धुमसणारे शाहीनबाग 

प्रकाश पवार
सोमवार, 9 मार्च 2020

कव्हर स्टोरी
 

शाहीनबाग हा नवीन संदर्भ आहे. परंतु हा प्रश्‍न जुना आहे. कारण वसाहतवादी राज्यकर्त्यांनी भारताला 'फोडा व राज्य करा' हे धोरण सप्रेम भेट म्हणून दिले. भेटवस्तूवर जास्त प्रेम असते, तशी अवस्था आहे. यापेक्षा वेगळा मुद्दा म्हणजे यालाच पाश्चिमात्य राजकारण म्हणतात. एका बाजूने समकालीन युगातील भारतीय शाहीनबागेत पाश्‍चिमात्य राजकारण करत आहेत. अशा या पाश्‍चिमात्य राजकारणाला भारतीय स्वातंत्र चळवळीत नाकारले गेले होते. उदाहरण स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांचे सांगता येते. मुद्दा हा नाही की हा प्रश्‍न आहे. मुद्दा हा आहे की प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले गेले का? तसेच असे प्रश्‍न सावळा गोंधळ निर्माण करतात. मुद्दा हा आहे. सावळा गोंधळ नियंत्रणात ठेवता येतो. त्यावर नियंत्रण आणता येते. गंभीरपणे असा विचार किती झाला असा प्रश्‍न दिल्लीने स्वत:च स्वत:ला विचारला पाहिजे. शाहीनबागेत खरे तर भारतीय आणि पाश्‍चिमात्य अशा दोन सत्तेच्या संकल्पनांमध्ये तीव्र संघर्ष झाला. हा वरवरचा संघर्ष नाही. राजकारण कसे करावे? या दृष्टिकोनामधील संघर्ष आहे. या कारणामुळे शाहीनबागेच्या संदर्भातील घडामोडी जास्त लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. दिल्ली आणि चळवळी यांचे संबंध दररोजचे येतात. दररोजची आंदोलने, मोर्चे, उपोषणे या गोष्टी दिल्लीने लोकशाही चौकटीतील संघर्षशील राजकारण म्हणून स्वीकारलेल्या आहेत. ही दिल्लीच्या संघर्षशील राजकारणाची एक ओळख भारतीय म्हणून आहे. तसेच ती वसाहतवादी भेट तत्त्वाच्या विरोधातील आहे. अशा दिल्लीतील ईशान्य दिल्ली, उत्तर पूर्व दिल्ली किंवा शाहीनबाग भागात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधी आंदोलन झाले. ही चळवळीची संघर्षशील बाजू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथे दंगल झाली. या दंगलग्रस्त भागाला नायब राज्यपाल, अरविंद केजरीवाल, अजित डोवाल यांनी भेटी दिल्या. चाळीसपेक्षा जास्त लोक मरण पावले. जवळपास सव्वाशे लोकांवर गुन्हे दाखल झाले. तसेच साडेसहाशे लोक संशयित आहेत. राजकीय पक्षांचे आरोपप्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. यांचे परिणाम भारताच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले. महाराष्ट्रात याबद्दल पक्षीय मतभिन्नता दिसली. शिवाय बीड जिल्ह्यातील परळी येथे संविधान संरक्षण समितीने सामूहिक मुंडण केले व दंगलीचा निषेध केला. यामुळे साधेसोपे परंतु चिंतनशील प्रश्‍न उभे राहिले आहेत. एक, भारतीय राजकारण आणि पाश्चिमात्य राजकारणातील फरक विसरला गेला आहे का? लोकमताचा दबाव व राजकीय पक्ष यांची फारकत होत आहे का? दोन, पूर्ण नागरिकत्वाच्या संकल्पनेचा संकोच होत आहे का? तीन, शेरेबाजी हाच राजकारणाचा नवीन प्रवाह सुरू झाला आहे का? चार, हिंदू-मुस्लिम सलोखा घसरडा झाला आहे का? असे काही महत्त्वाचे प्रश्‍न उभे राहिले आहेत. या प्रश्‍नांच्या मदतीने चळवळ आणि दंगल या दोन्ही गोष्टींचे अर्थांकन नवीन पद्धतीने केले पाहिजे. ते कसे करावे? हा एक महत्त्वाचा यक्षप्रश्‍न दिल्लीतील चळवळ आणि दंगलीने उभा केला आहे. 

