विकासाचे आव्हान

प्रकाश पवार
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

कव्हर स्टोरी
 

दिल्लीची निवडणूक आम आदमी पक्षाने तिसऱ्या वेळी जिंकली. तीनपैकी एक वेळ भाजप व काँग्रेसचा आणि दोनवेळा थेट भाजपचा आम आदमी पक्षाने पराभव केला. ही राजकीय घडामोड लक्ष वेधून घेणारी तर आहेच; शिवाय नवीन पक्षांना ताकद देणारी ठरली आहे. या निवडणुकीने नवीन राजकारणाचा आशावाद पल्लवित केला. राष्ट्रीय पक्षांची ताकद कमी पडते, असे चित्र उभे राहिले. राष्ट्रीय पक्षांना नवीन पर्याय म्हणून चर्चा सुरू झाली. याशिवाय ही निवडणूक वैचारिक संघर्षाचा एक महत्त्वाचा लढा होता. म्हणून तिचे महत्त्व सारासार विवेकासाठी अन्यन्यसाधारण होते. या अर्थाने ही निवडणूक इतर निवडणुकांसारखी नव्हती. मुख्य मुद्दा विकास जिंकला आहे का? कारण मतदार वर्ग दुभंगलेला आहे. म्हणून मतदार आणि पक्ष यांच्या संबंधांची चिकित्सकपणे चर्चा येथे केली आहे. 

नवीन प्रारूपाची पुनर्रचना 
 आम आदमी पक्षाने विकासाचे नवीन प्रारूप मांडले. गेल्या निवडणुकीत ते प्रारूप पुढे आले. तेव्हा ते प्रारूप जिंकले होते. गेल्या पाच वर्षांत विकास प्रारूपामधील काही भाग यशस्वी झाला. परंतु, त्याबरोबरच काही भाग नव्याने सामील केला गेला. नव्याने जो भाग सामील झाला. तो भाग राजकीय तडजोडीचा होता. त्यामुळे शुद्ध नवीन राजकीय पर्याय हा मुद्दा धूसर झाला. त्याऐवजी समझोता, तडजोड, जुळवाजुळवी असे धोरण स्वीकारले गेले. म्हणून प्रमुख माध्यमामध्ये सौम्य हिंदुत्वाची चर्चा झाली. अर्थात आम आदमी पक्षाचा विरोधक भक्कम असल्यामुळे त्यांना फेरबदल करावा लागला. परंतु, या बदलामुळे पक्षाचे शुद्ध नवीन पर्याय देण्याचे उद्दिष्ट अंधूक झाले. यामुळे निवडणुकीच्या नंतर या पक्षाला त्याच्या जुन्या प्रारूपाची नव्याने डागडुजी करावी लागणार आहे. निवडणूक निकालाने पक्षाला ही संधी दिली आहे. कारण पुन्हा जवळपास ९० टक्के जागा निवडून दिल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या पुढे बहुमताचा प्रश्‍न नाही. प्रशांत किशोर यांचे राजकारण ही एका अर्थाने डावपेचात्मक घडामोड आहे. डावपेचापेक्षा राजकारण वेगळे असते. त्या राजकारणाचा पोत संघर्षशील असतो. परिवर्तनाच्या राजकारणात संघर्ष हा केवळ अटळ नव्हे, तर निरंतर होत राहतो. वैचारिक संघर्ष हा त्यामधील महत्त्वाचा भाग आहे. दिल्लीचा मतदार हा विकास प्रारूप, निवडणुकांचे डावपेचात्मक प्रारूप आणि नरेंद्र मोदी-शहांच्या राजकारणाचे प्रारूप अशा तीन वैचारिक द्वंद्वामध्ये अडकला आहे. यावर आम आदमी पक्षाने नव्याने काम करण्याची गरज आहे. त्यासाठीचा अर्थविस्तार करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. कारण दिल्ली म्हणजे भारताचे लघुरूप असे गृहीत धरले जाते. त्यामुळे दिल्लीच्या मतदारांमध्ये दुहेरी निष्ठा यांचा अर्थ संपूर्ण भारतातील मतदारांमध्ये दुहेरी निष्ठा आहे. यामुळे आम आदमी पक्षापुढे निवडणुकोत्तर काळात त्यांच्या विकास प्रारूपाची पुनर्रचना करण्याची गरज आहे, असे दिल्ली विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तुलनेवरून निष्कर्ष काढण्यास पुरेसा अवकाश मिळतो. भाजपविरोधी मतदारांचे ऐक्य या मुद्यालाही यामुळे मर्यादा दिसते. कारण मतदार शुद्धपणे भाजपविरोधी नाहीत. यामुळे भाजपविरोधवाद हा विचार नीटनेटका उभा राहू शकत नाही. यावरदेखील या निकालाने शिक्का मारला आहे. भाजपविरोधवाद घडविण्यासाठी इश्यू निश्‍चित करून समान इश्यूवर ऐक्य घडवले गेले नाही. 

