स्त्री कॉमेडीयनचा अफलातून प्रवास!

अदिती पटवर्धन
सोमवार, 11 एप्रिल 2022

 ‘वेब’वॉच
 

‘द मार्व्हलस मिसेस मेझल’ या लोकप्रिय वेबमालिकेमध्ये पन्नास-साठच्या दशकातील एका स्त्री कॉमेडीयनचा प्रवास बघायला मिळतो. ‘गिलमोर गर्ल्स’ या प्रसिद्ध मालिकेची निर्माती एमी शर्मन-पलाडीनोनं याही मालिकेची पूर्ण धुरा सांभाळली आहे. एमी शर्मन यांचे वडील डॉन शर्मन हे १९५०च्या दशकातले स्टँड अप कॉमेडीयन होते आणि त्या काळावरून प्रेरणा घेऊन शर्मनबाईंनी ही मालिका करायचं ठरवलं. 

सन १९५०चा काळ. अमेरिकेतल्या न्यू यॉर्कच्या ‘अप्पर वेस्ट साईड’ या उच्चभ्रू भागात राहणारी मिसेस मिरियम ऊर्फ ‘मिज’ मेझल. मिजला जे हवं होतं, ते सगळं मिळालेलं आहे. प्रेमात पडून तिनं जोलशी लग्न केलं, आता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत, मिजच्या आई-वडिलांच्याच इमारतीत वरच्या मजल्यावर मिज आणि जोल राहतात. मिजची कंबर अजूनही तिचं लग्न झालं तेव्हा होती, त्याच मापाची आहे, ती तिच्या नवऱ्याच्या स्टँड अप कॉमेडीयन होण्याच्या स्वप्नाच्या मागे उभी राहते, त्याच्यासाठी नोट्स काढते, वेळप्रसंगी क्लबच्या मालकाला जोलला माईकसमोर वेळ मिळावा यासाठी तिची प्रसिद्ध रेसिपी असलेल्या ‘ब्रिस्केट’ची लाच सुद्धा देते. एकुणात मिज ही एक अगदी आदर्श गृहिणी आहे.

या तिच्या ‘परफेक्ट’ आयुष्यात मिठाचा खडा ठरतील अशा दोन गोष्टी तिला कळतात - एक म्हणजे जोल स्वतः त्याचे विनोद लिहून कॉमेडी कधीच करत नव्हता, तर एका प्रसिद्ध कॉमेडीयनचे विनोद चक्क ढापत होता! आणि दुसरी, त्याहून जास्त हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे जोलचं त्याच्या सेक्रेटरीबरोबर अफेयर सुरू आहे. एके रात्री क्लबमध्ये त्याचा कॉमेडीचा प्रयोग सपशेल फसल्यानंतर आणि आपण कधीच चांगले कॉमेडीयन होऊ शकणार नाही हे कटू सत्य उमगल्यानंतर जोल तिला हे सांगतो आणि ‘आपण आता एकत्र राहू शकत नाही’ असं सांगून घर सोडून निघून जातो. हादरलेली मिज सैरभैर होऊन पुन्हा त्या क्लबमध्ये येते, दारू पिऊन क्लबच्या स्टेजवर जाऊन पहिल्याच प्रयत्नात उत्स्फूर्तपणे स्टँड अप कॉमेडी करते आणि स्वतःला अटकही करून घेते!