लोकमताचा दबाव     
 कधीही राजकारणाचा मध्यवर्ती आशय लोकमत असतो. हे सूत्र लोकमान्य टिळकांपासून भारतात स्वीकारले गेले. लोकमान्य टिळकांनी सरकारवर लोकमताचा दबाव असावा असा जोरदार आग्रह धरला होता. लोकमताच्या दबावाचे सूत्र पुढे महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीसाठी महत्त्वाचे सूत्र म्हणून पाळले. नागरिकत्वाच्या संदर्भात या सूत्राचा प्रयोग केला गेला. या अर्थाने ईशान्य दिल्लीमध्ये लोकमताचा दबाव वाढविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, लोकमताला प्रतिक्रिया दंगल या पद्धतीची आली. म्हणजे  लोकमतविरोधी दंगल असे भारतात द्वैत उभे राहिले आहे. ही शाहीनबागेतील घडामोड भारतीय राजकारणाच्या विरोधातील आहे. कारण लोकमताचा आदर केला गेला नाही. लोकमताचा आदर करणार की नाही? हा नवीन प्रश्‍न उभा राहिला आहे. लोकमताला प्रतिउत्तर चर्चा, संवाद, वाटाघाटी असे आहे. परंतु या गोष्टींच्याऐवजी लोकमताला प्रतिउत्तर दंगल, हिंसा, धाकदपाटशाही असे दिले गेले. त्यामुळे ईशान्य दिल्ली लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकमताच्या मार्गापासून वेगळी झाली. लोकमताचे बोट ईशान्य दिल्लीमध्ये सुटले. लोकमताचे बोट सुटते तेव्हा लोकशाही झुंडीमध्ये हरवते. यांचे आत्मभान इतिहासाच्या सामान्य ज्ञानामुळेही समजते. यासाठी विशेष ज्ञानाची गरज नाही. असे का झाले? यांचे कारण जनसमूहाला आपण कोण आहे? यांचे उत्तर मिळत नाही. राजकीय पक्ष जनसमूहाला विवेकी स्थान देऊन त्यांचे संघटन करत नाहीत. थोडक्यात जनसमूहाचे लोकशिक्षण थांबले आहे. लोकशिक्षणाच्या अभावामुळे दंगल, हिंसा, धाकदपाटशाही हे मुद्दे पुढे आले. ईशान्य दिल्लीच्या संदर्भात शेरेबाजी जास्त झाली. शेरेबाजीमध्ये धाकदपाटशाहीची भाषाशैली होती. लोकशाहीची भाषा शेरेबाजीने बाजूला ठेवली होती. शेरेबाजी म्हणजे राजकारण अशी संकल्पना येथे उदयास आली होती. शेरेबाजीचे राजकारण म्हणजे सरतेशेवटी बेबनावाचे राजकारण होय. त्यामुळे एकूण बेबनाव मोठ्या प्रमाणावर झाला. लोकशाही पोकळ झाली. लोकशाहीचा ताबा शाहीनबागेत पोकळ लोकशाहीने घेतला. या अर्थाने नेते आणि राजकीय पक्षदेखील लोकमत समजून घेऊ शकले नाहीत. दंगल ही एक हिंसा आहे. हिंसेला स्वीकारल्यामुळे लोकमताचे प्रबोधन तेथे झाले नाही. हिंसेमुळे शोषणाच्या दुष्टचक्राला सहमती दिली गेली. यामुळे क्रांतीचा व मुक्तीचा मार्ग पुढे ढकलला गेला. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये घटना घडली. तेथे सामान्य लोकांचे शोषण झाले. छोटे व्यवसाय येथे होते. त्यावर परिणाम झाला. तसेच अनेकांना पोलिसांच्या कायदेशीर फेऱ्यातून जावे लागले आहे. अशा घडामोडी म्हणजे पोकळ लोकशाहीतील नेत्यांची चंगळ असते. परंतु गरिबांचे आर्थिक शोषण आहे, यांचे आत्मभान राहिले नव्हते. अशा वेळी दिल्लीतील राजकीय पक्षांनी लोकमताचा दबाव हा मार्ग वापरला नाही. आम आदमी पक्ष असो की काँग्रेस पक्ष केवळ शेरेबाजीच्या, भाषणबाजीच्या, आरोपाच्या सुरात सूर मिसळत गेले. लोकमत संघटित केले नाही. लोकमताला योग्य दिशा दिली गेली नाही. यांचे प्रतीक म्हणजे दिल्ली येथील दंगल ठरली.   