राष्ट्रीय-प्रादेशिक अंतराय  
 राष्ट्रीयविरोधी प्रादेशिक अशा राजकारणाच्या चौकटी आहेत. भाजपने त्यांची राष्ट्रीय चौकट निश्‍चित केली आहे. त्या चौकटीच्या विरोधी दिल्लीचा निकाल गेला. कारण दिल्लीची निवडणूक राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती. तशीच प्रादेशिक पक्षांच्या दृष्टीनेही महत्त्वाची होती. भाजपला ७० पैकी केवळ आठ जागा जिंकता आल्या. भाजपच्या पाच जागा वाढल्या आणि आपच्या पाच जागा कमी झाल्या. भाजपची मतांची टक्केवारी आम आदमी पक्षाच्या तुलनेत फारच कमी आहे. भाजपला ३८.५१ टक्के मते मिळाली. जवळपास १५ टक्के मतांचे अंतर भाजप आणि आपमध्ये राहिले. आपला ६२ जागा आणि त्याबरोबरच ५० टक्क्यांपेक्षा जास्त मत मिळाली (५३.५७ टक्के). राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला दिल्लीमध्ये राजकीय अवकाश मिळाला नाही. भाजपच्या नंतर काँग्रेस पक्षाची अवस्था तर फार वाईट झाली. कारण पक्षाला एकही जागा मिळाली नाही. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाला केवळ ४.२६ टक्के मत मिळाली. भारतीय राजकारणातील राष्ट्रीय पक्षांची ही दिल्लीमधील दुय्यम अवस्था दिसते. यामुळे राजकीयदृष्ट्या राष्ट्रीय कोण असा नवीन प्रश्‍न उभा राहतो. राष्ट्रीय पक्षाचे धोरण, डावपेच, उद्देश स्थानिक राज्यांसाठी उपयोगाचे नाही, असा या निकालाचा अर्थ घेतला जातोय. यामुळे राष्ट्रीय राजकारणविरोधी राज्यांचे राजकारण असा अंतराय उभा केला जात आहे. हा अंतराय राष्ट्रीय चौकटीमध्ये भाजप योग्य पक्ष आहे, अशी त्या पक्षाला मान्यता देतो. परंतु, राज्याच्या संदर्भात तो पक्ष अमान्य केला जातोय, असे राजकारणाचे एक बाळबोध सूत्र पुढे येते. या सूत्रानुसार राष्ट्रीय म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय इतर पक्ष नाहीत. अशी मांडणी होते. ही मांडणी बाळबोध आहे. लोकसभा निवडणुकीत आपला केवळ १८ टक्के मते मिळाली होती. आपच्या मतांमध्ये जवळपास तीन पट वाढ झाली. राष्ट्रीय पक्षाचे सदस्यत्वाचे दावे मोठे होते. भाजपने ६२.२८ लाख सदस्यांचा दावा केला होता. त्यांना सदस्यसंख्येच्या निम्मी मते मिळाली (३५.६६ लाख). अशीच अवस्था काँग्रेस पक्षाची. त्यांचे दिल्लीत सात लाख सदस्य आहेत. परंतु, त्यांना ३.