लॉकडाउननंतरचे गिर्यारोहण

उमेश झिरपे
सोमवार, 1 जून 2020

कव्हर स्टोरी
लॉकडाउन संपला, तरी कोरोना मात्र बराच काळ आपल्याबरोबर राहणार आहे. त्यामुळेच लॉकडाउन संपून जेव्हा भटंकती-गिर्यारोहण सुरू होईल, तेव्हा त्याचे स्वरूप बदललेले असेल. फिरताना, गिर्यारोहण करताना लॉकडाउनचे काही नियम नेहमीसाठी पाळावेच लागतील. स्वरूप बदलेल म्हणजे काय होईल? कोणती खबरदारी घ्यावी लागेल? लॉकडाउन उठल्यावर गडकोटांवर होणारी गर्दी कशी रोखता येईल? जबाबदार नागरिक म्हणून वैयक्तिक पातळीवर काय करता येईल? या प्रश्‍नांचा वेध...

गेले दोन महिने आपण सर्व जण घरात बसून आहोत. कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने जगभर पसरले अन् अक्षरशः जगातील सर्वांनाच एक पॉझ घ्यावा लागला. विमाने उडायची थांबली. पर्यटन बंद झाले, प्रत्यक्ष भेटींचे रूपांतर व्हिडिओ कॉलमध्ये झाले. ऑलिंपिकसारखे जगातील मोठमोठे इव्हेंट्स पुढे ढकलले गेले, तर विंबल्डनसारख्या स्पर्धा थेट रद्दच झाल्या. अनेकांचे जीव की प्राण असणारे फुटबॉल सामनेदेखील थांबले. कोरोनाच्या प्रभावाचा आवाका लक्षात घेता, खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये पुन्हा कोणत्याही खेळाचे सामने भरण्यास वर्षभराहून अधिक कालावधी जाईल, प्रेक्षकाविनाच सामने भरवून फक्त टीव्हीवर हे सामने लाइव्ह बघावे लागतील असे चित्र दिसत आहे. कोरोना विषाणू संक्रमणामुळे खेळाडू-प्रेक्षक हा थेट संवादामध्ये स्वल्पविराम आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रभाव जगातील सर्वच गोष्टींवर स्पष्ट जाणवत आहे. आमचा गिर्यारोहणाचा धाडसी खेळदेखील यामुळे थांबला आहे. एप्रिल-मे महिन्यात गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जत्थेच्या जत्थे हिमालयाच्या कुशीत येतात. आपल्या आवडत्या पर्वत शिखरांच्या सान्निध्यात जाता न येण्याची सल अनेक गिर्यारोहकांना सतावते आहे. मात्र, परिस्थितीची जाण ठेवून, उगाच कुढत न बसता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत गिर्यारोहक मंडळी स्वतःला मजबूत करत आहेत, नवनवीन माध्यमांचा उपयोग करून स्वयंपूर्ण होत आहेत. यावेळी नाहीतर पुढच्या खेपेला आपल्या लाडक्या पर्वतात जाऊ, असा आत्मविश्‍वास गिर्यारोहकांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. खरे तर गिर्यारोहकांसाठी लॉकडाउनचा अनुभव काही अगदीच नवीन नाही. एव्हरेस्ट, कांचनजुंगा किंवा इतर कोणत्याही अतिउंच शिखर मोहिमांदरम्यान काही हजार मीटर उंचीवर तंबूंमध्ये बसून रात्र काढावी लागते, काही तास बर्फ वितळवून एखादे लीटर पाणी पिण्यासाठी तयार करावे लागते, आहे तो शिधा खावा लागतो, बेभरवशी वातावरणात तंबू बाहेर पसरलेली पांढरी हिमाची चादर, घोंघावणारा वारा जेव्हा साथीला असतो व टीव्ही, मोबाइल, इंटरनेट इत्यादी काहीही सोबतीला नसते. सतत एकाकी वाटेल असे वातावरण असते. अशा परिस्थितीतदेखील गिर्यारोहक हे मनाने अत्यंत कणखर राहतात व शिखरमाथा गाठण्याचे स्वप्न पूर्ण करतात. अतिउंचीवरील अघोषित लॉकडाउनच्या परिस्थितीपेक्षा सध्याचा लॉकडाउन हा तसा बरा असल्याने गिर्यारोहक अत्यंत सकारात्मकपणे लॉकडाउनकडे बघत आहेत. कधीही गंभीर परिस्थिती उद्‍भवली आणि तुम्ही ‘आत्मनिर्भर’ असाल, तर तुम्ही त्या परिस्थितीवर नक्कीच मात करू शकता, हे गिर्यारोहक जाणतातच. नुकतेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेच ‘आत्मनिर्भर’ होण्याचा सल्ला दिला आहे. गिर्यारोहक हे आधीपासूनच ‘आत्मनिर्भर’ असतात, म्हणूनच ते कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करू शकतात. याच कारणाने गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वच जण अगदी संयमाने व धीरोदात्तपणे लॉकडाउनला सामोरे गेले. या दिवसांमध्ये मानसिक अथवा शारीरिक तणावाला सामोरे जावा लागणारा गिर्यारोहक मी तरी पाहिला नाही. कारण सर्वांनी गिर्यारोहण ही जीवनशैली म्हणून आत्मसात केली होती.

