एका कफल्लक कुटुंबाची श्रीमंत कहाणी

अदिती पटवर्धन
सोमवार, 31 जानेवारी 2022

‘वेब’वॉच

पूर्वी मोठ्या बंगल्यात, वेगवेगळ्या शहरात राहणारे, महिना-महिना एकमेकांचं तोंड न बघणारे कुटुंबीय अचानक दोन खोल्यांमध्ये एकत्र राहायला लागतात आणि मग त्यांना कळतं की इतकी वर्षं आपण एकमेकांना पुरेसं ओळखतच नव्हतो. एका अर्थी हे संकट या कुटुंबाला एकमेकांच्या जवळ आणतं. ते एकमेकांची काळजी घ्यायला, एकमेकांना आधार द्यायला शिकतात... त्यांची कहाणी म्हणजेच ‘शिट्स क्रीक’ ही मालिका! 

एका भव्य बंगल्याच्या दाराची घंटा वाजते. हाउसकीपर लगबगीनं येऊन दरवाजा उघडते. समोरचे फेडरल ऑफिसर कडक चेहऱ्यानं त्यांचं ओळखपत्र दाखवतात आणि सुरू होतो हजारो कोटींचे मालक असलेल्या रोझ कुटुंबाच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस - रेव्हेन्यू खात्याच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना कळतं, की त्यांच्या बिझनेस मॅनेजरनी त्यांची मोठी फसवणूक केलेली आहे आणि त्यांची सगळी संपत्ती ते गमावून बसले आहेत. हताश झालेल्या रोझ कुटुंबाकडे आता एकच प्रॉपर्टी शिल्लक आहे. काही वर्षांपूर्वी जॉनी रोझ यांनी त्यांच्या मुलासाठी, डेव्हिडसाठी, त्याच्या वाढदिवसाला मजेमजेत एक गाव विकत घेतलं होतं, त्याचं नाव ‘शिट्स क्रीक’. एका कोपऱ्यातलं हे विचित्र नावाचं आडगाव कशासाठीही प्रसिद्ध नाही, आणि त्यातून काही वसूल होऊ शकेल असं कुणालाच न वाटल्यामुळेच केवळ ते रोझ कुटुंबाकडे शिल्लक राहिलं आहे. आता या कुटुंबाकडे या गावी राहायला जाण्यावाचून कोणताच पर्याय नाही. अशा प्रकारे हे चौकोनी कुटुंब या गावातल्या एका मोटेलमध्ये म्हणजे एका लहानशा लॉजवजा हॉटेलमधे राहायला येतं आणि सुरू होते एक धमाल गोष्ट! 

या कुटुंबातील सदस्य म्हणजे एका मोठ्या व्हिडिओ स्टोअरच्या मालिकेचे पूर्वायुष्यातील मालक जॉनी रोझ, त्यांची बायको आणि पूर्वाश्रमीची सोप ऑपेरा स्टार मॉयरा, साधारण तिशीत असलेला त्यांचा मोठा मुलगा डेव्हिड आणि अठ्ठावीसची धाकटी मुलगी ॲलेक्सिस. डेव्हिड गेली काही वर्षं न्यू यॉर्कमध्ये एक आर्ट गॅलरी चालवायचा, तर ॲलेक्सिसनी तिची बरीच वर्षं वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणी आणि प्रियकरांबरोबर जगभर फिरण्यात घालवली आहेत. हळूहळू नव्यानव्या ‘रियालिटी’ त्यांना धक्के देऊ लागतात. जगातल्या सर्वात महागड्या शाळेत जाऊनही एक आख्खं सेमिस्टर दांडी मारल्यामुळे आपल्याकडे साधा हायस्कूल डिप्लोमासुद्धा नाही, असं ॲलेक्सिसला कळतं आणि आपल्या आर्ट गॅलरीमधली पेंटिंग आणि शिल्पं आपले आई वडीलच कुणाकुणाला पाठवून विकत घ्यायचे, हा साक्षात्कार डेव्हिडला होतो! थोडक्यात, आपल्याला आयुष्य पुन्हा शून्यातून उभं करावं लागणार आहे, हे त्यांना कळून चुकतं!

