एका बाबाची धमाल तारांबळ

अदिती पटवर्धन
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

‘वेब’वॉच

लग्नाला साधारण १२-१३ वर्षं झालेलं एक मध्यमवर्गीय जोडपं... आई-बाबा, दोन मुली आणि एक मुलगा असा लहानसा टुकीचा संसार. बाबाचा बांधकामाचा व्यवसाय आणि आई घराकडे पाहते... अशा काहीशा निवांत, अनेक वर्षांचं ठरावीक ‘रुटीन’ बसून गेलेल्या एका कुटुंबात अचानक घराकडं आणि मुलांकडं पाहण्याची जबाबदारी जेव्हा बाबावर येऊन पडते तेव्हा काय काय धमाल उडते, हे दाखवणारी वेबमालिका ‘मॅन विथ अ प्लॅन’!

पहाटे उठायचं, एकीकडे दूध-नाश्त्याची तयारी करायची, दुसरीकडे मुलांना उठवायचं... स्वयंपाक करून त्यांच्या, बाकीच्यांच्या डब्यांची सोय करायची, शिवाय त्यांचं वेळेत आवरतंय ना याकडे एक डोळा ठेवायचा, जरा लहान मूल असेल तर दप्तर भरणं वगैरे तयारी करून द्यायची... त्यांना शाळेत सोडायला-आणायला जायचंच, शिवाय त्यांचे दिवसभरातले क्लास, वेगवेगळ्या खेळांचे सराव आणि इतर तत्सम गोष्टी लक्षात ठेवून (एकापेक्षा जास्त मुलं असतील तर प्रत्येकाचं वेळापत्रक वेगवेगळं लक्षात ठेवून) तिथंही त्यांना आणायला-सोडायला जायचं... दुपारच्या वेळात घरातली बाकीची कामं उरकायची... संध्याकाळी मुलं घरी आली की पुन्हा त्यांचा अभ्यास, त्यांचं, घरातल्या बाकीच्यांचं खाणंपिणं, हे सगळं सांभाळायचं... आणि या सगळ्यातून वेळ उरलाच तर स्वतःला थोडा वेळ द्यायचा, असा सर्वसाधारण कोणत्याही गृहिणीचा व्यग्र दिनक्रम असतो, तसाच ‘मॅन विथ अ प्लॅन’ या अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध असलेल्या वेबमालिकेतील अँडीचाही आहे. 

अनुक्रमे साधारण बारा, आठ आणि चार अशा वयाच्या तीन मुलांमध्ये तिचा वेळ पूर्णपणे बांधलेला आहे. अॅडम, तिचा नवरा, बांधकाम व्यावसायिक आहे आणि त्याच्या भावाबरोबर मिळून एक बांधकाम कंपनी चालवतो. अॅडम आणि अँडी हे एकमेकांच्या खूप प्रेमात असणारे नवरा-बायको असले तरी घरकाम आणि मुलांच्या संगोपनात अॅडमचा वाटा नगण्य आहे, हे उघडच आहे. अशात अँडीला तिच्या जुन्या ऑफिसमधून पुन्हा कामावर रुजू होण्याबद्दल विचारणा होते आणि या कुटुंबांच्या सामाईक आयुष्यात एक मोठाच बदल घडतो. अॅडम अँडीला प्रोत्साहन देतो, पण आपल्यावर बरीच जबाबदारी पडेल, हे लक्षात आल्यावर जरा कचरतो. मुलांनासुद्धा आईची सवय झाल्यामुळे त्यांचाही विरोध असतो.. पण इतक्या वर्षात तिचं काम भयानक ‘मिस’ करणारी अँडी मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते आणि साहजिकच तिच्यावर मनापासून प्रेम करणारा अॅडम तिचा निश्चय बघून मात्र ही मोठी जबाबदारी स्वीकारतो. आपल्या कामाच्या वेळा सांभाळून मुलांची जबाबदारी उचलायची असं तो ठरवतो खरं, पण हे सगळं किती अवघड आहे, आणि आपण संध्याकाळी आल्यावर आपल्यासमोर ‘गोग्गोड’ वागणारी आपली बाळं किती उद्योगी आणि आळशी आहेत, हे त्याला पहिल्याच दिवशी समजतं!

