चैतन्याचा आविष्कार...!!!

आशिष तागडे 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

पाऊस विशेष

रोमारोमांत चैतन्य निर्माण करणारा कोणता ऋतू असेल, तर तो पावसाळा! निसर्गाला मनसोक्तपणे भिजवून टाकल्यानंतर चराचरात निर्माण झालेला उत्साह वर्णनापलीकडचा आहे. पावसाची जितकी रूपे आहेत, तितकी अन्य कोणत्याच ऋतूची नाहीत. प्रत्येकाला पाऊस वेगवेगळ्या रूपात दिसत असतो.. 

पाऊस म्हणजे सचैल स्नान, 
पाऊस म्हणजे तनामनाला असीम शांतता देणारे सृजन, 
पाऊस म्हणजे नवं चैतन्य, 
पाऊस म्हणजे निसर्गाची किती रूपं! 

या लोभस ऋतूनं कल्पकतेला बहर न दिला तर नवलच! पाऊस... मनातला आणि प्रत्यक्षातला याला माझ्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे. प्रत्येकाला पाऊस वेगवेगळा वाटू शकतो. शेतकऱ्यासाठी तो वेगळा असतो, कवीसाठी तर अगदीच मूडी असतो तर प्रियकर-प्रेयसीसाठी तो कमालीचा रोमँटिक असतो. प्रत्येकाच्या मनात पाऊस वेगवेगळ्या रूपात येतो. प्रत्येकासाठी वेगळं जगणं आणि अस्तित्व आणतो. सुकलेल्या झाडावर पावसाच्या स्पर्शानं होणारी नवपालवी पाहता आपल्या मरगळलेल्या मनालाही तो नवचेतना देऊन जातो. रिमझिम, बेफाम अशा कितीतरी तऱ्हा असल्या, तरी त्याच्या प्रत्येक रूपावर आपण प्रेम करतोच... 

पावसाचे आणि माझे नाते जुळले ते साताऱ्यात. नोकरीनिमित्ताने मी २००० मध्ये सातारा येथे गेलो. तोपर्यंत पाऊस म्हणजे मोठी सर अशीच माझी आणि त्याची ओळख होती. साताऱ्यात गेल्यावर माझी आणि पावसाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. पावसाचे आणि निसर्गाचे नाते काय असते याचा प्रत्यय आणि अनुभव मला आला आणि त्यावेळेपासून पाऊस माझ्या मनात कायमचे चांगले घर करून बसला. सातारा येथील माझा मित्र राजेंद्र गलांडे याला फिरण्याची भारी हौस. ती आताही आहे. त्याने त्यावेळी नुकतीच मोटारसायकल घेतली होती. आमची इच्छा झाली, की मोटारसायकलला किक मारायची आणि सह्याद्रीच्या रानावनात मनसोक्त भटकंती करायची.. तीही भर पावसात! त्यामुळेच पावसाचे रूप अनुभवता आले. 
सह्याद्रीतील पाऊस खऱ्या अर्थाने खुणावणारा आणि मन प्रसन्न करणारा आहे. कधी रांगडा तर कधी कोणतीही कुजबुज न करता शांतपणे आपले काम करणारा पाऊस आपल्याला मोहित करतो. पहिल्या दोन पावसातच पिवळ्या पडलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरव्यागार व्हायला सुरुवात होते. उन्हामुळे डोंगररांगांवरील गवत वाळल्याने पिवळे दिसते. हे गवत, डोंगररांगा पावसाची आतुरतेने वाट पाहतात, असे मला उगाच वाटायचे. पहिल्या पावसानंतर या डोंगररांगा आपला साज बदलायला सुरुवात करायच्या. पहिल्या पावसानंतर आणखी दोन पाऊस झाले, की याच डोंगररांगांतून सळसळत्या उत्साहाने ओथंबलेले धबधबे प्रवाहित व्हायचे. त्यावेळी निसर्गाचे अनोखे लोभसवाणे रूप दिसायचे. ते कितीही डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न केला तरी अशक्यच होते आणि आहे. 

डोंगररांगांवरून मस्तपैकी आपल्या मस्तीत फिरणारे ढग मनाला वेगळाच आनंद देतात. यवतेश्वर किंवा कासच्या पठारावर गेल्यावर आपण त्या ढगांचा भाग कधी होतो ते आपल्यालाही समजत नाही. मनातील नैराश्याचे ढग या पावसाळी ढगांबरोबर निघून जात मनात उत्साहाचे अंकुर सहजतेने रोवून जायचे. दरम्यान त्याचवेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने दरीतून ढग पसार झाल्यावर दिसणारे दृश्य अत्यंत चैतन्यदायी असते. दरीतून खाली दिसणारी हिरवीगार शेती आपले मन आणि चित्त प्रफुल्लित करतात. हा खेळ खरोखरच अनुभवण्यासारखा असतो. 

