5 G तंत्रज्ञानाची नवी पिढी

अतुल कहाते
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

कव्हर स्टोरी

मोबाईल तंत्रज्ञानाची नवी पिढी अवतरली, की त्यामध्ये आधीच्या पिढीच्या मानानं खूप जास्त वेगानं माहिती आणि आवाज एकीकडून दुसरीकडे नेण्याची क्षमता येते. म्हणजेच 3Gकडून 4Gकडे येताना ही क्षमता खूप वाढली; आता 4Gकडून 5Gकडे जाताना ती आणखी कैकपटींनी वाढेल.

‘फोन’ हा शब्द ऐकला की अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘आपण कुणाशी तरी बोलण्यासाठी हे उपकरण वापरायचं’ यापलीकडे आपल्याला त्यासंबंधी काही जाणवत नसे. आता मात्र ‘फोन’ या उपकरणाची व्याख्याच समूळ बदललेली आहे. फोन करून कुणाशी तरी बोलायचं हा फोनच्या अनेक वापरांपैकी एक आणि अनेक जणांच्या बाबतीत तर दुय्यम झालेला प्रकार आहे! शहरी भागांमध्ये तरी बव्हंशी लोकांचे फोन आता एकदम ‘स्मार्ट’ झाले आहेत. साहजिकच बोलण्यासाठी कमी आणि इतर असंख्य गोष्टींसाठी जास्त; असा फोनचा वापर जागोजागी सुरू आहे. जगभरातले बव्हंशी लोक एकाच वेळी आपल्या फोनमध्ये डोकं खुपसून बसलेले असतील असं दृश्य काही वर्षांपूर्वी कुणी कल्पिलंही नसतं. आता मात्र ते आपल्याला हटकून दिसतं. अगदी घरामध्येही सगळी माणसं आपापल्या फोनमध्ये बुडून गेलेली असतात. हा बदल घडण्यामागेसुद्धा मोबाईल फोनच्या नवनव्या पिढ्या वेगानं अवतरत राहण्याचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातही झपाट्याने बदल होत आहेत. आता तर लवकरच 5Gसुद्धा वापरात येणार आहे. या वेगानं जर ते घडलं नसतं तर कदाचित स्मार्टफोनची कल्पनाही तंत्रज्ञांना सुचली नसती आणि आपोआपच फोन हे उपकरण पूर्वीसारखं एकमेकांशी बोलण्यासाठीचं साधन म्हणूनच ओळखलं गेलं असतं. 

5G म्हणजे नेमकं काय?
सुरुवातीला 5G म्हणजे नेमकं काय, याचा विचार करू. मोबाईल तंत्रज्ञानाची नवी पिढी अवतरली, की त्यामध्ये आधीच्या पिढीच्या मानानं खूप जास्त वेगानं माहिती आणि आवाज एकीकडून दुसरीकडे नेण्याची क्षमता येते. म्हणजेच 3Gकडून 4Gकडे येताना ही क्षमता खूप वाढली; आता 4Gकडून 5Gकडे जाताना ती आणखी कैकपटींनी वाढेल. साहजिकच आपल्याला ओटीटी, स्मार्ट टीव्ही, व्हिडिओ कॉल, यूट्युब, गेमिंग वगैरेंमध्ये आणखी जास्त स्पष्टता जाणवेल. सगळंच ‘हाय डेफिनिशन (एचडी)’सारखं अत्यंत स्पष्ट, ठळक, बारकव्यांनिशी दिसायला लागेल. एखादी मोठी फाईल डाऊनलोड करायला सध्या तीन मिनिटं लागत असतील, तर 5Gमध्ये त्यासाठी कदाचित तीन सेकंदही पुरतील. 

