आरोग्य व्यवस्थेची सत्त्वपरीक्षा 

योगिराज प्रभुणे 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

बरोबर सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा महाभयंकर उद्रेक झाला. त्यामुळे राज्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः अशक्त झाली. एकाच वेळी हजारो रुग्णांच्या प्राणांवर हे कोरोनाचे संकट बेतले आहे. त्यामुळे सध्याची देशातील स्थिती कोणत्याही विनाशकाली युद्धापेक्षा कमी नाही. यात सर्वांत आरोग्य व्यवस्थेची मात्र सत्त्वपरीक्षा सुरू आहे. 

आपल्या घरात स्वतःचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण किती गुंतवणूक करतो? मग, ती पैशाच्या रूपाने असो, की वेळेच्या! आपल्या घरातील किती जण नियमित आरोग्य तपासणी करतात? कोणताही आजार होऊ नये यासाठी स्वतःच्या तंदुरुस्तीकडे प्रकर्षाने लक्ष देतात? अचानक उद्‍भवणाऱ्या आरोग्याच्या खर्चाच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य विमा आपण उतरवतो का? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ‘हो’ असेल तर तुम्ही आरोग्य-साक्षर आहात, असे म्हणू शकता. पण, आपल्या राज्यातील ६७ टक्के जणांनी या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असे दिले आहे. हा निष्कर्ष पुण्यातील आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या पाहणीतून पुढे आला आहे. आपण आपल्या आरोग्याकडे ज्या दृष्टीने बघतो, तसेच आपले राज्यकर्तेही पाहतात. त्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्पात आरोग्यावर अगदीच तुटपुंजी तरतूद केली जाते. सामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्यामध्ये भरीव आर्थिक तरतूद झाली पाहिजे. सरकारचा आरोग्य खर्च सध्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या १.३ टक्का आहे. चांगल्या आरोग्यसेवेसाठी हा खर्च किमान पाच टक्के असला पाहिजे, अशी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे. पण, भारतात गेल्या ४० वर्षांमध्ये आरोग्यावरील आर्थिक तरतूद एक ते सव्वा टक्का यापेक्षा पुढे गेली नाही. हे झाले देशाचे चित्र. 

महाराष्ट्र हे देशातील सधन राज्यांपैकी एक महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे उत्तर भारतातील ‘बिमारू’ राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे त्यातल्या त्यात चांगली आरोग्य व्यवस्था आहे, हे निश्‍चित मान्य करायला पाहिजे. पण, आपल्यापेक्षाही चांगली व्यवस्था तामिळनाडू आणि केरळमध्ये आहे. मात्र, या कोरोनाच्या उद्रेकाने आपल्या आरोग्य व्यवस्थेचा ‘क्ष’ किरण काढल्याचे दिसते. 

उद्रेकाची सुरुवात 
आपल्या देशाचा शेजारी असलेल्या चीनमधील वुहान शहरात नवीन कोरोना विषाणूंचा उद्रेक झाल्याचे डिसेंबरमध्ये घोषित झाले. चीनच्या इतर शहरांबरोबरच जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्येही कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होऊ लागले. आपण चीनचे शेजारी असल्याने आपल्या देशात संसर्गाचा धोका वाढणे स्वाभाविकच होते. त्यामुळे जानेवारीपासून मुंबईसह महानगरांमधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्वेक्षण सुरू केले. ताप, सर्दी, खोकला असलेल्या प्रवाशांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवायचे. त्यांची प्रयोगशाळा तपासणी (लॅब टेस्ट) करायची. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे का, याची यातून खात्री करायची, असे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झाले. 

