लग्नगाठींमागच्या  गुंतागुंतीचा वेध

अदिती पटवर्धन
सोमवार, 9 मे 2022

‘वेब’वॉच

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण पृथ्वीवरच्या माणसांनी लग्नाच्या या गाठींचा जो अनाकलनीय गुंता करून ठेवला आहे, त्या गुंत्यात शिरायचं धाडस करणाऱ्या फार थोड्या सिनेमालिकांपैकी एक ‘मेड इन हेवन’ आहे, हे नक्की!

गेल्या काही वर्षांत ‘वेडिंग प्लॅनिंग’ इंडस्ट्री भारतात चांगलीच रुजली आहे. लग्नातल्या प्रत्येक विधीचा ‘सोहळा’ करण्याचं काम वेडिंग प्लॅनर करतात. उदाहरणार्थ, हळदीच्या कार्यक्रमाला पिवळ्या फुलांची सजावट, साजेसा मेनू या बरोबरीनं वधूसाठी फुलांचे दागिने, घरच्या इतर सगळ्यांसाठी ‘कलर कोऑर्डीनेटेड’ कपडे, सजावटीसाठी विशिष्ट थीम ठरवणे, डीजेनं कोणकोणती गाणी लावायची याचं नियोजन, एखाद्या नेमक्या क्षणाला वधूच्या अंगावर फुलं उधळली जातील असं बघणं, त्यासाठीचं नियोजन, यासारखी लग्नातली एक ना अनेक कामं वेडिंग प्लॅनर आपल्या अंगावर घेतात. पूर्वी वेगवेगळ्या घरांतले ‘नारायण’ जी कामं करायचे, ती कामं आता हे वेडिंग प्लॅनर करतात आणि त्यामुळे घरातल्या मंडळींना लग्नविधींचा आनंद निवांतपणे लुटता येतो.

ॲमेझॉन प्राइम व्हिडियोवर उपलब्ध असलेली ‘मेड इन हेवन’ हे वेबमालिका तारा आणि करण या वेडिंग प्लॅनर्सची गोष्ट सांगते. झोया अख्तर आणि रीमा कागती या दोन गुणी चित्रपटकारांनी या मालिकेची धुरा सांभाळली आहे. साधारण एकेक तास लांबीच्या नऊ भागांमध्ये विभागलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन स्वतः झोया अख्तर, नित्या मेहरा, प्रशांत नायर आणि अलंक्रिता श्रीवास्तव या चार दिग्दर्शकांनी केलं आहे. सोभिता धुलीपाला आणि अर्जुन माथुर या दोन कलाकारांनी या मालिकेत तारा खन्ना आणि करण मेहरा या प्रमुख भूमिका अतिशय ताकदीनं साकारल्या आहेत.

तारा ही एक निम्न मध्यमवर्गात जन्मलेली एक हुशार तरुणी. श्रीमंतीची आणि उच्चभ्रू आयुष्याची स्वप्नं पाहत ती मोठी झालीय, आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर तिचं ते स्वप्न खरंसुद्धा झालंय. आदिल खन्ना या एका खानदानी उद्योगपतीच्या कंपनीत काम करताना त्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी तिनं लग्न केलं आहे. असं असलं, तरी तिला अजूनही या सगळ्या चमचमाटात स्वतःचं असं स्थान सापडत नाहीये. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी आदिलकडून गुंतवणूक घेऊन तिनं तिच्या जुन्या मित्राच्या करणच्या साथीनं ‘मेड इन हेवन’ ही उच्चभ्रू लोकांसाठीची वेडिंग प्लॅनिंग कंपनी सुरू केली आहे. करणला त्याच्या पहिल्या व्यवसायात अपयश आलेलं आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला ज्यांच्याशी छत्तीसचा आकडा आहे, त्या वडिलांकडूनच पैसे घ्यावे लागले आहेत आणि तरीही तो अजूनही कर्जबाजारी आहे. त्यामुळे हा नवा व्यवसाय यशस्वी होणं त्याच्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे. करणच्या व्यक्तिगत आयुष्यातलं आणखी एक रहस्य म्हणजे तो समलैंगिक आहे, पण सामाजिक दबावामुळे त्याला त्याची ही ओळख उघड करता येत नाही.

या मालिकेच्या प्रत्येक भागात एक वेगळं जोडपं, आणि त्यांची नवी कहाणी आपल्या समोर येते आणि त्याच बरोबरीनं तारा आणि करण यांची वैयक्तिक आयुष्यंसुद्धा उलगडत जातात. या जोडप्यांच्या आयुष्यात त्यांच्याही नकळत करण आणि तारा गुंतत जातात, आणि प्रत्येक लग्न त्यांच्यासाठी फक्त एक प्रोजेक्ट न उरता त्याहून मोठं काही तरी होतं. ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय लग्नांमागची गुंतागुंत आणि त्याचबरोबर या परंपरेत घडणारे कालसुसंगत बदल, तिच्यासमोर येणारी आव्हानं, या सगळ्या देखाव्यातला फोलपणा हे सगळं या मालिकेत आवर्जून समविष्ट केलं आहे, ज्यामुळे ही मालिका बहुतांश अति-श्रीमंतांच्या लग्नांबद्दल असूनही ‘रीलेटेबल’ वाटते.

