एका लग्नाची गोष्ट...

अदिती पटवर्धन
सोमवार, 17 जानेवारी 2022

‘वेब’वॉच

लग्न व प्रेम ही दोन वेगळी नाती आहेत आणि त्यातल्या एकावर दुसरं अवलंबून असेलच असं नाही, हे ‘डिस्ने हॉटस्टार’वर उपलब्ध असलेली ‘सीन्स फ्रॉम अ मॅरेज’ ही वेबसीरीज दाखवून देते. त्यातील पात्रांच्या नात्याचे कंगोरे, त्यातली कमालीची गुंतागुंत पाहताना आपणही त्यात गुंतून जातो.

जोनाथन आणि मिरा... दोघांच्या लग्नाला दहा वर्षं झाली आहेत, त्यांना एक पाच वर्षांची गोड मुलगी आहे - एव्हा. मिरा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या एका मोठ्या कंपनीत महत्त्वाच्या हुद्द्यावर काम करते, तर जोनाथन हा तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. अर्थातच त्यांच्या कामाच्या वेळांमध्ये बरीच तफावत आहे. वेळेच्या बाबतीत लवचिकता असल्यामुळे जोनाथन एव्हाची आणि घराचीही बरीचशी जबाबदारी उचलतो, तर मिरा प्रामुख्यानं या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेते. या कुटुंबाशी पहिल्यांदा आपली ओळख होते ते एका मुलाखतीच्यावेळी. जोनाथनची एक विद्यार्थिनी ज्या कुटुंबांमध्ये आर्थिक जबाबदारी स्त्रीकडे आहे अशा कुटुंबांबद्दल संशोधन करते आहे, आणि ती या दोघांची मुलाखत घ्यायला आली आहे. तसं पाहता एकमेकांपेक्षा बरीच वेगळी असलेली ही दोघं त्यांच्या प्रेमाबद्दल, लग्नाबद्दल सांगतात. एका कर्मठ ज्यू कुटुंबात जन्मलेला, पण नंतर धर्माचा त्याग केलेला जोनाथन आणि मोकळ्या विचारांत, विभक्त कुटुंबात वाढलेली मिरा... त्यांचं एकमेकांना भेटणं, मैत्री-प्रेम-लग्न हे एकेक टप्पे पार करणं, सगळं आपण त्यांच्याकडून ऐकत जातो. “काय परफेक्ट जोडपं आहे, ते एकमेकांच्या किती प्रेमात आहेत,” असं नकळत मनात येऊन जातं. आणि जरी ही कथा या जोडप्याच्या विभक्त होत जाण्याची असली, तरी शेवटपर्यंत त्यांचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे याविषयी आपल्याला कधीच शंका वाटत नाही. डिस्ने हॉटस्टारवर उपलब्ध असलेल्या पाच भागांच्या या मालिकेचं हेच खरं यश आहे. 

हळूहळू त्यांच्यातले छोटेमोठे मतभेद पुढे यायला लागतात. त्यातूनही ते समंजसपणे, एकमेकांशी बोलून मार्ग काढू शकतात, अशी खात्री आपल्याला वाटत असतानाच मिराच्या आयुष्यातलं एक मोठं सत्य समोर येतं. मिरा या लग्नात, या नात्यात पुरेशी आनंदात नाही, तिला जोनाथन सोबत असतानाही एकटं वाटतंय आणि ती गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्‍या कोणाच्या तरी प्रेमात आहे. जोनाथनला सोडून त्याच्याबरोबर राहण्याचा तिचा निर्णय आहे, असं ती जोनाथनला सांगते. तिचा प्रियकर तेल अविवला आहे आणि पुढचं काही ठरवायच्या आधी तीन महिने ती तिकडे जाऊन राहणार आहे. जोनाथनसाठी हा मोठा धक्का आहे. तो तिला खूप समजावतो, तू तडकाफडकी काही निर्णय घेऊ नको, एव्हाचं या सगळ्यात काय होईल, असं विचारतो. हे सगळं दाखवताना दिग्दर्शक हगाई लेव्ही आपल्याला आपल्याच पितृसत्ताक पद्धतीत वाढलेल्या मनाचे कंगोरे दाखवून देतो. अजूनही लग्न मोडण्याचा निर्णय घेणारी, किंवा स्वतःच्या आनंदाला, सुखाला कुटुंबाच्या एकसंध असण्यापेक्षा जास्त महत्त्व देणारी स्त्री आपल्याला सहजासहजी स्वीकारता येत नाही. जोनाथनचं अफेअर असतं, आणि तो तिला सोडून निघाला असता, तरी प्रेक्षकांची प्रतिक्रिया रागाचीच आली असती, हे खरंच आहे. पण त्या रागाची जातकुळी पूर्णपणे वेगळी असती, हेसुद्धा तितकंच खरं आहे. मन मारून कुटुंबासाठी, मुलांसाठी एकत्र राहणारी स्त्री अगदी प्रगत म्हटल्या जाणाऱ्‍या समाजातही अजून आदर्श मानली जाते आणि याच दुटप्पीपणावर दिग्दर्शक हगाई लेव्ही या मालिकेत अचूक बोट ठेवतो.