आता आपल्याला या काळाची पार्श्वभूमी थोडीशी जाणून घ्यायला हवी. ‘स्टँड अप कॉमेडी’ हा प्रकार त्या काळी प्रचलित झाला असला, तरी अशा प्रकारचे प्रयोग करणाऱ्या कलाकारांवर खूप बंधनं असायची. अश्लील समजली जाणारी भाषा, हावभाव, खुणा वापरण्यावर बंदी होती - एखादाही वेडावाकडा शब्द आला तरी तुरुंगवारी ठरलेली. शिवाय या क्षेत्रात महिला बोटावर मोजण्याइतक्यासुद्धा नव्हत्या. त्यामुळेच यातले कोणतेच नियम माहीत नसणाऱ्या मिजची रवानगी थेट तुरुंगात होते. पोलिसांच्या गाडीत मिजला लेनी ब्रूस हा त्या काळातला प्रसिद्ध, पण वादग्रस्त कॉमेडीयन भेटतो. लेनी इतका मुरलेला आहे, की त्याला हवं तेच तो बोलतो, राजकीय मुद्द्यांपासून ते वर्णभेदापर्यंत कोणताच मुद्दा त्याला वर्ज्य नाही आणि त्यामुळेच वरचेवर तुरुंगाची हवा खाणं हा त्याच्यासाठी नित्यनेमाचा भाग आहे. खरंतर आयुष्यात पहिल्यांदाच वास्तवाला सामोरं गेलेल्या मिजला हे सगळंच नवीन आहे. वारंवार तुरुंगात जाऊनसुद्धा हा माणूस कसं काय हे बंद करत नाही, याचं तिला आश्चर्य वाटतं. लेनीसुद्धा हा एक भयंकर व्यवसाय असल्याचं सांगतो, आणि “मला दुसरं काहीही करणं शक्य असतं तर तो मी ते केलं असतं, पण...” या त्याच्या एका वाक्यातून स्टँड अप कॉमेडीची झिंग काय आहे याची आपल्याला जाणीव होते. आणि मिजलासुद्धा लवकरच हीच झिंग चढणार आहे, हेही कळतं!

‘गॅसलाईट’ क्लबमधली मॅनेजर सुझी मिजला जामीन मिळवून देते. रात्रीचं तिचं बोलणं ऐकून मिजमध्ये ‘कुछ तो बात हैं’ हे अनुभवी सुझीनं हेरलेलं आहे आणि ही बाई उत्तम स्टँडअप कॉमेडीयन होऊ शकते, याची तिला खात्री आहे. या पर्यायाचा करियर म्हणून विचार करायला सुझी मिजला भाग पाडते. इथून पुढे प्रत्येक क्षणी मिजची मॅनेजर आणि सर्वात जवळची व खरी मैत्रीण म्हणून सुझी मिजच्या पाठीशी उभी राहते... आणि सुरू होतो मिजचा स्टँड अप कॉमेडीच्या पुरुषप्रधान जगातला खडतर आणि अर्थातच विनोदांनी भरलेला प्रवास!

 ॲमेझॉन प्राईम व्हिडिओची निर्मिती असलेल्या ‘द मार्व्हलस मिसेस मेझल’ या लोकप्रिय वेबमालिकेच्या लोकप्रियतेचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे यातले कलाकार. मिजचं कुटुंब, म्हणजे मिजचे विद्यापीठात गणित शिकवणारे अतिशय हुशार पण विसरभोळे प्राध्यापक वडील एब, जिच्याकडून आदर्श गृहिणी कसं व्हायचं हे मिज शिकली आहे अशी तिची आई रोझ, वेगळं झाल्यानंतरही मुलांसाठी आणि उरल्यासुरल्या थोड्याशा प्रेमाखातर तिच्या आयुष्यात असलेला जोल, तयार कपड्यांचा व्यवसाय करणारा सासरा (खरंतर एक्स-सासरा) ताठ, बढाईखोर मॉईश, मोठ्ठ्या आवाजात खूप बडबड करणारी (एक्स-सासू) शर्ली, मिजची सर्वात जवळची मैत्रीण आणि जोलच्या सर्वात जिगरी दोस्ताची आर्चीची बायको इमोजीन आणि या गदारोळात नव्यानी सामील झालेली - मिजच्या अप्पर वेस्ट साईडच्या सुखवस्तू गणितात कुठेच न बसणारी, शर्ट-पॅन्ट आणि पुरुषी हॅट घालणारी, रुमालाएवढ्या घरात राहणारी तिची मॅनेजर सुझी. या सगळ्या उत्कृष्ट कलाकारांनी मिळून जी काही धमाल केली आहे, त्यामुळे या मालिकेचा प्रत्येक क्षण मनमुराद हसवणारा आहे. यातल्या प्रत्येक पात्राचा स्वतःचा असा प्रवास आहे.

