विलक्षण, विक्षिप्त आणि वल्ली!

अदिती पटवर्धन
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

‘वेब’वॉच

पूर्वी हिंदी मालिका म्हटलं, की त्यातल्या नायिकांची एक विशिष्ट अशी ‘इमेज’ होती. गोरी, दिसायला रूढार्थानं सुंदर, सडपातळ आणि स्वतःचं असं काही व्यक्तिमत्त्व नसलेली अशीच नायिका असायची. मालिकेमध्ये तिचं काम हे फक्त नायकाची कथा पुढं नेणं, एवढंच असायचं. तिची स्वप्नं, आकांक्षा मध्यात ठेवून कधीच मालिका लिहिल्या जात नसत. पण आता मात्र टीव्हीवर काय किंवा ओटीटीवर काय, बदल घडताना दिसतोय. खऱ्याखुऱ्या, आपल्याला जवळच्या वाटतील अशा नायिका आणि त्यांच्या कथा आपल्याला पाहायला मिळतायत. सुमुखी सुरेश या कॉमेडीयननं लिहिलेली आणि प्रमुख भूमिका केलेली ‘ॲमेझॉन प्राइम’वरची मालिका ‘पुष्पवल्ली’ ही अशीच एक उल्लेखनीय मालिका!

नावातलं साधर्म्य हा निव्वळ योगायोग असला तरी पुष्पवल्ली ही अक्षरशः एक ‘वल्ली’ आहे! भोपाळमध्ये राहणाऱ्‍या एका तामिळ कुटुंबातली विशीतली ही पुष्पवल्ली. तिचे बाबा आता नाहीत, आई आणि ती अशा दोघीचं कुटुंब. तिनं फूड सायन्समध्ये बी.एस्सी. केलंय. एका सेंद्रिय कृषी उत्पादनांविषयीच्या एका परिषदेत वक्ता म्हणून आलेल्या निखिल रावशी वल्लीची ओळख होते. त्यांची छान मैत्री होते, थोडंसं फ्लर्टिंग होतं आणि आठवड्याभरानंतर तो पुन्हा बंगलोरला परततो. इथे वल्ली मात्र त्याच्यासाठी झुरायला लागते. पण नुसतं झुरत बसणं काही हिच्या स्वभावात नाही; त्यामुळे त्याच्या शोधात ती थेट बंगलोर गाठते. निखिलच्या कंपनीपासून अगदी जवळ तिचा शाळेतला एक मित्र पंकज छोट्या मुलांसाठीचं एक छोटेखानी ग्रंथालय चालवतो, अशी कुणकूण हिला लागते. त्याला पटवून ही तिथं काम करायला लागते, जेणेकरून निखिलवर लक्ष ठेवता येईल आणि हा सगळा एक मोठ्ठा योगायोग असल्याचं भासवून, त्याच्याशी मैत्री वाढवून त्याचं रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. 

आता मुळात या मुलाकडे तिनं इतकं का आकर्षित व्हावं, असा प्रश्न कुणालाही पडेल. याचं उत्तर देताना अगदी सहजपणे सुमुखी ‘गोरी आणि सडपातळ’ या समाजमान्य पठडीत न बसणाऱ्‍या आणि त्यामुळेच कायम त्याविषयीचा न्यूनगंड मानत बाळगणाऱ्या मुलींचे प्रश्न उलगडून सांगते. कॉलेजच्या स्वप्नं पाहण्याच्या, प्रेमात पडण्याच्या वयातसुद्धा वल्लीला कोणी प्रियकर नाही, कधीच नव्हता आणि याचं कारण तिचं दिसणं आहे, असं तिला वाटतं. मुलांना सडपातळ नसणाऱ्‍या मुली आवडत नाहीत असा तिचा अनुभव आहे, आणि त्यामुळेच जेव्हा निखिलसारखा अतिशय देखणा मुलगा तासनतास तिच्याशी मनापासून गप्पा मारतो आणि चक्क थोडंफार फ्लर्टिंगसुद्धा करतो तेव्हा तो तिच्या आयुष्यात आलेला असा पाहिलाच मुलगा असतो. हे त्याच्याबद्दल वाटणारं जे ‘कुछ कुछ’ आहे, त्याचं रूपांतर आपण जर अधिक भेटलो, एका शहरात राहिलो तर प्रेमात नक्की होऊ शकेल, असं तिला वाटतं.

अर्थात, साध्या सरळ आकर्षणातून सुरू होणारी ही कथा कमालीची वळणं घेत, निवडक; पण जमून आलेल्या व्यक्तिरेखांच्या सोबतीनं घडणाऱ्‍या अनेक विनोदी प्रसंगांतून पुढे सरकत सरकत एका वेगळ्याच ठिकाणी येऊन पोहोचते. वल्लीच्या सरळ साध्या आकर्षणाचं रूपांतर सारासार विचारहीन आसक्तीत कधी होतं हे तिचं तिलाच कळत नाही. अतिशय घट्ट बांधणी असलेली पटकथा, चटपटीत संवाद आणि कमाल जमून गेलेली पात्रं ही या ‘डार्क कॉमेडी’ प्रकारात मोडणाऱ्या मालिकेच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळेच वल्ली कितीही वेड्यासारखं वागली आणि आपल्याला जरी ते अजिबात पटलेलं नसेल, तरीही आपण उत्सुकतेनं मालिका पुढे बघत राहतो.