आपलं सगळं काही गमावून बसलेल्या या कुटुंबाकडे जर काही उरलेलं असेल, तर ती एकच गोष्ट! बॅगा भरभरून आणलेले महागडे उंची कपडे! मॉयरा वेगवेगळे विग घालते, ती आणि ॲलेक्सिस वेगवेगळे अद्ययावत फॅशनचे ड्रेस आणि गाऊन पूर्ण मेकअपसकट रोज घालतात, जॉनी थ्री पीस सुट घालतो, तर डेव्हिडचा स्वतःचा असा वेगळाच ‘कॅश्मीर’ आणि लेदरच्या स्वेटर्सनी भरलेला वॉर्डरोब आहे. एका साध्या खेडेगावात मोटेलच्या दोन खोल्यांमध्ये राहणारं, पण फॅशन शोमध्ये शोभतील असे कपडे रोज घालणारं हे कुटुंब दिसायलाच फार मजेदार दिसतं!

पूर्वी मोठ्या बंगल्यात, वेगवेगळ्या शहरात राहणारे, महिना-महिना एकमेकांचं तोंड न बघणारे हे सगळे अचानक दोन खोल्यांमध्ये एकत्र राहायला लागतात आणि मग त्यांना कळतं की इतकी वर्षं आपण एकमेकांना पुरेसं ओळखतच नव्हतो. एका अर्थी हे संकट या कुटुंबाला एकमेकांच्या जवळ आणतं. ते एकमेकांची काळजी घ्यायला, एकमेकांना आधार द्यायला शिकतात. हळूहळू प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं त्याचा मार्ग शोधतो - ॲलेक्सिस हायस्कूलमध्ये नाव नोंदवते आणि डिप्लोमा मिळवते. डेव्हिड आधी नोकरी करायला लागतो, त्यानंतर पुढे गावात स्वतःचं एक दुकान सुरू करतो; त्या प्रवासात त्याला त्याचा बिझनेस पार्टनर आणि प्रियकर पॅट्रीक भेटतो. जॉनी मोटेलच्या मालकिणीला स्टीव्हीला मदत करायला लागतो आणि नंतर ते दोघे मिळून तो व्यवसाय वाढवतात.