एकीकडे गिर्यारोहक हा लॉकडाउनच्या परिस्थितीतदेखील अगदी संयमाने उभा आहे. मात्र गिर्यारोहण मोहिमा, ट्रेकिंग, भटकंती इत्यादींवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था मात्र कोलमडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या क्षेत्रांमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते. नेपाळसारखा देश तर गिर्यारोहण मोहिमा व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारलेला आहे. हे सर्वच बंद झाल्याने अनेकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रातदेखील जाणवतो आहे. गेल्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये साहसी खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक जण ट्रेकिंग, भटकंती करू लागले, यातून ॲडव्हेंचर टुरिझम हा नवीन व्यवसाय बहरला. ट्रेकिंगला घेऊन जाणाऱ्या संस्थांपासून ते गडकोट किल्ल्यांच्या पायथ्याला अथवा वाटेवर असलेल्या गावांमधील स्थानिक गावकऱ्यांनी निवास-भोजनाच्या केलेल्या व्यवस्थांपर्यंत सर्व काही बहरले, वाढीस लागले. मात्र कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व काही ओस पडले. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत होणारी ट्रेकिंग, भटकंती, प्रस्तरारोहण याबरोबरच रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग इत्यादीसारखे साहसी खेळदेखील थांबले. त्यामुळे या सर्वांवर अवलंबून असणारे व्यवसाय अक्षरशः खिळखिळे होत असल्याचे आपण बघतो आहे. येणाऱ्या काळामध्ये हे कधी पूर्वरत होतील याची काहीही कल्पना नाही. त्यात येणारा पावसाळादेखील महाराष्ट्रातील भटकंतीचा पर्वकाळ आहे. अशा वेळी मात्र आपल्या सर्वांना भटकंती करता येणार नाही किंवा कदाचित शासनाकडून परवानगी मिळाली तरी अतिशय काटेकोर नियमावलीत भटकंती, ट्रेकिंग, साहसी खेळ अथवा गिर्यारोहण करावे लागेल. ट्रेकर किंवा भटकंतीची आवड असलेला व्यक्ती हा घरामध्ये स्थिरावू शकत नाही. त्याला आस असते ती निसर्गाची, डोंगरदऱ्यांची, कातळकड्यांची. त्यामुळे आपल्यापैकी अनेक जण असे असतील, जे लॉकडाउन संपताच अथवा काही नियम शिथिल होताच आपल्या आवडत्या निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी तुटून पडतील. मात्र असे करणे हे निसर्गासाठी, तसेच गिर्यारोहण क्षेत्रासाठी बाधक असेल, असे माझे मत आहे. गेले काही महिने घरात राहिल्याने अतिशय मोठ्या संख्येने हौशी पर्यटक, ट्रेकर्स हे सह्याद्रीच्या डोंगररांगांत, गडकोटकिल्ल्यांवर गर्दी करतील, असा कयास आहे. हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी अतिशय जबाबदारीने वागणे, हे पहिले व सर्वांत महत्त्वाचे पाऊल असेल, असे मला वाटते. जर गर्दी केली अथवा प्रशासनावर ताण आला, तर निसर्गातील भटकंतीच सरकारच्या आदेशाने बंद होईल, अशी भीती आहे. याचा प्रत्यय आपण गेल्या दोन वर्षांत देवकुंड धबधबा तसेच अंधारबन ट्रेकिंगच्यावेळी घेतला आहे. प्रचंड गर्दी व काही दुर्दैवी अपघात घडल्याने या ठिकाणांवर शासनाने सरसकट बंदी घातली होती. अशी सरसकट बंदी टाळायची असेल, तर प्रशासनावर ताण न येऊ देता आपण वैयक्तिक जबाबदारी म्हणून सर्वांनी अतिशय संयतपणे वागले पाहिजे. सर्व जबाबदारी शासनावर सोडूनदेखील चालणार नाही. गिर्यारोहक, ट्रेकर्स नव्हे तर निसर्गप्रेमी, सह्याद्रीप्रेमी यांनी एकत्र येऊन अत्यंत गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. लॉकडाउन किंवा कोरोनानंतर ट्रेकिंग-गिर्यारोहण सुरक्षितपणे व सुरळीतपणे कसे करता येईल, यावर विचारविनिमय करणे गरजेचे आहे. ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ’ या शासनमान्य राज्यस्तरीय गिर्यारोहण शिखर संस्थेच्यावतीने लॉकडाउननंतर ट्रेकिंग, भटकंती, गिर्यारोहण कसे असावे, त्यासाठी कशी यंत्रणा उभी करावी, यंत्रणा उभी करण्यात व ती राबवण्यात महासंघ कशाप्रकारे मदत करू शकेल, याविषयी विविध तज्ज्ञांचे, अनुभवी मंडळींचे, तरुण ट्रेकर्सचे विचार एकत्र करून शासनाकडे पाठविण्यासंबंधी काम सुरू आहे. याविषयी शासन योग्य तो निर्णय घेईलच. मात्र तोपर्यंत आपण जबाबदारीने वागणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