पाऊस पडू लागला, की मनापासून भिजावेसे वाटते आणि शब्दांनाही मनात मग काहीतरी रुजवावेसे वाटते. आठवणीतील पाऊस प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा भाव निर्माण करत असतो. पहिल्या पावसाने निर्माण होत असलेल्या सुगंधाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही. तो ओला सुगंध प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. पावसाशी नाते नाही, असे सांगणारा कुणी सापडणार नाही. पावसाची कोण वाटत नाही. सृष्टीतील प्रत्येक घटकाला त्याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा असते. पक्षी, प्राणी, झाडे, व्यक्ती अर्थात सर्व चराचर पाऊस व्यापतो. पावसाची नवचेतना, नवऊर्जा, नवप्रेम, उत्कटता हे सारे जुळलेय. पावसाच्या कितीही तऱ्हा असल्या, तरी त्याच्या प्रत्येक रूपावर आपण प्रेम करतोच. प्रत्येकाशी त्याचे नाते वेगळेच असते. शालेय वयात तर तो मित्रच वाटतो. शाळा सुटल्यावर पावसाने हजेरी लावली असेल तर विचारायलाच नको. शक्य असेल तर दप्तर डोक्यावर घ्यायचे आणि मनसोक्त भिजत घरी यायचे आणि येताना साचलेल्या पाण्यात उंच उडी घेत मित्राच्या अंगावर पाणी उडविण्यासारखा दुसरा आनंद आणि समाधानही नाही. व्हॉट्स अॅपवर नुकताच एक मेसेज वाचला, ‘लहानपणी मी खूप श्रीमंत होतो. कारण पावसाळ्यात कागदाची का असेना परंतु माझ्याकडे दररोज नवीन होडी असायची.’ या संदेशातच - समाधान म्हणजे काय असते, हे अगदी समर्पकपणे सांगितले आहे. साचलेल्या पाण्यात आपल्या हाताने केलेली होडी सोडण्यासारखा दुसरा आनंद नसतो. 

पाऊस तोच असतो मात्र वयाप्रमाणे संदर्भ आणि भावना बदलतात. पाऊस हा कविमनाचा आणि प्रेमवीरांचा आवडता विषय. या दोघांच्या भावविश्‍वाचे, मनतरंगांचे दरवाजे उघडण्याचे माध्यम जणू पाऊसच. प्रेमाचा आणि पावसाचा खूप जवळचा संबंध. त्याच्या आठवणींचे हिंदोळे पावसात पुन्हा त्याला प्रभावित करतात. पावसाची आल्हाद चाहूल  त्याचे शब्द जुळवतात. मानवी मनाची शुष्कता, मरगळ पाऊस घालवतो. खरेतर मनुष्य पावसाच्या प्रत्येक सरीकडे काही ना काही मागतोच आणि पाऊस ते देतोही.

माझे आणि पावसाचे नाते मित्राप्रमाणे आहे. तो मला कायम सखाच वाटतो. मित्र आपल्या चांगल्यासाठी आपल्यावर चिडतो, रागावतो आणि परत आपल्यात काहीच झाले नाही, या प्रमाणे शांतपणे सरी पाडत वागायलाही लागतो. दोनच दिवसांपूर्वी अचानक ‘नभ उतरू आलं अंग झिम्माड झालं...’ हे गाणे ऐकले. हे गाणे  ऐकताना अक्षरशः मोहरून येते. पाऊस काय घेऊन येत नाही. सळसळता उत्साह, चैतन्य, नावीन्य भरभरून आणण्याचे काम पाऊसच करतो. निसर्गात बदल घडवीत असताना आपल्या मानसिकतेतही तो बदल करायला भाग पाडतो. त्यामुळेच सर्वाधिक कविता, गाणी पावसावरच आहेत. कारण आहेच तो प्रेम करायला लावणारा. 