सामाजिक सलोखा
 दंगलीवर उपाय म्हणजे सामाजिक सलोखा हा असतो. परंतु, हा मार्ग उत्तरपूर्व दिल्लीत फार जबाबदारपणे वापरला गेला नाही. उलट पश्‍चिमेकडील राजकारणाची प्रतिकृती येथे घडवली गेली. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांचे सोईचे अर्थ लावले गेले. यामुळे चांदबागमधील ताहिर हुसेन असो, की कपिल मिश्रा यांची शेरेबाजी सामाजिक सलोख्याला पोषक नव्हती. या दोन्ही नेत्यांचा काही काळासाठी संबंध आम आदमी पक्षाशी आला होता. यांपैकी कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे (१७ ऑगस्ट २०१९). ताहिर हुसेन यांना आम आदमी पक्षाने पक्षातून निलंबित केले (२८ फेब्रुवारी २०२०). आम आदमी पक्षाची भूमिका सामाजिक सलोख्याला पूरक आहे. परंतु, काही नेतृत्व पक्षविरोधी काम करतात. ही वस्तुस्थिती आम आदमी पक्षाच्या संदर्भात दिसते. या शिवाय इतर पक्षांची व नेत्यांची भूमिका तर फारच अवघड आहे. देशद्रोही अशी प्रतिमा कृत्रिमपणे लोकांना दिली जाते. ती प्रतिमा कथित असते. तसेच देशात राष्ट्रवादी आणि देशद्रोही असा अंतराय उभा केला गेला. दिल्ली मेट्रोमध्ये देशद्रोहीविरोधी घोषणाबाजी केली गेली. तसे वार्तांकन आले आहे. ही वस्तुस्थिती सामाजिक सलोख्याच्या विरोधी दिसते. याबद्दलचे आरोप प्रत्यारोप सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर करत आहेत. यासाठी उत्तरपूर्व दिल्लीतील दंगलीची मदत घेतली गेली. यामुळे दंगल हा एक टप्पा झाला. दंगलीनंतर प्रपोगंडा हा दुसरा टप्पा सुरू झाला. प्रपोगंडा ही घडामोड राजकीय प्रक्रियेतील एक हत्यार आहे. पक्षाची विचारसरणी अतिजलद गतीने पसरवण्यासाठी उत्तर काळात दिल्लीत दररोज दंगल प्रपोगंडाचा वापर केला गेला. यामुळे दिल्लीतील सामाजिक सलोखा अडचणीत आला. सामाजिक सलोख्यासाठी संस्थांची भूमिका महत्त्वाची असते. अशा संस्थांपैकी न्याय संस्था ही एक महत्त्वाची संस्था आहे. या दंगलीच्या संदर्भांत न्यायालयाने खंबीर पाठिंबा देण्याची गरज होती. परंतु, सामाजिक सलोख्यांसाठी तातडीची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने निर्णय दिला नाही. यामुळे भेदभाव या गोष्टीवर शाहीनबाग येथे मात करता आली नाही. अल्पसंख्यांकविरोधी द्वेषमूलक प्रचार शाहीनबाग येथे झाला. तसेच कथित देशविरोधी व कथित देशद्रोही अशा कल्पना कल्पिल्या गेल्या आहेत. अशा भ्रामक संकल्पनांच्या आधारे राष्ट्रवाद उभा राहत