राज्यातील उद्रेक 
मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्यासह महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढू लागला होता. कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या दिशेने उसळी घेत होता. आतापर्यंत केरळ, राजस्थानातील पर्यटकांना कोरोना विषाणूंच्या संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. काही दिवसांतच हैदराबाद शहरातही कोरोनाचा रुग्ण आढळला. महाराष्ट्र राज्यासाठी - पुण्यासाठी ही धोक्‍याची घंटा होती. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरांवर विषाणूंचा पहिला हल्ला होईल, अशी शक्‍यता एव्हाना साथरोग तज्ज्ञांकडून वारंवार वर्तविण्यात येत होती. ९ मार्चला राज्यातील पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर वेगाने एका मागोमाग एक रुग्णांचे निदान होऊ लागले. गेल्या सहा महिन्यांमध्ये लाखोंनी रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपूर्वी आपल्या भागातील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे ऐकत होतो. पण, आता हा संसर्ग आपल्या दारापर्यंत आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे ही शहरे ‘हॉटस्पॉट’ ठरली. मात्र, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसते. उलट, पुण्यातील कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्याची तीव्रता वेगाने विस्तारत आहे. त्यातून पुणे हे देशातील सर्वांत मोठे हॉटस्पॉट झाले आहे. सर्वाधिक रुग्ण या शहरात असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. 

प्रतिबंधाची त्रिसूत्री, उपचार तंत्र 
वारंवार हात स्वच्छ धुणे (निर्जंतूक करणे), सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क ही कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री आहे. मात्र, एकदा कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर लवकर निदान, तात्काळ वर्गवारी करणे आणि त्यानुसार प्रभावी उपचार याच आधारावर कोरोनाचा मृत्यूदर कमी करता येतो. कोरोना विषाणूंच्या संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी वर्गवारी केली जाते. लक्षणे नसणारे रुग्ण, सौम्य लक्षणांचे रुग्ण, मध्यम आणि अत्यवस्थ अशा प्रकारच्या वर्गवारीच्या आधारावर उपचार करण्यात येत आहे. कोणत्या टप्प्यावर कोणते उपचार आणि त्यासाठी कोणत्या वैद्यकीय चाचण्या करणे आवश्‍यक आहे, हे निश्‍चित केले आहे. त्यामुळे निदान झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीतील प्रत्येक वैद्यकीय निकषांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आव्हान सध्या डॉक्टरांपुढे आहे. दाखल झालेल्या रुग्णाची प्रकृती बिघडणार नाही, तो त्यातून बरा होईल, यासाठी कोणत्या टप्प्यावर कोणत्या औषधांचा वापर करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

फुप्फुस हीच कोरोनाची युद्धभूमी 
कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम आक्रमण करतो तो मानवाच्या श्वसन संस्थेवर. त्यातून फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. या कोरोनाविरोधातील युद्धात वैद्यकीय तज्ज्ञांसाठी फुप्फुस हीच युद्धभूमी असते. जगभरात कोरोनाबाधीत सर्व रुग्णांचे मृत्यू अतिदक्षता विभागात (आयसीयू) झाले आहेत. कोरोना रुग्णांचे व्यवस्थापन ‘आयसीयू’मध्ये कसे करायचे, याचे आव्हान सध्या अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांपुढे आहे. कारण, आयसीयूमध्ये एक बरोबर एक असे समीकरण कधीच नसते. तिथे एक बरोबर सहा असे समीकरण असते. कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सुरुवातीला न्यूमोनिया म्हणून येतो. पण, त्याच्या मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी झालेली असते, यकृताचे काम थांबण्याचा धोका असतो, हृदय बंद पडण्याची शक्‍यता असते, तो रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. फुप्फुसाचे कार्य कमी होते. त्याचा परिणाम मेंदूसह वेगवेगळ्या अवयवांना प्राणवायू पुरविण्याच्या व्यवस्थेवर होतो. या सगळ्यांमुळे कोरोनाच्या युद्धात फुप्फुस हा उपचाराचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याची कार्यक्षमता शक्‍य तितक्‍या लवकर वाढवता येईल, यावर उपचारपद्धतीवर आता जगभरातील आयसीयूतज्ज्ञ संशोधन करत आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी काही रुग्ण अत्यवस्थ होतात. त्यांना दम लागतो. रुग्ण स्वतः श्वासोच्छवास करू शकत नाहीत. अशा वेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवासासाठी व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. पण, त्यात सामान्य व्हेंटिलेटर निरुपयोगी ठरतात. त्यासाठी फुप्फुसाचे कार्य परिणामकारकपणे करतील अशा अद्ययावत व्हेंटिलेटरची गरज असते. 

