वास्तवदर्शी इराणी सिनेमा

अदिती पटवर्धन
सोमवार, 28 मार्च 2022


‘वेब’वॉच

असगर फरहदी या इराणी दिग्दर्शकाचा ‘अ सेपरेशन’ हा सिनेमा पाहत असताना अगदी सुरुवातीलाच आपल्याला जाणीव होते, की हा सिनेमा बघणं हे काही सोपं काम नाही. इथे प्रत्येक पात्र आपापल्या जागी योग्य आहे -आपापल्या वास्तवात ठामपणे पाय रोवून उभं आहे. आणि त्यामुळेच आपण प्रेक्षक म्हणून पाहताना हा चूक, ही बरोबर अशी विभागणी करून मोकळे होऊ शकत नाही.

सिनेमाच्या अगदी सुरुवातीचा हा प्रसंग... सिमीन आणि नादेर या जोडप्यानं कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला आहे. घटस्फोटाचं कारण असं आहे, की सिमीन आपल्या आणि लहान मुलीच्या भवितव्याचा विचार करून परदेशी जाऊ इच्छिते; पण नादेर मात्र आपल्या अल्झायमरने ग्रस्त म्हाताऱ्या वडिलांची काळजी घेण्यासाठी इराणमध्येच राहू इच्छितो.

या खटल्याची सुनावणी कौटुंबिक कोर्टात सुरू असताना सिमीन आपली बाजू समजावून सांगते. त्यावर न्यायाधीश तिला विचारतात, “हे घटस्फोटासाठी पुरेसं कारण वाटत नाही. आणखी काही आहे का?” ती मानेनंच नकार देते. “तुमचा नवरा व्यसनाधीन आहे का?” “नाही.” “मग तो तुम्हाला मारहाण करतो का?” “नाही हो.” न्यायाधीश अजूनही संशयानी पाहतोय. सिमीन काहीच बोलत नाही. नादेर काही वाईट नवरा नाहीच मुळी. उलट तो अगदी प्रेमळ आहे. पण हा एक असा मुद्दा त्यांच्या आयुष्यात उद्‍भवला आहे, ज्यावर समेट घडणंच अशक्य आहे. दोघंही आपापल्या निर्णयावर ठाम आहेत.

असगर फरहदी या इराणी दिग्दर्शकाचा ‘अ सेपरेशन’ हा सिनेमा पाहत असताना अगदी सुरुवातीलाच आपल्याला जाणीव होते, की हा सिनेमा बघणं हे काही सोपं काम नाही. इथे प्रत्येक पात्र आपापल्या जागी योग्य आहे - आपापल्या वास्तवात ठामपणे पाय रोवून उभं आहे. आणि त्यामुळेच आपण प्रेक्षक म्हणून पाहताना हा चूक, ही बरोबर अशी विभागणी करून मोकळे होऊ शकत नाही. या पात्रांच्या खरेपणाचं ओझं वागवतच आपल्याला हा सिनेमा पाहावा लागतो.

इराणी सिनेमा सुरुवातीपासूनच वास्तवदर्शी, निखळ आणि कलात्मक सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. माजीद माजिदी, अब्बास किआरोस्तामी, मोह्सेन मखमलबाफ यासारख्या दिग्दर्शकांनी त्यांची स्वतःची अशी शैली निर्माण केली आणि माणसांच्या दिनक्रमातले लहान लहान क्षण टिपून, त्या क्षणांना जिवंत करत एखादी सुरेख कथा विणता येऊ शकते, हे या सिनेमांनी मुद्दाम नाट्य निर्माण करण्याची सवय असलेल्या हॉलिवूडला आणि अमुर्ततेत रमणाऱ्या युरोपियन चित्रपटकारांना दाखवून दिलं. त्यामुळेच अनेक इराणी सिनेमे ऑस्कर पासून ते व्हेनिस, बर्लिन आणि कान्सपर्यंत वेगवेगळे पुरस्कार जिंकून गेले. ‘अ सेपरेशन’ला सुद्धा परकीय भाषा विभागातील सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीचे ‘ऑस्कर’, बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधला सर्वोच्च सन्मान ‘गोल्डन बेअर’ आणि ‘गोल्डन ग्लोब’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध असलेल्या या सिनेमातील प्रत्येक पात्र त्याच्या जागी योग्य आहे. नादेर आणि सिमीनच्या घटस्फोटाचा अर्ज न्यायाधीश फेटाळून लावतात. सिमीन आपल्या आईजवळ राहायला लागते, पण त्यांची १२ वर्षांची मुलगी तेरमेह मात्र वडिलांसोबत राहायचा निर्णय घेते. नादेरला आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी कोणाची तरी मदत लागणार हे लक्षात येतं आणि तो राझिये नावाच्या एका बाईची नेमणूक वडिलांची काळजी घेण्यासाठी करतो. राझियेला तीन वर्षांची छोटी मुलगी आहे, जी तिच्या सोबत कामावर येते. राझिये चार महिन्यांची गरोदर आहे, ही गोष्ट लपवून ठेवायची तिची धडपड आहे. अत्यंत धार्मिक असलेल्या राझियेला विस्मरणाचा आजार असलेल्या आजोबांचा सांभाळ करणं अवघड जातंय. एकदा बाथरूममध्ये गेलेले आजोबा बाहेर यायचं विसरतात, आणि आता आपल्याला त्यांचं सगळं करून त्यांना बाहेर घेऊन यावं लागणार हे लक्षात येतं, तेव्हा ती आधी इमामाला फोन करून त्याची परवानगी घेते. अशातच एक दिवस आजोबा तिची नजर चुकवून बाहेर जातात आणि त्यांना शोधायला राझिये रहदारीच्या रस्त्यावर पळत जाऊन त्यांना शोधून आणते. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला डॉक्टरकडे जायचं असतं तेव्हा ती आजोबांचा हात दिवाणाला बांधून आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन बाहेर जाते आणि नेमका त्याच वेळी नादेर घरी येतो. वडिलांची अशी अवस्था बघून तो भडकतो, राझिये परत आल्यावर त्यांच्यात बाचाबाची सुरू होते, आणि या सगळ्यात नादेर राझियेला ढकलतो. राझियेला दवाखान्यात न्यावं लागतं आणि तिचा गर्भपात झाल्याचं कळतं. यानंतर सुरू होतं एक नवं नाट्य. कुठल्याही क्षणी एखादा माणूस कसा वागेल, हे त्याचं त्यालाही माहीत नसतं आणि तो फक्त येणाऱ्या परिस्थितीला त्या त्या क्षणी प्रतिक्रिया देण्याचं काम करत असतो, हे फरहदी अतिशय कमाल पद्धतीनी, वेळ घेऊन उलगडून दाखवतो.

