लघुपटांची मोठ्ठी किमया!

अदिती पटवर्धन
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

‘वेब’वॉच

यूट्युबवर सर्वांसाठी बरेच उत्तम लघुपट उपलब्ध आहेत! यातल्या काही ‘मस्ट वॉच’ लघुपटांचा हा धावता आढावा.

संध्याकाळची वेळ. एक साधंसं मध्यमवर्गीय घर. आज घरी चांगलाच दंगा आहे - कारण घरी पार्टी आहे! ब्रजेश आहेत या पार्टीचे यजमान, त्यांच्या मित्रांची मैफल रंगली आहे आणि गप्पा चांगल्याच रंगात आल्या आहेत. एकेक जोडपं येत जातं, तसे नवरे हॉलमध्ये मद्यपान आणि गप्पा मारणं यामध्ये सहभागी होतात, तर बायका आत स्वयंपाकघरात मंजूच्या मदतीला जातात. नीरज घायवान दिग्दर्शित लघुपट ‘ज्यूस’ची ही साधारण पार्श्वभूमी.

प्रचंड उकाडा आहे, पण थंडगार कूलर मात्र हॉलमध्ये ठेवला आहे, शिवाय बर्फ, कोल्ड ड्रिंक या गोष्टी आहेतच. स्वयंपाकघरात मात्र लाही लाही होते आहे, एक जुना टेबल पंखा चालू करायचा प्रयत्न मंजू करते, पण तिला ते जमत नाही. ब्रजेशला हाका मारूनही त्याचा पाय काही गप्पांतून हलत नाही. आत सुरू असलेल्या बायकांच्या गप्पा आणि बाहेरच्या खोलीतल्या पुरुषांच्या गप्पा वरकरणी पूर्णपणे वेगळ्या असल्या, तरी त्यातून डोकावणाऱ्या स्त्री-पुरुषातल्या असमानतेच्या धाग्यावर अगदी अचूक बोट ठेवता येतं - इकडे पुरुष ऑफिसमध्ये अमुक एकीला प्रमोशन मिळायला नको होतं आणि तिला कसं घर आणि काम दोन्ही झेपत नाही याविषयी चर्चा करतात, तेव्हाच आत गरोदर असलेली रजनी ‘आता नवरा म्हणतोय नोकरी सोड आणि बाळाकडे बघ,’ असं बाकीच्यांना सांगते. बाकी सगळ्या वयानं जरा मोठ्या असलेल्या बायकाही त्याला दुजोरा देतात. शेफाली शाहनी मंजूची व्यक्तिरेखा कमालीच्या ताकदीनं साकारली आहे. मंजू कमालीची संवेदनशील आहे, आजूबाजूला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीही तिच्या नजरेतून सुटत नाहीत - शिकल्या-सवरलेल्या रजनीनं मोलकरणीला चहा देताना काचेच्या कपाऐवजी स्टीलचा ग्लास काढून देणं, शेजारच्या खोलीत खेळणाऱ्या मुलांमधून लहानग्या मुलीला केवळ ती मुलगी आहे म्हणून बोलावून आणणं आणि तिला मुलग्यांची ताटं वाढायला लावणं, एकीकडे स्वयंपाक करताना मुलांकडे लक्षसुद्धा मंजूनी द्यावं, ही ब्रजेशची अपेक्षा, बाहेरच्या खोलीतून येणाऱ्या पुरुषांच्या न संपणाऱ्या मागण्या आणि या सगळ्या गोंधळात कढईमधलं करपलेलं चिकन! मंजूच्या सहनशीलतेचा अंत होतो आणि त्यानंतर जे घडतं ती या सिनेमाची खरी ताकद आहे! मंजू हातातलं काम सोडते, शांतपणे फ्रीजमधून थंडगार ज्यूस काढते, तो ग्लासमध्ये ओतून घेते, एक खुर्ची ओढून हॉलमध्ये घेऊन जाते आणि कूलरसमोर बसून शांतपणे ज्यूस पिऊ लागते. ब्रजेश काही बोलणार तेवढ्यात त्याची नजर मंजूच्या नजरेला भिडते. तिच्या नजरेतली थंडगार आग त्याच्यापर्यंत काही न बोलताच पोहचते आणि तो गप्प बसतो. कमालीच्या उकाड्यात पुरुषांच्या पार्टीमध्ये कूलरच्या वाऱ्यासमोर बसून ब्रजेशच्या नजरेला नजर देत थंडगार ज्यूस पिणाऱ्या मंजूच्या चेहऱ्यावर कॅमेरा स्थिरावतो आणि तिथेच हा लघुपट संपतो.

लघुपटाची ताकद काय असते आणि कमी वेळात, कमी शब्दांत किती सांगता येऊ शकतं, हे अनुभवायचं असेल तर यूट्युबवर उपलब्ध असलेली ही शॉर्ट फिल्म पाहायलाच हवी. कुठेही बोजड संवाद नाहीत, अवजड भाषण नाही, पण तरीही त्या शेवटच्या काही सेकांदातल्या शांततेतून हा लघुपट फार काही सांगून जातो! 

