गुरुर्देवो ऑक्टोपस!

अदिती पटवर्धन
सोमवार, 14 मार्च 2022

‘वेब’वॉच
 

एखाद्या माणसाची कुत्र्याशी, मांजराशी सहज दोस्ती होते. अगदी हिंस्र समजल्या जाणाऱ्या वाघ, सिंह, चित्त्यादी प्राण्यांशी माणसांची गट्टी झाल्याच्या कहाण्याही आपण ऐकल्या आहेत. पण एका ऑक्टोपसशी माणसाची मैत्री झाल्याचं कधी ऐकलंय? अशा एका अनोख्या मैत्रीची कहाणी ‘माय ऑक्टोपस टीचर’ हा सिनेमा सांगतो!

‘माय ऑक्टोपस टीचर’ माहितीपटाच्या पहिल्याच शॉटमध्ये आपल्याला दक्षिण आफ्रिकेतला एक विशाल, एकांडा समुद्र किनारा दिसतो. अगदी लगेचच या समुद्राच्या किनाऱ्याजवळच्या उथळ भागात दडलेल्या समुद्री शेवाळाच्या जंगलात आपण प्रवेश करतो... निळंशार अर्धपारदर्शक पाणी, त्यातून पाण्याच्या तळाशी पोहोचणारी किरणं प्रकाशाचा खेळ खेळतायत. पिवळसर, हिरवट, मातकट रंगाच्या लवचिक समुद्री वनस्पती झाडं वाऱ्याच्या तालावर जशी डोलतात तशा पाण्याच्या प्रवाहासोबत सळसळतायत, वेगवेगळ्या समुद्री जिवांची नित्याची लगबग सुरू आहे... आणि अशातच या वातावरणाला पूर्णतः ‘एलियन’ अशा दोन गोष्टी तिथं अवतरतात. एक म्हणजे ढब्बी चकाकणारी लेन्स असलेला काळ्या रंगाचा कॅमेरा आणि डायव्हिंग गिअर घातलेला, पण पूर्ण वेट सूटला डच्चू देऊन फक्त स्विमिंग शॉर्ट्स घातलेला डायव्हर क्रेग फॉस्टर. 

या समुद्री जंगलात रोज नित्यनेमानं सफर करणाऱ्या क्रेगला एका ऑक्टोपसची गुहा, म्हणजेच ‘डेन’ सापडते आणि रोज डायव्हिंगला गेल्यावर तिचं निरीक्षण त्याला करायचा छंद जडतो. या अनोळखी प्राण्याला पाहून डेनमध्ये आत आत जाऊन लपून बसणारी ती - हो, ही एक मादी ऑक्टोपस आहे - हळूहळू उत्सुकतेनं थोडीशी बाहेर डोकावू लागते. त्याच्या चकाकणाऱ्या कॅमेराच्या भिंगाकडे आकर्षित होते, तिच्या आठ भुजांचा वापर करून ही वस्तू काय आहे, ते चाखून बघते... एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेनी तिचं या वस्तूशी खेळणंही सुरू होतं, कधी ती तो कॅमेरा ढकलते, तर कधी आडवा पाडते! हळूहळू हा कॅमेरा घेऊन येणाऱ्या प्राण्याबद्दलसुद्धा तिला उत्सुकता वाटायला लागते. तो आल्यावर हळूच बाहेर डोकावणं, त्याच्या असण्यानं तिच्या दिनक्रमात काही फरक न पडणं, अशा गोष्टींतून त्याला तिच्या त्याच्यावर बसलेल्या विश्वासाची जाणीव व्हायला लागते... आणि एके दिवशी चक्क ती क्रेगनी पुढं केलेल्या हातात आपला हात देते! कॅमेरावर अचूक पकडला गेलेला त्यांच्या मैत्रीचा हा पहिला क्षण खरंच फार कमाल आहे!

या माहितीपटाची खरी ताकद आहे याचं अफलातून चित्रीकरण आणि संकलन. क्रेग अख्खं एक वर्षभर रोज या ठिकाणी डायव्हिंग करायला जात होता आणि तिथलं जग आपल्या कॅमेरामध्ये टिपत होता. या वर्षभराच्या कालावधीतलं अफाट प्रमाणातलं सगळं फुटेज पाहून, त्यातलं आवश्यक तेवढंच निवडून ते एका सुसूत्र धाग्यात बांधण्याचं काम आणि ते करत असताना ती नुसती एक प्राण्याबद्दलची डॉक्युमेंटरी फिल्म न राहता या माणसाच्या आणि प्राण्याच्या उलगडत जाणाऱ्या नात्याची गोष्ट होईल, हीसुद्धा किमया साधता येणं, ही फार अवघड गोष्ट आणि आणि जेम्स रीड आणि पिपा एरलीश या दिग्दर्शक द्वयीला बऱ्याच अंशी ते साध्य झालंय.

एका वर्षभराच्या कालावधीत क्रेगला उलगडत गेलेली ऑक्टोपसच्या आयुष्यातली अनेक रहस्यं आपल्यालाही हळूहळू उमगत जातात. तिचा दिनक्रम, तिची शिकार करण्याची पद्धत, त्यासाठी ती वापरते त्या वेगवेगळ्या क्लृप्त्या, तिला ज्यांच्यापासून धोका आहे असे वेगवेगळ्या जातींचे शार्क आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी ती करते ते एकसे एक ‘जीनियस’ उपाय, जसं की स्वतःला समुद्री शेवाळात गुंडाळून घेणं किंवा वेगवेगळे शंखशिंपले आपल्या भुजांमध्ये उचलून ते डोक्यावर धरून एखादा दगड असल्याचं भासवणं - सगळं सगळं आपल्याला हळूहळू कळत जातं. ही मैत्री का आहे, यातून तिला काय मिळतं, तिच्या काय भावना, कोणते विचार असतील; किंबहुन तिला विचार करता येत असेल का, असे आपल्याला पडणारे वेगवेगळे प्रश्न साहजिकच हे सगळं स्वतः अनुभवणाऱ्या क्रेगलासुद्धा पडतात आणि तो त्याच्या परीनं त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो.