या कथेत एकीकडे उच्चभ्रू म्हणता येतील अशा सिमीन आणि नादेरच्या नात्याचं हळूहळू विघटीत होत जाणं आहे, तर दुसरीकडे राझिये आणि तिचा नवरा होद्जात यांचं एक वेगळं जग आहे - ज्यात गरिबी, असहायता आणि लाचारी आहे. या सगळ्यात प्रत्येकाची आपली अशी एक स्वतंत्र भूमिका आहे आणि त्या त्या माणसाच्या परिस्थितीचा विचार करता ती योग्यच आहे. लिंगाधारित भेदभाव जसा लहान लहान प्रसंगांतून समोर येत राहतो, तसाच वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतलं अंतरसुद्धा आपोआपच ठळक होतं.

या सगळ्यात एका मध्यवर्ती साक्षीदाराची भूमिका बजावते ती नादेर-सिमीनची १२ वर्षांची हुशार आणि संवेदनशील मुलगी तेरमेह. हे सगळं आसपास घडत असताना नकळतच ती या सगळ्याचं विश्लेषण करत राहते, अर्थ लावायचा प्रयत्न करत राहते.

नादेरला राझिये गरोदर असल्याचं माहीत होतं आणि तरीही त्यानी तिला ढकललं, यामुळे नादेरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. नादेर कोर्टात आपल्याला राझियेच्या गरोदर असण्याची कल्पना नसल्याचं सांगतो. तेरमेहला हे खटकतं. एका प्रसंगात ती नादेरला सरळ सरळ विचारते, तेव्हा नादेर म्हणतो, “खरं सांगायचं तर मला माहीत होतं. पण जेव्हा तो सगळा वाद झाला, त्या क्षणी ते मला माहीत नव्हतं! खरंच! ते माझ्या डोक्यातच नव्हतं त्या क्षणी!” “पण मग तुम्ही तसं सांगितलं का नाही त्यांना?” “कारण कायदा हे समजून घेऊ शकत नाही. कायद्यासाठी एक तर तुम्हाला माहीत असतं किंवा नसतं,” नादेर म्हणतो. आपण खोटं बोलल्याचं त्यानी तेरमेहकडे कबूल केलं आहे, आणि त्याची बाजू कळल्यामुळेच तेरमेह नंतर कोर्टासमोर त्याच्या बाजूनी जबाब देते.

चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो, तसतसं नादेर आणि सिमीन यांच्यातलं अंतर हळूहळू वाढत जातं. शेवटी जेव्हा पुन्हा घटस्फोटाचा मुद्दा पुढे येतो - तेव्हा तेरमेह कोणाकडे जाणार हा प्रश्न उपस्थित होतो. चेहऱ्यावर निर्धार असलेली तेरमेह आणि कमालीचे अस्वस्थ आई वडील कोर्टाच्या व्हरांड्यात बसलेले दिसतात. तेरमेह तिचा निर्णय झाला असल्याचं सांगते, पण तो सांगताना तिला आई किंवा बाबा समोर नको आहेत. त्यामुळे नादेर आणि सिमीन बाहेर थांबतात, तेरमेह आत जाते आणि नादेर आणि सिमीनच्या मनात उठणारा कल्लोळ आपल्याही मनात उसळतोय, हे आपल्याला जाणवायला लागतं तोच सिनेमा संपतो.

हीच फरहदीच्या सिनेमाची मजा आहे! किआरोस्तामीचा वास्तवदर्शी, जमिनीवरचा सिनेमा आणि हिचकॉकची उत्कंठा ताणून ठेवत कथेतला गूढपणा जपण्याची हातोटी - याचा एक विलक्षण संगम फरहदीच्या सिनेमात पाहायला मिळतो. अत्यंत खरी, जमिनीत रुजलेली पात्रं शांतपणे आपापल्या जागी आपापली आयुष्यं जगत असतात आणि एखादीच अशी घटना घडते की त्यामुळे या सगळ्या पात्रांच्या आयुष्याची सरमिसळ होऊन जाते. अगदी स्वतःलाही ओळखू येणार नाही, इतके आमुलाग्र बदल घडत जातात. साधीसुधी माणसं, साध्यासुध्या घटना, आणि त्यांच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांतून एवढं नाट्य आणि थरार तो घडवून आणतो, की अवाक होऊन पाहत राहावं. आज जगात सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये त्याचं नाव का गणलं जातं, हे कळून येतं. खऱ्या अर्थानी ‘युनिव्हर्सल’ होणारा सिनेमा म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर ‘अ सेपरेशन’ पाहायलाच हवा!

संबंधित बातम्या