पाऊस संकेत

अॅड. सीमंतीनी नूलकर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

कव्हर स्टोरी

मॉन्सून हे भारतीय उपखंडाचं वैशिष्ट्य आहेच, पण भारतीय उपखंडाला पडलेलं अवघड कोडंही आहे. मॉन्सून कधी बरसेल, किती येईल, कोणकोणत्या भौगोलिक क्षेत्रावर मेहेरबान होईल, याचे आडाखे सोपे नसतात. ‘मौसीम’ या मूळ अरबी शब्दावरून मॉन्सून हा शब्द रूढ झाला आहे. मौसीमचा अर्थ वर्षातून एकदा येणारा ऋतू - मॉन्सून!

सरत्या उन्हाळ्यापासून झाडं-वेली, पशू-पक्षी, माणसं, मॉन्सूनच्या काजळकाळ्या मेघांची वाट, डोळ्यात प्राण आणून पाहत असतात. इतकंच नव्हे तर माती, डोंगररांगांवरचे काळे कातळ, जांभळसडेही मॉन्सूनकडं डोळे लावून बसलेले असतात. उन्हाळी आकाशातलं रंगसोहळ्याचं अप्रूप संपलेलं असतं. कधी एकदा हे रंग फिकुटतील, कधी घनघनमाला दाटून येतील, अशी आस लागलेली असते. आकाशपटावर पर्जन्यनांदी करणाऱ्‍या, मेघज्योती, मेघरेखांची ओढ लागलेली असते.

भारतात मॉन्सून येतो तो केरळ मार्गे. त्याचं पहिलं ओलेतं पाऊल पडतं ते तिरुवनंतपुरममध्ये. मॉन्सूनच्या दोन शाखा आहेत. एक अरबी समुद्रावर सक्रिय होणारी शाखा म्हणजे नैऋत्य मॉन्सून. तर दुसरी बंगालच्या खाडीवर सक्रिय होणारी. कालिदासानं रघुवंशात, ज्या पश्‍चिम घाटाचं वर्णन, हिरवा शालू लेऊन पहुडलेली सुंदरी असं केलंय, तिचं मस्तक म्हणजे कन्याकुमारी, उन्नत स्तन म्हणजे निलगिरी आणि अन्नामलाई आणि नितंब-कटी प्रदेश म्हणजे गोवा-कारवार! अशा या सुंदरीला नैऋत्य मॉन्सून हळूहळू कवेत घेत जातो.

जैवविविधतेचा अफाट खजिना, जैविक ऐश्‍वर्याचा संपन्न आविष्कार म्हणजे पश्‍चिम घाट! ही जैविक संपन्नता केवळ आणि केवळ मॉन्सूनवर अवलंबून असते. म्हणून मान्सूनचे वेध. तो कधी येणार, किती येणार याचा लेखाजोखा म्हणूनच ही सुंदरी, संपूर्ण पश्चिम घाट मागत असतो.

मॉन्सूनबद्दल भाकीत करण्याच्या काही पद्धती आहेत. विकसित तंत्रज्ञान, उपकरणं, हवामानशास्त्र याबरोबरच  पारंपरिक प्राचीन पद्धतीही आहेत. ढग, ढगांचे रंग आणि आकार, दिशा, गडगडाटाचे आवाज, इंद्रधनू यावरून पावसाचं भाकीत करतात. त्याला अंतरिक्ष पद्धती म्हणतात. तर, भूमीवरचे कीटक, पशुपक्षी, फुलं-झाडं यावरून भाकीत करण्याची ती भौम पद्धती. कित्यकशे वर्षांपूर्वी वराहमिहिरानं या पद्धती मांडल्या. त्याच अबेरक्रम्बी हिल्ड ब्रॅंडसननं १८८७ मध्ये नव्यानं सांगितल्या. नव्या बाटलीत जुनी दारू!