लॉकडाउननंतर गिर्यारोहण करताना ट्रेकर, गिर्यारोहक म्हणून आपली काय जबाबदारी असली पाहिजे असा जेव्हा प्रश्‍न पडतो, तेव्हा मला असे वाटते, सोशल डिस्टन्सिंग, हायजिन व सॅनिटायझेशन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब ट्रेकिंग, भटकंती करताना करावा व योग्य ती काळजी घ्यावी. कोणत्याही ट्रेकवर जाताना तिथे आपण गर्दी तर करत नाहीत ना, याची माहिती घ्यावी. ज्या ठिकाणी ट्रेकिंगला जाणार आहोत, तेथील स्थानिक प्रशासनाला आपल्या ट्रेकविषयी माहिती द्यावी, तसेच ट्रेकिंगला जाण्यासाठी काही परवानगी काढावी लागते का याची चौकशी घरी असतानाच करावी. यासाठी आवश्यक यंत्रणा लवकरच उभी केली जाईल. मात्र, आपण स्वतःहून आवर्जून सर्व माहिती व चौकशी केल्याशिवाय कोणत्याही भटकंती-ट्रेकिंगला जाऊ नये. ज्या गडकोटकिल्ल्यावर जात आहोत, त्याच्या पायथ्याला असलेल्या गावातून जाताना, तिथे मुक्काम करताना, स्थानिक लोकांची काही कारणास्तव मदत घेताना सोशल डिस्टन्सिंग तसेच हायजिन अर्थात स्वच्छता पाळतो आहोत ना, याची खातरजमा करून घेणे हे आपले काम आहे. गावाजवळ, वस्तीजवळ मुक्काम करताना काही अंतरावर टेंट लावणे, आपल्या खाण्यापिण्याची, पाण्याची सोय घरूनच करून जाणे, बरोबर मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्ह्जचा वापर करणे हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. ट्रेकिंगची बॅग भरताना ही सर्व साधने आपल्या बरोबर असलीच पाहिजेत. लॉकडाउन जरी संपले तरी कोरोनाचा धोका मात्र जोपर्यंत या आजारावर लस अथवा औषध येत नाही तोपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे अनावधानाने किंवा लक्षणे दिसत नसलेल्या अवस्थेत कोविड-१९ हा आजार आपण आपल्या भटकंती-ट्रेकिंग करताना गावखेड्यांमध्ये घेऊन गेलो, तर त्याची लागण इतरांना होऊन धोका अधिकच वाढू शकतो. तसेच दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सुविधा सहज व तातडीने पोचत नसल्याचा परिणामदेखील तेथील स्थानिक ग्रामस्थांवर होऊ शकतो. याचादेखील विचार आपल्या सर्वांना अतिशय काटेकोरपणे करावा लागणार आहे.

