विद्या बालनची जादुई सिनेत्रयी!

अदिती पटवर्धन
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022


 ‘वेब’वॉच

विद्या बालन या अभिनेत्रीनं केलेलं काम आणि निवडलेले सिनेमे यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, असं तिचा प्रत्येक सिनेमा पाहताना वाटतं आणि तिचे सर्वोत्तम म्हणता येतील असे तीन सिनेमे ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहेत : ‘तुम्हारी सुलू’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘शेरनी’!

बॉलिवूडला पूर्वीपासूनच स्वतंत्र विचारांच्या, स्वावलंबी, स्वतःचे निर्णय स्वतःच्या खऱ्या आवडी-निवडीचा विचार करून घेणाऱ्‍या आणि मुख्य म्हणजे कारण नसताना त्याग न करणाऱ्‍या नायिकांचं वावडं आहे. मुळात नायिकेची कथा सांगणारे सिनेमेच क्वचित होतात, कारण नायिका ही सिनेमात नायकाच्या प्रेमात पडण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी असते, असंच अगदी आजही बहुतांश सिनेमे पाहून वाटतं. अर्थातच अलीकडच्या काळातले ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘पिकू’, ‘थप्पड’, ‘छपाक’, ‘राझी’ यांसारखे काही सन्माननीय अपवाद आहेतच, आणि अशाच सन्माननीय अपवादांमध्ये जिचं नाव आदरानं घेतलं जातं ती अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिनं केलेलं काम आणि निवडलेले सिनेमे यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, असं तिचा प्रत्येक सिनेमा पाहताना वाटतं आणि तिचं सर्वोत्तम काम म्हणता येतील असे तीन सिनेमे ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहेत : ‘तुम्हारी सुलू’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘शेरनी’!

शाळेतला ‘पॅरेंट्स डे’. सगळ्या आयांची लिंबू चमच्याची शर्यत सुरू होते आहे... डोळे तिरळे करून नाकासमोरच्या चमच्याकडे एकटक नजर लावून शर्यतीत भाग घेणारी सुलोचना म्हणजेच सुलू आपल्याला दिसते. ही शर्यतीत उत्साहानं भाग घेऊन दुसरा नंबर मिळविणारी १०-११ वर्षांच्या प्रणवची आई आणि एका टेलरिंग कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्‍या अशोकची बायको. सुलूचं पाणीच काही वेगळं आहे, ‘नाही’ हा शब्द तिच्या शब्दकोशातच नाही. ‘मैं कर सकती हैं,’ हे तिचं ब्रीदवाक्य. तिच्या अंगात सळसळता उत्साह आहे, तिच्या त्रिकोणी कुटुंबात ती खूश आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छा तिच्यात आहे. पण घरात कायम ‘कुरूप वेडे पिल्लू’ असलेल्या सुलूला तिच्या मोठ्या जुळ्या बहिणी नेहमीच तिनदा बारावीत नापास म्हणून हिणवतात आणि तिला काही म्हणजे काही जमू शकत नाही, असं दरवेळी तिला ऐकवतात.

अशातच रेडिओवर घेतलेल्या एका स्पर्धेत जिंकलेलं बक्षीस घ्यायला म्हणून सुलू रेडिओच्या कार्यालयात जाते आणि ‘तुम्हीही होऊ शकता आरजे’ हे पोस्टर बघून ‘मैं कर सकती हैं’ म्हणत तिथल्या मारिया मॅडमच्या मागे लागते. गंमत म्हणून मारिया आणि प्रोड्युसर पंकज तिची ऑडिशन घेतात. सगळा वेळ खळाळून हसणारी सुलू आणि शेवटी तिनं कमालीच्या आकर्षक आवाजात म्हटलेलं ‘हॅलो’ मारियाला आवडून जातं आणि सुलूच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळतं. रात्री उशिरा रेडिओवर प्रेम आणि नातेसंबंधांवर सल्ला देणाऱ्‍या एका शोचं अँकरिंग करायची जबाबदारी सुलूकडे सोपवली जाते. सुरुवातीला अडखळत, चुका करत करत हळूहळू सुलूला ते जमायला लागतं, आणि तिचा शो अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरतो. तिथंही आपल्याला सुलूचा आत्मविश्वास आवडून जातो, लेखकानं लिहिलेल्या ओळी पाठ करून बोलण्यापेक्षा ती स्वतःच्या खास अंदाजात लोकांशी गप्पा मारते आणि खऱ्या अर्थानं ‘आरजे’ होते! स्टुडिओत बसून मटार सोलता सोलता एका अस्वस्थ प्रेमिकाला मटार पनीरचं उदाहरण घेऊन प्रेमाविषयी सल्ले देणाऱ्‍या सुलूला पाहताना धमाल येते! 

अर्थातच सगळं इतकं सुरळीत काही घडत नाही. सुलूचा रात्रीचा शो कुटुंबाच्या इभ्रतीला धक्का लावणारा आहे, असं तिच्या बहिणी म्हणायला लागतात. आत्तापर्यंत तिच्या सोबत असणारा अशोकसुद्धा कामावरच्या ताणामुळे आणि लोकांच्या उलटसुलट बोलण्यानं व्यथित होतो आणि त्या दोघांत अढी निर्माण होते. तेव्हाच प्रणवच्या शाळेत एक मोठं नाट्य घडतं आणि शाळेतून काही दिवसांसाठी त्याची हकालपट्टी होते आणि अर्थातच सगळ्याचं खापर ‘सुलूचं घराकडे कसं लक्ष नाही,’ म्हणून सुलूच्या माथ्यावर फोडलं जातं. या सगळ्यात निराश झालेली सुलू नोकरी सोडायचा विचार करते, पण झाल्या गोष्टीतून शहाणे झालेले अशोक आणि प्रणव पुन्हा तिच्या पाठीशी उभे राहतात आणि सुलू पुन्हा आरजे म्हणून रुजू होतानाच अशोकसोबत एक नवा व्यवसायसुद्धा सुरू करते. तिच्या स्वप्नातली खरीखुरी ‘करिअर वुमन’ होते!

