‘टेस्ला’च्या अपयशातील ‘यश’

डॉ. अनिल लचके 
शुक्रवार, 9 मार्च 2018

कव्हर स्टोरी 
आगामी काळात निवडक लघुग्रहांवर यान पाठवून आणि मग उत्खनन करून मौल्यवान मूलद्रव्यं मिळू शकतील. तेव्हा खासगी कंपन्यांना अंतराळातील बाजारपेठेत वाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ या अपयशात ‘यश’देखील दडलेलं आहे, असं जाणकारांना वाटतं आहे.

‘स्ट्रार स्ट्रेक’ ही टीव्हीवर गाजलेली वैज्ञानिक मालिका अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यामधील धाडसी अंतराळवीरांना ‘स्टारशिप एंटरप्राइज’ यानातून एका नव्या जगाचा शोध घ्यायचा असतो. त्यातील गाजलेल्या एका वाक्‍यात मालिकेचं उद्दिष्ट स्पष्ट झालं आहे - ‘स्पेस, दि फायनल फ्रॉन्टिअर, व्हेअर नो मॅन हॅज गॉन बीफोर!’ त्यांचं हे मिशन फक्त पाच वर्षांचं होतं. पण मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला असावा म्हणून किंवा हा न संपणारा सततचा प्रवास असल्याचं लक्षात आलं म्हणून - ‘अ फाइव्ह इयर मिशन’ऐवजी ‘इट्‌स कंटिन्यूइंग मिशन’ असा शब्दप्रयोग वापरण्यात आला. 

अंतराळातील प्रवास म्हणजे अनंताचा वेध. तो अनंतकाळ चालणारा आहे, याची सर्वसामान्य माणसालाही जाणीव आहे. पण तरीही रिक्षातील उतारूला आपण केव्हातरी अंतरिक्षातील प्रवास करावा असं वाटलं तर त्यात नवीन काही नाही. खरं तर हे त्याचं स्वप्न आहे. त्यासाठी प्रयास आणि प्रवास करणं आलंच! अंतराळात प्रवास करायचा म्हणजे रॉकेट (अग्निबाण) पाहिजे, अवकाशयान पाहिजे. याचा व्यावहारिक पातळीवर अर्थ एवढाच, की अंतराळाकडं एक ‘बाजारपेठ’ म्हणून पाहाता येईल. यातूनच ‘स्पेस एक्‍स’सारख्या एखाद्या महत्त्वाकांक्षी कंपनीची स्थापना होते. यांचा उद्देश अग्निबाण आणि अवकाशयान तयार करणं हा तर आहेच; पण ज्यांना परवडेल त्यांना अंतराळवारी घडवून आणायची, शक्‍य झाल्यास चंद्रावर किंवा मंगळावर फिरवून आणायचं, हाही आहे. हे असलं स्वप्न इलान मस्कसारखी मनस्वी माणसंच पाहू शकतात. 

मस्क नेहमी म्हणतात, ‘माझ्या हयातीत जर मानवानं मंगळावर वस्ती केली नाही, तर मी खूप निराश होईन!’ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ते सतत मागोवा घेत असतात. वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यांमधील स्वप्नं सत्यसृष्टीत दिसू लागतील, अशी त्यांच्या मनाची धारणा आहे. येत्या तीस वर्षांत जगातील बहुतेक सर्व मोटारी विजेवर पळतील असं भविष्य त्यांनी वर्तवलं आहे. प्रवास अतिवेगानं करायच्या ‘हायपरलू’चे ते प्रवर्तक आहेत. 

इलान मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला, पण ते वृत्तीनं आता पूर्ण अमेरिकन झालेले आहेत. उद्यमशील मनोवृत्ती असल्यामुळं ते म्हणतात, ‘महान कंपनीची उभारणी नेहमी महान उत्पादनावर अवलंबून असते.’ सध्या महान तंत्रज्ञानामध्ये अवकाश-तंत्रज्ञान आघाडीवर आहे. हे लक्षात घेऊन इलान मस्क यांनी यांच्या ‘स्पेस एक्‍स’ कंपनीची वाटचाल चालू ठेवलेली आहे. 

पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्फुटनिक’ रशियानं ४ ऑक्‍टोबर १९५७ रोजी, म्हणजे साठ वर्षांपूर्वी अवकाशात पाठवला होता. त्याचं वजन जेमतेम ८४ किलोग्रॅम होतं. आता कोणता देश किती ‘पे-लोड’ पेलू शकतो त्याचं महत्त्व वाढलं आहे. भारताचा जी-सॅट १९ उपग्रह ३१३६ किलोग्रॅम वजनाचा आहे आणि जीएसएलव्ही एम के रॉकेट दोनशे हत्तींएवढं जड आहे. 