शास्त्रीय भाषेत म्हणायचं, तर अंतरिक्ष आणि भौम पद्धती म्हणजेच अजैविक (abiotic) आणि जैविक (biotic) घटकांवरून पावसाचे आडाखे बांधणं. स्थानिक लोक, शेतकरी, आदिम जाती-जमातींची स्वतःची काही निरीक्षणं, ठोकताळे असतात. परंपरागत, वर्षानुवर्षांचे अनुभव! यांचं शास्त्रीय भाषेत डॉक्युमेंटेशन नसतं, सिस्टमॅटिक अनॅलिसिस नसतं, पण म्हणून ते सरसकट मोडीत काढता येणार नाहीत. अंतरिक्ष असो किंवा भौम पद्धती किंवा शास्त्राधारीत पद्धती, पावसाचे संकेत समजून घेणं महत्त्वाचं. निसर्गाच्या, लोकसंस्कृतीच्या जवळ गेल्याशिवाय निसर्गाची ही भाषा, लोकसंस्कृतीचे हुंकार समजत नाहीत हे खरं! लोकगीतात, संगीतातही पावसाची चाहूल, भरून आलेल्या मेघांमुळं विरहिणीला.... आलेली व्याकुळता, कजरी, बारहमास गीतातून दिसते. कजरी तर पावसाच्या चाहुलीची, पावसाचीच गाणी आहेत. काजळाच्या रंगाच्या मेघांवरून ‘कजरी’ हे नाव या गीत प्रकाराला पडलंय.

भारत कृषिप्रधान देश असल्यानं आणि भारतातली शेती पर्जन्याच्या लहरीवर अवलंबून असल्यानं पर्जन्यवृष्टीचे आडाखे शेतकऱ्‍यांना, जनसामान्यांना नितांत आवश्यक. प्राचीन साहित्य, लोकसाहित्यात निसर्ग निरीक्षणावर, नित्य अनुभवावर आधारित काही पर्जन्य आडाखे आढळतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, वराहमिहिराच्या बृहतसंहितेत  वर्षाविषयक सिद्धांत आढळतात. वराहमिहिरानं गर्ग, कश्यप अशा ऋषींचा उल्लेख ‘वर्षा वैज्ञानिक’ असा केला आहे. 

पर्जन्यभाकितं करणारं लोकज्योतिषांचं लोकसाहित्यही समृद्ध आहे. महाराष्ट्राच्या लोकसाहित्यात सहदेव भाडळी  ही लोकज्योतिषांची प्रसिद्ध जोडी आहे. त्यापैकी भाडळी गुजरात, राजस्थान, पूर्वभारत, हरयाणा, उत्तरप्रदेश, बिहारमध्ये भडळी, भंदली, भाजली अशा नावांनी आढळते. तर भाडळीचा सहचर राजस्थानात डंक, बंगालमध्ये डाक, उत्तर भारतात घाघ म्हणून ओळखला जातो. गुजरात-काठेवाडात ‘भडळीवाक्य’ ही पर्जन्यभाकितं प्रमाण  मानून पूर्वापार शेतीव्यवहार केले जातात. गुजरात मधले इतिहासतज्ज्ञ मोहनलाल झवेरी म्हणतात, ‘भडळीवाक्य’ या लोकसाहित्यातले पर्जन्यआडाखे सूक्ष्म निरीक्षणांवर, अनुभवावर आधारित असल्यानं प्रायतः बरोबर असतात. महाराष्ट्रात सहदेव भाडळीच्या ‘मेघमाला’ या ओवीबद्ध रचना आहेत. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते या रचना मराठीतले आद्य गद्यावशेष आहेत.

मॉन्सून भारताच्या नसानसात, मनामनात, संस्कृतीत रुजलेला आहे. संपूर्ण लोकजीवन त्याभोवती केंद्रित आहे. म्हणूनच मॉन्सून अनुभवणं, मॉन्सून उतरताना पाहणं, मॉन्सूनबरोबर प्रवास करणं, सगळंच अंतर्मुख करणारं असतं. पावसाच्या निव्वळ संकेतानं चैतन्याचे कोंब रसरसतात. गोव्याचा किनाऱ्या‍वर, ताशाचा तडाम तडाम आवाज करत, उधाण दर्यावरून चाल करून येणारा मॉन्सूनचा कृष्णपट अनुभवता येतो. काझिरंगात एप्रिलमध्येच  जंगलभर फुललेल्या जंगली लिली आणि काजव्यांचे जमिनीवर पसरलेले रुजामे मॉन्सूनचे संकेत देतात. आकाशातली निमलेली निळाई, बिटल्सच्या पंखांवर, मोरपिसांवर, कबुतराच्या वेळावत्या मानेवर उमटताना दिसायला लागली की पावसाचे संकेत मिळतात.

