वेगळ्या विषयाचे वेगळे पैलू

अदिती पटवर्धन
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

‘वेब’वॉच

एखाद्या लहान मुलानं नाटकात सिंड्रेला व्हायचं ठरवलं, तर कुजबूजत, कधी खुलेपणानं; तर कधी फक्त मनातल्या मनात “मुलगा सिंड्रेला होणार? काय बायल्या आहे का?” अशी जी पहिली प्रतिक्रिया उमटते, तीच ती मनात चुकचुकणारी पाल नेटफ्लिक्सचा ‘अ किड लाईक जेक’ हा सिनेमा अचूक पकडतो आणि या विषयावर अधिक खोलात जाऊन, तार्किक विचार करायला आपल्याला भाग पाडतो.

तुमचा चार वर्षांचा मुलगा परीकथांनी भारावून जात असेल तर? त्याला राजकन्यांच्या गोष्टी प्रचंड आवडत असतील तर? त्या गोष्टी तो पुन्हा पुन्हा सगळ्या जामानिम्यासह अभिनित करून दाखवत असेल तर? त्या कथेतल्या पात्रांसारखे कपडे घालून तयार व्हायला त्याला आवडत असेल तर?

तुम्ही म्हणाल, की त्यात काय एवढं? सगळ्याच लहान मुलांना परीकथा आवडतात की!

पण तुमचा मुलगा जर परीकथेच्या या नाटुकल्यामध्ये राजपुत्र न होता सिंड्रेला, रुपुंझेल आणि स्नो व्हाइट होत असेल तर?

हां... हीच ती... कधी कुजबूजत, कधी खुलेपणानं; तर कधी फक्त मनातल्या मनात “मुलगा सिंड्रेला होणार? काय बायल्या आहे का?” अशी जी पहिली प्रतिक्रिया उमटते, तीच ती मनात चुकचुकणारी पाल नेटफ्लिक्सचा ‘अ किड लाईक जेक’ हा सिनेमा अचूक पकडतो आणि या विषयावर अधिक खोलात जाऊन, तार्किक विचार करायला आपल्याला भाग पाडतो.

चार वर्षांच्या जेकची आई ॲलेक्स ही मुळात वकील आहे, पण गेली काही वर्षं पूर्णवेळ घर आणि जेककडे बघते आहे. जेकचा बाबा ग्रेग हा मानसोपचारतज्ज्ञ असून समुपदेशक म्हणून काम करतो. चारचौघांसारखा असलेला जेक कमालीचा प्रतिभाशाली आहे, तो नव्या नव्या गोष्टी रचतो, त्या उत्तम प्रकारे सादर करू शकतो. त्यामुळे तो शाळेत ‘ड्रेस अप कॉर्नर’मध्ये तासनतास रमतो, किंवा घरी असताना आईच्या उंच टाचांच्या चपला घालून आणि तिची पर्स घेऊन खेळतो, ही गोष्ट ग्रेग किंवा अलेक्स दोघांनाही फार काही वावगी वाटत नाही. एकेका वयात एकेक वेड असायचंच काहीतरी, ही ‘फेज’ जाईल काही महिन्यांनी आणि नवं काहीतरी त्याची जागा घेईल, असा त्यांचा त्याकडे बघण्याचा सोपा दृष्टिकोन.

अशातच काही दिवसांनी जेकची शाळा बदलण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू होते आणि एखाद्या उत्तम खासगी शाळेची भरमसाट फी भरण्यासाठी जेकला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी ॲलेक्स आणि ग्रेग प्रयत्न करायला सुरुवात करतात. हजारो मुलांमधून निवडक मुलांनाच शिष्यवृत्ती मिळू शकते आणि त्यासाठी काहीतरी वेगळेपणा आपल्या मुलाच्या फाइलमध्ये असायला हवा आणि त्यासाठीच त्याच्या ‘ह्या वेगळेपणा’वर भर द्यावा असं जेकच्या शाळेची मुख्याध्यापिका सुचवते. असं केल्यामुळे शिष्यवृत्तीसाठी येणाऱ्या भरमसाठ आवेदनांमधून जेक ‘उठून दिसेल’ आणि त्याला शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता वाढेल, हा तिच्या या सल्ल्यामागचा हेतू. 

आता एका बाजूला जेकसाठी जे योग्य आहे ते करायला हवं, त्याच्या भविष्याचा विचार करायला हवा या गोष्टीचा दबाव या जोडप्यावर आहे; तर दुसरीकडे त्याला या सगळ्या प्रक्रियेत कळत-नकळत एका चौकटीमध्ये बंदिस्त तर केलं जाणार नाही ना ही काळजी... या कात्रीत दोघं सापडलेत. ॲलेक्स या कल्पनेच्या पूर्णपणे विरोधात आहे; तर ग्रेगचं मत मात्र आपण याबाबतीत एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, असं आहे. या सगळ्या तणावांमुळे साहजिकच त्यांच्या नात्यातले इतरही काही विसंवादाचे मुद्दे पुढे येऊ लागतात आणि बघता बघता हे हसरं कुटुंब बदलून जातं.

