सावरीच्या सहवासात 

प्रिया भिडे
सोमवार, 27 एप्रिल 2020

कव्हर स्टोरी
स्वसंरक्षणार्थ काटे लेऊन राहणारी, कीटकांना, पक्ष्यांना अभय देणारी, हिरवे करपल्लव मिरवणारी, पानगळीनंतर व्रतस्थ होणारी, वसंतात पुष्पोत्सव साजरा करून नंतर लेकुरवाळी होणारी काटेसावर आपल्याला जीवनाचे रसरंग दाखवत जाते... तुम्हाला एकदा ती भेटली, की तुम्ही तिच्या सहवासात रमून जाता!

चाळीस वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी सज्जनगडाकडे जाणाऱ्या नागमोडी वाटेच्या दुतर्फा गर्द गुलाबी फुलांनी बहरलेले, रस्त्यावर फुलांचा सडा घालणारे उंच उंच देखणे वृक्ष आजही आठवतात. या वाटेवरची ही काटेसावर, सेमल, शाल्मली अशा नावानेही परिचित आहे. ही सावर मला आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर सखी होऊन भेटतच राहिली.

सखीशी जसे सख्य झाले, तसे दूर डोंगरावर, रस्त्याकडेला, जंगलात, देवराईत जिथे जिथे ती भेटली तिथे तिच्या लावण्याने मोहून टाकले. अगदी तळेगावच्या ओसाड गवताळ प्रदेशात, अंगावर काटे असलेले, सरळ खोडाचे, आडव्या फांद्यांचा विस्तार असलेले बुटके झाडही लक्ष वेधून घेत असे. बॉमबॅक्स सीबा नावाने ओळखली जाणारी ही सावर आशिया खंडातच नाही, तर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिकेतही आढळते. ऋतुमानाप्रमाणे हिची रूपे बदलतात. अधिवासाबाबत ही खूपच लवचिक आहे. भरपूर पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी आढळेल, तशी शुष्क वैराण भागातही अस्तित्व जपेल. औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर दुतर्फा वीस-पंचवीस मीटर उंच सावरीचे देखणे वृक्ष पाहिल्याचे आठवते. एका सायंकाळी अकोले भंडारदरा रस्त्यावर सायंकाळी प्रवास करताना सूर्य बुडाला आणि हिरवी राने हळूहळू गर्द होत गेली, एकमेकांत विरून गेली. पण राखाडी रंगाची निष्पर्ण सावर तिच्या सरळ खोडावर आडव्या फांद्याच्या आकृतीबंधामुळे चटकन नजरेत भरत होती. कात्रजच्या घाटात अनेक ठिकाणी हे वृक्ष आहेत. फेब्रुवारी, मार्चनंतर घाटात रंगपंचमीच असते.  

जानेवारीपर्यंत पाने पूर्ण गाळून सावर वैराग्य धारण करते. वसंताची चाहूल लागताच फांद्यांवर दीपकळ्या लेऊन नटून जाते. टपोऱ्या गुलाबीसर कळ्या ल्यालेली सावर मुग्ध बालिका भासते. वसंत येताच उमलून येते. गर्द गुलाबी रंगाच्या फुलांची उधळण करते. फुलांचा साज लेवून मिलनोत्सुक यौवना होते. चार वर्षांपूर्वी कराड-पाटण रस्त्यावर अशीच एक यौवना भेटली. दुरूनच तिने लक्ष वेधून घेतले. वीस पंचवीस मीटर उंच, निष्पर्ण, फांद्यांचा प्रचंड मोठा विस्तार आणि घनगर्द गुलाबी फुलांचा बहार. गाडीतून उतरून पाहिले तर मधमाशांची वीस-बावीस पोळी सावरीवर विसावली होती. मैना, पोपट, तांबट, बुलबुल, दयाळ अशा अनेक पक्ष्यांची तिथे वर्दळ होती. त्यात एक कोतवालांची टोळी होती. त्यातील एक कोतवाल मधमाशांच्या पोळ्याला हलकेच टोचायचा. त्यामुळे दोन-चार माशा उडायच्या, आजूबाजूचे इतर कोतवाल त्यांना मटकवायचे. कोतवालांचे हे टीम वर्क बघून मी थक्कच झाले. पाटण परिसरात बहरलेले खूप वृक्ष होते. एका ठिकाणी माकडे प्रत्येक फुलापाशी जाऊन वाकून त्यातील मधुरस पीत होती. खूपच गमतीशीर दृश्य होते ते. प्रत्येक फूल म्हणजे मधुरसु प्याला होता. जणू सावरीने रसवंतीगृह उघडले होते.