या सिनेमाची कथा, लेखन आणि सुरेश त्रिवेणी यांचं दिग्दर्शन उत्तम आहेच, पण विद्या बालन ही या सिनेमाची खरी जान आहे. ती ज्या सहजतेनी सुलूच्या भूमिकेत उतरली आहे, त्याला तोड नाही.

गणितातल्या असामान्य जागतिक कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवींची कहाणी दिग्दर्शक अनु मेनननी ‘शकुंतला देवी’ या सिनेमातून जगासमोर आणली. ‘मैं बडा आदमी बनूंगी, बडी औरत नही!’ असा विश्वास लहानपणापासून बाळगणारी, कमालीची बुद्धिमान, स्वतःच्या तत्त्वांनुसार जगणारी, स्वतःच्या ध्येयाला, करिअरला सर्वात जास्त महत्त्व देणारी शकुंतला विद्या बालननी कमाल साकारली आहे. अगदी लहानपणापासून ‘मॅथ शो’ करायला लावणाऱ्‍या वडिलांमुळे बालपण हरवल्याचं शल्य मनात घेऊन जगणाऱ्या या बाईला तिच्यात काहीतरी वेगळं आणि लोकविलक्षण आहे हे सुरुवातीलाच उमगलेलं होतं! आणि त्यासाठी ती जगाचा कोणताही कोपरा गाठायला तयार होती... त्या काळात एकटीनं लंडनला जाऊन ताराबाई नावाच्या एका बाईंच्या लॉजमध्ये राहून स्वतःचं नशीब अजमावण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या या स्त्रीमध्ये काय कमालीचं धैर्य आणि धडाडी असेल! जगभरात नाव कमावणाऱ्या या बाईंची व्यक्तिगत आयुष्यातली ओढाताण, तिच्या महत्त्वाकांक्षी स्वभावासाठी तिनं मोजलेली किंमत हे सगळं विद्या बालननी अगदी जीव ओतून रंगवलं आहे.

त्यानंतरचा २०२१मध्ये प्रदर्शित झालेला ‘शेरनी’सुद्धा असाच एक वेगळा विषय हाताळणारा अमित मसूरकरनी दिग्दर्शन केलेला सिनेमा. आत्तापर्यंत फक्त बॅक ऑफिसमध्ये काम केलेल्या फॉरेस्ट ऑफिसर विद्या विन्सेंटची नियुक्ती पहिल्यांदाच फिल्ड ऑफिसर म्हणून होते. या भागात माणूस आणि वाघ यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचला आहे, गावच्या जमिनीवरची कुरणं नष्ट करून तिथं झाडं लावल्यामुळे गावकऱ्यांना गुरं चारायला जंगलाशिवाय दुसरी जागा नाही, आणि दोन जंगलांना जोडणाऱ्या कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणात खाणकाम केल्यामुळे वाघाला दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी मानवी वस्तीतून जाण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे संघर्ष अटळ, अशा विचित्र परिस्थितीत विद्याची नियुक्ती तिथं होते. अशा महत्त्वाच्या वेळी आम्हाला ‘लेडी ऑफिसर’ दिली म्हणून पदोपदी तिला हिणवलं जातं, पण ती आपलं काम निष्ठेनं करत राहते. नवीन असली तरी गावातल्या प्राणी संवर्धनासाठी समर्पित असलेल्या एका प्राणिशास्त्र प्राध्यापकाच्या मदतीनं या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढायचा प्रयत्न ती करत राहते. फॉरेस्ट खात्याला मदत करायच्या बहाण्याने आलेल्या एका बड्या धेंडाला केवळ वाघाची शिकार करण्यात रस आहे, हे कळल्यावर त्याला थेट डोळ्यात बघून सडेतोड उत्तर देणाऱ्या विद्यामध्येसुद्धा आपल्याला एक निडर वाघीण दिसायला लागते... या सिनेमातली विद्या अगदी साधी आहे, कोणताही मेकअप नाही, अगदी साधे कपडे, चोपून मागे बांधलेले केस अशा साध्या ‘लूक’मध्ये ती आपल्याला दिसते. पण तो ‘लूक’ आहे असं अजिबात वाटत नाही, कारण ती विद्या बालन आहे हे आपण विसरतो आणि विद्या विन्सेंट आता हा तिढा कसा सोडविणार, हे उत्सुकतेनी पाहायला लागतो.

विद्या बालन ही ‘विद्या बालन’ का आहे, याचं उत्तर या तिन्ही सिनेमातून मिळतं आणि तिच्या संयत, भूमिकेत संपूर्णपणे उतरून केलेल्या अभिनयाची ही जिवंत उदाहरणं या सिनेमांत दिसतात. उत्कृष्ट अभिनयाला दमदार कथेची आणि चांगल्या लिखाणाची जोड मिळाली की काय कमाल होते ही अनुभवायचं असेल तर एखाद दिवशी निवांत वेळ असताना या तिन्ही सिनेमांची एक ‘मुव्ही मॅरेथॉन’ करायलाच हवी, नाही का?

संबंधित बातम्या