प्रेमकहाणी माणूस आणि कॉम्प्युटरची... 

अदिती पटवर्धन
सोमवार, 3 जानेवारी 2022

‘वेब’वॉच

माणूस आणि तंत्रज्ञान यांच्यातलं नातं दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि त्यात दिवसागणिक प्रगती होताना दिसते आहे... अशावेळी भविष्यात माणूस आणि स्वतःचे विचार, भावना असणारा त्याचा कॉम्प्युटर यांच्यात कशाप्रकारे नातं तयार होऊ शकेल याचा मागोवा स्पाइक जोन्झ त्याच्या ‘हर’ या सिनेमातून घेतो... 

सायन्टिफिक फिक्शन किंवा ‘साय-फाय’ हा हॉलिवूडचा अगदी आवडता जॉनर. भविष्यात तांत्रिक प्रगती झाल्यावर त्याचे कशा प्रकारे परिणाम होतील, याचं चित्रण करणारे असंख्य चित्रपट दरवर्षी अमेरिकेत तयार होतात. यात ‘स्टार वॉर्स’, ‘स्टार ट्रेक’ किंवा ‘मॅट्रिक्स’सारख्या किंवा ‘आयर्न मॅन’सारख्या सुपर हिरो सिनेमांच्या शृंखला आहेतच, शिवाय ‘ग्रॅव्हिटी’, ‘द मार्शन’, ‘अवतार’ आणि ‘इंटरस्टेलर’सारखे प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेले सिनेमेही आहेत. ‘साय-फाय’च्या या ‘हाय-फाय’ गर्दीतला तसा फारसा माहीत नसलेला सिनेमा म्हणजे स्पाइक जोन्झ यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘हर’.

मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या क्षेत्रांतल्या प्रगतीविषयी बरेच सिनेमे तयार झाले आहेत. पण एकुणात पाहता त्यात माणसानंच तयार केलेले ‘रोबो’ स्वतः विचार करायला समर्थ झाले आणि शेवटी माणसावर वरचढ ठरले, किंवा त्यांनी सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, अशा पद्धतीचे सिनेमे जास्त दिसतात. पण याच ‘एआय’मध्ये विचार करण्याच्या क्षमतेबरोबरच भावनासुद्धा निर्माण झाल्या तर कशाप्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते, हे दिग्दर्शक ‘हर’ या अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध असलेल्या सिनेमातून दाखवायचा प्रयत्न करतो.

सिनेमाची सुरुवातीला आपल्याला दिसतो थिओडोर ट्वॉम्ब्ली. साधारण तिशीतला थिओडोर एक प्रेमपत्र डिक्टेट करतोय. ‘तुला कसं सांगू , तू माझ्यासाठी किती बहुमोल आहेस... तुझ्या प्रेमात पडतानाचा आणि पडल्यानंतरचा प्रत्येक क्षण मला आठवतोय... गेली ५० वर्षं आपण एकत्र जगलो, पण तरीही आजही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे...’ ५० वर्षं? आपण चक्रावतो... मग कळतं की अशी पत्रं इतरांसाठी लिहून देणं हे थिओडोरचं काम आहे. ‘ब्यूटिफुली हँडरिटन लेटर्स डॉट कॉम’ या कंपनीत तो काम करतो आणि वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या ‘ब्रीफ’नुसार त्यांची पत्रं तो लिहून देतो. इथे आपल्याला ह्या जगाच्या वेगळेपणाची खरी जाणीव होते. आपली इतकी वैयक्तिक पत्रंसुद्धा सरळ सरळ आउटसोर्स करणारं हे जग काळाच्या जरा पुढचं आहे, हे जाणवतं. 

थिओडोरच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग झाल्यावर आपल्याला लक्षात येतं की हा काहीसा एकांडा माणूस घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. त्याची बायको आणि तो वेगळे होऊन वर्ष झालं आहे, आणि या ब्रेकअपमधून हा अजून बाहेर आलेला नाही. त्याच्या इमारतीत राहणाऱ्‍या एमीशिवाय त्याला कोणी जवळचा मित्र किंवा मैत्रीण नाही, आणि एकुणातच नव्या ओळखी करून घेण्याची, चारचौघांत मिसळण्याची, किंवा डेटिंग करण्याची त्याची अजून तयारी नाही. त्याचा दिनक्रम बघताना आपल्याला जाणवत राहतो तो तंत्रज्ञानाचा त्याच्या आयुष्यात असलेला प्रभाव. वायरलेस हेडफोन्समध्ये व्हर्च्युअल असिस्टंटला सूचना देऊन तो ईमेल चेक करतो, तोच आवाज त्याला बातम्या आणि ईमेल वाचून दाखवतो, अनावश्यक डिलीट करतो, ऑफिसमध्ये तो फक्त डिक्टेशन करतो आणि सुंदर हस्ताक्षरात पत्र प्रिंट होऊन त्याच्या समोर येतं, घरी आल्यावर त्याच्या हालचाली जमवून दिवे लागतात, एसी ऑन होतो... 