ॲडमला घरची, मुलांची सगळी जबाबदारी स्वीकारून एकच दिवस झालाय. तो उत्साहानं मुलांना तयार करून, त्यांच्या नाश्त्याची सोय करून त्यांना शाळेत सोडतो. त्यानंतर ऑफिसला जाऊन काम करून येताना मुलांना पिकअप करतो. मुलं गाडीत बसल्या बसल्या ‘भूक लागली, खूप भूक लागली’ असा आरडाओरडा करायला लागतात. अॅडम त्यांना शांत करायचा प्रयत्न करतो, पण छोटी एमी लगेच म्हणते, ‘आई आम्हाला घरी पोहोचेपर्यंत खायला गाडीतच स्नॅक्स द्यायची...’ हार मानायला तयार नसलेला अॅडम त्यांना बाहेरून खायला घेऊन देतो. घरी आल्यावर पोरं खाण्याची पाकिटं, कोल्ड ड्रिंकचे टीन असा सगळा कचरा गाडीत तसाच टाकून घरात निघून जातात. वैतागलेला अॅडम तो कचरा नीट कचरापेटीत टाकून आत येतो तो तिन्ही पोरं त्यांच्या बॅगा, बूट, पुस्तकं हॉलमध्ये अस्ताव्यस्त टाकून आपापल्या रूममध्ये जाऊन फोनमध्ये गुंगलेली असतात. सगळा पसारा एकट्यानं आवरेपर्यंत पार संध्याकाळ होते. पुढचे दोन तीन दिवस सगळं असंच सुरू राहतं, आपण सांगून, ओरडून काहीच उपयोग होत नाही हे पाहिल्यावर अॅडमला लक्षात येतं की आता ‘उंगली तेढी’ करायची वेळ आलीय. अशी एकच गोष्ट आहे ज्याशिवाय आपली मुलं जगूच शकत नाहीत, आणि ती म्हणजे इंटरनेट, हे अॅडमच्या लक्षात येतं आणि तो एक शक्कल लढवतो. घरातल्या वायफायचा पासवर्डच बदलून टाकतो. घरी पोहोचल्या पोहोचल्या ‘ऑफलाइन’ झालेली पोरं सैरभैर होतात आणि अॅडम शांतपणे त्याची ‘ऑफर’ जाहीर करतो, ‘गाडीतला कचरा साफ करा, आपापली दप्तरं, मोजे-बूट आणि पुस्तकं जागेवर ठेवा, कटकट न करता दूध प्या, मगच पासवर्ड मिळेल!’ आणि स्वतः बियरचा ग्लास घेऊन निवांत सोफ्यावर बसतो!

अशा छोट्या छोट्या मजेदार प्रसंगांतून ही मालिका पुढं सरकत जाते. हळूहळू अॅडम या जबाबदारीत मुरत जातो, मुलांच्या शाळेतही वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या उचलायला लागतो. या प्रवासात घडणारे धमाल प्रसंग आपणही मजेत पाहत राहतो. ‘सिटकॉम’ म्हणजे प्रासंगिक विनोदनिर्मिती करणाऱ्‍या मालिकांच्या प्रकारातली ही मालिका असल्यामुळं अजिबात कंटाळवाणी किंवा उपदेशात्मक नाही. शिवाय अवघ्या २०-२५ मिनिटांचे एपिसोड पटकन बघून होतात!

या मालिकेतली मला स्वतःला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे यात दाखवलेलं अॅडम आणि अँडीचं नातं! लग्नानंतर इतक्या वर्षांनीसुद्धा त्यांच्यातलं प्रेम अगदी तसंच टिकून आहे, आणि मुख्य म्हणजे हे दोघं एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते एकमेकांची टिंगल करतात, एकमेकांना हसतात, एकमेकांच्या चुका दाखवून देतात, अधूनमधून एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्नसुद्धा करतात, पण एकमेकांचा आदरही करतात. मुलांचे पालक म्हणून एकमेकांच्या मतांचा, निर्णयांचा आदर करतात आणि कोणताही निर्णय एकत्र चर्चा करून मगच घेतात! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करायला मागेपुढे पाहत नाहीत. 

या सगळ्या प्रवासात अॅडम आणि अँडीच्या मुलांच्या हळूहळू मोठं होण्याचे, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्‍या बदलांचेही आपण साक्षीदार होतो. पालकांनी मुलांविरुद्ध संप पुकारणं, केट डेटिंग सुरू करतेय हे ऐकून अॅडमचं भयानक ‘प्रोटेक्टिव्ह’ होणं, ख्रिसमस ट्रिपचा प्लॅन अचानक रद्द होणं, मुलांचे दोन्ही बाजूचे आजीआजोबा अचानक आमनेसामने येणं, मुलांच्या डोक्यात उवा झाल्या आणि यावेळी त्यांच्याबरोबर माझ्या डोक्यात उवा झाल्या नाहीत म्हणजे मी चांगली आई नाही या काळजीनं अँडीचं हैराण होणं, एमीनं लपवून पाळलेला साप सापडल्यावर उडणारा गोंधळ, हे एपिसोड विशेष धमाल आहेत. बरेच सीझन चालणाऱ्‍या इतर बऱ्‍याच मालिकांप्रमाणे इथंसुद्धा पुढचे सीझन सगळ्यांना फारसे आवडतीलच असं नसलं, तरी पहिले दोन सीझन मात्र आवर्जून पाहावे असे आहेत.

बाबानं खरंच घरकामाची आणि मुलांची निम्मी जबाबदारी घेतली, तर आधी उडणारी साहजिक तारांबळ या मालिकेत दाखवलीय, हे खरंच; पण त्याहीपेक्षा पुढं जाऊन, बाबानं खरंच प्रयत्न केला आणि या सगळ्या जबाबदाऱ्‍या खऱ्या अर्थानं उचलल्या, तर ते संपूर्ण कुटुंबासाठी किती चांगलं ठरू शकतं, हे दाखवलंय! त्यासाठी या मालिकेचं विशेष कौतुक!

संबंधित बातम्या