मुळात हा सिनेमा जे प्रश्न विचारतो आणि उभे करतो, ते आपल्याकडे कधी विचारातच घेतले जात नाहीत, असं मला वाटतं. आपल्या मुलाचा लिंगभावाचा कल कोणत्या दिशेला आहे, याविषयी तार्किक चर्चा तर फारच दूरची गोष्ट! लहान असताना मुलगा निखळ उत्सुकतेनं जरी स्वयंपाक, मेकअप, आईचे कपडे-चपला याकडे ओढला गेला, तरी त्यामागचं कारण समजून न घेता त्याला ‘मुलीसारखं काय वागतोस’ असं म्हणून त्याला जाणीवपूर्वक त्या गोष्टींपासून दूर केलं जातं आणि नकळतच मुलग्यांच्या (आणि मुलींच्याही) मनावर ‘अमुक गोष्टी मुलींनी करायच्या, अमुक गोष्टी मुलांना शोभत नाहीत, मुली अशा दिसतात, मुलांना असं वागावं लागतं’ यांसारख्या गोष्टी बिंबवल्या जातात. बरेचदा पालकांचा यामागचा हेतू हा खरंतर फक्त आपल्या मुलांची कोणी चेष्टा करू नये हा असतो. चारचौघात असं काही यानी केलं आणि सगळे त्याला हसले, काहीबाही बोलले तर?

ॲलेक्स आणि ग्रेग स्वतः मुळात लिंगभाव, समलैंगिकता आणि या विषयांशी निगडित इतर अनेक मुद्द्यांबाबत जागरूक आहेत, ग्रेग स्वतः समुपदेशक आहे आणि अतिशय शांत, समंजस असलेला ग्रेग अजिबातच पुरुषार्थाचा आव आणणारा ‘माचो मॅन’ वगैरे नाही... पण तरीही... त्यांचा लहानगा जेक जेव्हा हॅलोवीनच्या सणाला ‘ट्रिक ऑर ट्रीट’ या प्रथेसाठी जवळपासच्या शेजाऱ्‍यांच्या घरी रुपुंझेल होऊन जायचं म्हणतो, तेव्हा मात्र त्या दोघांनाही इतर मुलं त्याला चिडवतील का, आणि त्याही पुढे जाऊन त्याला त्रास देतील का किंवा वाळीत टाकतील का, हीच काळजी लागून राहते आणि त्यापोटी ते त्याला रुपुंझेल होऊन जायला नकार देतात.

चित्रभाषेपेक्षाही शब्दांतून अधिक बोलणारा हा सिनेमा मूळच्या याच नावाच्या नाटकावर बेतलेला आहे. कदाचित त्यामुळे असेल, पण संवादांना या सिनेमात जास्त महत्त्व दिलेलं दिसून येतं. असं असलं तरीही जो मुद्दा हा चित्रपट उचलून धरतो, त्यामुळे तो महत्त्वाचा ठरतो. संवाद, उत्तम अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

ज्या जेकविषयी हे सगळं घडतंय, तो मात्र या सिनेमामध्ये जवळ जवळ ऑफ-कॅमेरा आहे. लाँग शॉट्स, सिलोएट्स, सॉफ्ट फोकस असलेले शॉट्स अशी छायाचित्रणातली तंत्रं वापरल्यामुळे जेक हा बऱ्‍याच अंशी आपल्याला एका अंधूक आकृतीच्या स्वरूपात दिसतो. अर्थातच, हा अतिशय जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. मूळ नाटकात जेक हे पात्रच कधी प्रेक्षकांसमोर येत नाही, तर सिनेमात तो येतो तो फक्त एका धूसर आकृतीच्या स्वरूपात... मुळात जी काही मानसिक उलथापालथ सुरू आहे, जो कोलाहल निर्माण झालेला आहे, यात जेक कुठंच नाहीये. तो त्याच्या विश्वात मश्गूल आहे, त्याला जे आवडतं ते तो करतो, त्यात त्याला आनंद मिळतो आणि तीच गोष्ट त्याला करता आली नाही, तर तो नाराज होतो, चिडतो, रडतो. बास. या सगळ्याला जोडून आलेली त्रैराशिकं त्याच्यासाठी अजून अस्तित्वातच नाहीत. ती आहेत फक्त त्याच्या आई बाबांसाठी, कारण त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे, तो जेकचं भविष्य ठरवणार आहे. 

मुळात इतक्या संवेदनशील विषयाला हात घातल्याबद्दल लेखक-दिग्दर्शकाचं कौतुक. ज्याप्रमाणे लिंग आणि लिंगभाव आणि त्यांचं एकमेकांवर असलेलं किंवा नसलेलं अवलंबित्व याबद्दल असलेली अनभिज्ञता किंवा अनास्था जितकी हानिकारक आहे, त्याचप्रमाणे या गोष्टीविषयी जागरूकता दाखवतानाच अवेळी लेबल लावण्याची घाई करणंसुद्धा योग्य नाही, हे हा सिनेमा दाखवून देतो. खरंतर लहान वयात मुलांवर कोणतंच लेबल न लावता त्यांना फक्त असू देणं आणि त्यांना स्वतःला जाणून घ्यायला वाव देणं, एवढंच अपेक्षित असतं. ग्रेग आणि ॲलेक्सनासुद्धा चित्रपटाच्या शेवटाकडे हेच उमगतं आणि ते जेकला फक्त ‘असू द्यायचा’ निर्णय घेतात. शेवटच्या दृश्यात एका झळाळत्या सकाळी ‘टुटू’ म्हणजेच बॅले नृत्यांगना घालतात तसा छोटासा फ्रील्स असलेला स्कर्ट घातलेल्या जेकला घेऊन ग्रेग आणि ॲलेक्स बाहेर पडतात आणि खुशीत असलेला जेक दोघांचा एकेक हात हातात घेऊन उड्या मारत मारत चालताना दिसतो, तेव्हा आपल्यालाही ते उमजून जातं, जे त्या दोघांना उमगलंय!

 

संबंधित बातम्या