पेंचचे सुवर्णपर्व कॉलरवाली  

अनुज खरे
सोमवार, 31 जानेवारी 2022


कव्हर स्टोरी

‘कॉलरवाली’ गेली आणि पेंचच्या अरण्यगाथेतले एक पर्व संपले. तिचे आयुष्य आणि तिचे नाव पेंचच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले जाईल हे तर निश्चित. तिच्या जीवनअस्तापर्यंत ती नैसर्गिक अधिवासात मोठ्या जंगलभागाची सम्राज्ञी म्हणून जगली, हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. पेंचमधल्या लोकांच्या मनात घरातलेच कोणीतरी गेले असावे अशी भावना निर्माण करणाऱ्या ‘कॉलरवाली’चे आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थ झाले. 

मध्य भारतातली जंगले खरेच अद्‍भुत आहेत, निसर्गाने अगदी वेळ काढून घडवल्यासारखी! नानाविध प्रकारची जैवविविधता आपल्याला या जंगलांमध्ये पाहायला मिळते. निसर्गाचे अनेक रंग अनुभवायला मिळतात. हिवाळ्यातली हुडहुडी भरवणारी थंडी, उन्हाळ्यातले कातडी भाजून काढणारे ऊन ते अगदी पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊस, असे जबरी ऋतू आपल्याला मध्य भारतातल्या जंगलात बघायला मिळतात. याशिवाय मध्य भारताने आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपून ठेवली आहे, ती म्हणजे भारताच्या व्याघ्र राजधानीची. भारताच्या एकूण व्याघ्र संख्येपैकी सर्वाधिक वाघ आपल्याला मध्य भारतातल्या जंगलात पाहायला मिळतात. यापैकी मध्य प्रदेशात मोडणारी जंगले तर जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंतच म्हणावी लागतील. मध्य प्रदेश म्हणले की चटकन डोळ्यासमोर येते ते म्हणजे कान्हा आणि बांधवगड. पण मध्य प्रदेशातील तितक्याच सुंदर जंगलातल्या एका वाघिणीने त्या जंगलाचे नाव अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात नेले.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर वसलेले पेंच जंगल अफलातून जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही राज्यांत पसरलेल्या या जंगलाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेला आहे. मध्य प्रदेशातील जंगलाला १९९२ साली, तर महाराष्ट्रातील जंगलाला १९९९ साली व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. मध्य प्रदेशातील जंगलात असलेली शाकाहारी प्राण्यांची लक्षणीय संख्या आणि वाघांच्या वाढीसाठी असलेले पोषक वातावरण यामुळे जंगलात वाघांची संख्याही चांगली होती. पण ‘कॉलरवाली’ ऊर्फ ‘माताराम’ या वाघिणीने पेंचचे नाव खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावर आणले. ‘बडी मादा’ या वाघिणीच्या पोटी २००५ साली जन्मलेली ही वाघीण. ही वाघीण आणि तिची भावंडे यांच्यावर आधारित ‘स्पाय इन द जंगल’ असा वन्यजीव चित्रपट ‘बीबीसी’ने केला होता. डेव्हिड ॲटेनबरो या जगप्रसिद्ध निसर्ग चित्रपटकाराने तयार केलेल्या या चित्रपटातून या संपूर्ण कुटुंबाच्या काही दुर्लभ आणि सुंदर क्षणांचे चित्रीकरण करण्यात आले होते. हत्तींच्या सोंडेला कॅमेरे लावण्यात आले होते. वाघांना सहजासहजी दिसणार नाहीत आणि त्यांना त्यापासून धोका वाटणार नाही, अशा प्रकारे या कॅमेऱ्यांना झाकण्यात आले होते. पुढे आईपासून वेगळे झाल्यावर ‘कॉलरवाली’ने तिच्या आईच्या हद्दीवर आपला हक्क सांगितला. ‘बडी मादा’नेही आपल्या मोठ्या हद्दीचा भाग ‘कॉलरवाली’साठी सोडला.   

पेंचमधील मोठ्या आणि अतिशय महत्त्वाच्या भागावर अधिराज्य गाजवणाऱ्या या वाघिणीच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी तिला रेडिओ कॉलर हे उपकरण लावण्यात आले. गळ्याभोवती रेडिओ कॉलर लावल्यामुळे तिला ‘कॉलरवाली’ (टी -१५) नाव मिळाले. वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी हे उपकरण वाघांना लावले जाते. 