सावरीचे एक फूल अलगद काढले. गर्द गुलाबी, किंचित चकाकणाऱ्या पाच पाकळ्या, पाकळ्यांना धरून ठेवणारा मधुरस प्याला, देखणे पुंकेसर-स्त्रीकेसर अशी फुलांची रचना, त्यात चमचाभर मधुरस, तो चाखून पाहिला!

थोड्याच अंतरावर रस्त्याकडेला एक बाई काहीतरी गोळा करताना दिसली, जवळ जाऊन पाहिले तर तिने लवंगेच्या आकाराच्या काळ्या काड्या दाखवल्या. ते काय आहे याची तिला माहिती नव्हती, पण ‘आमच्याकडून लोक तीनशे रुपये किलोने हे विकत घेतात,’ असे तिने सांगितले. गुगलवर खूप शोधल्यावर कळले, याला ‘मराठी मोग्गु’ म्हणतात. या असतात सावरीच्या गळलेल्या कळ्या. मोग्गु म्हणजे कानडी भाषेत कळी. आता मराठी मोग्गु नाव का पडले असावे हा प्रश्नच आहे. कारण मराठी लोकांना हे नावदेखील माहीत असेल असे वाटत नाही. कर्नाटक, तामिळनाडू, विशेषकरून तंजावर भागात मराठी मोग्गु मसाल्याच्या पदार्थात, बिसिबेळे भात करताना वापरतात. थायलंडमध्ये नूडल्स, सूप, इतर मांसाहारी पदार्थ करताना मसाला म्हणून वापरतात. बाजारात याची किंमत ९०० रुपये किलोपर्यंत असते हे वाचून धक्काच बसला. आपण तर आजूबाजूला असलेल्या या वृक्षाकडे लक्षही देत नाही. पक्षीप्रेमी पक्षीनिरीक्षणासाठी या झाडाकडे आकर्षित होतात इतकेच. 

आदिवासी भिल्ल, गरासिया, काठोडी, मीना, दामोर या लोकांच्या जीवनात सावरीला महत्त्वाचे स्थान आहे. सावरीला ते हेमल म्हणतात. ‘हेदे हेमलाये रमेलो.... तुझ्या छायेत आम्ही रमतो,’ असे लोकगीत इथे गायले जाते. ‘हेमलो रोपालो रे.... हेमलचे झाड लाव रे, त्याची कुटुंबातील माणसासारखी काळजी घे,’ अशी लोकगीते भिल्ल आदिवासी गातात. भिल्ल आदिवासी याला पवित्र वृक्ष मानून त्याचे पूजन करतात. दुर्गाबाई भागवत त्यांच्या संचित पुस्तकात म्हणतात, ‘भारतात लोक दुष्काळात सावरीच्या कापसाच्या बिया दळून त्यांच्या भाकरी करून खातात म्हणजे परम कंगालाची अन्नपूर्णाच की! बंगालमध्ये याच्या फुलांची भाजी करतात. ही भाजी लोण्यासारखी शिजते, वसंत मेवाच तो!’ पुढे त्या लिहितात, ‘या काटेसावरीने अनेकांना सावरले आहे.’ किती सुंदर वर्णन केले आहे नाही का?

अनेक गाण्यात बहरलेल्या सावरीची वर्णने येतात. होळीच्या सुमारास फुलांपासून रंग तयार करतात. राजस्थान, उत्तरप्रदेशात लाकडापासून ढोलके, तंबुरा तयार करतात आणि अनेक ठिकाणी रूढी-परंपरेनुसार होलिका दहन करताना मोठ्या प्रमाणात हिचे दहनही करतात. असंख्य जीवांना जीवन आधार देणारी सावर खरे तर आपण जपायला हवी. हा आपला जैविक वारसा आहे. पुराणकाळातील अमरकोश, किष्किंधाकाण्ड यासारख्या अनेक ग्रंथांमध्ये बहरलेल्या शाल्मलीचे वर्णन आढळते. 