मुळात क्रेगनं आपल्या कामातून ब्रेक घेऊन हे करायला सुरुवात का केली, यामागचं कारण महत्त्वाचं असलं, तरी ते पुरेसं स्पष्टपणे समोर येत नाही. क्रेग याबद्दल बोलताना त्याच्या आयुष्यातल्या एका खडतर काळाविषयी बोलतो, जेव्हा तो भयानक थकला होता, त्याला त्याच्या कामाविषयी तिटकारा निर्माण झाला होता आणि तो अशा एका विचित्र मनोवस्थेत होता ज्यामुळे तो त्याच्या कुटुंबापासून दूर जात होता. अशावेळी या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी त्यानं त्याच्या लहानपणीच्या आवडीचा, छंदाचा आधार घेतला. याच किनाऱ्यावर समुद्रालगत त्याचं घर होतं आणि समुद्रकिनारी खडकांमुळे तयार झालेल्या अशा नैसर्गिक तळ्यांमध्ये तासन तास पोहणं हा त्याचा लहानपणीचा आवडता छंद! त्यावेळी आपण किती आनंदी होतो आणि किती मोकळं मोकळं वाटायचं, हे आठवून क्रेगनं पुन्हा तिथं जाऊन डायव्हिंग करायचं ठरवलं आणि या सगळ्याची सुरुवात झाली.

कदाचित काहीशा अंतर्मुख मनोवस्थेत असल्यामुळे, स्वतःशीच अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला धडपडत असल्यामुळे असेल, पण या ऑक्टोपसशी झालेल्या मैत्रीकडे तो काहीशा जास्त आपुलकीनी, माणुसकीनी बघतो असं जाणवतं आणि हीच या माहितीपटाची जमेची बाजू आहे, असं मला वाटतं. एरवी अशा पद्धतीच्या माहितीपटाचा मुख्य मुद्दा त्या ऑक्टोपसचं आयुष्य आणि तिथल्या नैसर्गिक संरचना हाच राहिला असता. पण क्रेगच्या या सगळ्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे हा माहितीपट प्रेक्षकांशी अधिक जवळीक साधू शकतो. त्या ऑक्टोपसचं क्रेगवर पूर्णपणे विश्वास टाकणं, त्याच्या अगदी हातावर, छातीवर येऊन विसावा घेणं, यातून त्या ऑक्टोपसला किती भावनिक आपुलकी वाटते, हे आपल्याला माहीत नसलं, तरी क्रेग या नात्यातून खूप काही अनुभवतोय, खूप काही शिकतोय हे जाणवत राहतं. यातल्या बऱ्याचशा गोष्टी हे क्रेगच्या भावनांचं ‘प्रोजेक्शन’ आहे आणि ऑक्टोपसकडे इतक्या गुंतागुंतीच्या भावना अनुभवण्याइतकं सामर्थ्य नैसर्गिकरीत्याच नसेल, हे आपल्याला जाणवत असतं. पण तरी क्रेगला जे वाटतं आहे, तेही त्याच्या बाजूनी खरं आणि प्रामाणिक आहे, हेही आपल्याला लक्षात येतं. आपल्या आयुष्यातल्या एका अवघड कालावधीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रेगला या अनपेक्षित मैत्रीतून खूप काही गवसतं आणि म्हणून तो या ऑक्टोपसला थेट गुरूचा दर्जा बहाल करतो!

मुळातच डायव्हिंग हा एक विलक्षण अनुभव आहे. समुद्राच्या तळाशी जाऊन तिथल्या निळाईमध्ये हरवून जाणं, त्या पाण्याचा सर्वांगाला होणारा स्पर्श, तिथल्या कणाकणात असलेलं समुद्राचं जिवंत अस्तित्व अनुभवणं हाच एक आध्यात्मिक म्हणता येईल असा अनुभव आहे. त्याला जेव्हा या आगळ्या-वेगळ्या अनुभवाची जोड मिळते, तेव्हा क्रेगसाठी खरंच हा अनुभव आयुष्याला कलाटणी देणारा ठरला असणार, हे साहजिकच आहे.

आपल्यासाठीसुद्धा हा माहितीपट पाहणं हा एक विलक्षण अनुभव ठरतो, आणि ज्ञान आणि अनुभव-भावना या दोन्ही पातळ्यांवर घडणारा हा खेळ आपण अवाक होऊन पाहत राहतो. या ऑक्टोपसच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग पाहताना नकळत आपणही तिचे मित्र होतो! या माहितीपटाची दृश्य ताकद इतकी जबरदस्त आहे, की अगदी ऑस्करच्या ज्युरीलादेखील या माहितीपटानं भुरळ घातली आणि त्यांनी २०२१चा सर्वोत्तम माहितीपटासाठीचे ऑस्कर त्याला जाहीर केले. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असणारा हा माहितीपट आवर्जून पाहावा असाच आहे. क्रेग म्हणतो तसं हे ‘थ्री डी जंगल’ ज्यात तुम्ही वरून शिरता आणि जणू काही उडत उडत वरपासून खालपर्यंत कुठंही जाऊ शकता, तुम्हालाही नक्कीच भुरळ घालेल, हे नक्कीच!

संबंधित बातम्या