घरकुल सजवताना!

आशिष देशपांडे    
शुक्रवार, 16 मार्च 2018

कव्हर स्टोरी
 

आपल्या आयुष्यातील कोणताही बदल आपल्याला पटकन मान्य होत नाही; पण काही बदल हे सुखकारक व आपल्या सोयी वाढवण्यासाठी केल्यास ते कदाचित प्रत्येकालाच पटकन आपलेसे करावेसे वाटतात. थोडक्‍यात, इंटिरिअरविषयी बघितल्यास या क्षेत्रात दिवसेंदिवस घडणारे बदल हे प्रत्येक वेळेस ॲडव्हॉन्स टेक्‍नॉलॉजीकडे नेणारे आहेत असेच दिसून येते. हे सांगताना प्रत्येक वेळेस माजघराचे उदाहरण योग्य ठरते. पण आपण खूप आधीच माजघराला मागे सोडले यात शंकाच नाही. माजघराचे मॉर्डनायझेशन नकळत कधी घडले हे त्या गृहिणीला देखील सांगता येणार नाही. अशा प्रकारे डिझायनिंग या क्षेत्रात बदलत्या ट्रेंडस व टेक्‍नॉलॉजीचा वापर जास्त प्रमाणात होतो व तो बदल प्रत्येक जण आनंदाने आत्मसात करतो.

इंटिरिअरमध्ये काम करताना प्रत्येक येणारा ग्राहक ‘काहीतरी वेगळे’ असा शब्द सारखा उच्चारत असतो. कारण एकंदरच लहानांपासून मोठ्यांनादेखील प्रत्येक गोष्टीत, वस्तुतः वेगळेपण अपेक्षित असते व हे वेगळेपण जपण्यासाठी मार्केटमध्ये प्रत्येक माध्यमात भरपूर व्हरायटी बघायला मिळते. थोडक्‍यात काय तर मनात आणले की येनकेन प्रकारे तुमच्यासाठी ते उपलब्ध आहे किंवा करता येते. अशा या बदलत्या जमान्यात, ट्रेंडस पण बदलतात हे मात्र खरं! किचनसंबंधी बोलायचे झाल्यास नवीन उपलब्ध माध्यमांमुळे आत्ताचे किचन एकदम ट्रेंडी आणि आधुनिक दिसते. इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌समुळे किचनमधील प्रत्येक काम खूप सोपे झाले आहे. या बदलत्या टेक्‍नॉलॉजीचा वापर वाढत गेला तर थोड्याच दिवसात घरातील वस्तू संपल्यावर किराण्याच्या यादीची वाट न बघता, डायरेक्‍ट वस्तू संपल्याचा मेसेज तुमच्या किराणावाल्याला जाऊन भाजी - दूध - इतर वस्तू घरात हातोहात मिळतील अशी टेक्‍नॉलॉजी मार्केटमध्ये येऊ घातली आहे.

लिव्हिंग रूमच्या बाबतीत देखील काही वेगळे नाही. बैठकीची जागा कधीच सोफ्यानी घेतली तसेच बंगई किंवा झुला यांची जागा आता नवीन पद्धतीच्या ककुन चेअरनी घेतली. एवढेच कशाला पडदे सरकवायलासुद्धा कोणाचीच गरज पडत नाही. रिमोट ऑपरेटेड पडदे बाजारात उपलब्ध आहेत. टीव्हीवर तर जणू काही एक वॉलच पूर्ण टीव्हीसारखी उभी होते. काही कंपन्यांनी तर आपण आपल्या मूडप्रमाणे घरातील लायटिंग बदलता येईल असे कितीतरी प्रॉडक्‍ट बाजारात आणलेत. अशा या बदलत्या ट्रेंडसचा आपल्या घरात आपण वापर कसा करायचा हा विचार आपल्याला करावा लागतो व यातील एकही ट्रेंड असा नाही की जो भविष्यात उपलब्ध होणारा आहे. ही सगळी नवीन प्रणाली आजही बाजारात उपलब्ध आहे.

बेडरुममध्येदेखील एकदम कोझी, रिलॅक्‍सींग अशी रचना बघायला मिळते. सगळे काही बसल्या ठिकाणी एका रिमोटवर, मग काय आरामच आराम नाही का? वॉर्डरोबमधेदेखील अंतर्गत रचना बदललेली आढळून येते. गोदरेज कपाटातील कप्प्यांसारखे कप्पे आता ज्या पद्धतीचे कपडे आपण वापरतो त्याला पुरत नाही, त्यामुळे त्यातदेखील बदल दिसून येतो. किड्‌स रूम किंवा मुलांची खोली याविषयी प्रत्येक जण काळजी करत असतो. जागेला पर्याय म्हणून वॉल ॲटॅच्ड बेड आलेत. उपयोग झाला की बेड भिंतीला लावून ठेवता येतात आणि पूर्ण रूम मुलांसाठी मोकळी मिळते किंवा बेड हवा असल्यास प्लॅटफॉर्म बेड करणे सोयीचे ठरते कारण आजकाल मुलांना अभ्यास करायला रेग्युलर स्टडी टेबल पुरत नाहीत मग ते परत खोलीत खाली पसारा मांडून बसतात त्यापेक्षा प्लॅटफॉर्म बेड केला तर त्यांना बेड सोडून इतर जागा पसारा मांडायला मिळते. थोडक्‍यात काय तर हे नवीन ट्रेंडस हे पूर्णपणे रीसर्च केल्यानंतर आलेत यात काही वादच नाहीत. कारण आजच्या काळात प्रत्येक गोष्ट ऑरगनाइज्ड असणे याला फार महत्त्व आले आहे. मग घरातील कार्यक्रम देखील तेवढ्यासाठी इन्व्हेंटवाल्यांना दिला जातो. असे हे बदलते ट्रेंड मार्केटमध्ये कसे उपलब्ध आहेत ते थोडक्‍यात आपण बघू.