या मालिकेच्या प्रत्येक भागात हे दोघं काही एका विशिष्ट कालावधीनंतर - कधी काही महिन्यांनी, कधी काही वर्षांनी एकमेकांना भेटतात. त्यावेळी ते आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, आपापल्या पद्धतीनं आयुष्याला सामोरे जातायत. सुरुवातीचा धक्का ओसरल्यावर जोनाथनला आपण भावनिकदृष्ट्या या नात्यात ‘प्रेझेंट’ नव्हतो, तिला आपण आपल्या गाभ्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही, आणि त्यामुळे ती एकटी पडली, हे उमगून येतं आणि तो ते तितक्याच प्रांजळपणे तिच्यापाशी कबूलसुद्धा करतो.

या सीरीजची खरी ताकद आहे यातल्या दोन्ही कलाकारांचा अभिनय! ऑस्कर आयझॅक आणि जेसिका चॅस्टेन यांनी जोनाथन आणि मिरा ज्या ताकदीनं उभे केले आहेत, त्याला तोड नाही. त्यांच्यातले वाद, भांडणं, आणि त्याबरोबरच त्या सगळ्या मतभेदांपलीकडे जाऊन टिकलेलं, मागं उरलेलं प्रेम, माया.. हे सगळं त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं अभिनित केलं आहे...

 त्यांच्या नात्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हे दोघं भेटत जातात.. मधे कितीही काळ गेला, कितीही स्थित्यंतरं झाली, तरी त्यांना एकमेकांविषयी वाटणारी काळजी, माया काही बदलत नाही. एकमेकांना भेटल्यावर ते आनंदानं एकमेकांना मिठी मारतात. त्या दोघांमध्ये असलेलं कमालीचं शारीर आकर्षण, एकमेकांविषयी आतून वाटणारी ओढ आणि कणव एका बाजूला आणि नात्यात झालेली उलथापालथ, एकमेकांना दुखावणं, कमालीचा कडवटपणा दुसऱ्या बाजूला - अशा कडू-गोड क्षणांमध्ये ही मालिका अक्षरशः झुलत राहते. कुणा एकाचं योग्य आणि दुसऱ्याचं चूक अशी काळ-पांढरं करणारी रेघ आपल्याला मारता येत नाही आणि म्हणूनच हे नातं अधिक खरं, अधिक जिवंत वाटायला लागतं!

एकमेकांना आपल्या प्रवासाबद्दल ते मोकळेपणानं सगळं सांगतात, मिरा तिच्या आणि पॉलीमध्ये झालेल्या वादाबद्दल जोनाथनला सांगते, जोनाथन त्याच्या दुसऱ्‍या लग्नाबद्दल आणि त्यातल्या फोलपणाबद्दल मिराला मोकळेपणानं सांगतो. ‘आता मी तुझ्या प्रेमातून बाहेर पडलोय, पडू शकलोय,’ हे घटस्फोट घेताना जितक्या सहजपणे तो मिराला सांगतो, तितक्याच खरेपणानं ‘तुझ्यावर मी जितकं खरं प्रेम केलं तितकं मी त्यानंतर कुणावरच कधीच करू शकलो नाही,’ हेसुद्धा शेवटी कबूल करतो. “एखादी चिकटपट्टी समजा आपण ओढून काढली, आणि ती पुन्हा चिकटवायचा प्रयत्न केला, तर ती पुन्हा चिकटणारच नाही, असं नसतं. ती कदाचित पुन्हा चिकटेलही. पण पहिल्यांदा ती जशी चिकटते तशी ती पुन्हा कधीच चिकटत नाही. तसंच माझ्याबाबतीत प्रेमाचं झालंय.”

जगप्रसिद्ध स्वीडिश चित्रपटकार इंगमार बर्गमनची ‘सीन्स फ्रॉम अ मॅरेज’ ही टेलीमालिका १९७३ साली स्वीडिश टीव्हीवर प्रदर्शित झाली आणि तिनं खळबळ माजवली. एका प्रथमदर्शनी आनंदी जोडप्याचा हळूहळू वेगळं होण्याच्या दिशेनं होणारा प्रवास या मालिकेत बर्गमननं चित्रित केला होता. त्या काळात, जेव्हा घटस्फोट हा एक निषिद्ध शब्द होता, त्या काळात बर्गमननी नात्यांच्या वेगवेगळ्या छटा उलगडून दाखवल्या. एकमेकांच्या प्रेमातून बाहेर पडणं शक्य असतं आणि तसं झालं तर लग्नातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेता येतो, आणि शिवाय लग्न मोडलं, म्हणून एकमेकांविषयी वाटणारी माया कदाचित कधीच संपत नाही, असंही होऊ शकतं, ह्या त्या काळी समाजमनाला न झेपणाऱ्या संकल्पना बर्गमननी अतिशय प्रभावीपणे मांडल्या.

अशा लोकविलक्षण कलाकृती केवळ प्रेक्षकांच्याच नाही, तर कलाकारांच्याही मनातून पुसल्या जात नाहीत. त्यावर आपणही काहीतरी करावं, आपलं मत, आपला दृष्टिकोन मांडावा, असं कित्येक कलाकारांना वाटत असतं. त्यामुळेच बर्गमनच्या मूळ ‘सीन्स फ्रॉम अ मॅरेज’वर ही नवी सीरीज आधारित आहे. या सीरीजची कथा बरीचशी बर्गमनच्या मूळ कथेसारखी असली, तरी लेव्ही काही बाबतीत स्वतःचा वेगळा दृष्टिकोन मांडण्यात यशस्वी ठरतो आणि बर्गमनच्या छायेत न राहता, ही मालिका एक स्वतंत्र कलाकृती म्हणून उभी राहते, हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य!

 

संबंधित बातम्या