या मालिकेचं नाव अगदी योग्य आहे - कारण या मालिकेत सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका या गावाचीच आहे. अगदी लहानशा अशा या गावाला त्याचं असं एक व्यक्तिमत्त्व आहे. इथली माणसं, इथलं जगणं, याला एक वेगळी लय, एक वेगळा गोडवा आहे. आणि त्यामुळेच ही सर्वस्व गमावलेली माणसं या गावात येऊन त्यांचा हरवलेला आनंद पुन्हा मिळवू शकतात. गावाचा जरासा विक्षिप्त मेयर रोलंड आणि त्याची बायको हायस्कूल शिक्षिका जॉसलिन, त्यांचा स्वतः बांधलेल्या झोपडीत राहणारा आणि ओला कचरा गोळा करून कंपोस्ट करणारा निसर्गप्रेमी मुलगा मट, गावातला जनावरांचा डॉक्टर टेड, तिच्या थेट बोलण्यामुळे आणि कोरड्या टिप्पणीमुळे लक्षात राहणारी रॉनी, लहानसं गॅरेज चालवणारा बॉब आणि त्याची बायको ग्वेन, तिथल्या एकमेव कॅफेमधली वेट्रेस ट्वायला... सर्वच भूमिका जमून आल्या आहेत! अगदी टिपिकल असं हे लहानसं गाव आहे. तिथं भांडणं-वादावादी आहे, तसंच एकमेकांना मदत करायची, बाहेरच्या माणसांना सामावून घेण्याची वृत्तीसुद्धा आहे. ते सगळे इथं मजेत राहतात, टाऊन हॉलमध्ये एकत्र येऊन गाण्याचे कार्यक्रम, म्युझिकल नाटकं बसवतात, सण साजरे करतात, बेसबॉलचे सामने खेळतात, वेगवेगळ्या थीमच्या पार्ट्या करतात, टाऊन कौन्सिलच्या निवडणुकीत हिरीरीने सहभागी होतात! कदाचित हे गाव इतकं लहान आणि निवांत आहे, म्हणूनच हे बाहेरून आलेलं कुटुंब इथे येऊन या कम्युनिटीचा भाग होतं आणि इथलं होऊन जातं. ह्या मालिकेत एका पॅनसेक्शुअल तरुणाची आणि त्याच्या प्रियकराची म्हणजेच डेव्हिड आणि पॅट्रीकची प्रेमकहाणी दाखवली आहे. पहिल्यांदाच टीव्हीवर अशा एका छानशा कौटुंबिक मालिकेत अशा पद्धतीचं नातं दाखवल्याबद्दल या मालिकेचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतं आहे. पॅनसेक्शुआलिटी म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या एका सुंदर सीनमध्ये डेव्हिड वाईनचं उदाहरण घेऊन सांगतो, ‘‘मी रेड वाईन पण पितो आणि व्हाईट वाईनसुद्धा. खरं सांगायचं तर मला वाईन आवडते, त्यावर लेबल काय आहे त्यानं मला फरक पडत नाही!’’

असं असलं, तरी मुळात ही मालिका या कुटुंबाची आणि त्यांच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमाची, माणसा-माणसातल्या नात्यांची, मैत्रीची गोष्ट सांगते आणि त्यामुळेच या कुटुंबानी आणि या गावानी सहजपणे खुल्या दिलानी डेव्हिड आणि पॅट्रीकला स्वीकारणं, हेसुद्धा तितकंच साहजिक वाटतं.

ही मूळची कॅनेडियन मालिका. प्रसिद्ध विनोदी अभिनेते युजीन लेव्ही आणि त्यांचा मुलगा डॅनियल यांनी एकत्र या मालिकेची निर्मिती केली. २०१५मध्ये याचा पहिला सीझन एका कॅनेडियन नेटवर्कवर प्रदर्शित झाला आणि अमेरिकेत पॉप टीव्ही या तुलनेने अप्रचलित नेटवर्कवरही दाखवला गेला. सुरुवातीला फारशी प्रसिद्धी न मिळालेली ही सीरीज २०१७मध्ये तिसऱ्या सीझनपासून नेटफ्लिक्सच्या माध्यमातून जगभरात पोहोचली आणि हळूहळू या मालिकेच्या साध्या सोप्या कौटुंबिक विनोदाची भुरळ सगळ्यांना पडली. या मालिकेच्या सहाव्या आणि शेवटच्या सीझननी प्रख्यात एमी पुरस्कार सोहळ्यामध्ये तब्बल १५ नामांकनं आणि त्यापैकी ९ पुरस्कार पटकावले!

कोविड-१९ महासाथीच्या काळात असंख्य लोकांनी ही मालिका पाहिली आणि एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगून ही मालिका हळूहळू प्रत्येकाच्या ‘वॉच लिस्ट’चा भाग झाली! निराश करणाऱ्या या काळात निखळ आनंद आणि आशा देणारं काहीतरी प्रत्येकच जण शोधत होता आणि या मालिकेचा सरळ साधा आपलेपणा सगळ्यांनाच भावला. सिटकॉम हा प्रकार आता खूप प्रचलित असला, तरी त्यात इतका निखळ विनोद क्वचितच दिसून येतो, आणि तो शेवटच्या सीझनपर्यंत टिकून राहिला आहे, हे या मालिकेचं मोठं यश आहे!

संबंधित बातम्या