व्हेंटिलेटरर्सची सज्जता हवीच 
कोरोना विषाणूंच्या संसर्गाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी योग्य व्हेंटिलेटर्सचा तुटवडा यावर गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आता आली आहे. कोरोना उद्रेकामुळे झालेले लॉकडाउन, ठप्प झालेली आर्थिक उलाढाल याप्रमाणेच योग्य व्हेंटिलेटर्स रुग्णांना गरजेच्या वेळी उपलब्ध होतील, यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. 

इराण, इटली, न्यूयॉर्क येथील थरकाप उडविणाऱ्या दृश्‍यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेथील रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांनी पूर्ण भरली. रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्स कमी पडू लागले. हीच अवस्था सध्या महाराष्ट्रातील पुण्यात दिसत आहे. रुग्णांना उपचारांसाठी दाखल करायला हॉस्पिटलमध्ये बेड नसतो. वेळेत पुरेसा ऑक्‍सिजन मिळत नाही. रुग्णांना दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नाहीत. अशा आरोग्याची सत्त्वपरीक्षा पाहणाऱ्या काळातून आपण सगळे जात आहोत. 

व्हेंटिलेटर कशासाठी? 
आपण श्वास आत घेतो त्यावेळी फुप्फुसाचे स्नायू फुगतात. त्यातून आत घेतलेल्या हवेमुळे छातीच्या पोकळीत निगेटिव्ह प्रेशर तयार होते. याला व्हेंटिलेशन असे म्हणतात. सामान्य व्हेंटिलेटरच्या माध्यमातून फुप्फुसात हवा फक्त ढकलली जाते. त्यासाठी रुग्णाच्या श्वसनमार्गात ट्युब टाकली जाते. त्याद्वारे रुग्ण श्वासोच्छवास करतो. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णाला ॲक्‍युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) तयार होतो. त्यातून फुप्फुसाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे सामान्य व्हेंटिलेटरला मर्यादा पडते. कारण, या रुग्णाला फक्त ऑक्‍सिजन द्यायचा नसतो, तर फुप्फुसाचे कार्य करणाऱ्या व्हेंटिलटरची गरज असते. 

कोरोनाच्या संसर्गाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रगत व्हेंटिलेटर हे प्रभावी अस्त्र असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना सर्वसामान्य व्हेंटिलेटरला खूप मर्यादा असल्याचे दिसते. व्हेंटिलेटर म्हणजे उपचार नाही, हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवे. अत्यवस्थ रुग्णाचे निश्‍चित रोगनिदान होत असताना त्याचे प्राण वाचविण्यासाठी ही एक प्रकारची सपोर्ट सिस्टीम आहे. त्यामुळे डॉक्टरांना अचूक रोगनिदान आणि त्यानुसार उपचाराची दिशा ठरविण्यासाठी काही वेळ मिळतो. अशा वेळी रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रगत व्हेंटिलेटरची गरज असते. 

लसीच्या प्रतीक्षेत 
प्रत्येक भारतीय कोरोना प्रतिबंधक लसीची अतिशय आतुरतेने वाट बघतो आहे. भारतात तीन लसींच्या ट्रायल सध्या सुरू आहेत. त्याच्या मानवी चाचण्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या वर्षाच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोना विषाणूंना प्रतिबंध करणारी लस येईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. 

ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी, अँस्टॅजेनेका आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या ‘कोविशिल्डर’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी पुण्यात सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात लसीची सुरक्षितता बघण्यात येते. त्यासाठी देशभरात शंभर स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. या टप्प्याच्या निष्कर्षाचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर केंद्राने मान्यता दिल्यास तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू होतील. त्यात लसीची परिणामकारकता तपासली जाणार आहे.  

संबंधित बातम्या