निसर्गाचे खरे रूप पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते. उन्हाच्या दाहकतेनंतर आपल्याला पाऊस सुखावून जातो. कधी ऊन आणि कधी पाऊस याचा खेळदेखील बघायला आणि अनुभवायला विलक्षण आनंद मिळत असतो. पावसाच्या सरी अंगावर घेण्यासारखा दुसरा आनंद नाही. कधी सुसाट तर कधी मंद वाहणारा वारा, कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पाऊस. मृगाचा पाऊस हा तसा पहिला पाऊस. सारी धरती कडक तापलेली असताना शीतलता घेऊन येणारा पाऊस. या शीतल जलधारांत कोणाला भिजायला आवडणार नाही? अगदी लहानापासून थोरांपर्यंत सारेजण या पावसात भिजतात. त्याच्या ओलाव्याचा आनंद लुटतात. पावसाचा आनंद घरात बसून भजी खात घेण्याइतकाच निसर्गात जाऊन त्याचे मनमोहक रूप पाहण्यातही आहे. पावसाचा रांगडेपणा अनुभवायचा असल्यास आपल्याला सह्याद्रीच्या डोंगररांगांशिवाय जवळचा दुसरा पर्याय नाही. कोकणातील पाऊसही आपल्याला खूप काही सांगून जातो. 

मला नेहमी असे वाटते, की आपण पावसाकडे कोणत्या नजरेतून पाहतो, त्याप्रमाणे तो आपल्याला भासतो. पावसामुळे सर्वत्र होणारा चिखल हा त्याचा दोष नाही. तो नित्यनियमाने आपले काम करत असतो, आपणच निसर्गात जास्तीचा हस्तक्षेप केल्याने त्याचा परिणाम भोगावा लागतो. 

पाऊस कधी हवाहवासा तर कधी अगदी नको वाटतो. सर्वांत गमतीचा भाग म्हणजे पाऊस आपल्याला वयाचा अनुभव सांगतो. गप्पांच्या ओघात कोणी फार बोलायला लागले वा आपल्याला एखादा मुद्दा ठसवून सांगायचा असल्यास आपण सहजतेने सांगतो की, मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्तच पाहिले आहेत. धो धो पडणारा मुसळधार पाऊस धरतीला तृप्त करून जातो. 

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जसा भिन्न असतो तसा पावसाच्या प्रत्येक नक्षत्राचाही स्वभाव वेगवेगळा असतो. सुरुवातीला कोसळणाऱ्या जलधारा भिज पावसात कधी रूपांतरित होतात; तर कधी पुन्हा धडकी भरायला लावणाऱ्या होतात. सहज विचार केला तर जाणवते की, शहरातला आणि रानावनातील पाऊस आपल्याला वेगवेगळा अनुभव देतो. रानावनांत गेले की तेथे पक्षी, रानसंगीतात पावसाचा आवाज सहजेतेने मिसळून जातो. शहरी भागातील पन्हाळ्यातून पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि ग्रामीण भागात कौलारू घरांच्या पागोळ्यांतून पावसाचे थेंब जमिनीशी सलगी करताना वेगळाच नाद येत असतो. तो खरोखरच मोहक भासतो. एका संथ लयीत पडणाऱ्या पावसाने मनातल्या जाणिवा हळुवारपणे उलगडल्या जातात. हा जाणिवा जपणारा पाऊस मनाला नवीन उमेद देऊन जातो. अगदी गवताच्या पात्यापासून ते झाडांच्या शेंड्यापर्यंतचे गुज पाऊस त्या-त्या स्वरात, भाषेत सांगतो. यासाठी आपले कान आणि मन मात्र पावसाबरोबर एकरूप झालेले पाहिजे. डांबरी रस्त्यावरून तडतड नाचणारा आणि रानावनात जमिनीशी एकरूप साधणारा पाऊस कायम नवीन ऊर्जा निर्माण करतो. पावसाळी पर्यटनाला बाहेर पडल्यावर सोसाट्याच्या वाऱ्याने उलटी झालेली छत्री सांभाळता सांभाळता उडालेली त्रेधातिरपिट कधीच विसरता येत नाही. थंडगार बोचऱ्या वाऱ्याचा स्पर्श झेलत भिजण्याचा आनंद वेगळीच अनुभूती देऊन जातो. 

आता पावसाचे वेगळे रूप आपण पाहतो. म्हणजे कमी काळात तो महिन्याभराची आपली हजेरी पूर्ण करतो. खरंतर हा त्याचा वेगळा पैलू काही वर्षांपासून आपण अनुभवत आहोत. एकमात्र नक्की पाऊस खूप झाला तरी आपल्या प्रतिभांना घुमारे फुटतात. गेल्यावर्षी पार मार्चपर्यंत पावसाने लावलेल्या हजेरीने सारेच अवाक् झालो होतो. यावर्षीही सुरुवातीला काही काळ हजेरी लावलेल्या पावसाने मोठी विश्रांती घेतली. मात्र विश्रांतीनंतर जोरदार कमबॅक करत सर्व कसर दूर केली. काहीही असो या पावसाच्या मूडने आपलाही मूड निश्चितच बदलतो.

संबंधित बातम्या