पाऊस संकेत समजून घेण्यात कीटकांची वर्तन शैली महत्त्वाची असते. कोळी, वाळवी ,मुंग्या, हुमले, काजवे, मृगकिडे अशा अनेक कीटकांना वातावरणातले बदल अचूक समजतात. वाऱ्‍याचे बदलते प्रवाह, हवेचा दाब, आर्द्रता यांची त्यांना चांगलीच जाणीव असते. त्यांचाही एक आतला आवाज असतो, तोच त्यांना वातावरणाचे, हवामानाचे संकेत देतो. पावसापूर्वी बेगमीसाठी मुंग्यांची लगबग सुरू होते. तोंडात पांढरी अंडी घेतलेल्या काळ्या तुरतुऱ्या मुंग्या पळत असतात. पानांची घरटी विणणारे हुमले पानं शिवण्याच्या उद्योगात गर्क होतात. अंधार पडता पडता अनवट वाटा अचानक दुमदुमून उठतात. हा असतो सिकाडा आणि क्रिकेटचा ऑर्केस्ट्रा. पावसाचं येणं साजरं नको करायला?

पाऊस जास्त होणार असा हिशोब वाळवीनं केला असेल, तर ती झाडावर तिचं मातीचं घर करते. पण वाळवीच्या आडाख्यापेक्षाही जास्त पाऊस असतो कधी कधी. ‘घाघ’ या लोकज्योतिषाच्या पाऊस संकेताच्या दुनोळ्या-चारोळ्या आहेत. वाळवीच्या वर्तनावरून पाऊस जास्त हे नक्की, पण किती याचे घाघचे आडाखे वेगळे. तो म्हणतो, वैशाखात पाऊस पडला तर इतका पडेल, की तेंसुल वृक्षांवरची वाळव्यांची मातीची घरं धुऊन जातील.

बैसाख छुवाई,
तेंसुल धुवाई 

पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे मॉन्सूनपूर्व काळातले काजव्यांचे प्रियाराधन. मॉन्सूनपूर्व काळातली प्रकाशथेंब लगडलेली ‘काजुल्यांची झाडं’ हा एक मातब्बर पाऊस संकेत आहे. मृग लागता लागता, धरणीसाठी इंद्राचे, पावसाच्या आगमनाचे शुभशकुनी संदेश घेऊन इंद्रगोप येतात. इंद्रगोप म्हणजे मृगाचे किडे. केशरी मखमली पोशाख घातलेल्या या इंद्रगोपांना स्कार्लेट लेडी म्हणतात. तर तेलुगूमध्ये म्हणतात ‘आरुद्र पुरुगू’. आरुद्र म्हणजे मोसमी, पुरुगू म्हणजे कीटक - मोसमी कीटक! फक्त मोसमी पावसाच्या तोंडावर हा दिसतो. शेतकरी या इंद्रगोपांच्या मागावर असतात. हे इंद्रगोप जसे अज्ञातातून प्रकटतात, तसे अज्ञातात दिसेनासेही होतात. ते दिसेनासे झाले की शेतकरी पेरणीच्या मागं लागतात. 

कोकणातल्या, किनारपट्टीच्या लोकांचं अवघं जगणं मासळीशी निगडित. पावसापूर्वी समुद्र किनाऱ्‍यालगत काही विशिष्ट जातीचे मासे उड्या मारताना दिसायला लागतात. एरवी समुद्रात बिलजांची रेलचेल असते, पण पावसाचे संकेत मिळताच बिलजा बेपत्ता होतात आणि कांटे मासे दिसायला लागतात. माशांची वर्तनशैली कोकणी लोक, कोळी, मासेमारी करणारे यांच्यासाठीचे पाऊस संकेत असतात. गायब असणारे बेडूकही आता दिसायला लागतात. बेडकांवरूनही पावसाचं एक निरीक्षण आहे. ज्येष्ठात बेडूक जोरजोरात ओरडायला लागले, की लवकरच पाऊस आहे हे ओळखायचं. पावसाच्या चाहुलीनं ‘दादूर’ लोकगीतातून बोलायला लागतात. एरवी बेडूक काही आवडत नाही, पण पावसाच्या चाहुलीनं व्याकूळ विरहिणी.... मोर, पपिहाबरोबरच दादूरलाही (बेडकालाही) साद घालतात.