९५ लाख मते मिळाली. अर्थातच भाजप आणि काँग्रेस या पक्षाचे सदस्यत्वाचे दावे खरे मानले, तर या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या निम्या-निम्या सदस्यांनी त्यांचा पक्षाला नाकारले, असे दिसते. यामुळे प्रादेशिक प्रश्‍न राष्ट्रीय आहेत, की नाहीत असा प्रश्‍न उपस्थित होतो. प्रादेशिक प्रश्‍न राष्ट्रीय आहेत, याचे आत्मभान पक्षांचे कमी कमी होते. हा कळीचा मुद्दा आहे. परंतु, प्रादेशिक पातळीवर या निवडणुकीचे परिणाम दिसू लागले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विशेष परिणाम करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. अहंकार, धार्मिक प्रचार, राष्ट्रीय आपत्तीवरील विजय ‘आप’चा आहे, असे शरद पवारांचे मत आहे. तर मन की बात नव्हे तर जन की बात अशी व्यक्तीपूजाविरोधी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी नोंदवली. यामुळे एकूण प्रादेशिक पक्षांना ताकद मिळू लागली असे दिसते, अशी चर्चा लोकप्रिय झाली आहे. ही चर्चा भाजपविरोधात जात नाही. कारण केवळ प्रादेशिक पक्षाची एकी म्हणजे भाजपचा पराभव असा अर्थ होत नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. ही एक क्रांतिकारी घडामोड शरद पवारांनी घडवली आहे. या प्रयोगाचे महत्त्व आहे. परंतु, त्याबरोबर भाजप समर्थक वर्ग वाढला आहे. तो वर्ग नरेंद्र मोदी-अमित शहा समर्थक आहे. यामुळे केवळ सत्तांतरावर लक्ष केंद्रित केले, तर हा अंतराय सत्ताकेंद्री ठरतो. अशीच अवस्था दिल्लीमधील आहे. कारण तेथे राष्ट्रीय राजकारण म्हणून नरेंद्र मोदी-अमित शहा समर्थक वर्ग आहे. म्हणून राजकारणाचा अर्थ निवडणूक निकालकेंद्री मांडण्यामध्ये अडचण उभी राहते. निवडणूक निकाल आणि मतदार यांच्या संबंधांची चिकित्सक चर्चा केली पाहिजे. त्यावर आधारीत मतदार वर्गाचे चारित्र्य बदलणे हे पक्षांचे उद्दिष्ट जास्तच गुंतागुंतीचे व जटिल आहे. या आघाडीवर पोकळी निर्माण झाली आहे. या पोकळीत मोदी-शहांचा भाजप वाढतो. त्याला आधार मिळतो. म्हणून भाजप मोदी-शहांचा विचार हा निवडणूक निकालापेक्षा वेगळा मुद्दा शिल्लक राहतो. या मुद्यावर हा निकाल लक्ष केंद्रित करतो, असे दिसते.  

वैचारिक अंतरायला मर्यादा
