खवले मांजरांसाठी...

भाऊ काटदरे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

कव्हर स्टोरी

जगभरात होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारींचा आणि तस्करीचा सर्वात मोठा बळी ठरत असलेल्या खवले मांजरांबद्दल लोकांना माहिती करून देण्यासाठी आणि खवले मांजरांची तस्करी रोखण्याबाबत जागृती करण्यासाठी फेब्रुवारी २०१२ पासून दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या शनिवारी जागतिक खवले मांजरदिन साजरा केला जातो. वाळवी आणि मुंग्यांच्या संख्यावाढीवर नैसर्गिकरीत्या अंकुश ठेवणाऱ्या खवले मांजरांना, त्यांच्या अंगावरच्या खवल्यांसाठी आणि मांसासाठी होणाऱ्या अवैध शिकारींमुळे धोका निर्माण झाला आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याने खवले मांजरांना संरक्षण दिले असले तरी खवले मांजरांना संरक्षण देण्यासाठी, त्यांची नैसर्गिक वसतीस्थाने जपली जावीत यासाठी लोकसहभागाची मोठी गरज आहे.

महाराष्ट्राच्या वनखात्यानेही अलीकडेच खवले मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काही कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. तीन दशकांपासून निसर्गाविषयी, नैसर्गिक ठेव्यांविषयी, वन्यप्राण्या-पक्ष्यांविषयी, समुद्री कासवांविषयी लोकसंवादातून लोक शिक्षणाचे, निसर्गसंवर्धनाचे काम करणारी चिपळूणची ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ ही संस्था गेली जवळजवळ पाच वर्षे खवले मांजरांविषयी जनजागृतीचे काम करीत आहे.

कोकणात खवले मांजर संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी लिहीत आहेत सह्याद्री निसर्ग मित्रचे संस्थापक आणि खवले मांजर तज्ज्ञ समितीचे सदस्य भाऊ काटदरे; निमित्त आहे २० फेब्रुवारीला साजऱ्या होत असलेल्या दहाव्या जागतिक खवले मांजरदिनाचे...

खवले मांजराच्या नावात जरी मांजर असले तरी मांजर कुळाशी त्याचा दुरान्वयेही संबंध नाही. संपूर्ण शरीरावर कठीण खवले असलेला हा एकमात्र सस्तन प्राणी आहे. त्याचे पोट, कपाळ व पायाच्या आतील भाग वगळता संपूर्ण अंगावर खवले असतात. हे खवले त्याचे संरक्षण करतात, कारण बंदुकीची गोळी सुद्धा सहजासहजी हे खवले भेदू शकत नाही. त्याला धोका वाटला की तो अंगाचे वेटोळे करतो व एखाद्या फुटबॉलसारखा होतो. मग हे वेटोळे उघडणे वाघ-सिंह यांनासुद्धा सहजासहजी शक्य होत नाही. खवले मांजराच्या शेपटीखाली एक ग्रंथी असते त्यातून तो संकटकाळी उग्र वासाचा स्राव फवारतो व आपले संरक्षण करतो. निसर्गाने त्याला एवढी कवचकुंडले बहाल केल्यामुळे निसर्गात त्याला भीती नाही, परंतु नतद्रष्ट मानवापासून तो स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. मजबूत खवले हेच त्याच्या नाशाचे कारण बनतात. आज जगात सर्वात जास्त शिकार व तस्करी होणारा हा प्राणी आहे.

