मोटार उद्योगात युतीची लाट
भारतीय मोटार उद्योगात मारुती मोटारीच्या प्रवेशानंतर सगळीच गणिते बदलली. भारतात परदेशी कंपन्यांनी आपली मॉडेल्स केवळ उपलब्ध केली आहेत असे नाही; तर काही महत्त्वाच्या मॉडेलचे उत्पादनही आता इथे होते. भारतीय मोटार उद्योग जगाच्या तुलनेत लहान आहे, मात्र आता जगात आणि भारतातही मोटार उद्योगात दोन कंपन्या एकत्र येण्यास सुरवात झाली आहे.
भारतीय मोटार वाहन उद्योग गेल्या वीस वर्षांत खूपच मोठा टप्पा पार करून गेला आहे. देशात मारुती उद्योग १९८५ च्या आसपास उदयाला आला. तोपर्यंत आपल्याकडे फियाट व ॲम्बेसिडर याशिवाय निराळा पर्याय उपलब्ध नव्हता. फक्त या दोन गाड्यांचा पर्याय उपलब्ध असताना अचानक भारतीय मोटार चालकाला ‘मारुती ८००’ ही सुटसुटीत आणि लहान शहरात चालवायला सुलभ अशी गाडी मिळाली. मारुती उद्योग केवळ ८०० सीसीची गाडी देऊन थांबले नाहीत, या वाहनानंतर मारुती झेन, मारुती एस्टीलो, मारुती एस्टिम, मारुती बॅलेनो, आल्टो, जिप्सी या वाहनांची भर पडली. मारुती डिझायर या गाडीने खपाचे उच्चांक मोडले. कालपरत्वे ८०० सीसीच्या इंजिनबरोबर १००० सीसी पण येऊ लागले व शेवटी १३०० सीसीचे इंजिन पण आले. याच काळात भारत सरकार १२०० सीसीच्या आतील इंजिन असलेल्या गाड्यांना कर आकारणीत सूट देऊ लागले व ४ मीटर लांबीपेक्षा कमी असलेल्या गाड्यांनाही सूट मिळू लागली.
मारुती उद्योग डिझायर गाडीची डिकी कापून ४ मीटरच्या आत असल्याचा फायदा घेऊ लागली. आज बाजारात असलेल्या बहुतांशी सेदान व हॅचबॅक गाड्या ४ मीटरच्या आतील आहेत. (लांबी). एकट्या मारुती उद्योगाने बनविलेल्या असंख्य गाड्या २५,०००/- ते ५०,०००/- च्या फरकाने तुम्ही विकत घेऊ शकता. रेंज ३ लाख ते १५ लाख. ही गोष्ट नक्की की मारुती खूप मोठ्या गाड्यांवर भर देत नाही. हे सर्व होत असताना मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी या लक्झरी गाड्यांनीसुद्धा भारतीय गिऱ्हाईकांचे लक्ष वेधून घेतले आहे व यातसुद्धा २५ लाख ते ३ कोटी रुपयांपर्यंत गाड्या घेता येतात. मर्सिडीज कंपनी मे-बॅक या गाडीचे उत्पादन पुण्यात करते. जर्मनी सोडून मे-बॅक ही गाडी बनविणारा भारत हा एकमेव देश आहे. जगात इतरत्र मे-बॅक फक्त जर्मनीतूनच वितरित केली जाते. हे जगजाहीर आहे की, रोल्स रॉईस व जग्वार गाड्या यावर इंग्रजांचाच मक्ता होता. जग्वार, लॅंड रोव्हर ही कंपनी वर्षानुवर्षे तोट्यात चालत होती. जगातील बऱ्याच मातब्बर मोटार उद्योगांनी त्यांच्याबरोबर हातमिळवणी करून कंपनीला ऊर्जितावस्था मिळवून देण्याचा निष्फळ प्रयत्न केला. सरतेशेवटी रतन टाटा या भारतीय उद्योजकाने जग्वार, लॅंडरोव्हर कंपनी विकत घेऊन त्यात आमूलाग्र बदल घडवून कंपनीला एक आगळंवेगळं स्थान मिळवून दिले. आज जग्वार गाड्या भारतासह जगभर विकल्या जातात, त्यातल्या काही जग्वार गाड्या पुण्यात जोडल्या जातात. (टाटा मोटर्सच्या आवारात). येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते व ती म्हणजे टाटा मोटर्सची तीन अतिशय अद्ययावत डिझाईन सेंटर्स कार्यरत आहेत. (पुणे, इंग्लंड व इटली) येथे. टाटांच्या आजच्या गाड्या (झेस्ट, टियागो, टिगॉर व नेक्सॉन व हेक्सा) या सर्व गाड्या प्रगत तंत्रज्ञानांची साक्ष देतात. या सर्व गदारोळात इतर वाहने आपापली हजेरी लावत आहेत. व्होक्सवॅगन, टोयोटा, निस्सान, रेनो इत्यादी. टोयोटा यांनी तर इनोव्हा हे वाहन या थराला नेलेले आहे की, आज १० वर्षांनंतरही तुम्हाला वाट बघावी लागते. लगेच मिळत नाही. एकदा विकत घेतली की, अविरत चालू राहाते. इंग्रजीत याला कंपाउंड लास्टींग ॲबिलिटी, असे म्हणतात.