मला आठवते, काझिरंगा अभयारण्यातील वृक्ष मान वर करूनही नजर पोचणार नाही इतके उंच. प्रचंड मोठ्या बुंध्याचे, दीर्घायू नाव सार्थ करणारे. सावरीच्या या वृक्षांवर अनेक गरुडांची व आपल्या भागातून नामशेष झालेल्या गिधाडांची घरटी होती. ही घरटी पाहून मन सुखावून गेले. आपल्या गगनाला स्पर्श करणाऱ्या माथ्यावर जणू ही सावर गिधाडांच्या, गरुडांचा पिल्लांना जोजवत होती. सांगत होती, तुम्ही सुरक्षित आहात, माझ्या कुशीत आहात. आसाममध्ये ना मेरी या अभयारण्यात आपल्याला पायी फिरण्याची अनुमती असते. इथे सावरीचे खूप मोठे प्रचंड विस्तार असलेले अनेक वृक्ष आहेत, त्यावर अनेक दुर्मीळ पक्षी मधुरसाच्या आशेने आकर्षित होतात.

या वृक्षावर येणारे पक्षी, कीटक परागीभवनाला मदत करतात आणि मग मऊसूत कापसाने भरलेली बोंडे सावरीवर लटकू लागतात. अगदी गेल्याच वर्षी अशी लेकुरवाळी सावर भेटली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही वेल्हे तालुक्यातील बोपलघर येथील काळूबाईच्या देवराईत गेलो होतो. सकाळीदेखील उन्हाचा चांगला तडाखा जाणवत होता. देवराईत शिरताच थंडावा जाणवला. देवराई छोट्याशा टेकाडावर असल्याने एका बाजूला चढ, तर दुसरीकडे उतार व मधे पायवाट आहे. आम्ही आत गेलो. ऐन उन्हाळ्यातही देवराईत गच्च हिरवाई होती. तीन-चार महिने पानगळ झाल्याने चारी बाजूला खाली पालापाचोळ्याचा गालिचा होता. अचानक डावीकडच्या उतारावर एक पांढुरका थर दिसला. पाचोळ्यावरून अलगद जाऊन पाहिले, तर काय हिमवृष्टीच झाली होती जणू.  हळूहळू भुरभुरणारा बर्फ जमिनीवर बसल्यासारखे दृश्य होते. वर पाहिले तर उंचच उंच जाडजूड खोड दिसत होते. बाकी वृक्षांच्या वरती या वृक्षाची छत्री गेली होती, पण खाली पडलेल्या कापसावरून ओळख पटली. देवराईच्या बाहेर जाऊन पाहिले, इतर गर्द हिरव्या वृक्षांच्या झाडोऱ्यावर पर्णहीन सावरीवर कापसाची बोंडे लटकत होती. अनेक बोंडे उकलली होती, तर काही जमिनीवर पडली होती. उकललेल्या बोंडामधल्या कापसाचा वर्षाव देवराईत झाला होता. ते दृश्य अवर्णनीय होते. जमिनीवर पडलेले एक बोंड उचलून हातात धरले, जणू आइस्क्रीमचा कोनच वाटत होता. या मऊसूत कापसात खेळायचा मोह आवरला नाही...

सावरीचा मऊसूत कापूस उशा करण्यासाठी वातानुकुलित यंत्रणांमध्ये वापरला जातो आणि बोंडामधील असंख्य बिया कापसाबरोबर दूर प्रवासाला निघतात... कुठेतरी रुजण्यासाठी, नवजीवन सुरू करण्यासाठी. 

भारताप्रमाणेच इतर देशात वाढणारी सावर, त्या देशात मानाचे स्थान मिळवून आहे. इक्वेटोरीयल गिनी या आफ्रिकेतील देशाच्या झेंड्यावर ती विराजमान आहे. थायलंड, लाओस या देशांनी तिच्या देखण्या फुलांची तिकिटे काढली आहेत. जपानसारख्या देशात चेरी ब्लॉसम झाडाचे लावण्य बघण्यासाठी लोक आवर्जून जातात, ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चेरी ब्लॉसमची लागवड करतात. आपणही या सावरीची, शाल्मलीटी जाणीवपूर्वक सौंदर्य वर्धनासाठी लागवड करू शकतो का, याचा विचार व्हायला हवा. 

लहानपणी स्वसंरक्षणार्थ काटे लेऊन राहणारी, कंटकद्रुम नाव सार्थ करणारी. कीटकांना, पक्ष्यांना अभय देणारी, हिरवे करपल्लव मिरवणारी, पानगळीनंतर व्रतस्थ होणारी, वसंतात पुष्पोत्सव साजरा करून नंतर लेकुरवाळी होणारी सावर आपल्याला जीवनाचे रसरंग दाखवत जाते.
मला अनेक ठिकाणी भेटलेली ही शाल्मली, सावर तुम्हालाही कधीतरी भेटेल आणि तुम्हीही तिच्या सहवासात रमून जाल!

संबंधित बातम्या