आयएनएस विक्रांत

अक्षता पवार
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

कव्हर स्टोरी

‘आयएनएस विक्रांत’च्या उल्लेखाबरोबर डोळ्यासमोर उभी राहते ती १९७१च्या युद्धात भारतीय नौदलाचा दरारा निर्माण करणारी विमानवाहू युद्धनौका. संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे ‘आयएनएस विक्रांत’ असे नामकरण करून भारतीय नौदलाने ही स्मृती आगळ्या पद्धतीने जागवली आहे. भारतीय बनावटीच्या या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेने पाच दिवसांची खोल समुद्रातील चाचणी नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली. त्या निमित्ताने ‘आयएनएस विक्रांत’वर टाकलेला एक दृष्टिक्षेप...

‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला चालना देत संरक्षण क्षेत्रातील विविध संस्थांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वदेशी उत्पादनावर भर दिला आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी स्वदेशी उपकरणांच्या निर्मितीला गती मिळत असतानाच संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका म्हणजेच ‘आयएनएस विक्रांत’ लवकरच नौदलात दाखल होत भारताची सागरी ताकद वाढविणार आहे. ‘आयएनएस विक्रांत’ने नुकतीच पाच दिवसांची खोल समुद्रातील चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. चाळीस हजार टन वजनाच्या ह्या युद्धनौकेच्या पुढील चाचण्यांना आता गती मिळाली असून २०२२पर्यंत ‘आयएनएस विक्रांत’ भारतीय नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.

‘आयएनएस विक्रांत’च्या बांधणीला कोचीनमध्ये २००९मध्ये सुरुवात झाली होती आणि २०१३मध्ये या युद्धनौकेचे जलावतरण झाले. नौदल आणि कोचीन शिपयार्डचा विमानवाहू युद्धनौका बांधण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. कोचीन बंदराजवळ ‘आयएनएस विक्रांत’च्या प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या महिन्याच्या ४ ते ८ तारखेदरम्यान ‘आयएनएस विक्रांत’ची खोल समुद्रातील चाचणीही पूर्ण झाली. या चाचणी दरम्यान युद्धनौकेची कार्यक्षमता तसेच सर्व उपकरणांच्या चाचण्या करण्यात आल्या. विविध हेलिकॉप्टर व लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्याही पूर्ण क्षमतेने चाचण्या घेण्यात आल्या. पाच दिवसांच्या या यशस्वी चाचण्यांनंतर भारताची गणना आता स्वबळावर युद्धनौका बांधणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये होऊ लागली आहे.

भारतीय नौदलाने यापूर्वी ब्रिटनकडून ‘आयएनएस विराट’ आणि ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौका घेतल्या होत्या. या दोन्ही विमानवाहू युद्धनौका आता नौदलाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्या असून सध्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहे. रशियन बनावटीच्या या युद्धनौकेचे नुकतेच नूतनीकरणही करण्यात आले आहे. 

भारतीय नौदलाच्या नौदल रचना संचालनालयाने (डीएनडी) ‘आयएनएस विक्रांत’ची मूळ रचना विकसित केली असून केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाच्या अंतर्गत कोचीन शिपयार्ड लिमिटेडतर्फे (सीएसएल) या युद्धनौकेची बांधणी संपूर्ण स्वदेशी पद्धतीने करण्यात आली आहे. यासाठी पहिल्यांदाच या विमानवाहू नौकेच्या आकाराच्या जहाजाचे संपूर्ण त्रिमितीय मॉडेल (थ्रीडी मॉडेल) सर्वप्रथम तयार करण्यात आले. त्यानंतर या त्रिमितीय मॉडेलच्या आधाराने निर्मिती करण्यात आली. युद्धनौकेच्या बांधणीचे काम संपूर्ण झाले असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे युद्धनौकेच्या समुद्री चाचण्यांसाठी विलंब झाला होता.  

संरक्षणदलांच्या प्रसिद्धी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आयएनएस विक्रांत’च्या बांधणीसाठी ७६ टक्के स्वदेशी सामग्रीचे वापर करण्यात आले आहे. ही युद्धनौका २६२ मीटर लांब, ६२ मीटर रुंद आणि ५९ मीटर उंच आहे. ही विमानवाहू युद्धनौका म्हणजे एक तरंगते शहर असून विमानांच्या परिचालनासाठी असलेल्या तळाचे क्षेत्रफळ हे दोन फुटबॉल मैदानाच्या एकत्र क्षेत्रफळाइतके आहे. जहाजावरील अधिकारी व खलाशी असे सर्व मिळून सुमारे १७०० लोक या युद्धनौकेवर राहू शकतात. महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष केबिनच्या सुविधादेखील पुरविण्यात आल्या आहेत. ‘आयएनएस विक्रांत’ एकावेळी साडेसात हजार नॉटिकल मैलांचा प्रवास करू शकते. स्वदेशी विमानवाहू युध्दनौकेची रचना आणि बांधणी यशस्वी होणे ही देशासाठी खूप महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  

या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी हे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने प्रगत पाऊल आहे. यामुळे जहाजांची स्वदेशी रचना आणि बांधणी क्षमतेबरोबर साहाय्यक उद्योगांचा विकास झाला आहे. या प्रकल्पामुळे सीएसएलमध्ये दोन हजार तर साहाय्यक उद्योगांमध्ये सुमारे बारा हजार कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. सीसएलशी जोडल्या गेलेल्या सुमारे ५५० भारतीय कंपन्यांसह १०० सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांचाही (एमएसएमई) या युद्धनौकेच्या बांधणीला हातभार लागला आहे. भारतीय नौदलाचा जहाजबांधणी कार्यक्रम हा देशाच्या आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘बूस्टर इम्पॅक्ट’ ठरला असून या कार्यक्रमांतर्गत आता स्वदेशी बनावटीची आणखी ४४  जहाजे व पाणबुड्या बांधण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या