लॉकडाउनच्या काळात आपण अनेक बदल अनुभवले. मानवाचा लॉकडाउन तर निसर्गासाठी, पशुपक्ष्यांसाठी अक्षरशः वरदान ठरलेला आहे. शेकडो कोटी रुपये खर्चून शुद्धीकरण करावी लागणारी गंगा नदी या अवघ्या दोन महिन्यांच्या काळात अनेक ठिकाणी एकही दमडी खर्च न करता शुद्ध झालेली, अगदी वाहत्या पाण्यात हात घालून पाणी पिता येण्याजोगी स्वच्छ झाली आहे. जगभरातील समुद्र किनाऱ्यांनी स्वतःचे रूप इतके पालटले आहे, की छायाचित्रांमध्ये बघताना कधीकाळी येथे लोकांची गर्दी व कचऱ्याचा ढीग उभा दिसायचा, यावर विश्‍वास बसत नाहीये. मुंबईपासून समुद्रामध्ये काही किलोमीटर आत व्हेल माशांचे झालेले दर्शन, पंजाबमध्ये २५० किमीहून दिसणारी हिमालयाची पर्वतरांग, काठमांडूतून होणारे एव्हरेस्टचे दर्शन, रस्त्यांवर बागडणारे मोर, स्वच्छंद विहार करणारे पाशीक पक्षी या सर्व गोष्टींतून असेच निदर्शनास येते, की या अवघ्या दोन महिन्यांच्या मानवाच्या लॉकडाउनमुळे निसर्गाला मोकळा श्‍वास घेता येतोय, निसर्ग स्वतःला यातून ‘रिव्हाइव्ह’ करतोय. यातूनच आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित होते, ती म्हणजे मानवाने लावलेली निसर्गाची वाट. वाट दिसेल तिथे फिरायला जा आणि जागा दिसेल तिथे कचरा टाक, या मानवाच्या घाणेरड्या प्रवृत्तीने निसर्गाचा गळा घोटला जात होता. या लॉकडाउनमुळे जगभरातील अनेक ठिकाणांचा जीव वाचला आहे, असेच मी म्हणेल. पण कुठेतरी हे लॉकडाउन संपेल आणि मनुष्य प्राणी पुन्हा बेजबाबदारपणे वागला, त्याने पुन्हा अशा ठिकाणांना हानी पोचवली, तर आपल्याकडे असणारा अमूल्य ठेवा नष्ट होईल, ही भीती सतत मनामध्ये असते. मग यावर उपाय काय? लॉकडाउन तर वाढवता येणार नाही, तसेच लोकांवर निर्बंध घालणे हाही सोईस्कर पर्याय नाही. मग काय करावे, असा विचार जेव्हा माझ्या मनात आला, तेव्हा काही काळासाठी महाराष्ट्रातील काही मोजकी ठिकाणे दोन वर्षांसाठी सर्वांसाठीच बंद ठेवावी, हा उपाय मला योग्य वाटला. आता दोन वर्षे बंद म्हणजे नेमके काय, त्याने काय होणार असे प्रश्‍न पडणे साहजिक आहे. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे गर्दीमुळे, लोकांच्या बेजबाबदार वागण्याने त्या ठिकाणांची अपरिमित हानी झाली आहे. उदाहरणादाखल कास पठार किंवा रायरेश्‍वर पठार. सातारा जिल्ह्यातील ही ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील नंदनवनेच. इतकी सुंदर फुले इतर कुठे शोधून सापडणार नाहीत. पण या जागांचे व्यावसायीकरण झाले आणि येथील परिस्थिती बदलली. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आता गाडी कुंपणात कैद केलेला निसर्ग बघावा लागतो. इथे दोन वर्षे जरी मानवाला, पर्यटनाला बंदी केली तरी येथील निसर्ग पुन्हा तेवढ्याच सुंदरतेने बहरेल. गुराढोरांना घातलेली बंदी उठली, तर निसर्गचक्र पुन्हा जागृत होईल व ज्यासाठी ही पठारे ओळखली जातात, ती पुन्हा एकदा खुलतील व दोन वर्षांच्या बंदीनंतर टप्प्याटप्प्याने सर्वांसाठी खुली करता येतील. जशी गत कास पठारांची आहे, तीच अवस्था आहे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची. काही किल्ल्यांवर तर नेहमी इतकी गर्दी असते, की जसे एखादे गावच इथे कायमस्वरूपी वसलेले आहे. खरे तर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धंनासाठी हजारो करोड रुपये अगदी पाण्यासारखे खर्च होतात, मात्र त्याचा परिणाम तितकासा दिसून येत नाही. यातील काही किल्ल्यांवर दोन वर्षे मानवी पर्यटनास बंदी घालून, संवर्धनाचे काम केल्यास, तसेच या किल्ल्यांना स्वतःहून नैसर्गिक पद्धतीने सुदृढ होण्यास वेळ दिल्यास जे बदल घडतील, ते नक्कीच सुखावणारे असतील.

