‘कोरोना’ विषाणूचा उगम शोधताना...

सुरेंद्र पाटसकर
सोमवार, 28 जून 2021

कव्हर स्टोरी

कोरोनाचा संसर्ग चीनमधील वुहानमधून जगभरात पसरल्याला आता दीड वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. कोरोनाच्या संसर्गाला कारणीभूत असलेला ‘सार्स-कोव्ह-२’ या विषाणूचे उगमस्थान कोणते हे अजूनही निश्चितपणे सांगता आलेले नाही... 

वटवाघळांमधील कोरोना विषाणूशी ‘सार्स-कोव्ह-२’ (कोविड-१९) या विषाणूचे साधर्म्य आहे. परंतु, त्यावेळी त्याचा प्रसार मानवात झाला नव्हता. प्राण्यांकडून माणसाकडे या विषाणूचा प्रवास झाला असे सुरुवातीच्या काळात मानण्यात येत होते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रसार हा वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही प्रयोगशाळा असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर झाला. म्हणजेच वटवाघळांमध्ये हा विषाणू सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे एक हजार मैल अंतरावरून याचा प्रसार सुरू झाला. त्यामुळे प्रयोगशाळेतूनच हा विषाणू बाहेर पडला (किंवा मुद्दाम बाहेर नेला) असेल ह्या शक्यतेची शंकाा बळावली. यापूर्वीही प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर गेल्याने त्यांचा प्राण्यांद्वारे माणसांमध्ये प्रसार झाल्याची उदाहरणे आहेत. वानगी दाखल उल्लेख करायचा झाला तर ‘एच१एन१’ फ्लूच्या (बर्ड फ्लू) लाटेचा करता येईल. त्या लाटेत जगभरातील सात लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला होता. 

पशुजन्यरोगांचा सिद्धांत
‘सार्स-कोव्ह-२’चे मूळ कशात आहे याबाबतची चर्चा कोरोनाचा संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध करण्यात आलेल्या दोन लेखांमुळे सुरू झाली. पहिला लेख १९ फेब्रुवारी २०२०च्या ‘द लॅन्सेट’ या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला होता. सुमारे २७ शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या प्रबंधामध्ये कोरोनाचे मूळ शोधण्याच्या चिनी शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचा उल्लेख करण्यात आला होता. याचे मूळ नैसर्गिक नसल्याचा दावा त्यात खोडून काढला होता. सुरुवातीच्या काळातील घटनाक्रमाची संगती जुळवून हा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र कोरोनाचा संसर्ग निसर्गतःच झाला हे सांगणारे वैज्ञानिक पुरावे त्यात मांडण्यात आले नव्हते. 

मार्च २०२०मध्ये आणखी एक लेख ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. त्यात या संसर्गाचे मूळ नैसर्गिक असल्याचा दावा करण्यात आला. कोरोनाच्या आधीच्या विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल केल्याचे पुरावे नसल्याचे त्यात म्हटले होते. मात्र, गेल्या वर्षभरामध्ये चीनमधील विविध भागांतून ३०हून अधिक प्रजातींच्या प्राण्यांचे ८० हजार नमुने तपासण्यात आले. ते सर्व ‘निगेटिव्ह’ आले.

प्रयोगशाळेतून प्रसाराचा सिद्धांत
हा सिद्धांत मांडणारे पहिले प्रबंध ‘डीसेंट्रलाईज्ड रॅडिकल ऑटोनॉमस सर्च टीम इन्व्हेस्टीगेटिंग कोविड-१९’ अर्थात ‘ड्रास्टिक’ या गटामार्फत लिहिण्यात आले होते. कोरोना विषाणू प्रयोगशाळेतच तयार केला गेला आणि तेथूनच त्याचा प्रसार झाला असा दावा करणारा लेख ‘सायन्स’ या नियतकालिकात १३ मेच्या अंकात लिहिण्यात आला होता. तेव्हापासून याची चर्चा जास्त सुरू झाली. या लेखाखाली १८ शास्त्रज्ञांच्या स्वाक्षरी होत्या व ‘सार्स-कोव्ह-२’ या विषाणूचा उगम कोठे झाला याचा सखोल तपास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये याच आशयाचे लेख ‘पीअर-रिव्ह्यूड’ या विज्ञान नियतकालिकात लिहिण्यात आले. त्या दोन्ही लेखांमध्ये एटिनी डेक्रोली हे सहलेखक होते. याबाबत दोन शक्यता वर्तविण्यात आल्या. एक म्हणजे जाणीवपूर्वक हा विषाणू तयार केला गेला असावा व त्याचा प्रसार जगभरात केला गेला आणि दुसरी शक्यता म्हणजे प्रयोगशाळेत प्रयोग सुरू असताना अपघाताने तो प्रयोगशाळेबाहेर गेला असावा व तेथूनच तो मानवापर्यंत पोहोचला असावा. वुहान येथील प्रयोगशाळेमध्ये जंगली प्राण्यांवर तसेच उंदरावर विषाणूंचे प्रयोग करण्यात येतात. मूळच्या विषाणूंमध्ये प्रयोगशाळेत बदल घडवून त्यांच्या चाचण्या प्राण्यांवर घेतल्या गेल्या. 

पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. मोनाली रहाळकर आणि बायफ रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे डॉ. राहुल बहुलीकर यांनी विविध संशोधन प्रबंध आणि जैवमाहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाचा सर्वांत जवळचा नातेवाईक ‘आरएटीजी१३’ हा विषाणू कुठून आला असावा, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माहितीनुसार ‘आरएटीजी १३’ हा विषाणू एका तांब्याच्या खाणीमधील वटवाघळांमध्ये २०१२ मध्ये आढळला होता. ही खाण चीनमधील युनान प्रांतातील मोजियांग येथे आहे. या खाणीत २०१२ च्या सुमारास सहा खाणकामगार ही खाण स्वच्छ करण्यासाठी गेले होते. त्यांना वटवाघळांची विष्ठा आणि इतर घाण साफ करावी लागली होती. त्यानंतर ते श्वसनाच्या त्रासामुळे आजारी पडले. पुढील एक-दोन आठवड्यांमध्ये या सहा कामगारांपैकी तीन कामगार मृत्युमुखी पडले. या कामगारांना झालेला रोग वटवाघळांमधील विषाणूमुळे झाला असावा, असा निर्वाळा सार्स आणि कोविड मधील आजारावरील मुख्य तज्ज्ञ चीन मधील डॉ. झोन्ग ननशांग यांनी दिला होता. एका चिनी विद्यार्थिनीने तिच्या प्रबंधात या खाण कामगारांच्या आजाराचे विश्लेषण केले आहे. त्यातील रोग्यांच्या ‘क्ष-किरण’ आणि ‘सीटी स्कॅन’चे साम्य कोरोना विषाणूशी असल्याचा निर्वाळा पुण्यातील ‘क्ष-किरण’ तज्ज्ञ डॉ. आनंद रहाळकर यांनी दिला आहे.

ज्या खाणीत पहिल्यांदा विषाणू सापडला ती खाण बंद केली आहे, असे सांगण्यात येते. तरीही, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि चीनमधील इतर संस्थांतील तज्ज्ञ या खाणीला नियमित भेट देत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या भेटींमध्ये तेथील वटवाघळांच्या विष्ठेचे आणि अन्य नमुने वुहान प्रयोगशाळेत आणले जात होते. वुहानची प्रयोगशाळा वेगवेगळ्या विषाणूचे नमुने आणि जिवंत विषाणू साठवून ठेवते. या प्रयोगशाळेत त्याच्या जनुकीय माहितीमध्ये बदल करून त्याचे त्या विषाणूच्या वेगवेगळ्या प्राण्यांना संसर्ग करण्याच्या क्षमतेमध्ये झालेल्या बदलांवर संशोधन करण्यात येते. त्यामुळे नोव्हेल कोरोना विषाणू हा त्या प्रयोगशाळेतील एक प्रयोग तर नाही ना, असाही संशय आहे.

आणखी काही निरीक्षणे

  • चीनमध्ये कोरोनाच्या विषाणूवर ‘रेट्रो इंजिनिअरिंग’ केल्याचा ब्रिटिश प्राध्यापक एंगस डल्गलिश आणि नॉवेचे वैज्ञानिक डॉ. बिर्गर सोरेनसेन यांचा अभ्यासाअंती दावा.
  • कोरोनाचे मूळ शोधण्यात संयुक्त राष्ट्रांनाही अपयश
  • संयुक्त राष्ट्रांच्या पाहणी समितीतील सदस्यांची नावे चीनने फेटाळल्याने संशय
  • न्यूयॉर्कमधील ‘इकोहेल्थ अलायन्स’चे अध्यक्ष पीटर डॅसझॅक यांनी वुहान प्रयोगशाळेला निधी पुरविल्याचा संशय
  • चीनने निवडक माहितीच जगासमोर मांडली
  • वुहान प्रयोगाशाळेत गोठवलेल्या ‘आरएबीटीकोव्ह-४९९१’ विषाणूचे (नंतर याचे नाव ‘आरएटीजी१३’ असे केले) कोरोना विषाणूशी ९६.२ टक्के साधर्म्य
  • ‘आरएटीजी१३’ विषाणूवर २०१२ ते २०१५ या कालावधीत वुहान प्रयोगशाळेत प्रयोग; नवा विषाणू तयार करून उंदरांवरही चाचण्या
  • वुहानमध्ये संसर्ग झाल्यानंतर प्रयोगशाळेचा ताबा चिनी लष्करातील जैवसुरक्षा वैज्ञानिक चेन वेई यांच्या पथकाने घेतला.

संबंधित बातम्या