वेगवेगळ्या प्रकारची माणसं या निमित्तानं करण आणि ताराच्या आयुष्यात येतात. एका भागात एक साठीचं जोडपं लग्नाला उत्सुक आहे, पण त्यांच्या तरुण मुलांना हा प्रकार अजिबात आवडलेला नाही आणि त्यामुळे तेढ निर्माण झाली आहे. या जोडप्याची बाजू आणि मुलांची बाजू दोन्ही समजून घेऊन करण आणि तारा त्यांच्यात समेट घडवून आणतात आणि हे लग्न पार पडतं. एका आयएएस अधिकाऱ्याच्या लग्नात मुलाकडच्या लोकांनी हुंड्याची मागणी केली, हे ऐन लग्नघटिकेच्या वेळी नवरीला कळतं आणि त्यातही आपल्या होणाऱ्या नवऱ्याची याला मूक संमती आहे हेही लक्षात आल्यावर ती ते लग्न मोडण्याचा निर्णय घेते. समाजात आजही छुप्या पद्धतीनं हुंडा देणं-घेणं ही प्रथा सुरू आहे, आणि उच्चशिक्षित तरुणही त्याला अपवाद नाहीत, हे सत्य तितक्याच थेट पद्धतीनं मांडून ही मालिका बघणाऱ्याला अस्वस्थ करते. एका एनआरआय मुलानी लग्नासाठी भारतात घेतलेली ‘स्पर्धा’ हीसुद्धा अशाच पद्धतीचं विषण्ण करणारं वास्तव सांगून जाते.

त्याच वेळी समलैंगिक व्यक्तींना काय पद्धतीच्या तणावाचा सामना आयुष्यभर करावा लागतो, हे तीन वेगवेगळ्या वयाच्या आणि पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या कथा समांतरपणे सांगून दिग्दर्शक दाखवून देतात. करणचा पन्नाशीतला विवाहीत, एका मुलीचा बाप असलेल्या घरमालकानं आख्खं आयुष्य स्वतःची खरी ओळख लपवलेली आहे. आपण समलैंगिक आहोत, हे तो आयुष्यात पहिल्यांदा उघडपणे, नाइलाजानं का होईना, पण कबूल करतो, तेव्हा आपल्या अंगावर सर्रकन काटा येतो. तर दुसरीकडे करणच्याच जवळच्या मैत्रिणीशी ज्याचं लग्न ठरलंय, तो करणचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आहे. तिशीतला हा मॉडर्न तरुण, ‘उघडपणे खरं कबूल करून जगण्याची हिंमत माझ्यात नाही, त्यापेक्षा मी हे खोटं आयुष्य जगायला तयार आहे,’ असं म्हणतो, तेव्हा समाज यांच्याकडून वेगळं असण्याची केवढी मोठी किंमत मागतो, याची जाणीव होते.

हुंडा, ऑनर किलिंग, वर्गभेद-जातीभेद, नव्या आणि जुन्या विचारांतला संघर्ष, समलैंगिकतेभोवतीचे प्रश्न, लग्नाकडे केवळ व्यवहार म्हणून पाहणारी मानसिकता - यांसारखे लग्नाशी जवळून जोडलेले वेगवेगळे मुद्दे या मालिकेत पुढे येतात, आणि मुख्य म्हणजे एखाद्या सामाजिक विषयावर भाष्य करायचंच, अशा हेतूने आणि अट्टाहासानं नाही, तर कथेच्या बांधणीत चपखल ठिकाणी, त्यातली मेख मोक्याच्या क्षणी उलगडून दाखवताना त्यावर मोठमोठी भाषणं अजिबात न देता हे मुद्दे येतात आणि त्यामुळेच ही मालिका अधिक परिणामकारक ठरते.

या मालिकेतली मला आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे यातली अतिशय ताकदीची स्त्री पात्रं. तीन ताकदीच्या स्त्रियांनी या मालिकेच्या लेखन-निर्मिती-दिग्दर्शनात मोठी भूमिका बजावल्यामुळे असेल, पण या मालिकेतली एकही स्त्री खोटी किंवा कचकड्याची वाटत नाही, मग ती निम्न मध्यमवर्गातून उच्चभ्रू वर्गात गेलेली तारा असो, पाच माणसांच्या कुटुंबात दिल्लीतल्या लहानशा एका खोलीच्या घरात राहणारी जसप्रीत ऊर्फ जॅझ असो, किंवा खानदानी श्रीमंत असलेली फैझा असो. या मालिकेतली ‘ती’ महत्त्वाकांक्षी आहे, तिला आयुष्यात पुढं जायचं आहे, आणि त्यासाठी तिच्या पद्धतीनं ती प्रयत्न करते. कधी तिचे निर्णय चुकतात, आणि ती तोंडावर आपटते. पण त्यासाठी ती कोणालाही दोष देत नाही, कारण ती स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायलाही शिकली आहे. ती भावुक आहे, पण भावनाप्रधान नाही. कोणीतरी येऊन आपल्याला मदत करावी यासाठी ती वाट बघत बसत नाही, आपल्या परीनं उत्तरं शोधायचा प्रयत्न करते. ही आजची स्त्री आहे, बॉलिवूडच्या कल्पनेतली कचकड्याची बाहुली नाही. आणि म्हणूनच ती जवळची वाटते, आपली वाटते.

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण पृथ्वीवरच्या माणसांनी लग्नाच्या या गाठींचा जो अनाकलनीय गुंता करून ठेवला आहे, त्या गुंत्यात शिरायचं धाडस करणाऱ्या फार थोड्या सिनेमालिकांपैकी एक ‘मेड इन हेवन’ आहे, हे नक्की!

संबंधित बातम्या