 राष्ट्रीय व प्रादेशिक अंतरायला मर्यादा आहेत. याशिवाय वैचारिक अंतरायला मर्यादा आहे. भारतीय राजकारणाचे एक छोटे स्वरूप दिल्ली आहे. तेथे वैचारिक पातळीवर संघर्ष झाला. या अर्थाने वैचारिक राजकारण घडले, असे कल्पिले जाते. त्या संघर्षात अंतिम आम आदमी पक्ष जिंकला. कल्पित राष्ट्रवाद आणि सामाजिक न्याय या दोन्ही प्रकारच्या वैचारिक सत्तासंघर्षाला मर्यादा आहे. भाजपचा प्रचार राष्ट्रवाद, भारत-पाक, हिंदू-मुस्लिम या मुद्यांवर केंद्रित झाला होता. हा एका अर्थाने कल्पित राष्ट्रवाद आहे. यापुढे आम आदमी पक्षाचा कोणता राष्ट्रवाद हा प्रश्‍न उभा राहिला. या संदर्भात ‘आप’ने धार्मिक राष्ट्रवादाचा अंतराय उभा राहू दिला नाही. त्यांनी धार्मिक राष्ट्रवादाचा अंतराय रोखला. राष्ट्रद्रोही मुद्यावर मी वृद्धांना तीर्थयात्रा घडवतो, मुस्लिम हितचिंतक प्रश्‍नावर ‘आप’ने हनुमान चालिसा गायली. पाकच्या मंत्र्याने भाजपला हरवण्याचे ट्विट केले, तेव्हा हस्तक्षेप नामंजूर, मोदी माझेही पंतप्रधान आहेत अशी चर्चा घडवली. विशेष म्हणजे मोदीविरोधी केजरीवाल असा अंतराय उभा राहू दिला नाही. या उलट मोदी-शहांनी ४९ सभांमध्ये धार्मिक व नेतृत्वाचा अंतराय उभा करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निकालानंतर वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा केजरीवालांनी दिल्या. त्यानंतर ते हनुमान मंदिरात गेले. याचे दोन महत्त्वाचे अर्थ आहेत. एक, अंतरायापेक्षा समन्वय या गोष्टीला ‘आप’ने स्वीकारले. त्यांनी सामाजिक सलोखा हा कळीचा समझोता निवडणूक क्षेत्रात घडवला. दोन, आपने हिंदू अस्मिता स्पष्टपणे व्यक्त केली. हिंदू अस्मिता त्यांनी बहुल पद्धतीची व्यक्त केली. त्यामुळे मोदी-शहांची हिंदुत्व अस्मिता आणि हिंदू अस्मिता यांपैकी हिंदू अस्मितेकडे झुकता कल राहिला. ‘आप’च्या हिंदू अस्मितेला मुख्य मीडियाने सौम्य हिंदुत्व असे संबोधिले आहे. त्यांचे सौम्य हिंदुत्वाचे विश्‍लेषण राजकीय अपुऱ्या ज्ञानाचा एक भाग दिसतो. भारत-पाक व हिंदू-मुस्लिम या दोन प्रश्‍नांपेक्षा आपची हिंदूची संकल्पना वेगळी ठरते. भारत-पाक व हिंदू-मुस्लिम हे मुद्दे केवळ धार्मिक नाहीत. त्यांनी धर्माची सीमारेषा ओलांडली आहे. या दोन्ही मुद्यांमध्ये कृत्रिमपणा जास्त आहे. तसेच साटेलोटे पद्धत जास्त आहे. त्यातुलनेत आम आदमी पक्षाची हिंदू संकल्पना धार्मिक सहिष्णू आणि वांशिक-जातीय सहिष्णू अशा दोन वैशिष्ट्यांची मिळून तयार होते. हा वैचारिक संघर्ष तरीही भौतिक प्रश्‍नांशी संबंधित नाही. त्यामुळे हा संघर्ष सरतेशेवटी अस्मितांच्या साच्यामध्ये घडतो. याचा अर्थ तळागाळाशी विसंगत राहतो. ही वैचारिक साच्याला मर्यादा दिसते. 

निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात वैचारिक चौकटीचा दुसरा मुद्दा सामाजिक न्याय हा मांडला जातो. त्यांची चर्चा गंभीरपणे केली जाते. उदा. आम आदमी पक्षाची वैचारिक भूमिका त्यांच्या पाच वर्षांतील कामगिरीमधून घडवली गेली. तसेच भाजपची वैचारिक भूमिका त्यांच्या कामगिरीतून घडवली होती. आम आदमी पक्षाने शाळा, रस्ते, वीज अशी विकासोन्मुख भूमिका घेतली होती. हे आम आदमी पक्षाचे खास वैचारिक वैशिष्ट्य होते. याबरोबर निवडणूक काळात त्यांनी नेतृत्वापेक्षा विकास हा विचार मध्यवर्ती ठेवला. आम आदमी पक्षाने धार्मिक अंतराय हा मुद्दा बाजूला ठेवला. यामुळे ही सर्व राजकीय प्रक्रिया सामाजिक न्यायाच्या चौकटीत आम आदमी पक्षाने घडवून आणली. असा युक्तिवाद केला जातो. यामध्ये तथ्य आहे. त्यामुळे सौम्य हिंदुत्व अशी आम आदमीची विचारसरणी ठरत नाही. फार तर तो आपद्धर्म ठरतो. परंतु, तोही मुद्दा किरकोळ ठरतो. यापेक्षा वेगळा मुद्दा म्हणजे आम आदमी पक्ष आणि मतदार यांच्यातील संबंध हे सारासार विवेक या पद्धतीचे निवडणूक निकालामुळे दिसून आले. मतदार आणि राजकीय पक्ष यांचे संबंध साटेलोटे पद्धतीचे असतात. ही मतदारांची पोलादी प्रतिमा झाली होती. अशा प्रतिमेचा साचा या निवडणूक निकालात दिसत नाही. परंतु, तरीही प्रश्‍न शिल्लक राहतो की लोकसभेसाठी मोदींचे नेतृत्व आणि विधानसभेसाठी केजरीवालांचे नेतृत्व हा नेतृत्वकेंद्री विचार होता. या दोन्ही नेतृत्वामध्ये फरक आहे. केजरीवाल विकासाधारित आणि मोदी हिंदुत्वाधारित राजकारण घडवत आहेत. अशा दोन भिन्न टोकांच्या राजकारणाचे समर्थन दिल्लीमध्ये केले गेले (लोकसभा-दिल्ली विधानसभा). त्यामुळे एकवेळ सारासार विवेक आणि दुसच्यावेळी हिंदुत्व असे मतदारांचे दुहेरी स्वरूप दिसते. मतदारांची अशी दुहेरी जीवनपद्धती लोकशाहीविरोधी ठरते. त्यामुळे अशा प्रकारच्या मतदारांच्या वर्तनाला नैतिक व लोकशाही समर्थक असे कितपत म्हणता येईल, हा प्रश्‍न उपस्थित होतो. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, झारखंड अशा राज्यांत सत्तांतरे झाली. तरीही मतदार वर्गाचे राजकीय चारित्र्य दुभंगलेले दिसते. नैतिकता ही गोष्ट निवडणूक राजकारणात फार नसते. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, आक्रमक राष्ट्रवाद आणि प्रदेशवाद या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी जशा आहेत, तशाच त्या रचनात्मक राष्ट्रवादाच्याविरोधी जाणाऱ्या आहेत. यामुळे मतदार वर्गाच्या संदर्भात नैतिकतेचा मुद्दा शिल्लक राहतो. यामुळे ही निवडणूक भाजपचा पराभव म्हणून जास्त महत्त्वाची आहे. त्यापेक्षा मतदारांचे नैतिक-राजकीय चारित्र्य आक्रमक राष्ट्रवाद-विकासवाद अशा चौकटीमध्ये मुक्त संचार करते असे दिसते, म्हणून जास्त चिंताजनक आहे. मतदार राजा अशी त्यांची प्रतिमा असली, तरी मतदार राजाची मुक्ती ढोंगीपणा आणि बेबनाव या गोष्टींपासून होत नाही. या अर्थाने मतदार राजा एका नवीन साटेलोटे चळवळीत अडकला आहे. साटेलोटे चळवळीचा तो कार्यकर्ता व नेता झाला आहे. अशा चळवळीपासून त्याने फारकत घेतली, तरच तो पर्यायी राजकारणाचा विचार करतो, असे म्हणता येईल. या क्षेत्रात राजकीय पक्ष फार काम करत नाहीत. निवडणुकीतील यश-अपयशाच्या आधारे मतदार राजा सारासार विचार करणारा किंवा अविवेकी ठरवला जातो. या दोन्ही पद्धती मतदार राजाचे गौरवीकरण आणि विकृतीकरण करणाऱ्या आहेत. तरीही आम आदमी पक्षाने विकास करणारा कार्यकर्ता घडवला. तसेच त्यांनी विकासाचे एक प्रारूप विकसित केले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी वर्ग सकारात्मक भाष्य करतो. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या निवडणुकीय राजकारणाला मर्यादा राहूनदेखील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर एक आशावाद निर्माण झाला. परंतु, मतदारांची दशदिशा वेगवेगळी आहे.    

संबंधित बातम्या