अशी सरसकट दोन वर्षे बंदी घालणे कितपत योग्य आहे, याचे परिणाम काय होतील, याआधी असे कुणी केले आहे का, केले असेल तर त्याचे काय परिणाम झाले, असे एक ना अनेक प्रश्‍न अनेकांना पडतील. मात्र, मी माझ्या अनुभवातून, अभ्यासातून एक मात्र निश्‍चित सांगू शकतो, हा दोन वर्षांचा लॉकडाउन या निवडक ठिकाणांसाठी नवसंजीवनी ठरेल. याआधी हिमाचल प्रदेशहून लडाखला जोडणाऱ्या खारदुंगला या १७,५०० फूट उंचीवर वसलेल्या पासमधून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने, प्रदूषण वाढल्याने या पासमधून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना परवाना देऊन वाहतूक नियंत्रित करण्यात आली, तर काही काळ हा पास बंददेखील करण्यात आला. यातून निसर्गाची होणारी हानी थांबली. त्याचबरोबर उत्तराखंड राज्यातील नंदादेवी राष्ट्रीय उद्यान हेदेखील तब्बल २५ वर्षांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद होते. यामुळे येथील निसर्ग अतिशय सुंदरतेने फुलला, हे आपण पाहिले आहे. यांमुळे काही काळापुरता मानवाचा वावर जर थांबवला, तर त्याचा होणारा परिणाम दूरगामी असेल, याची मला शाश्‍वती आहे.

महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग करावयाचा असल्यास कोणती ठिकाणे निवडणार, त्याचा ॲक्शन प्लॅन काय असणार, यातून उद्दिष्टे काय साध्य करणार हे सर्व आपण चर्चेअंती ठरवू शकतो. यासाठी नागरिक म्हणून, जबाबदार पर्यटक म्हणून शासनाशी सतत संपर्क ठेवणे गरजेचे आहे, संस्थात्मक पातळीवरदेखील आम्ही पर्यटन व पर्यावरण मंत्र्यांशी, राज्य शासनाशी समन्वय ठेवून आहोतच. मात्र, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, नव्हे तर कर्तव्य आहे असे मला वाटते. काही महत्त्वाच्या ठिकाणांना दोन वर्षे ‘ब्रेक’ दिला म्हणून दुसरीकडे गर्दी करावी, असे मुळीच नाही. लॉकडाउन जरी संपला अन् भटकंती सुरू झाली तरी लॉकडाउनचे काही नियम आपल्याला नेहमीसाठी पाळायचे आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगले उपाय शोधले व त्यांचे पालन केले, तर आपला निसर्ग पुन्हा एकदा बहरेल व निसर्गातील आनंददायी वातावरणाची अनुभूती घेता येईल. या कोरोना विषाणूबरोबर आपल्याला जगायचे आहे. ट्रेकिंग-भटकंती-गिर्यारोहणदेखील आपल्या जीवनाचा भाग आहे, नव्हे जीवनशैलीच आहे. ही जीवनशैली आत्मसात करत जगायचे असेल, तर कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक खबरदारीचे उपाय आपल्याला लॉकडाउन असो किंवा नसो, नेहमीच्या जीवनात रुजवायचे आहेत. असे केल्यास आपण पुन्हा एकदा निसर्गात भटकंती करून आनंदाची अनुभूती घेऊ शकू, असा विश्‍वास मला वाटतो.

संबंधित बातम्या