 खवले मांजर (Indian Pangolin, Manis crassicaudata) हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा आफ्रिका व आशिया खंडातील उष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळतो. जगभरात खवले मांजराच्या आठ प्रजाती आहेत. त्यातील चार आफ्रिकेत आढळतात तर चार आशियात. भारतीय खवले मांजर दक्षिण आशियात पूर्व पाकिस्तानचा काही भाग, भारतात हिमालयाच्या दक्षिणेकडील भाग, दक्षिण नेपाळ, बांगलादेश व श्रीलंकेमध्ये आढळते. भारतात आढळणारी खवले मांजराची दुसरी प्रजाती आहे चिनी खवले मांजर (Chinese Pangolin Manis pentadactyla). ही प्रजाती उत्तर भारतात तसेच पूर्वोत्तर भारतात आढळते. खवले मांजराला सर्व स्तरावर कायद्याने सर्वोच्च संरक्षण देण्यात आले आहे. खवले मांजर भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२च्या शेड्यूल वनमध्ये असून ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉंझर्व्हेशन ऑफ नेचर’च्या (आययूसीएन) रेड लिस्टमध्ये ‘एन्डेंजर्ड’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘कन्व्हेंशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेंजर्ड स्पिसीज् ऑफ वाइल्ड फॉना ॲण्ड फ्लोरा’(CITES) या संस्थेच्या यादीमध्ये परिशिष्ट-एक मध्ये खवलेनमांजराचा समावेश केला आहे.

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट, २०१५च्या जुलैमधील. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये बातमी आली होती चिपळूण जवळ घाटात खवले मांजरांच्या खवल्यांची तस्करी पकडण्यात आली आहे. एकूण ४४ किलो खवले पकडले गेले होते. आम्हाला खवले मांजराच्या तस्करीबाबत माहिती होते, पण त्याची पाळेमुळे कोकणातदेखील पोहोचली आहेत हे त्या बातमीच्या निमित्ताने आम्हाला समजले. चव्वेचाळीस किलो खवले म्हणजे लहान मोठी किमान वीस खवले मांजरे मारली गेली आहेत, हे लक्षात आल्यावर आम्ही हादरलो. त्याच सुमारास आमची सागरी कासव संरक्षण मोहीम फत्ते करून आम्ही स्थानिक लोक व वनविभागाला सुपूर्त केली होती. वर्तमानपत्रातल्या त्या बातमीमुळे खवले मांजराच्या संरक्षण, संवर्धनाचे काम हाती घेण्याची गरज जाणवली आणि वनविभाग आणि पोलिस विभागाच्या सहकार्याने आम्ही खवले मांजर संरक्षण संवर्धनाचे काम हाती घेतले. सर्वप्रथम खवले मांजराची माहिती गोळा करायला सुरुवात केली.

सुरुवातीला आम्ही चिपळूण तालुक्यातील १६० गावांमध्ये सर्वेक्षण चालू केले. लोकांजवळ चौकशी करायला लागल्यावर, ‘आम्हाला काही माहिती नाही’, असे सांगून लोक आम्हाला टाळू लागले. तस्करीसंदर्भात काही लोकांना पकडले आहे हे सर्वांना समजले होते. आपण काही बोललो तर चौकशीचा ससेमिरा चालू होईल, या भीतीने कोणीच बोलत नव्हते. मग आम्ही पोलिस, वनविभाग यांच्या संयुक्त सहीची पत्रे पोलिस पाटील, गावांमधल्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, सरपंच यांना दिली व त्यांच्या सहकार्याने काम चालू केले. त्याला हळूहळू यश येऊ लागले. जेव्हा आम्ही माहितीचा आढावा घेतला तेव्हा सुमारे तीस टक्के लोकांना खवले मांजराची माहिती होती, असे लक्षात आले. 