पण 5G म्हणजे एवढंच नाही! 
आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अमेरिकेमधला एखादा हृदयरोगतज्ज्ञ पुण्यामधल्या रुग्णावर आपल्या ठिकाणाहूनच शस्त्रक्रिया करू शकतो. हे कसं शक्य आहे? तर त्या हृदयरोगतज्ज्ञाला रुग्णाची पुण्यामधली स्थिती व्हिडिओ/ऑडिओ यांच्या साहाय्यानं ‘लाईव्ह’ दिसत असते. आपल्या समोरच्या स्क्रीनवरच्या या रुग्णाच्या हृदयावरची शस्त्रक्रिया हा हृदयरोगतज्ज्ञ समोरच्या स्क्रीनवरच करतो. म्हणजेच तो तज्ज्ञ अमेरिकेत आणि रुग्ण पुण्यात, असं असताना हा हृदयरोगतज्ज्ञ पडद्यावर आपल्या हातातली उपकरणं हलवतो. त्यानं ती उपकरणं जशी हलवली असतील त्यांचं अचूक मोजमाप करून पुण्यामध्ये त्या रुग्णाच्या जवळ उभ्या असलेल्या यंत्रमानवाच्या हातामधली तशीच उपकरणं त्याच प्रकारे हलतात. म्हणजेच अमेरिकेमधला हृदयरोगतज्ज्ञ जणू पुण्यामधल्या रुग्णावरच शस्त्रक्रिया करतो! 

कदाचित आपल्याला ही कल्पनेची भरारी किंवा एखादी विज्ञानकथा वाटेल; पण आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं निदान साध्या स्वरूपाच्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होऊ शकतात. अर्थातच त्यासाठी विलक्षण वेगानं माहिती एकीकडून दुसरीकडे गेली पाहिजे. उदाहरणार्थ, अमेरिकेमधल्या हृदयरोगतज्ज्ञानं आपल्या हातामधली शस्त्रक्रियेची उपकरणं हलवल्यानंतर अत्यंत जलदपणे तशीच हालचाल पुण्यामधल्या यंत्रमानवाकडूनही झाली पाहिजे. म्हणजेच अमेरिकेमधून पुण्यामध्ये येणारा माहितीचा संदेश अत्यंत झपाट्यानं आला पाहिजे. एक वेळ आपण टीव्ही बघताना मधेच चित्र किंवा आवाज यातलं काही अडकलं तर आपण तेवढ्यापुरते वैतागून जाऊ; पण त्यानं त्यापलीकडे फार नुकसान होणार नाही. इथे मात्र अक्षरशः माणसाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. साहजिकच यामध्ये माहिती एकीकडून दुसरीकडे अक्षरशः डोळ्यांची उघडझाप होण्याच्या आत गेली पाहिजे.

ऑग्मेंटेड रिअॅलिटी (एआर)
माहिती एकीकडून दुसरीकडे जाण्याचा वेग वाढत गेला की त्याबरोबर तंत्रज्ञ नवनव्या संकल्पनांना कसा जन्म देतात याचं हे ठळक उदाहरण झालं. या उदाहरणामध्ये ‘ऑग्मेंटेड रिअॅलिटी’ (एआर) नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान सध्याही अस्तित्वात आहे; पण त्यात 5Gच्या वेगाची झिंग मिसळल्यावरच खरी बहार येईल. याचं वैद्यकीय उदाहरण आपण वर बघितलंच; पण त्याची इतर काही उदाहरणं तर आपण अनुभवलेलीच आहेत. फक्त आपल्याला ‘हे म्हणजे एआर’ असं माहीत नसतं. काही वर्षांपूर्वी भारतात सगळीकडे एक गेम खूप लोकप्रिय झाला होता. पुण्या-मुंबईतसुद्धा कित्येक तरुण-तरुणी आपल्या हातामधला स्मार्टफोन बघत बघत त्यात काहीतरी टिपण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. बऱ्‍याच जणांना हा काय प्रकार आहे हे नक्की समजत नव्हतं. थोडी चौकशी केल्यावर ‘पोकेमॉन गो’ नावाचा गेम हे तरुण-तरुणी खेळत असल्याचं त्यांना समजलं. हा नेमका प्रकार तरी काय होता?