‘कहानी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजॉय घोषने अहल्या आणि गौतम ऋषींच्या कथेची एक पुरोगामी मांडणी काही वर्षांपूर्वी ‘अहल्या’ या लघुपटातून सादर केली. राधिका आपटे आणि सौमित्र चटर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा लघुपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. देवांचा राजा इंद्रानं गौतम ऋषींचं रूप घेऊन अहल्येचा शीलभंग केला. याची शिक्षा म्हणून गौतम ऋषींनी अहल्येला शाप दिला आणि तिची शिळा झाली, अशी ही मूळ कथा. बिचाऱ्या अहल्येची काहीही चूक नसताना तिला मात्र शिक्षा आणि इंद्र, ज्यानं जाणूनबुजून हा कट रचला आणि अहल्येला फसवलं, त्याच्यासाठी कोणतीच शिक्षा नाही, हा दुटप्पी कारभार न पटलेल्या सुजॉय घोषनं या कथेचं एक ‘मॉडर्न व्हर्जन’ या लघुपटात दाखवलं आहे. या आधुनिक कथेत गौतम या वयस्कर फोटोग्राफरची तरुण आणि आकर्षक बायको म्हणजे अहल्या. एका बेपत्ता पुरुष मॉडेलची चौकशी करायला पोलिस इन्स्पेक्टर इंद्र सेन त्यांच्या घरी येतो आणि अहल्येवर वाईट डोळा असणाऱ्या इतर पुरुषांसारखीच त्याचीही गत कशी होते, हे हा लघुपट बघतानाच कळेल.

हे दोन्ही लघुपट ‘लार्ज शॉर्ट फिल्म्स’ या मालिकेचा भाग आहेत. या मालिकेतील इतरही बरेच लघुपट यूट्युबवर पाहायला मिळतील. देवाशिष मखीजाद्वारा दिग्दर्शित आणि मनोज वाजपयीची मुख्य भूमिका असलेला ‘तांडव’ हासुद्धा एक विशेष उल्लेख करण्याजोगा लघुपट आहे!

याशिवाय ॲनिमेशन प्रकारातदेखील अनेक लघुपट आपल्याला यू ट्यूबवर पाहायला मिळतात. यातले अर्थातच कमालीचे लोकप्रिय लघुपट म्हणजे ‘डिस्ने’ आणि ‘पिक्सार’द्वारा निर्मित वेगवेगळे सुंदर लघुपट. अगदी दोन-तीन मिनिटांपासून दहा-पंधरा मिनिटं लांबीचे हे लघुपट लहान मुलांनाच नाही, तर मोठ्या माणसांनासुद्धा मनापासून आवडतील असे असतात. असाच एक सुरेख लघुपट म्हणजे ‘ला लुना’. लुना म्हणजे चंद्र. अवघ्या सात मिनिटांचा हा लघुपट ‘फॅन्टसी’ म्हणजेच कल्पनाविलास या प्रकारात मोडतो. चंद्रावर सतत येऊन कोसळणाऱ्या चांदण्या साफ करण्याचं काम करणाऱ्या एका कुटुंबातला हा लहानगा. वडील आणि आजोबांच्या छायेतून बाहेर पडतानाच हळूहळू त्याला स्वतःची अशी खुबी कशी सापडते, याची कथा हा गोंडस लघुपट सांगतो.

भारतीय शैलीचं ॲनिमेशन करणारी प्रसिद्ध ॲनिमेटर गीतांजली राव हिचे ‘प्रिंटेड रेनबो’, ‘ब्लू’, ‘ऑरेंज’ लघुपट पाहायलाच हवेत, असे आहेत. आपल्या सिनेमातून वेगवेगळ्या भारतीय चित्रशैली शोधू पहाणाऱ्या गीतांजलीचे लघुपट आपल्या परदेशी पद्धतीच्या अॅनिमेशनला सरावलेल्या डोळ्यांना एक वेगळाच आनंद देतात. वेगवेगळी चित्रं असलेल्या काडेपेट्या गोळा करायचा छंद असलेल्या एका एकुटवाण्या आजीची गोष्ट ‘प्रिंटेड रेनबो’मध्ये गीतांजली राव सांगते. या आजीच्या कृष्णधवल आयुष्यातला एकमेव विरंगुळा म्हणजे जमवलेली ही रंगीबेरंगी चित्रं पुन्हा पुन्हा बघत राहणं, आणि या चित्रांच्या माध्यमातून जगाची सफर करून येणं. अशीच सफर करता करता एक दिवस ती याच रंगीत इंद्रधनुष्यात नाहीशी होऊन जाते आणि तेव्हा कदाचित तिला तिचा आनंद सापडतो. हा लघुपट बघणं म्हणजे खरंच एखादी सुरेख लयबद्ध कविता वाचण्यासारखं आहे. आपल्या भारतात इतक्या विलक्षण प्रतिभेचे कलाकार आहेत आणि पाश्चात्त्य शैलीचा मोठ्या प्रमाणात पगडा असलेल्या या क्षेत्रात इतकं कमालीचं काम करू पाहतायत, ॲनिमेशनची खास भारतीय शैली निर्माण करतायत, हे पाहून खरंच अभिमान वाटतो.

जगभरात असंख्य लघुपट सतत तयार होत असतात. शिकताना पहिली पायरी म्हणून बरेच सिनेमाकार लघुपट तयार करतात, तर काही केवळ लघुपट प्रकारातच काम करणारे फिल्ममेकरसुद्धा आहेत. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये लघुपट या विभागात वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, अगदी ऑस्करच्या स्पर्धेतसुद्धा सर्वोत्कृष्ट लघुपटांसाठी तीन पुरस्कार आहेत. यातले बरेचसे लघुपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर किंवा यूट्युबवर प्रदर्शित होत असतात. त्यामुळे कमी वेळात, कमी शब्दांत खूप काही सांगायची ताकद असणारा हा फॉरमॅट जाणून घ्यायचा असेल, तर फक्त सर्च ऑप्शन वापरून पाहा - हा खजिना आपली वाटच पाहतोय!

संबंधित बातम्या