एवढे झाल्यावर मग ज्यांना खवले मांजराची माहिती आहे त्यांच्या सहकार्याने चिपळूण तालुक्यात विविध ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून प्रत्यक्ष खवले मांजराच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. हे अत्यंत कठीण काम होते. पहिल्या वर्षभरात आम्हाला सतत प्रयत्न करूनसुद्धा खवले मांजरांचा थांगपत्ता लागला नाही. हळूहळू आम्हाला खवले मांजरांचे अधिवास त्यांची बिळे करण्याची पद्धत, राहत असलेले बीळ, सोडून गेलेले बीळ या विषयी समजायला लागले. दुसऱ्या वर्षीपासून हळूहळू खवले मांजराचे अस्तित्व जाणवू लागले. खवले मांजराचे फोटो कॅमेऱ्यात मिळू लागले. गेल्या पाच वर्षात आम्ही चाळीस ट्रॅप कॅमेरा वापरून सुमारे वीस हजार कॅमेरा दिवस हे सर्वेक्षण केले. या प्रयत्नांतून खवले मांजराचे सुमारे दोनशे फोटो मिळाले, वापरातली तेहेतीस बिळे लक्षात आली. या सर्वेक्षणात दोन गोष्टी लक्षात आल्या. कोकणात खवले मांजरं सर्वत्र आढळत असल्याचे जसे जाणवले, तसेच त्यांची शिकार होत असल्याचे पुरावेसुद्धा मिळाले. शिकारी खवले मांजराची बिळे शोधतात, बिळासमोर बारीक काटक्या उभ्या करतात. खवले मांजर बिळात गेले असेल तर त्या काटक्या आत पडलेल्या असतात. त्यानंतर हे लोक ते बीळ दोन फूट रुंद व सहा ते आठ फूट उंच व लागेल तेवढे लांब खणतात, खणायला वेळ लागला तर रात्रभर काम चालू ठेवतात परंतु शेवटी बिळाच्या टोकाला पोचतात व खवले मांजराला पकडतात. खवले मांजर हा प्राणी अगदी लाजाळू आहे. स्वतःच्या शरीराचा गोळा बनवण्याशिवाय त्याला इतर काही संरक्षण नाही. पकडल्यावर शिकारी त्याला उकळत्या पाण्यात घालून मारतात, कारण कुऱ्हाडीनेसुद्धा त्याला काही होत नाही.

खवले मांजराच्या संरक्षण संवर्धनासाठी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात सरपंच, पोलिस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांना वनविभाग, पोलिस व ‘सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण’चे संयुक्त पत्र पाठवले. त्यात खवले मांजराला कायद्याने मिळालेले संरक्षण, कायदा मोडणाऱ्याला होणारी शिक्षा याची माहिती देऊन खवले मांजरांच्या संरक्षणाचे आवाहन करण्यात आले होते. 

दर वर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या शनिवारी जागतिक खवले मांजर दिवस साजरा केला जातो. आम्ही २०१६ पासून हा दिवस साजरा करत आलो आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व गावांचे प्रतिनिधी, वनविभाग, पोलिस विभाग यांची कार्यशाळा आयोजित केली गेली. संपूर्ण जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी खवले मांजरांच्या संरक्षणाबाबत बोर्ड लावण्यात आले. पत्रके वाटण्यात आली. गेल्यावर्षी चिपळूण तालुक्यातील डूगवे गावात खवले मांजराची प्रतिकृती पालखीत घालून त्याला देवासारखा मान देऊन संरक्षण देण्याची ग्वाही गावाने दिली. जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांमध्ये जागृतीचे कार्यक्रम करण्यात आले. इयत्ता सातवीच्या पुस्तकात खवले मांजराबद्दल माहिती असलेला धडा दरवर्षी १६ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. खवले मांजर चषक क्रिकेट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रमांमधून मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