पण लवकरच याहीपेक्षा प्रगत तंत्रज्ञान वापरून विकसित करण्यात आलेली एक नवी ‘इंटेलिजन्ट’ ऑॅपरेटिंग सिस्टीम म्हणजेच ‘ओएस’ बाजारात उपलब्ध होते. थिओडोर एके ठिकाणी तिची जाहिरात बघतो आणि स्वतःसाठी एक ओएस घेऊन येतो. इन्स्टॉल केल्यावर तो तिला तिचं नाव विचारतो, तेव्हा ती म्हणते ''समॅन्था''. हे नाव तुला कुणी दिलं असं तो विचारतो, तेव्हा ती उत्तर देते, ‘मीच दिलं. तू मला माझं नाव विचारलंस तेव्हा मला वाटलं की आपल्याला एखादं नाव असायला हवं, म्हणून मी नाव शोधलं आणि मी वाचलेल्या काही हजार नावांतलं हे नाव मला सगळ्यात जास्त आवडलं!’ आश्चर्यानं थिओडोर विचारतो, ‘हे तू मी तुला विचारल्यानंतरच्या क्षणभरात केलंस?’ ‘नाही, खरंतर एका सेकंदाच्या एक अष्टमांश भागात!’
 इथून सुरू होतो थिओडोर आणि समॅन्थाच्या मैत्रीचा आणि प्रेमाचा प्रवास. या सिनेमात जोआक्विन फीनिक्स या कमालीच्या अभिनेत्याने थिओडोरची भूमिका केली आहे, तर समॅन्थाला आवाज स्कार्लेट जोहान्सनने दिला आहे. तिच्या केवळ आवाजातून समॅन्थाचं अवघं व्यक्तिमत्त्व घडत जाताना आपण बघतो आणि ही केवळ एक ‘ओएस’ नसून एक खरीखुरी व्यक्ती आहे ह्याची थिओडोरइतकीच खात्री आपल्यालासुद्धा पटत जाते.

या सिनेमाची माझ्या दृष्टीनं सर्वात जमेची बाजू म्हणजे या सिनेमाचा ‘लूक’ आणि छायाचित्रण. कलादिग्दर्शक आणि भविष्यातला, कमालीचं प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात असलेला हा काळ अतिशय देखणेपणानं, पण संयम ठेऊन निर्माण केला आहे. भविष्यातला काळ दाखवायचा म्हणजे काहीतरी भव्यदिव्य, अचाट, आणि काहीसे विचित्र सेट उभारण्याकडे कल दिसतो. हा मोह टाळून आपल्याला आपल्या जवळचं वाटणारं, फक्त तंत्रज्ञानाच्या बाबतीत काही पावलं पुढे असणारं हे जग त्यांनी उभं केलं आहे. मुळात ही प्रेमकथा आहे आणि हे जग आपल्याला काही प्रमाणात का होईना जवळचं वाटल्यामुळे ही कथा प्रेक्षकाला परकी वाटत नाही, उलट या कथेमध्ये विरघळून जायला मदतच होते.

या कथेत दिग्दर्शकानं समॅन्थाच्या घडत जाण्याचा प्रवास फार कमाल रेखाटला आहे. सुरुवातीला स्वतःचं काहीच अस्तित्व नसणारी ही कॉम्प्युटरमधली ओएस वेगवेगळ्या अनुभवांतून घडत जाते, त्या अनुभवांतून शिकत जाते. थिओडोरच्या प्रेमात पडल्यामुळे नव्याच वेगळ्या भावनांना तिला सामोरं जावं लागतं, त्या सगळ्याचा ती अर्थ लावत असताना तिचं आणि थिओडोरचं नातं आणखीच ‘खरं’ वाटायला लागतं. अर्थातच हे प्रेम जसं जसं आणखी वाढत जातं, तसं तसं त्यातली गुंतागुंत, प्रश्नसुद्धा वाढू लागतात. शारीर प्रेमाची माणसाची गरज अशा पद्धतीच्या पूर्णपणे अमूर्त प्रेमातून पूर्ण होऊ शकते का? मानवी स्पर्श हा नात्यांचा अतिशय महत्त्वाचा भाग असल्यामुळे अशा प्रकारचं माणूस आणि एक सॉफ्टवेअर यांच्यातील नातं शारीर पातळीवर आणण्यासाठी काही उपाय असू शकेल का? एका ओएसचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून विकसित होण्याचा प्रवास कोणत्या दिशेनं आणि कसा होईल, याचा अंदाज खुद्द तिच्या प्रोग्रॅमरनासुद्धा जर येणार नसेल, तर तो एका सामान्य माणसाला येऊ शकेल का? असे अनेक प्रश्न हा सिनेमा उभे करतो. आणि खरंतर या प्रश्नांची उत्तरं अजून कोणालाच मिळालेली नसल्यामुळे त्यातले बरेचसे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. 

असं असलं, तरीही स्पेसशिप, अंतराळ, एलियन्स, किलर रोबो, अतिमानव आणि शेवटी - संरक्षण किंवा संहार - या चक्रात अडकलेल्या साय-फाय सिनेमांमध्ये हळुवार आणि खरंच काही वेगळं मांडायचा प्रयत्न करणाऱ्‍या मोजक्या सिनेमांपैकी ‘हर’ हा सिनेमा एक वेगळा दृष्टिकोन देऊन जातो, हे नक्कीच!

 

संबंधित बातम्या