजेन चाचणी करण्याचे ठरवले आहे. ‘मंडळांनी आरोग्य उत्सव यंदा साजरा करावा,’ अशी अपेक्षा खडकमाळ आळी मंडळाचे संजय बालगुडे व्यक्त करतात. 

गणेशोत्सव मंडळांकडून गर्दी टाळण्यासाठी अनेक स्तुत्य पावले उचलली जात असली तरी आता नागरिकांचीही जबाबदारी आहे. मंडळांनी मांडव न घालता मंदिरातच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली किंवा छोटा मांडव घातला किंवा सोशल डिस्टन्सिंगसाठी कार्यकर्त्यांची फळी उभी केली तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली तर सगळेच मुसळ केरात जाण्याची शक्‍यता आहे. नागरिकांकडून पहिली अपेक्षा अशी, की शक्‍यतो ज्या मंडळांच्या गणेशाचे, देखाव्याचे दर्शन घरीच बसून अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने पाहता येणे शक्‍य आहे, अशा मंडळांजवळ जाऊच नये. तसेच एका मंडळाकडून दुसऱ्या मंडळाकडे जातानाही एकमेकांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्याचे भान हवे. पुण्याचे उदाहरण पाहिले तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू गेनू मंडळ, अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग मंडळ या एकाच भागात असलेल्या नावाजलेल्या मंडळांची सजावट पाहण्यास नागरिक मोठी गर्दी करतात. काही ठिकाणी तर एकमेकांना अगदी खेटून जावे लागते, एवढी गर्दी उत्सवाच्या अखेरच्या दिवसांत होते. अशी गर्दी झाली तर सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडेल आणि कोरोनाची लागण वेगाने होईल. त्यासाठी प्रशासनानेही या मंडळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरूनही दहा-पंधरा जणांना एका वेळी सोडण्याची यंत्रणा उभारण्याची आवश्‍यकता लक्षात येते. 

सार्वजनिक उत्सवाप्रमाणेच घरोघरी बसवल्या जाणाऱ्या श्रींच्या पद्धतीतही यंदापुरता बदल नागरिकांनी करण्याची गरज आहे. देवघरातील पूजेच्या छोट्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठापना करून प्रत्यक्ष विसर्जनाची मूर्ती आणणे टाळले तर खूप फरक पडू शकतो. सार्वजनिक उत्सवाप्रमाणेच घरच्या गणेशाचे विसर्जनही रद्द करता आले, तर ते परिणामकारक ठरेल. 

... हे होऊ शकेल, यंदाचा गणेशोत्सव कोरोनाचे विघ्न वाढवणारा नव्हे तर ते परतवून लावणारा ठरेल याचे कारण सामाजिक जबाबदारीची जाणीव असणारे समाजमन जागे असल्याची वाटत असलेली खात्री आणि विश्‍वास!

संबंधित बातम्या