‘हमारे सावरीया नही आये, 
सजनी छाई घटा घनघोर
दादूर, मोर, पपिहा बोले, 
कोयल कर रही शोर’

भारतवर्षात पावसाचा पहिला सांगावा घेऊन येतो तो चातक! Jacobin cuckoo. स्थलांतर करून येणारं हे पाखरू कित्येक कवींचं, प्रेमिकांचं लाडलं आहे. याला मेघपपिहाही म्हणतात. मेघपपिहा पावसाच्या आगमनाच्या ललकाऱ्यांवर ललकाऱ्‍या देत राहतो... न थकता. पण रूक्ष ब्रिटिशांचा, या ललकाऱ्‍यांनी माथेशूळ उठतो म्हणून ते मेघपपिहाला म्हणतात ‘Brain Fever Bird’. ब्रिटिशांना मॉन्सूनची आस, प्रेम नसतंच मुळात. त्यामुळं मेघपपिहाच्या ललकाऱ्यांचा गोडवा त्यांना काय कळणार?

शेतकरी याच काळात पावशा पक्ष्याच्या इशाऱ्‍यांची वाट पाहत असतात. तो सांगतो ना, आता ‘पेरते व्हा.. पेरते व्हा’. चिमण्याही मृत्तिका स्नानाचा आनंद लुटताना दिसतात. कावळ्यांची घरटी बांधण्यासाठी निवडलेली झाडं, उंची, अंड्यांची संख्याही बहोत कुछ बयाँ करती है।

पेंटेड स्टोर्क पुढे भरपूर पाऊस असेल, तर आकाशात लंबवर्तुळात भरारत राहतात. अवर्षणाचा होरा असेल तर प्रजनन टाळतात. जमिनीवर घरटी करणारे पक्षी, पाऊस भरपूर येणार असेल तर ‘मुदतपूर्व’ प्रजनन मोहीम उरकून घेतात. उगीच ‘घरटे गेले वाहून’ म्हणत बसायला नको.

पावसाचे पुष्पसंकेत आणखीच वेगळे. पावसाचे संकेत फुलांना मिळायला लागले, की सुगंधाची उच्चतम उधळण  ती करायला लागतात. फुलांची ही मार्दवपूर्ण गंधित भाषा आसमंतात दरवळते. असाच एक पावसाचा गंधदूत म्हणजे ‘द्रौपदीमाला’. झाडा-पानाआडून अवचित निळा जांभळा लांबलचक सुवासिक गजरा डोकावतो. ते ऑर्किड म्हणजे द्रौपदीमाला. त्याला सीतेची वेणी असंही म्हणतात. खरं तर तो सीतेनं किंवा द्रौपदीनं वेणीवर माळलेला गजराच!

फुलांना दिवसाची लांबी नीट समजते. किती फुलायचं, कधी फुलायचं हे ठरवण्याचा हक्क ती आपल्याकडं राखीव ठेवतात. अमलताशाचा बहर हे त्याचं जातिवंत उदाहरण. अमलताशाची पावसाशी अदृश्य नाळ इतकी जुळलेली असते, की आदिवासींच्या निरीक्षणाप्रमाणं पावसाआधी ४०-४५ दिवस अमलताशाचा बहर टिपेला असतो. हेच निरीक्षण वराहमिहिरानं बृहतसंहितेत मांडलं आहे. अमलताशाच्या फांद्यांच्या सांध्यांचीच (internodes) लांबी   वाढलेली असते किंवा कोस्टस स्पीसीजमध्ये फुलाची लांबी वाढलेली आढळते. पळस म्हणजे गुजराती ‘केशुदा’. केशुदाच्या बहरावरून पाऊस कधी येईल आणि किती येईल हे सांगता येतं. प्लांट फेनोलोजीच्या अभ्यासाप्रमाणंही अशी काही निरीक्षणं आहेत. 