मे २००८मध्ये पहिल्या वेळी तिला तीन पिल्ले झाली. कमी वय आणि अनुभवाचा अभाव यामुळे ती या पिल्लांचे नीट पालनपोषण करू शकली नाही आणि न्यूमोनिया होऊन पिल्ले मरण पावली. दुसऱ्या वेळी ऑक्टोबर २००८मध्ये तिने चार पिल्लांना जन्म दिला. पिल्लांच्या जन्मानंतर काही महिने सगळे काही ठीक चालू होते. पण मग अचानक एक दिवस ‘कॉलरवाली’ गायब झाली. वनविभाग सातत्याने पिल्लांवर लक्ष ठेवून होता. पाच दिवस उलटून गेल्यावरही ‘कॉलरवाली’ पिल्लांजवळ परतण्याचे लक्षण दिसेना. तिच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा पिल्ले मरण पावणार असे वनविभागाला वाटत होते. पाचव्या रात्री पिल्लांपासून दीड किमी अंतरावर ‘कॉलरवाली’ आढळून आली. वनविभागाच्या आशा पल्लवित झाल्या. पण वाघिणीने पुन्हा पिल्लांपासून उलट दिशेने प्रवास सुरू केला. दुसऱ्या दिवशी वाघिणीने एक सांबर मारलेले आढळून आले आणि याच वेळी सगळ्या कोड्याचा उलगडा झाला. तिच्याबरोबर टी-30 नावाचा नर वाघ आढळून आला. ही चार पिल्ले त्याची नव्हती. टी-2 नावाच्या नर वाघाच्या मृत्यूनंतर या वाघाने त्याच्या राज्याचा कब्जा घेतला होता. ‘कॉलरवाली’चे हे चार बच्चे टी-2चे होते. पिल्लांना नव्या नर वाघापासून दूर ठेवून ती त्यांना वाचवू पाहत होती. ‘कॉलरवाली’बरोबर तिच्या पिल्लांपैकी टी-39 नावाच्या एका पिल्लालाही वनविभागाने रेडिओ कॉलर लावली होती. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणे वनविभागाला सोपे जात होते. 

एक एक दिवस जात होता तसे या वाघिणीवर आणि बच्च्यांवर लक्ष ठेवणाऱ्या पथकाच्या मनात नाना शंका येत होत्या. पिल्ले अधिकाधिक अशक्त होऊ लागली. या पिल्लांना कृत्रिमरीत्या मांस खाऊ घालावे का, असाही प्रश्न या पथकाच्या मनात वारंवार डोकावत होता. आईने पिल्लांना शिकार करायला शिकवल्याशिवाय मार्जारकुळातील प्राण्यांना शिकार करता येत नाही. या पिल्लांचा हा प्रशिक्षणाचा काळ सुरू होता. कोणत्याही निष्णात शिकारी वाघालाही किमान ७ ते ८ वेळा प्रयत्न केल्यावर शिकार करणे शक्य होते. त्यात ही तर शिकणारी पिल्ले. आई आणि पिल्ले यातील अंतर वाढतच होते. त्यामुळे या पिल्लांचे कसे होईल याची चिंता वनविभाग आणि सर्व पथकाला होती. अखेर एक दिवस आपल्या कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून टी-39 या पिल्लाने एका चितळाच्या पिल्लाची शिकार केली होती. आई आणि पिल्ले यांच्या दुराव्याला आता तब्बल १५ दिवस झाले होते. १६व्या दिवशी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ‘कॉलरवाली’च्या आवाजाने जाग आली. पिल्लांना हाक मारणारा तो आवाज होता. तिने एक मोठ्ठे चितळ मारले होते. अखेर १६व्या दिवशी कुटुंबाची पुनर्भेट झाली. ‘कॉलरवाली’ एखाद्या अनुभवी आईप्रमाणे वागली होती.