सुरुवातीला साधी सोपी आणि स्वप्नाळू वाटणारी वल्ली हळूहळू तिच्या या वेडेपणात वाहवत जाताना दिसते. निखिलच्या अपरोक्ष त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना भेटणं असो, त्याच्या बरोबर वेळ घालवता यावा आणि त्याच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली व्हावी यासाठी त्याच्या कुत्र्याला पळवणं असो किंवा टी बॉयकरवी त्याच्या घराचे सीसीटीव्ही कॅमेरे मॉनिटर करणं... हळूहळू हे सगळं हाताबाहेर जायला लागतं आणि वल्लीच्या चांगलंच अंगाशी येतं. अर्थातच, इतक्यात हार मानेल ती वल्ली कसली! दुसऱ्‍या सीझनमध्ये ती पुन्हा याच मिशनवर पुन्हा कामाला लागते आणि आता या मालिकेच्या तिसऱ्‍या सीझनची तयारी सुरू आहे.

पुष्पवल्लीचं पात्र सुमुखीनं उत्तम वठवलं आहे. मूळ कल्पना तिचीच असल्यामुळे वल्ली तिला आतून-बाहेरून पूर्ण उमगलेली आहे, हे कळून येतं. बोलताना तोंडात फक्त शिव्या असणारा, पण मनानं प्रेमळ असणारा पंकज, वल्लीला निखिलची माहिती पुरवणारा आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याच्या वल्लीच्या वेडाचारात तिची साथ देणारा ‘टी बॉय’, वल्लीला पाऽऽशुपल्ली म्हणून हाक मारणारी आणि सगळ्यांच्या उद्योगांवर बारीक लक्ष ठेवणारी तिच्या पीजीची मालकीण वासू, वल्लीला तिच्या अवास्तव कामगिरीत वेळोवेळी मदत करणाऱ्‍या पीजीमधल्या दोन विक्षिप्त पोरी, वल्लीची आई ज्यांची भक्त आहे ते गुरुजी आणि त्यांचा कमालीचा उद्धट शिष्य... सगळीच पात्रं अगदी लक्षात राहणारी आणि कथेला पुढं नेणारी आहेत.

प्रेक्षकाला खळखळून हसवणारी प्रासंगिक विनोदनिर्मिती, प्रहसनं, स्लॅपस्टिक कॉमेडी किंवा उपहासात्मक विनोदाची आपल्याला सवय आहे, पण ‘डार्क कॉमेडी’ हा जॉनर मात्र आपल्याकडे अजून तितकासा प्रचलित नाही. ‘जाने भी दो यारो’ किंवा ‘दिल्ली बेली’ यासारखे काही अपवाद वगळता या प्रकारात फार काम आपल्याकडे झालेलं नाही. असं असताना या प्रकारातली मालिका तयार केल्याबद्दल सुमुखी सुरेश आणि दिग्दर्शिका डेबी राव यांचं कौतुक करायला हवं.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद करावासा वाटतो. जरा आठवून पाहिलं, तर लक्षात येतं की एखादी जाड स्त्री मुख्य पात्र म्हणून जेव्हा जेव्हा प्रेक्षकांच्या समोर आली आहे, तेव्हा एकतर तिच्या जाड असण्यामुळे तिथं विनोदनिर्मिती करण्यात आलेली आहे, किंवा तिच्याबद्दल प्रेक्षकाला कणव वाटावी, अशा पद्धतीनं ती भूमिका लिहिण्यात आली आहे. पुष्पवल्ली मात्र ही चौकट मोडून काढते. एका जाड मुलीला मुख्य भूमिकेत ठेऊन लिहिलेली विनोदी मालिका असूनसुद्धा जेव्हा कुठल्याच प्रसंगात विनोदनिर्मितीसाठी तिचं ‘जाड असणं’ वापरावं लागत नाही, तेव्हा खऱ्या अर्थानं लेखिकेची आणि दिग्दर्शिकेची या माध्यमावरची पकड लक्षात येते. पुष्पवल्ली एक माणूस म्हणून आपल्याला उलगडत जाते, आणि त्यामुळेच ही मालिका एका जाड मुलीबद्दलची विनोदी मालिका न राहता, तिची स्वप्नं, तिच्या आकांक्षा, तिचा वेडेपणा आणि त्यामुळे निर्माण होणारे विचित्र पेचप्रसंग याबद्दलची मालिका होते आणि हेच या मालिकेचं खरं यश आहे, असं मला वाटतं. 

या मालिकेची आणखी एक जमेची बाजू आणि वेगळेपणा म्हणजे पुष्पवल्लीचं या मालिकेत ‘हिरॉईन’ आणि ‘अ‍ॅण्टी-हिरॉईन’ यामधल्या सूक्ष्म रेषेवर झुलत राहणं. एका बाजूला आपल्याला या हुशार, तरतरीत, जिद्दी, पण प्रेमाच्या बाबतीत दुर्लक्षित, एकाकी पोरीविषयी कमालीची कणव वाटते, तिच्याशी रिलेट होता येतं, पण दुसऱ्‍या बाजूला सारासार विचाराचा पूर्ण अभाव, योग्य अयोग्य यातला फरक न कळणं आणि इतरांच्या आयुष्यावर आपल्या वागण्याचा काय परिणाम होईल याबद्दलची बेफिकिरी तिच्यातले दुर्गुणसुद्धा ठळकपणे समोर येतात आणि आपला गोंधळ उडतो. एकतर साखरेत घोळवलेल्या नायिका किंवा कमालीच्या दुष्ट आणि क्रूर खलनायिका या दोन टोकांवरची स्त्री पात्रं पाहायची सवय असलेल्या आपल्याला ही आपल्यातली वाटणारी, चुका करणारी, स्वतःला जे हवं आहे ते मिळवायची जिद्द असणारी ही पुष्पवल्ली अतिशय आवडून जाते, हे नक्कीच! 

संबंधित बातम्या