फुलांचं बहरणं, बीजनिर्मिती, पानं, झाडांची खोडं, internodes मधलं अंतर यांचा अभ्यास, पर्यावरण, हवामान बदल या अभ्यासाच्या दृष्टीनं Phenology या शास्त्रशाखेत आहे. फेनोलोजी म्हणजे एक प्रकारे Science of appearance of Plants. 

जाई, प्राजक्ताचे बहर, पावसाच्या आगमनाच्या हिशोबानं ओथंबलेले असतात. पिंपळाचा, महुवाचा इतकंच नाहीतर, गवताच्या-दर्भाच्या पात्याचा ताजवाही पाऊस सूचित करतो. काही झाडांच्या फळांचं पिकणं, पिकून गळणं याचा वेळकाळही पाऊसकाळाच्या दृष्टीनं अर्थपूर्ण असतो. कर्नाटक भागात पावसाचं वातावरण तयार झालं, की त्याला ‘पावसाचा आकार आला’ असं म्हटलं जातं. पावसाचा आकार आला, की सह्याद्रीच्या जांभळसड्यांवरही हलचल सुरू होते. सापकांदे हळूच फणे काढतात. काही विशिष्ट कंदिलपुष्प वाटावाटांवर खडी ताजीम देतात. भुई आमरी फुलतात. पावसासाठी अशा रानसाजणी सजायला लागतात.

पावसाचं आगमन जसं ही फुलं सूचित करतात तसं निर्गमनही! पावसाच्या झडीवर झडी लागल्या आहेत, पाऊस आता आयुष्यभर थांबणार नाही, असा माहोल असतो आणि निलगिरी-शोलामधले आदिवासी छातीठोकपणे  सांगतात, ‘आठ दिवसांत पाऊस जाणार.’ कारण तेव्हा निलगिरी-शोलामध्ये M.nilgirica (mawrsh)चे बहर जंगलभर फुललेले त्यांनी मनोमन नोंदलेले असतात.

या अशा अनेक जैविक घटकांप्रमाणे अजैविक घटकही पावसाचे संकेत देतात. ढग, ढगांचे रंग आणि आकार, दिशा, गडगडाटातून ध्वनित होणारे आवाज ‘मायने’ राखतात. लहानपणी ढगात सुसर, हत्ती, कासव पाहण्याचा एक छंद असतो. पण या आकारांचेही अन्वयार्थ असतात. निळे पिवळे ढग दीर्घकाळ पाऊस दर्शवतात. ढग ईशान्येला असतील तर उत्तम धान्य आणि नैऋत्येला असतील तर धान्यनाश!

मेघांचे आकार, पाणी धारण करण्याची क्षमता यावरून मेघांना अभ्रतरू, अंबुवाह, जीमूत, वारिवाह अशी सुंदर नावं आहेत. पावसाची वाहनं, नक्षत्रं हाही पाऊस संकेताचा एक वेगळा पैलू आहे. यावरून घाघ घाघनीला सांगतो,
‘रोहिणी बरसे, मृग तपाई
कुछ दिन आर्द्रा जाये
कहे घाघ, सून घाघनी
स्वात भात नाही खाय’

म्हणजे रोहिणी नक्षत्रात पाऊस बरसला पण मृगात तलखी झाली, आर्द्राही काही दिवस कोरडंच गेलं. तर संपूर्ण  खरीप हंगामात, सर्वत्र चांगला पाऊस आहे. (या विषयावर डॉ. रविशंकर, डॉ. जगदीश्वर रेड्डी अशा अनेकांनी काम केलंय) उलटा बादल चढा, तितरपंख मेघा असे कितीतरी उल्लेख मोहवतात. खरं तर आधुनिक तंत्रज्ञान, हवामान शास्त्र, पारंपरिक अंतरिक्ष आणि भौम पद्धती, स्थानिकांचे, शेतकऱ्‍यांचे, आदिवासींचे ठोकताळे, निरीक्षणं, लोकसाहित्य, प्राचीनसाहित्य यांचा योग्य मिलाफ घडला, तर मॉन्सूनमागं वेडंपिसं होण्याचं नष्टचर्य संपेल.   

संबंधित बातम्या