पुढे ती पिल्ले तिच्यापासून बाजूला झाल्यावर ऑक्टोबर २०१०मध्ये तिने पाच पिल्लांना जन्म दिला आणि अत्यंत यशस्वीपणे त्यांचा सांभाळही केला. डिसेंबर २०१८ साली तिने आठव्यांदा पिल्लांना जन्म दिला. तिच्या पिल्लांची संख्या तब्बल २९वर पोहोचली. नैसर्गिक अधिवासात आपल्या आयुष्यात सर्वात जास्त पिल्ले देणारी वाघीण म्हणून ‘कॉलरवाली’चे नाव घ्यावे लागेल. ‘कॉलरवाली’ची पिल्ले मोठी झाली, हळूहळू आजूबाजूच्या प्रदेशात पांगली. त्यांनी पेंच आणि आसपासच्या प्रदेशात आपले स्थान निर्माण केले आणि त्या प्रदेशाला समृद्ध केले. तिच्या २९ पिल्लांपैकी २५ पिल्ले जगली, मोठी झाली अशी नोंद आहे. या सर्वांची जननी म्हणून ‘माताराम’ या आणखी एका नावाने प्रसिद्ध असलेली ‘कॉलरवाली’ आपले हे नाव रूढार्थाने सार्थ करते. पेंचच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या वाघिणीच्या उल्लेखाशिवाय पेंचची कथा कधीच पूर्ण होणार नाही.

‘कॉलरवाली’ गेल्यावर नुकताच मी पेंचला जाऊन आलो. तिथल्या सर्व गाइड मित्रांशी, वनविभागातल्या मित्रांशी बोललो. संपूर्ण वातावरणात एक प्रकारची खिन्नता भरून राहिलेली मला जाणवली. इतक्या वर्षांपासून सर्वांनाच भुरळ घालणाऱ्या ‘कॉलरवाली’शी या सर्वांचे भावनिक नाते तयार झाले होते. यातल्या अनेकांनी तर तिला लहानाची मोठी होताना आणि पेंचवर अधिराज्य गाजवताना पाहिले होते. त्यांच्यात ऋणानुबंध जुळले नसते तरच नवल म्हणावे लागेल. त्यांच्याशी बोलताना एक मात्र जाणवले, ते म्हणजे तिच्याबद्दल या सर्वांच्या मनात असलेला आदर आणि अभिमान. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पेंचमधल्या अत्यंत महत्त्वाच्या भागावर तिने सत्ता राखली होती. त्यामुळे तिचे जगणे जसे शाही होते तसेच मरणही शानदार होते. मात्र तिला शेवटच्या काळात होत असलेल्या वेदना या सर्व लोकांच्या बोलण्यातून सतत जाणवत होत्या. तिच्या अखेरच्या प्रवासात तिला मदत करू न शकल्याची अगतिकता सर्वांच्याच बोलण्यात डोकावत होती. पण अशी मदत न करणे हेच निसर्गनियमाला धरून होते, हेही सर्वांना पटलेले होते. ती जाण्यापूर्वी काही दिवस पर्यटकांना दिसली नव्हती. पण १४ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या दिवशी सीताघाट भागात ‘कॉलरवाली’ आढळून आली. अतिशय थकलेल्या अवस्थेत असलेली ही ‘पेंचची राणी’ फार काळ जगू शकणार नाही याची जाणीव सर्वांनाच झाली होती. उत्तरायण सुरू झाले. १४ जानेवारीच्या रात्री ‘कॉलरवाली’चा जीवनाच्या काव्यातला शेवटचा सर्ग सुरू झाला. अखेर १५ तारखेला सायंकाळी ६.१५च्या दरम्यान वयाच्या १७व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळ आणि त्यात आतड्यात केसाचा गोळा अडकल्यामुळे या अप्रतिम वाघिणीचा पेंचअध्याय संपला असला, तरीही तिच्या जगण्याचे महाकाव्य झाले हे निश्चित.    

साहित्याचे नोबेल मिळवणाऱ्या रुडयार्ड किपलिंग या लेखकाने आपल्या ‘जंगल बुक’ या पुस्तकातून अजरामर केलेल्या मोगलीच्या व्यक्तिरेखेची आपल्याला लहानपणीच ओळख झालेली असते. रुडयार्ड किपलिंगने या पुस्तकात ज्या जंगलाचे वर्णन केलेले आहे ते जंगल म्हणजे पेंच. त्यामुळे पेंच हे नाव जरी डोळ्यासमोर आले तरी पहिल्यांदा आठवतो तो मोगली. पण मला मात्र यात सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सहजीवन आणि मोगलीचे जंगलाशी असलेले अतूट नाते. ‘कॉलरवाली’ आणि तिच्या वंशावळीने नेमके हेच नाते अनेकांमध्ये पुन्हा रुजवले. संपूर्ण मध्य भारताचा विचार केला तर वाघांची कमालीची वाढलेली संख्या वाघांच्या वाढीसाठी असलेले पोषक वातावरण दर्शवते.

