गुणी मुलींचा एल्गार

अदिती पटवर्धन
सोमवार, 20 डिसेंबर 2021

‘वेब’वॉच

एखादी सीरीज पाहताना ही नक्कीच फिक्शन म्हणजे कल्पित कथेवर आधारित असणार असं वाटतं. ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध असलेली ‘गुड गर्ल्स रिव्होल्ट’ ही मालिका पाहायला सुरुवात केल्यावरसुद्धा ‘ही नक्कीच फिक्शन असणार’ असं वाटून गेलं.. पण तितकीच चीड ही मालिका सत्य घटनांवर आधारित आहे, हे कळल्यावर आली!

‘गुड गर्ल्स रिव्होल्ट’ मालिका पाहताना आपण साठच्या दशकाच्या शेवटाकडे न्यू यॉर्कमधल्या ‘न्यूज ऑफ द वीक’ या मासिकाच्या कार्यालयात शिरतो. वेगवेगळ्या भूमिकांची ओळख करून घेत असताना आपल्याला समजतं, की इथं बायका ‘रिसर्चर’ म्हणजे संशोधक आहेत आणि पुरुष आहेत ‘जर्नलिस्ट’ म्हणजेच पत्रकार! एका बातमीवर किंवा लेखावर एक जर्नलिस्ट आणि एक रिसर्चर मिळून काम करतात, बातमीच्या मुळाशी जाण्यासाठी झटतात, मेहनत करतात, लेखसुद्धा एकत्र लिहितात; पण लेखाच्या ‘बायलाईन’मध्ये, म्हणजेच लेखावर लेखक म्हणून फक्त जर्नलिस्टचं, म्हणजे अर्थातच पुरुषाचं नाव असतं! एका पत्रकारासाठी बायलाईन ही किती महत्त्वाची गोष्ट असते, हे पत्रकारच जाणतात. बायकांनी कितीही महत्त्वाचं काम केलं असलं, तरी त्यांचं नाव लेखावर छापलं जात नाही. याचं कारण दिलं जातं की ‘लेखिकेला श्रेय दिलं तर त्या लेखाची विश्वासार्हता कमी होईल...’ 

ही मालिका ज्या खऱ्या घटनेवर आधारित आहे, ती अशी - सन १९६९-७०च्या आसपास प्रसिद्ध न्यूजवीक मासिकाच्या कार्यालयात एका घटनेमुळे खळबळ माजली. या मासिकासाठी काम करणाऱ्‍या ४६ बायकांनी ‘इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी कमिशन’ म्हणजेच सर्वांना नोकरीमध्ये समान संधी उपलब्ध होण्यासाठीच्या समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्‍या आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. स्त्रियांना कामावर घेताना आणि पदोन्नती देताना मोठ्या प्रमाणात भेदभाव होत असल्याची ही तक्रार होती. यात सहभागी झालेल्या लिन पोविच या पत्रकारानं हा वृत्तांत ‘द गुड गर्ल्स रिव्होल्ट’ या पुस्तकात मांडला. यात भाग घेणाऱ्‍या बऱ्‍याचशा महिला सर्वसामान्य घरातल्या, राजकारणात रस नसणाऱ्‍या किंवा त्याबद्दल फारसं काही मत नसणाऱ्‍या, साधारणतः ‘बंडखोर’ प्रकारात न मोडणाऱ्या अशा होत्या. त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या अनुभवांतून पोळून, आपल्याला सततच कुणातरी पुरुषासाठी डावललं जातं या परिस्थितीला कंटाळून हे पाऊल त्यांनी उचललं. त्यामुळेच ही कथा अधिक प्रेरणादायी ठरते. या स्त्रियांनी पुकारलेल्या एल्गारामुळे मोठा बदल घडला. सेक्रेटरीच्या पदावर रुजू झालेली पोविच १९७५ साली या मासिकाची पहिली महिला वरिष्ठ संपादक झाली.

सत्यकथेवर आधारित असली तरी ‘गुड गर्ल्स रिव्होल्ट’ या कथेचं काही प्रमाणात कल्पित रूपांतर आहे. डॅना काल्वो हिने या सीरिजचं रूपांतर आणि दिग्दर्शन केलं आहे. या गोष्टीत काही खऱ्या आणि काही कल्पित भूमिकांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. ‘न्यूज ऑफ द वीक’मध्ये रीसर्चर म्हणून मन लावून काम करणाऱ्‍या हुशार मुली जेन आणि पॅटी, जिला लेखिका व्हायचं आहे अशी स्लोगन लिहिणारी लाजाळू सिंडी, आणि नवीनच रुजू झालेली नोरा (प्रसिद्ध पत्रकार, लेखक आणि चित्रपटकार नोरा एफ्रॉन) आपल्याला पहिल्याच एपिसोडमध्ये भेटतात. नोरानं लिहिलेला लेख संपादक जाहीररीत्या वाचून दाखवतो, त्याचं कौतुक करतो. आपण हा लेख लिहिला असल्यामुळे या लेखाच्या बायलाईनमध्ये आपलं नाव असावं ही अपेक्षा नोरा सर्वांसमोर व्यक्त करते. लेख तिनं लिहिलेला असल्याचं कळल्यावर चमकलेला आणि तिच्या मागणीमुळे चिडलेला जुन्या विचारांचा उपसंपादक तिला नकार देतो, तिचा अपमान करतो आणि ‘जिथे मला लिहिता येणार नाही अशा ठिकाणी मला काम करायचं नाही,’ असं शांतपणे सांगून नोरा पहिल्याच दिवशी नोकरी सोडून निघून जाते. तिच्या या कृतीमुळे पडते ती पहिली ठिणगी. आत्तापर्यंत जेन, पॅटी किंवा सिंडीनं असा विचारच केला नाहिये. आपण खपून शोधलेल्या, हजारो लोकांना फोन करून - त्यांना बोलतं करून मिळवलेल्या, पहिला-दुसरा-तिसरा खर्डा लिहून अधिकाधिक उत्तम केलेल्या बातमीसाठी श्रेय मागायचं हे त्यांना कधी सुचलंच नव्हतं.

