पिरियड. एन्ड ऑफ सेंटेन्स!

अदिती पटवर्धन
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021


‘वेब’वॉच

‘पिरियड. एन्ड ऑफ सेंटेन्स’ हा ऑस्कर विजेता माहितीपट आपल्याला सर्वसामान्य बायकांच्या माध्यमातून घडत असलेल्या अशा ‘शांतीत क्रांती’चे साक्षीदार करतो.

‘पिरियड म्हणजे काय माहितीय?’
कॅमेऱ्यामागून प्रश्न येतो. येत राहतो.

समोर बसलेल्या व्यक्ती बदलत राहतात. बदलत नाही, ती त्यांची प्रतिक्रिया.

मुली किंवा बायका असतील, तर लाजून चूर होणं, पिरियड म्हणजे काय माहीत असूनही ‘लाज वाटते सांगायला’ असं उत्तर देणं.. आणि पुरुष असतील तर संपूर्ण अनभिज्ञता, किंवा ‘तो बायकांचा आजार असतो’ यासारखी उत्तरं.

मग प्रश्न हळूहळू अधिक वर्णनात्मक उत्तरं मागू लागतात. ‘का येतात पिरियड बायकांना?’ आधी लाजून ओढणीनं तोंड झाकून घेणाऱ्‍या बायकांना बोलतं करायलाच फार वेळ प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर जेव्हा त्या जरा बोलायला लागतात तेव्हा, ‘काय माहिती कशामुळे... देवालाच ठाऊक आहे सगळं. आम्हाला तर एवढंच माहितीय, की खराब रक्त बाहेर टाकलं जातं महिन्याच्या महिन्याला...’ किंवा ‘ते बाळ होण्यासाठी असतं एवढंच माहितीय’ अशीच उत्तरं मिळतात. या सगळ्यातून दिसत राहते ती स्त्रीच्या आयुष्यातल्या इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टीविषयीची अनास्था आणि अज्ञान.

अरुणाचलम मुरुगनंथम या संशोधकानी स्वस्त परवडण्याजोगे सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅड तयार करण्याचं मशीन तयार केलं आणि ग्रामीण भागातल्या बायकांना या माध्यमातून परवडण्यासारख्या किमतीत पॅडबरोबरच रोजगारसुद्धा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भारतात मोठी चळवळ उभी केली. त्यांच्या

आयुष्यावर आधारलेला ‘पॅड मॅन’ हा अक्षय कुमारचा सिनेमा रिलीज झाला आणि त्या निमित्तानं या विषयावर काही प्रमाणात का होईना सार्वजनिक परिघात चर्चा शक्य झाली. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेला ‘पिरियड. एन्ड ऑफ सेंटेन्स’ हा ऑस्कर विजेता माहितीपट आपल्याला सर्वसामान्य बायकांच्या माध्यमातून घडत असलेल्या अशा ‘शांतीत क्रांती’चे साक्षीदार करतो.

पिरियड म्हणजे काय याचे उत्तरसुद्धा नीट देता न येणाऱ्‍या, पॅड फक्त जाहिरातीतच पाहिलेल्या या बायका हळूहळू स्वतः पॅड तयार करून, घरोघरी जाऊन विकायला लागतात, त्याचे डेमो देऊ लागतात आणि शेवटी अभिमानानं ‘आम्ही उद्योजिका झालोय, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालोय याचा आम्हाला आनंद वाटतो’ असं सांगतात तेव्हा ‘Women empowerment’ म्हणतात ती हीच, हे आपल्याला अगदी सहज उमगतं. एखाद्या वेबसीरिजच्या एका एपिसोडएवढी अवघी वीस मिनिटांची लांबी असणारा हा माहितीपट पाहण्यासाठी थोडासा वेळ नक्की काढायला हवा. कारण उत्तर भारतातल्या हरपुर नावाच्या या छोट्याशा गावातल्या बायकांचा हा प्रवास बघण्यासारखा आहे.

या माहितीपटाइतकीच या माहितीपटामागची गोष्ट विलक्षण आहे. नॉर्थ हॉलिवूडमधल्या ओकवूड या खासगी शाळेतल्या विद्यार्थिनींनी या सिनेमाची आणि यामागे असलेल्या ‘द पॅड प्रोजेक्ट’ या उपक्रमाची निर्मिती केली आहे. हेलेन येन्सर या पंधरा वर्षांच्या मुलीनं शिक्षिका असलेली तिची आई, मेलीसा बर्टन हिच्याबरोबर संयुक्त राष्ट्रांद्वारा आयोजित एका परिषदेला भेट दिली. या परिषदेत भारत, अफगाणिस्तान, नायजेरिया यासारख्या देशांत मासिक पाळी हा ‘टॅबू’ म्हणजेच ‘निषिद्ध’ विषय समजला जातो आणि या विषयाभोवतीच्या अंधश्रद्धा यावर चर्चा घडवून आणण्यात आली होती. अनेक मुलींना या लाजेखातर आणि पॅड उपलब्ध नसल्यामुळे कशी शाळा सोडावी लागते, याविषयी हेलननं तिच्या मैत्रिणींशी चर्चा केली आणि त्यातूनच या मुलींनी पॅड तयार करणाऱ्‍या मशीनसाठी पैसे उभे करायला सुरुवात केली.

या माहितीपटामागची टीम म्हणजे या शाळकरी मुलींच्या उत्साहानं भारावून गेलेले त्यांचे पालक. निर्माते गॅरेट शिफ हेसुद्धा असेच एक पालक. त्यांनीच फिल्म स्कूलमधून नुकताच डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेल्या पंचवीस वर्षीय रायका झेबाटची हिला दिग्दर्शन करायला पाचारण केलं.