या सर्व प्रयत्नांना चांगले यश येत आहे. गेल्या अडीच वर्षात ग्रामस्थ, वनविभाग, पोलिस व सह्याद्री निसर्ग मित्रच्या सहकार्याने एकूण २३ खवले मांजरे संकटातून सोडवून सुरक्षितपणे जंगलामध्ये सोडण्यात यश मिळाले आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गेल्या दोन वर्षांत वनविभाग, पोलिस यांनी उत्तम कामगिरी करत विविध ठिकाणी छापे टाकून १७ जिवंत तर ३ मृत खवले मांजर व काही किलो खवले जप्त करण्यात यश मिळवले आहे. एक बाब मात्र आवर्जून नोंदवावी वाटते, खवले मांजर भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२च्या शेड्यूल वनमध्ये आहे, त्याला वाघाइतकेच संरक्षण आहे, असे असूनही पकडलेल्या तस्कराला सहजासहजी जामीन मिळू शकतो. त्यामुळे कायद्याने खवले मांजरांना जे संरक्षण दिले आहे त्याचा योग्य उपयोग करून कायदेतज्ज्ञांच्या सहकार्याने पकडलेल्या तस्करांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. त्यामुळे तस्करीला निश्चितच आळा बसेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे ज्यामुळे नक्कीच खवले मांजरांना संरक्षण मिळण्यास मदत होईल.

जागतिक पातळीवर या खवले मांजराबाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्याच्या संपूर्ण जीवनचक्राचा अभ्यास, त्याची सद्यपरिस्थती, संख्या, त्याला असलेले धोके, याचा शास्त्रीय अभ्यास विविध अधिवासात होणे गरजेचे आहे. त्याला असलेला धोका पाहता त्याच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे यासाठी आधुनिक डीएनएसारखे तंत्रज्ञान उपयोगात आणले पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी फार मोठ्या प्रमाणात चालते. हे खवले चीनमध्ये त्यांच्या पारंपरिक औषधात वापरले जातात. ट्रॅफिक या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात जगभरातून दहा लाख खवले मांजरांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. खवले मांजरांची तस्करी करणाऱ्यांची एक मोठी साखळी असून त्यातील काही लोक छोट्या शहरातून ग्रामीण भागात जातात. गावात काही वस्तू विक्री किंवा भंगार विकत घेण्याचा बहाणा करतात व गावातील माहीतगार शिकारी लोकांना फूस लावतात. त्यांना पैसे, दारू देऊन खवले मांजर मारण्यास प्रवृत्त करतात. पुढच्या ट्रिपमध्ये ते मारलेल्या खवले मांजराचे खवले काही ठराविक मामुली रक्कम देऊन विकत घेऊन जातात. तेथून मोठ्या शहरा मार्गे पूर्वोत्तर भारतातून चीनला रवाना करतात. आमच्या नागालँड भेटीत आम्हाला तिथल्या एका स्थानिक माणसाने गेल्या महिन्यात १६ हजार रुपयांना खवले विकल्याचे कॅमेरासमोर सांगितले, एवढे सहजतेने त्या भागात हे घडत आहे.

भारतात प्रथमच महाराष्ट्र शासनाने येत्या पाच वर्षांसाठीचा खवले मांजर संरक्षण-संवर्धन बाबतचा कृती आराखडा बनवण्याचे काम सुरू केले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या पंधराव्या सभेत खवले मांजराच्या येत्या पाच वर्षांसाठीच्या संरक्षण-संवर्धन बाबतचा कृती आराखडा बनवावा असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तो स्वीकारण्यातसुद्धा आला. या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात संरक्षण-संवर्धन होईल याची खात्री वाटते. सदर कृती आराखडा बनवण्यासाठी पुणे येथील वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमण्यात आली आहे. ही समिती लवकरच आपला आराखडा शासनाला सादर करील. संपूर्ण भारतात प्रथमच अशा प्रकारे महाराष्ट्र शासनातर्फे खवले मांजर संरक्षण संवर्धनाबाबतचा कृती आराखडा बनवण्यात येत आहे ही खूप महत्त्वाची व आनंदाची बाब आहे. यासाठी महाराष्ट्र वनविभाग तसेच महाराष्ट्र शासन यांचे अभिनंदन करायला हवे. आगामी काळात कृती आराखड्याप्रमाणे काम होईल व महाराष्ट्रात खवले मांजर संरक्षित होईल अशी आशा करूयात.

संबंधित बातम्या