आधुनिक जगात अवकाश तंत्रज्ञान हे एखाद्या देशाची अस्मिता किंवा अभिमान ठरवत नाही. कारण अवकाश तंत्रज्ञान ही एक बाजारपेठ झालेली असून त्यात खासगी कंपन्यांनी केव्हाच पदार्पण केलेलं आहे. त्यामध्ये इलान मस्क यांची ‘स्पेस एक्‍स’ ही कंपनी आहे. त्यांनी  इंजिनं असलेल्या ‘फाल्कन हेवी’ या शक्तिशाली प्रक्षेपकाची जडणघडण केली आहे. त्याची उंची ७० मीटर (म्हणजे २३ मजली इमारतीएवढी उंच) आणि वजन ६४ टन आहे. केप कॅनव्हेरल तळावरून ७ फेब्रुवारीला ते प्रज्वलित करून ‘टेस्ला’ हे मंगळयान मंगळाच्या कक्षेत परिभ्रमण करण्यासाठी अंतराळात सोडण्यात आलं. ‘टेक ऑफ’ घेताना त्या अग्निबाणामध्ये १८ जंबो जेट विमानांएवढा जोर होता. रॉकेटचं बूस्टर अत्यंत महाग असल्यानं ते परत पृथ्वीवर अलगद उतरवणं आणि पैसे वाचवणं आता गरजेचं झालं आहे. ती सोय असल्यानं या यंत्रणेतील दोन बूस्टर पृथ्वीवर परत आणण्यात आले. त्याचा फेरवापर करता येतो. (या आधी बूस्टरचे अवशेष सागरात पडत असत). तिसऱ्या बूस्टरपासून ‘टेस्ला’ मंगळाच्या कक्षेत परिभ्रमण करण्यासाठी नियोजित पद्धतीनं वेगळे झाले. 

‘टेस्ला’वर मस्क यांची ‘टेस्ला-रोडस्टार’ ही लाल रंगाची मोटार (स्पोर्टस कार), कंपनीच्या सहा हजार कर्मचाऱ्यांची नावं, आयझॅक ॲसिमोव्ह यांच्या तीन वैज्ञानिक कादंबऱ्या, त्याचप्रमाणं विविध माहितीचं संकलन करण्यासाठी स्टेशनरी अशा काही गोष्टी ‘पे-लोड’ म्हणून ठेवलेल्या होत्या. चाळीस कोटी किलोमीटरचं अंतर पार करून मंगळाच्या कक्षेत मस्क यांची मोटार जाणं अपेक्षित असताना यानानं आपला मार्ग बदलला कारण यानाला वाजवीपेक्षा जास्त ऊर्जा (थ्रस्ट, हिसका) मिळाल्यामुळं त्यावरील नियंत्रणही सुटलं. आता ते अंतरिक्षात प्रतिसेकंद ११.२ किलोमीटर वेगानं दूरवर जात राहिलं आहे. मंगळावरची पहिली खासगी मोहीम आखण्याच्या दृष्टीनं या प्रयोगाचं विशेष महत्त्व होतं. मस्क यांची मोटार कारविश्‍वातील अनेक धक्‍क्‍यांना तोंड देत होती. पण तिचा रंग उडाला आणि बाह्यस्वरूपही खराब झाले. या अपयशामुळं मस्क निराश झाले असतील, पण खचलेले नाहीत. त्यांच्या मोटार-कारच्या डेकवर एक वाक्‍य लिहिलं आहे.. ते म्हणजे ‘डोंट पॅनिक’ (कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका आणि गोंधळून जाऊ नका) फाल्कन हा प्रचंड मोठ्या शक्तीचा प्रक्षेपक आहे. टेस्लाचा मार्ग चुकला, तो भरकटला, तरी तो लघुग्रहांच्या पट्ट्याच्या दिशेनं शीघ्रगतीनं जात आहे. साधारण २५ कोटी किलोमीटरपेक्षा जास्त दूर ते जाऊ शकणार नाही. तथापि ते यान कोट्यवधी वर्षं एखाद्या उपग्रहाभोवती परिभ्रमण करत राहील असे इलान मस्क यांना वाटत आहे. इलानसारख्या मनस्वी बाणेदार व्यक्तींमुळं जग आता झपाट्यानं बदलत आहे. 

अमेरिकेची चांद्रमोहीम पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता आहे. तेव्हा ‘फाल्कन हेवी’ या अग्निबाणाचा उपयोग होणारच आहे. ही चाचणी अपेक्षित यश देऊ शकली नाही, तरी आता ‘स्पेस एक्‍स‘, ‘बिग फाल्कन रॉकेट’च्या बांधणीला सुरवात करणार आहे. यामुळे मंगळावर मुक्काम करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतातच, पण खूप जड उपग्रह अवकाशात सोडण्याचे मनसुबेही पार पाडता येतील. हे आव्हान खासगी कंपन्यांनी स्वीकारलं आहे. या संदर्भात इलान मस्क यांनी यशस्वी होण्यासाठी एक मंत्र दिलाय. तो म्हणजे, ‘वर्क सुपर हार्ड!’ 

आगामी काळात निवडक लघुग्रहांवर यान पाठवून आणि मग उत्खनन करून मौल्यवान मूलद्रव्यं मिळू शकतील. तेव्हा खासगी कंपन्यांना अंतराळातील बाजारपेठेत वाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ या अपयशात ‘यश’देखील दडलेलं आहे, असं जाणकारांना वाटतं आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या