‘हा प्रवास अनुभवणं हे खरंच विलक्षण होतं. आम्ही पहिल्यांदा ज्यांच्याशी बोललो त्या कधीही घराबाहेर न पडलेल्या, पाळीच्या वेळी बाजूला बसणाऱ्‍या, पॅड न वापरलेल्या, पाळीच्या नावानंसुद्धा लाजणाऱ्या मुली - बायका होत्या... आणि पहिल्या फेरीनंतर सहा महिन्यांनी जेव्हा आम्ही परत भारतात आलो, तेव्हा याच सगळ्या नवउद्योजिकांनी मिळून अठरा हजार पॅड तयार केली होती आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग कसं करावं याचा विचार त्या करत होत्या. आम्ही जो कमालीचा बदल स्वतः अनुभवला, तोच आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता,’ रायका सांगते.

या माहितीपटात वस्तुस्थितीचं केवळ कोरडं चित्रण नाही, तर या बायकांच्या कथा, इच्छा - आकांक्षा यातून त्यांचं माणूसपण आपल्याला उमगत जातं. छोटे छोटे क्षण खूप काही सांगून जातात. वीस वर्षांची चटपटीत स्नेहा आपल्याला पोलिस व्हायचं आहे असं अभिमानाने सांगते. कशासाठी, असं विचारल्यावर पटकन म्हणते, ‘शादी से बचने के लिये.. यहां गाव में शादी हो गयी मतलब औरत की तो लाईफ खतम!’ पूर्वी याच गावातून दिल्लीत पोलिस म्हणून लागलेल्या एका मुलीचा आदर्श तिच्या डोळ्यांसमोर आहे. ‘उसे पहले कोई नही पेहचानता था, अब पूरा तालुक पेहचानता हैं.. उसके बाबा को भी अब उसके नाम से सब जानते हैं.. मुझे भी ऐसे ही बडा होना हैं, आझाद होना हैं।’ स्वतः तयार केलेले पॅड विकून स्नेहा दिल्लीमध्ये पोलिस परीक्षेसाठीच्या कोचिंग क्लासची फी भरतेय. बाकीच्या बायकांचा अनुभवसुद्धा काहीसा असाच आहे.

आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच सगळ्यांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला आहे. पूर्वी दुकानात जाऊन पॅडची किंमत विचारायलासुद्धा लाजणाऱ्या बायका आता त्याच दुकानात जाऊन आमचे पॅड विकायला ठेवणार का असे विचारतात, घरोघरी जाऊन ते विकतात... आता त्यांना त्यांच्या घरातसुद्धा मान मिळू लागला आहे, असं त्या आनंदानं सांगतात.

हा माहितीपट भारतीय व्यक्तींनी तयार केलेला नसल्यामुळे एका वेगळ्या लेन्समधून आपलीच संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. असं असलं, तरी या माहितीपटात कुठंही ‘बघा ह्या बिचाऱ्‍या अडाणी बायका’ असा सूर दिसत नाही. याविषयी बोलताना हेलन म्हणते, ‘ बघा या गरीब गावांत किती अंधश्रद्धा आहेत, पाळीविषयी किती चुकीच्या कल्पना आहेत, असं आम्हाला ठासून सांगायचं नव्हतं, तर त्यांच्या आयुष्यात होणारा सकारात्मक बदल दाखवायचा होता. शिवाय, मासिक पाळीविषयी चुकीच्या कल्पना आणि लाज सगळीकडेच आहे, अगदी न्यू यॉर्कमध्येसुद्धा! ही परिस्थिती थोड्याफार फरकानं सगळीकडेच आहे.’ ती म्हणते ते खरंच आहे. अजूनही मासिक पाळीच्या बाबतीत जगभरात मोठ्या प्रमाणावर गैरसमज आणि अंधश्रध्दा पाहायला मिळतात. त्यातही शहर आणि गाव यात तफावत दिसून येते. पाळी सुरू असताना देवळात जायचं नाही, घरातल्या कुणाला स्पर्श करायचा नाही, स्वयंपाक करायचा नाही, घरातल्या पुरुषांच्या नजरेस पडायचं नाही... एक ना अनेक प्रथा-परंपरांच्या आधारानं या नैसर्गिक आणि संपूर्णपणे नॉर्मल गोष्टीबद्दल समज-गैरसमज गेल्या अनेक वर्षांपासून पसरत गेले आहेत...

पुणे-मुंबईसारख्या शहरातसुद्धा ज्या दुकानात बायका विक्रेत्या आहेत अशीच मेडिकलची दुकानं सॅनिटरी नॅपकिन विकत घेण्यासाठी शोधणाऱ्या मुली आपण पाहतो, तिथं गावा-गावांत काय परिस्थिती असेल? याचं मूळ अर्थातच समाजात असलेल्या ‘टॅबू’मध्ये आहे. आता परिस्थिती थोडीफार बदलते आहे, ‘पॅड मॅन’सारखा सिनेमा, गूंज, मेन्स्ट्रुपीडिया यासारख्या संस्थांचं गावा-गावात चालणारं काम, पाळीच्यावेळी मेन्स्ट्रुअल कप किंवा कापडी पॅड यासारखी पर्यावरणपूरक साधनं वापरण्याविषयी हळूहळू वाढणारी जागरूकता.. यामुळे हा विषय ‘नॉर्मलाइज’ होतोय. ऑस्करसारखा मोठा पुरस्कार मिळालेल्या या माहितीपटामुळे ही जागरूकता वाढण्यात आणखी थोडा हातभार लागला आहे, हे नक्कीच!

संबंधित बातम्या