ही तिन्ही मुख्य पात्रंसुद्धा आपापल्या पातळ्यांवर वेगवेगळी आहेत. सिंडीला लेखक व्हायचं आहे, आणि तिला तिच्या नवऱ्यानं त्यासाठी फक्त एक वर्षाचा अवधी दिला आहे - एका वर्षानं मूल जन्माला घालून कुटुंबाची सुरुवात करायची आणि त्यासाठीच वेळ द्यायचा. त्यामुळे लाजाळू, अबोल असणारी सिंडी दिलेल्या वेळात कादंबरी लिहून पूर्ण करण्याच्या चिंतेत आहे. जेन तशी जुन्या विचारांची आहे. जेव्हा तिच्या सगळ्या मैत्रिणींनी प्रियकर शोधले आहेत, तेव्हा ती मात्र स्वतःला लग्नासाठी ‘राखून ठेवते’ आहे. तिच्या श्रीमंत वडलांनी ‘न्यूज ऑफ द वीक’मध्ये जेनला लग्नासाठी एखादा शिकलेला प्रतिष्ठित पुरुष मिळेल म्हणून तिला तिथं नोकरी करायची परवानगी दिलेली आहे. या तिघींमध्ये सगळ्यात आधुनिक म्हणावी अशी पॅटी. जुन्या विचारांच्या घरातून बाहेर पडून न्यू यॉर्कमध्ये एकटी राहणारी, एखाद्या बातमीचा मागोवा घेताना जंग जंग पछाडणारी, बरोबरीच्या पत्रकाराच्या प्रेमात पडलेली पण तरीही लग्नाला तयार नसणारी पॅटी तेव्हा अमेरिकेत पसरणाऱ्या हिप्पी बोहेमियन संस्कृतीचं बऱ्‍याच अंशी प्रतिनिधित्व करते. अशा या सर्वस्वी वेगळ्या स्वभावाच्या आणि विचारांच्या बायका एकत्र येऊन विचार करायला लागतात ते नोराच्या बंडखोर कृतीमुळे आणि तिच्या स्वतःवरच्या ठाम आत्मविश्वासामुळे. 

पुढे नोराचं पात्र या मालिकेतून एक्झिट घेतं, पण जाता जाता ती या मुलींची ओळख एलिनॉर होम्स नॉर्टन या वकील आणि नागरी हक्कांसाठी लढणारी कार्यकर्तीशी करून देते. एलिनॉर होम्स ही १९७०च्या या खटल्यात स्वतः गरोदर असताना या सगळ्या बायकांच्या बाजूनं केस लढवणारी वकील-सामाजिक कार्यकर्ती! हळूहळू एलिनॉरला लक्षात येतं की या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भेदभाव आहे, स्त्रियांना त्यांच्या कष्टाचं लिखाणाचं श्रेय कोणत्याच रूपात मिळत नाही - बायलाईन पुरुषांनाच मिळते, पण त्यांना पगारसुद्धा स्त्रियांच्या तिप्पट मिळतो. हे नागरी कायद्याचं उल्लंघन आहे आणि याविरुद्ध आपण खटला करू शकतो, असं एलिनॉर या स्त्रियांना सुचवते आणि सुरू होते समान हक्कांसाठीची ही लढाई. 

या मालिकेचा एकच सीझन आहे. अमेरिकेतल्या ६०-७०च्या दशकातल्या घडामोडी चित्रित करणाऱ्‍या अनेक मालिका आहेत. जाहिरात जगताच्या सुवर्णकाळाचा लेखाजोखा मांडणारी ‘मॅड मेन’ आणि पुरुष स्टँडअप कॉमेडीयन्सच्या जगात स्वतःचं नाव कमवू पाहणाऱ्‍या मिज मेझलची गोष्ट सांगणारी ‘द मार्व्हलस मिसेस मेझल’ ही दोन ठळक उदाहरणं सांगता येतील. या दोन्ही मालिकांच्या पंगतीत जाऊन बसण्याइतकी ‘गुड गर्ल्स रिव्होल्ट’ कमाल नसली, तरी एकदा बघावी अशी नक्कीच आहे!

समानतेच्या अशा अनेक लढाया अनेकांनी लढल्या आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना आपण इथवर येऊन पोहोचलो, हेही मालिका पाहून जाणवतं. आणि इतक्या वर्षांत आपण कापलेलं अंतर किती कमी आहे, हेसुद्धा ठळकपणे दिसून येतं. आज ५० वर्षांनीसुद्धा कामाच्या ठिकाणी समान मानधन मिळावं, समान वागणूक, समान संधी मिळाव्यात यासाठी स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रांत झगडावं लागतंय. गेली अनेक वर्षं आपण ही लढाई लढतोय आणि आपल्या मागे जगभरातल्या अनेक स्त्रियांचे आणि स्त्री हक्कांसाठी लढणाऱ्‍या कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत, ही गोष्ट अशा मालिकांमुळे उमजते आणि पुढे किती प्रवास अजून बाकी आहे, याचाही अंदाज येतो.

संबंधित बातम्या