आहे. त्यामुळे राष्ट्रवाद संरचनात्मक भूमिका घेऊ शकत नाही, असे चित्र पुढे आले. काँग्रेस पक्षालादेखील कथित संकल्पनांना सामोरे जाता आले नाही. जे राज्यशासन कमीतकमी शासन करते ते सर्वोत्तम असते व जे राज्यशासन अजिबात शासन करत नाही तेच सर्वोत्तम असते अशा अराज्यवादी बोधवाक्यांचा शाहीनबागेत डावपेच म्हणून वापर केला गेला. यामुळे जवळपास शासनविरहित शाहीनबाग उदयास आली. या वस्तुस्थितीनंतर पोलिसाच्या शेजारी उभे राहून स्थानिक नेते शेरेबाजी करत होते. यामुळे पोलिस आणि तेथील स्थानिक नेते यांच्यामधील अघोषित एकीचे चित्र या शाहीनबागमध्ये दिसले. या चित्रामुळे सामान्य जनतेच्या मनात शंका निर्माण झाल्या. ही घडामोडदेखील सामाजिक सलोखाविरोधी गेली होती. स्वामी विवेकानंदांनी संसद म्हणजे विनोद आणि पक्षीय राजकारणाला निकृष्ट दर्जाचा अत्याचारवाद आणि सांप्रदायिकता असे म्हटले होते. शाहीनबागेच्या संदर्भात जवळपास असे दिसले. राजकीय सत्तेची प्रखर आकांक्षा बाळगणे हा पाश्चिमात्य विचार आहे. हा विचार शाहीनबागेमध्ये दिसला. भारतीयांनी मर्यादित सत्तेच्या आकांक्षेची सीमारेषा पार केली. भारतीय अमर्यादित सत्तेच्या आकांक्षा बाळगू लागले. यांची नवीन प्रयोगशाळा शाहीनबाग झाली. कोणताही देश अथवा समाज हा माणसांच्या चांगुलपणावर अवलंबून असतो. हे काम संसद करत नाही. माणसांची नीतिमत्ता घडवावी लागते. त्यासाठी राजकीय पक्षांनी अवकाश पुरवावा लागतो. या गोष्टी दिल्लीमध्ये या घटनेमुळे दिसत नाहीत. या उलट दिसते ती शाहीनबाग म्हणजे दंगल, हिंसा, क्रौर्य इत्यादी. शाहीनबागमध्ये सत्तेची भौतिक आणि बाह्य स्वरूपाची संकल्पना दिसली. या संकल्पनेत आसक्ती होती. यापेक्षा भारतीय सत्तेची संकल्पना वेगळी आहे. विवेकानंद-गांधी यांची संकल्पना वेदांती आणि अंत:स्थ स्वरूपाची आहे. गांधींनी आत्म-शक्तीची खरी ताकद मानली. तसेच स्वामी विवेकानंदांनी सर्व शक्ती ही आत्म्याची असते अशी सत्ताविषयक भूमिका घेतली होती. तलवारीची शक्ती दोन्ही नेत्यांनी स्वीकारली नाही. त्यांनी आत्म्याची अथवा आत्म-शक्तीची सत्ता खरी मानली होती. म्हणून नेमकेपणे शाहीनबागमध्ये भारतीय विचारांपासून राजकीय पक्ष आणि जनता दूर गेली. त्यांनी तेथे पाश्‍चिमात्य सत्तेची बाह्य व भौतिक संकल्पना स्वीकारली. भारतीय राजकारणाचे महान कार्य सामाजिक सलोख्यांचे संवर्धन करणे व जपणूक करणे हे होते. या महान राजकारणापासून आपण