ज्या स्मार्टफोनमध्ये हा गेम इन्स्टॉल करण्यात आला होता, त्या गेमच्या स्क्रीनमधून गेम खेळणाऱ्‍याला समोरचं खरोखरचं दृश्य दिसत असे. उदाहरणार्थ समजा एखादा मुलगा आपला स्मार्टफोन हातात धरून या गेमच्या स्क्रीनकडे बघत पुण्यातल्या कमला नेहरू पार्कमध्ये चालत असेल, तर त्याला खरोखरच तिथली झाडं, चालणारे लोक, खेळणारी मुलं हे सगळं दिसत असे. यापुढची गंमत म्हणजे गेमनं त्या गेम खेळणाऱ्‍याचं ठिकाण त्याच्या स्मार्टफोनच्या ‘लोकेशन’वरून टिपलेलं असे. त्यामुळे हा मुलगा आत्ता कमला नेहरू पार्कमध्ये आहे हे गेमला समजायचं. त्याबरोबर कमला नेहरू पार्कमध्ये ‘ट्रेजर हंट’सारख्या काही वस्तू लपवून ठेवल्याचं हा गेम त्या मुलाला भासवायचा. हा मुलगा बागेत फिरत राहिला की त्याला यापैकी काही वस्तू गेमच्या स्क्रीनमध्ये दिसायला लागायच्या. म्हणजेच प्रत्यक्षातल्या बागेत आभासी वस्तू पेरल्यासारखं हा गेम त्या मुलाला भासवेल. तो मुलगा गेमच्या या स्क्रीनमधून त्या वस्तू टिपत राहण्याचा प्रयत्न करेल आणि आपला ‘ट्रेजर हंट’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. साहजिकच अनेक मुलं-मुली या गेमला पार भुलून गेले होते. प्रत्यक्षात हा ‘एआर’ तंत्रज्ञानाचाच आविष्कार होता.

हे एआरचं तंत्रज्ञान म्हणजे आधीच्या व्हीआर तंत्रज्ञानाची पुढची पायरी. व्हीआर (व्हर्च्युअल रिअॅलिटी) तंत्रज्ञानाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून आपण ‘ज्युरासिक पार्क’ या गाजलेल्या चित्रपटाचं उदाहरण घेऊ शकतो. त्यामध्ये खऱ्‍या दृश्यांमध्ये ज्या बेमालूमपणे तंत्रज्ञांनी डायनोसॉरची आभासी दृश्यं पेरली होती ते बघून लोक थक्क झाले. खरोखरच डायनोसॉर अजूनही अस्तित्वात आहे, असं कित्येक जणांना हा चित्रपट बघितल्यावर वाटायला लागलं. म्हणजेच वास्तवात आभास अशा सराईतपणे मिसळला गेला होता, की वास्तव (रिअॅलिटी) आणि आभास (व्हर्च्युअल) यांच्यामधला फरकच जणू नष्ट झाला होता. म्हणून याला व्हीआर हे नाव देण्यात आलं.

एआरमध्ये असं आभासी जगाचं व्हीआर तर असतंच; पण त्यात आपणही सामील होतो. म्हणजेच आता आपल्याला फक्त पडद्यावरच डायनोसॉर दिसेल असं नाही; तर तो कदाचित आपल्याही मागे लागेल (म्हणजे आपल्याला खरोखर तसं वाटायला लागेल). असा विलक्षण आभास समोरचं जग आणि आपलं जग यांचंच आता बेमालूमपणे मिश्रण करून टाकेल. साहजिकच आपल्याला आपल्यासमोरच्या आभासी जगाकडे निव्वळ तटस्थपणे न बघता त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येईल. म्हणूनच व्हीआरच्याऐवजी हे सहभाग दर्शवणारं एआर. आपण अमेरिकी हृदयरोगतज्ज्ञ पुण्यामधल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करतानाचं उदाहरण घेतलं ते याच स्वरूपाचं होतं.

या एआर तंत्रज्ञानामुळे माणूस आणि तंत्रज्ञान यांच्यामध्ये असलेलं अंतर संपुष्टात येऊन दोघं एकमेकांमध्ये मिसळून जातील. अर्थातच त्यासाठी पुन्हा प्रचंड वेगानं माहिती एकीकडून दुसरीकडे जाण्याची गरज आलीच. 4Gमध्ये ते शक्य नाही; पण 5Gमध्ये ते घडू शकेल. अनेक कंपन्या त्यासाठी प्रयत्नशील आहेत. वैद्यकशास्त्रापासून करमणुकीपर्यंत असंख्य क्षेत्रांमध्ये या एआरमुळे नाट्यमय घडामोडी घडू शकतील. 

इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)
4G तंत्रज्ञानानं माणसा-माणसामधलं संभाषण वेगवान, गंमतशीर, सहज-सोपं केलं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. 5G याच्या पुढे एक पाऊल टाकेल. या तंत्रज्ञानामध्ये यंत्रं किंवा उपकरणं (म्हणजे ‘थिंग्ज’) एकमेकांशी ‘बोलायला’ लागतील. यातून या यंत्रांचं किंवा उपकरणांचं इंटरनेटचं जाळं अस्तित्वात येईल. म्हणूनच याला आयओटी असं नाव देण्यात आलं. आता हा प्रकार नेमका काय आहे? 

एका तंत्रसाक्षर शेतकऱ्‍याला समजा पिकाला खूप कमी किंवा खूप जास्त पाणी दिलं जातं या समस्येनं भेडसावलं आहे. त्यानं यासाठी आयओटीचं तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं तर काय होईल? त्याच्या शेतामध्ये ठरावीक ठिकाणी मातीचा ओलसरपणा, हवेची आर्द्रता अशा अनेक गोष्टी अधूनमधून तपासणारे सेन्सर त्याला बसवता येतील. 

हे सेन्सर या सगळ्यांच्या पातळ्या मोजत राहतील. ज्या क्षणी या पातळ्या एका मर्यादेच्या खाली आल्या असल्याचं हे सेन्सर टिपतील त्याबरोबर हे सेन्सर आपोआप पाण्याचा पंप सुरू करण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करतील. त्यामुळे पिकांना पाणी दिलं जाईल. पाणीपुरवठा किती वेळ सुरू ठेवायचा आणि तो केव्हा बंद करायचा हे देखील ही यंत्रणाच ठरवेल. सेन्सरनं ही माहिती सातत्यानं टिपत राहणं आणि ती पाण्याच्या पंपाच्या यंत्रणेला पाठवणं, हे दोन यंत्रांनी एकमेकांशी संवाद साधण्याचं उदाहरण झालं. म्हणूनच याला आयओटी म्हणतात.

स्वयंचलित गाड्या
वर उल्लेख केलेल्या साध्या उदाहरणापासून स्वयंचलित (चालकविरहित) गाड्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा आयओटीच्याच जोरावर चालतात. सर्वसामान्यपणे लक्ष विचलित होणं, डुलकी लागणं, दारू आणि चालकाकडून घडणारी चूक, ही अपघात होण्यामागची प्रमुख कारणं मानली जातात. या चारही बाबतींमध्ये स्वयंचलित गाड्या महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. तसंच या गाड्या पूर्णपणे स्वयंचलित असल्याच पाहिजेत असंही नाही; बऱ्याच प्रमाणात त्या स्वयंचलित असू शकतात आणि गरज पडेल तेव्हा मानवी चालक गाडीचा ताबा आपल्याकडे घेऊ शकतो. या संदर्भात विमानांचं उदाहरण उपयुक्त ठरावं. विमान चालवण्यासाठीची स्वयंचलित म्हणजेच ‘ऑटो पायलट’ यंत्रणा हळूहळू प्रगल्भ होत गेली. त्याचबरोबर मानवी वैमानिकाचं प्रत्यक्ष काम कमी होत गेलं. आता ही स्वयंचलित यंत्रणा आपलं काम बरोबर करत असल्याची खात्री करणं आणि जेव्हा ते होत नसेल तेव्हा विमानाची सूत्रं आपल्याकडे घेणं हे वैमानिकांचं मुख्य काम झालं. अर्थातच स्वयंचलित गाड्यांच्या संदर्भात इतरही असंख्य अडचणींचा विचार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, रस्त्यामध्ये वाहनांची प्रचंड गर्दी असल्यामुळे वाहतुकीचे दिवे बंद ठेवून पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करणं, एखादा रस्ता बंद असणं, अनपेक्षित घटना घडणं, खराब हवामान असणं अशा अनेक गोष्टी निर्णायक ठरू शकतात. तरीसुद्धा ज्या वेगानं गुगल, टेस्ला आणि इतर काही कंपन्यांच्या स्वयंचलित गाड्यांनी प्रगती साधली आहे, ती बघता निदान काही प्रमाणात तरी गाड्यांचं स्वयंचलन नजीकच्या भविष्यात नक्कीच शक्य आहे, असं आपण खात्रीनं म्हणू शकतो.

संबंधित बातम्या