‘गिलमोर गर्ल्स’ या प्रसिद्ध मालिकेची निर्माती एमी शर्मन-पलाडीनोनं याही मालिकेची पूर्ण धुरा सांभाळली आहे. एमी शर्मन यांचे वडील डॉन शर्मन हे १९५०च्या दशकातले स्टँड अप कॉमेडीयन होते आणि त्या काळावरून प्रेरणा घेऊन शर्मनबाईंनी ही मालिका करायचं ठरवलं. आणखी एक वेगळेपणा ही मालिका बघताना जाणवतो, तो म्हणजे या मालिकेतून मांडली जाणारी ज्युईश संस्कृती. अमेरिकेत बरीच शतकं ज्यू धर्मीय लोक वास्तव्याला असले तरी त्यांची संस्कृती, त्यांचे सण हॉलिवूडमध्ये तितक्या प्रमाणात दाखवलेले आढळत नाहीत. या मालिकेच्या निमित्तानं या वेगळ्या संस्कृतीशी आपला परिचय होतो.

या मालिकेची आणखी एक जमेची बाजू म्हणजे यातलं १९५०-१९६०च्या दशकांतल्या काळाचं चित्रण. कमालीचं सुंदर आणि अचूक सेट डिझाईन आणि अफलातून वेशभूषा यांच्या साहाय्यानं ५० आणि नंतर ६०चं दशक या मालिकेनं उभं केलं आहे. त्या काळातले कपडे, गाड्या, इमारती, सर्वच बाबतीतल्या वेगवेगळ्या प्रचलित फॅशन या गोष्टी ही मालिका उभ्या करतेच, पण शिवाय त्या काळातली मानसिकता, स्त्रियांनी आपले विचार खुलेपणानी व्यक्त करण्याला असलेली बंधनं, नवऱ्यासमोर सतत सुंदर आणि ‘प्रेझेंटेबल’ दिसायला हवं या समजाचा असलेला प्रचंड पगडा.. एक वेगळाच काळ आपल्यासमोर उभा राहतो.

अगदी सुरुवातीच्याच एपिसोडमध्ये रात्री आपण मिजला जोलशेजारी झोपी जाताना पाहतो. मिजनी केलेला पूर्ण मेकअप (अगदी खोट्या पापण्यांसकट) पाहून मनातल्या मनात, “हे म्हणजे हिंदी सिरियलसारखं झालं, झोपताना कोणी असा मेकअप करतं का!” असं आपण म्हणतोय तोवर मिज हळूच डोळे उघडते. जोल गाढ झोपलाय, हे बघून उठते आणि बाथरूममध्ये जाते. तिथं आपला पूर्ण मेकअप उतरवते, केसांना कर्लर लावते, चेहऱ्यावर क्रीम थापते आणि गुपचूप जोलशेजारी येऊन झोपते. पहाटे पहाटे मिजचा फक्त तिच्यासाठी असलेला खास गजर वाजतो आणि पुन्हा मांजरीच्या पावलांनी ती बाथरूममध्ये जाते. कर्लर काढून केस स्टाईल करते, क्रीम धुऊन टाकते, पुन्हा मेकअप करते आणि जोलला जाग यायच्या आधी त्याच्या शेजारी येऊन ‘परफेक्ट’ मिज होऊन झोपते! ज्या माणसावर प्रेम करायचं, ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं त्याच्यासमोरसुद्धा आपल्याला आपलं खरं रूप दाखवता येऊ नये, हा केवढा विरोधाभास... आणि इथपासून सुरुवात करून नंतर स्टेजवर काहीशे लोकांसमोर आपल्या मनात जे येईल ते कोणताही ‘फिल्टर’ न लावता बोलणाऱ्या मिजला पाहून आपण खरंच थक्क होतो!

संबंधित बातम्या