पण साधे उदाहरण बघा, आपण एखाद्या बाटलीत जेव्हा पाणी भरतो तेव्हा त्या बाटलीची क्षमता संपल्यावर पाणी बाहेरच पडते. तशी एखाद्या जंगलाची क्षमता संपली की जास्तीचे वाघ नवीन जंगलाकडेच वळणार. या वाघांना जाण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि नवीन जंगलच शिल्लक राहिले नाही तर आपल्या ‘वाघ वाचवा, वाघ वाढवा’ या मोहिमेला तरी काय अर्थ उरणार आहे? त्यामुळे आहे त्या जंगलांना संरक्षण देऊन त्यात अधिक वाढ करणे हे आपल्यासमोर असणारे मोठे आव्हान आहे. एकदा का निसर्गाला हवे तसे सर्व आपण राखू शकलो तर निसर्ग स्वतःची, त्याच्यातल्या घटकांची काळजी घ्यायला समर्थ आहे. या जंगल संवर्धनासोबत वाघांना एक जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भ्रमणमार्गांचे रक्षण करणेही तितकेच अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र वनविभागाने या भ्रमणमार्गांच्या जतनासाठी, संवर्धनासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. हा कित्ता सर्व राज्यांनी गिरवणे जंगल संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ताडोबासारख्या जंगलांमध्ये वाघांना मिळालेले संरक्षण, पोषक वातावरण, मुबलक खाद्य या सर्वामुळे झपाट्याने वाढणारी व्याघ्रसंख्या दुधारी तलवारीसारखी ठरू नये इतकेच. एकदा का वाघ-मनुष्य संघर्ष सुरू झाला की ते माणूस आणि वाघ या दोघांच्याही हिताचे नसेल. त्यामुळे वाघांची वाढती संख्या हे जसे आनंददायक आहे, तितकेच ते आव्हानात्मक आहे हे निश्चित.

‘कॉलरवाली’ गेली आणि पेंचच्या अरण्यगाथेतले एक पर्व संपले. तिचे आयुष्य आणि तिचे नाव पेंचच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले जाईल हे तर निश्चित. ‘कॉलरवाली’च्या एकूण प्रवासाकडे पाहता मछली वाघिणीचा नैसर्गिक अधिवासात सर्वाधिक काळ जगण्याचा विक्रम ती मोडेल, असे अनेक निसर्गप्रेमींना वाटत होते. पण इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रावर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अधिराज्य गाजवणे म्हणजे खायचे काम नाही. तिच्या जीवनअस्तापर्यंत ती नैसर्गिक अधिवासात मोठ्या जंगलभागाची ‘सम्राज्ञी’ म्हणून जगली हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. पेंचमधल्या लोकांच्या मनात घरातलेच कोणीतरी गेले असावे अशी भावना निर्माण करणाऱ्या ‘कॉलरवाली’चे आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थ झाले. ती गेल्यावर सीताघाट येथेच शांताम्मा या स्थानिक वृद्ध आदिवासी महिलेच्या हातून तिला सरकारी इतमामात मुखाग्नी देण्यात आला. कर्माझरी येथे इको डेव्हलपमेंट कमिटीच्यावतीने कँटीन चालवणाऱ्या आणि अनेक वर्षे आमच्यासारख्या अनेकांच्या उदरभरणाची काळजी घेणाऱ्या या शांताम्माच्या हस्ते या ‘सुपरमॉम’चा अखेरचा प्रवास सुरू झाला. ‘कॉलरवाली’च्या जाण्याने पेंचच्या वातावरणात एक पोकळी निर्माण झाली असली तरीही पेंचमध्ये समृद्धी आणण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चितच असतो. काही जण केवळ आपल्याच नाही इतरांच्या आयुष्यातही आनंदरंग भरतात आणि स्वतःचे जीवन सार्थकी लावतात. तर काही नुसतेच मातीत मिसळतात आणि आपले जीवन मातीमोल करतात. ‘कॉलरवाली’ने पेंचचे निसर्गरंग अनेकांच्या मनःपटलावर असे खुलवलेत की पेंचच्या उल्लेखासोबत तिचेही नाव आदराने घेतले जाईल हे निश्चित. तिच्या जीवनपर्वाशिवाय पेंचची ‘अरण्यगाथा’ कधीच पूर्ण होणार नाही.

(शब्दांकन : ओंकार पांडुरंग बापट)
(लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)
 

संबंधित बातम्या