वेगळे शाहीनबाग प्रयोगामुळे झालो. प्रत्येक आत्मा हा ज्ञानाने परिपूर्ण आहे. प्रत्येक माणसात ही शक्ती समान आहे. हा समतेचा विचार विवेकानंदांचा होता. शाहीनबागमध्ये ज्ञानाऐवजी कथित ज्ञान आणि समानतेऐवजी भेदभाव आला. ही गोष्ट म्हणून भारतीय परंपरेच्या विरोधी घडली. वेदान्तांच्या विरोधी घडली. यांचे आत्मभान जवळपास सर्वांनाच नाही. म्हणून शाहीनबागेच्या संदर्भात प्रश्‍न उपस्थित झाला आहे, की नागरिकत्व संकल्पना आज पूर्ण अवस्थेकडून कमी कमी होत चालली आहे. कारण नागरिकांच्या अधिकारापेक्षा निवडणूक जिंकणे जास्त महत्त्वाचे झाले आहे. निवडणूक जिंकण्याचे हे शेरेबाजीचे प्रारूप पूर्ण नागरिकत्वविरोधी जाते. कारण नागरिकांना त्यांचे निवडणूक काळात अधिकार उपयोगात आणता येत नाहीत. उलट धाकदपाटशाहीमुळे नागरिकांच्या राजकीय व नागरी हक्कांचा संकोच होतो. ही कथा केवळ शाहीनबागेची नाही, तसेच ही कथा केवळ दिल्लीची नाही, तर ही कथा एकूण भारताची आहे. गावोगावी-गल्लीबोळात, वाडीवस्तीवर, वॉर्डावॉर्डात, प्रभागाप्रभागात, सोसायट्यांमध्ये आत्म-शक्तीचा ऱ्हास झाला आहे. त्याऐवजी राजकारण हा भौतिक व्यवसाय झाला आहे. पक्षांशी नेते आणि कार्यकर्त्यांची बांधीलकी फार कमी आहे. या उलट शेरेबाजी व उपटसुंभ असे पाश्‍चिमात्य पद्धतीचे राजकारण शाहीनबागेत घडले. परंतु, गांधींच्या भाषेत बाह्य राजकारण ही पशुतुल्य शक्ती आहे. भारतीय तत्त्वज्ञान पशूचे रूपांतर मानवी शक्तीमध्ये करते. ही गोष्ट सम्राट अशोकच्या पणजोबांपासून चालत आली आहे. याची चिन्हे सर्वत्र दिसतात. उदा. सांगली जिल्ह्यातील कस्तुबाई वालचंद महाविद्यालयात एक चित्र आहे. त्या चित्रात गाई व सिंह एकत्र पाणी पीत आहेत. हे भारतीय राजकारणाच्या सलोख्याचे व अहिंसेचे खरे रूप आहे. भारतीय राजकारणातील नीतिमूल्यांच्या पुढे राजे, वसाहतवादी राज्यसंस्था, वर्चस्वशाली गट-पक्ष यांचे स्थान गौण आहे. त्यामुळे शाहीनबागेच्या घटनेला नीतिमूल्यांची प्रतिक्रिया यापेक्षा जोरदार येईल. कारण भारतीय राजकारण परेशान असते. परंतु ते पराभूत होत नाही. याच भारतीय राजकारणाने पाश्‍चिमात्य पशुतुल्य सत्तेचा पराभव केला होता. ही साधी घडामोड लक्षात घेतली, तरी भारतीय म्हणून वेगळे राजकारण घडविण्याची सरतेशेवटी जबाबदारी पक्षांपेक्षा लोकमताची आहे. तसेच अनेकांतवादाची आहे. भारतीय राजकारण या गोष्टीची वाट पाहत आहे.    

फोटो फीचर

संबंधित बातम्या