वॉल व टेक्‍श्चर
आज रंग बदलणाऱ्या भिंती किंवा चित्र बदलणाऱ्या भिंती थोड्याच दिवसात प्रत्येक घरात बघायला मिळतील. डिजिटल वॉल याला पर्याय म्हणून आजही उपलब्ध आहे. जसे की टेक्‍श्चरवरून आपण वॉलपेपरकडे वळलो तसेच पेपरवरून डिजिटलायझेशन लवकरच बघायला मिळेल. आज रुमचे स्लॅबदेखील डेकोरेटिव्ह दिसतात. यात देखील भरपूर ट्रेंड दिसतात. जसे की ब्लॅक सीलिंग, स्काय सीलिंग आणि कितीतरी.

लायटिंग
लाइटींगमध्ये मूडप्रमाणे, एका चुटकीवर, हाकेवर ऑपरेट होणारे लाईट्‌स आपण अनुभवतो. डायरेक्‍ट - इंडायरेक्‍ट, पार्टी लायटिंग सगळं काही आपण आपल्या घरात अनुभवतो, याचाच अर्थ आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केले हे पदोपदी जाणवते.

टाइल्स
टाईल्समधे तर खरंच खूप सुंदर टाइल्स मार्केटमध्ये आहेत. प्रत्येक वयोगटानुसार या टाइल्स योग्य पद्धतीने बनविलेल्या आहेत. जसे की लहानांसाठी जेली टाईल, वयस्कर लोकांसाठी ॲटीस्कीड, किचनसाठी रिफ्लॅक्‍टीव्ह मीटर फिनिश टाईल जेणेकरून मेंटेनन्स कमी होईल. बाथरूम तर एकापेक्षा एक डिझाईनमध्ये बघायला मिळतात.

पेंटस
पेंटसमधे जर जुन्या रंगांसोबत कंपेअर केले तर भिंतीला टेकून उभे राहिले की कपडे रंगलेत, नाही का? पण आज पेंट पुसता येतो. यात नवीन प्रकार ग्राहकांचा विचार करून केलेले दिसतात जसे अँटीॲलर्जीक, सेंटेड, इझीटू मेंटेन, ग्लोरंग कलर, रेडियम कलर, म्हणजे सगळ्यात या इंडस्ट्रीमध्ये व्हरायटी आढळून येते.

फर्निशिंग
फर्निशींग हा देखील इंटिरिअरमधला महत्त्वाचा टप्पा असतो. यात उपलब्ध डिझाईन हे प्रत्येक वयोगटानुसार मिळते. रंग, कपड्याची व्हरायटी वाखाणण्याजोगी असते. स्वयंपाकात मिठाचे जसे काम असते तसेच इंटिरिअरमध्ये फर्निशींगचे काम असते. स्टीचींग व ड्रेपींग स्टाईल्सने प्रत्येक रूमला वेगळा लुक नक्कीच मिळतो. यात देखील शास्त्र असते. अगदी त्याच्या पद्धती पण खूप छान असतात. याचा अभ्यास वेळ असल्यास जरूर करावा.

फर्निचर
फर्निचरमध्ये खूपच जास्त माध्यम उपलब्ध  आहेत. समोरच्याने इच्छा व्यक्त करायची व तसे फर्निचर बनवून घ्यायचे. कारण आज म्हणाल ती ॲक्‍शन आपण फर्निचरला देऊ शकतो. उपलब्ध हार्डवेअर ॲडव्हान्स पद्धतीचे असल्या कारणाने फर्निचरचा ठोकळा न बनवतो त्याला ॲक्‍शन देणे तितकेच सोपे झाले आहे. आज-काल हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बऱ्याच अटॅचमेंट आल्या कारणाने फर्निचरमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी करता येतात. फर्निचर बनवण्यासाठी आज-काल प्लायवूडसोबत, स्लिपर वूड, पाइन, बीच वूड यांचा देखील वाढता वापर दिसून येतो. या व्यतिरिक्त फर्निचरसाठी लागणारे पॉलिशदेखील खूप ट्रेंडी दिसते. या पेंटिंग पॉलीशमधे अँटीक फिनीशचा ट्रेंड जास्त दिसतो. शिवाय लॅमिनेट्‌स, व्हीनीअरमधील व्हरायटी तर ग्राहकाला प्रश्‍नात टाकावी अशी!

अशा ट्रेंडी इंटिरिअरचा वाढता कल बघता प्रत्येक ग्राहक सगळ्यांपेक्षा काही तरी वेगळे नजरेने शोधतच असतो, आणि या बदलत्या ट्रेंडना अगदी सहजरीत्या आत्मसात करतो. या बदलत्या ट्रेंडचा वापर बघता आय.ओ.टी. तत्त्वावरच्या बऱ्याच गोष्टी आपल्यासारख्यांना उपयोगी पडतील असे वाटते व अगदी पुढील काळातील येणारे इंटिरिअर अगदी VR आणि व्हर्च्युअल जगातील असल्या कारणाने आपण घरात बसून कोणतीही इच्छा अनुभवू शकतो, यात शंकाच नाही!

फोटो फीचर

संबंधित बातम्या