मोटार उद्योगात निदान भारतात तरी एक अविभाज्य घटकही काम करतो. तो म्हणजे खेडोपाडी वापरण्यास योग्य असलेले वाहन. हे काम महिंद्रा अँड महिंद्रा गेली कित्येक दशके करीत आहे. दुसऱ्या महायुद्धात वापरलेली जीप या वाहनांपासून बोलेरो, स्कॉर्पिओ, क्वांटम, एक्सयूव्ही ५००, ३०० वगैरे. ही सर्व वाहने मजबूत बांधणीची व कुठेही वापरायला योग्य असलेली आहेत. काही वर्षांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने कोरियातील सॅंगयाँग कंपनी विकत घेऊन रेक्सटॉन नावाचे एसयूव्ही वाहन बाजारात आणले आहे. हे वाहन पुण्यात जोडले जाते.
शेवटी काय? तुम्हाला अभिप्रेत असलेले व तुम्हाला परवडणारे वाहन आता भारतात मिळतं. फक्त त्यासाठी तुमच्या स्वाक्षरीत म्हणजे तुम्ही चेकवर जी सही कराल त्यावेळी तुमच्या बॅंकखात्यात किती रक्कम आहे त्यावर बरेच काही ठरेल. मोटार उद्योगात फोर्ड व होंडा ही दोन नावं बरंच काही सांगून जातात.
फोर्डने भारतात १ केओएन व फिगो गाड्या आणून काही काळाकरिता खळबळ माजली, पण हे फार वेळ टिकले नाही. एंडेव्हर ही एसयूव्हीसुद्धा बाजारात ठसा उमटविण्यास असमर्थ ठरली. याउलट होंडा सिटी हे वाहन सेदान कॅटॅगरीमध्ये १० वर्षे आपलं नाव टिकवून आहे. थोड्याफार फरकाने लोकांची मने जिंकली, हे विधान चुकीचे नाही. याबरोबर होंडा सीआरव्ही हे वाहन एसयूव्ही भागात, आपली छाप उमटवून गेला. होंडा अमेझ ही चार मीटरच्या आतील कॉम्पॅक्ट सेदान लोकांना भावली. मोठ्या गाड्यात ॲकॉर्ड वाहन फार काळ टिकले नाही. भारतीय मोटार उद्योगात अजून एक नाव घ्यायलाच पाहिजे आणि ते म्हणजे ह्युंडाई. ही कंपनी भारतात सॅन्ट्रो ही टॉल बॉय बॉडी असलेली गाडी घेऊन आली. तीन सिलिंडर असलेले इंजिन व बसवयास अतिशय आरामदायी अशी. गेल्या दहा वर्षांत ॲक्सेंट, आय-१०, आय-२० या गाड्या खूपच लोकप्रिय झाल्या. एलान्ट्रा व ॲम्बैरा फार प्रभाव पाडू शकल्या नाहीत. दोन वर्षांपूर्वी क्रेटा हे एसयूव्ही / एमयूव्ही वर्गातील वाहन प्रचंड प्रमाणात खपलं तर आहेच. पण ‘कार ऑफ द इयर’ बक्षीससुद्धा घेऊन गेले. हा किताब गेली तीन वर्षे ह्युंदाई कंपनीने मिळविला आहे. उत्तम वाहन व तितकीच उत्तम विक्रीनंतरची सेवा हे हुंदाईचे वैशिष्ट्य. मारुतीच्या पाठोपाठ यांचा नंबर लागतो.
या गाड्या आपली छाप उमटवत असतानाच गेल्या काही वर्षांतच टोयोटा, मर्सिडीज, निसान या कंपन्यांनी भारतात आपली मोठी बाजारपेठ तयार केली आहे. आजमितीला भारतीय बाजारपेठेत बऱ्याच नवीन गाड्या उपलब्ध आहेत. (भारतात जोडलेल्या व जोडून आणलेल्या) या सर्व प्रवासात टाटा मोटर्स, महिंद्रा यांनी केलेली प्रगती नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. थोडक्यात काय दोन-तीन लाखांपासून ते दोन-तीन कोटींपर्यंत वाहन खरेदी तुम्ही करू शकता.
मोटार उद्योगातला सर्वांत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे रस्ते व हा भाग सर्वांत जास्त दुर्लक्षित आहे, असे दिसते. रस्ते बांधणी, मोटार उद्योगापेक्षा सरस वेगाने होण्याची जरूर आहे. हे न झाल्यास वाहतूक कोंडी, अपघात व खर्च, मनस्ताप यांना सामोरे जावे लागते. हे सर्व होत असताना वाहन चालविणाऱ्या चालकांची मानसिक जडणघडण फारच महत्त्वाची आहे.
वाहन उद्योगाचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे विक्रीनंतरची सेवा हा विषय अतिशय क्लिष्ट असा आहे. ही सेवा पुरविणारी मंडळी काय मानसिकतेची आहेत, यावर सर्व अवलंबून असते. या व्यक्तीची सर्व बाबतीत जडणघडण काय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वीस लाख रुपये किमतीची गाडी सर्व्हिस करताना सीटवर प्लॅस्टिक कव्हर न घालता काम करण्याची सवय महागात पडू शकते.
आणखीन एक गोष्ट मी निदर्शनास आणू इच्छितो आणि ती म्हणजे या सेवेतून उत्पन्न होणारा खर्च. गाडी घेतल्यानंतर सुटे भाग न लागणे व लागल्यास वाजवी किंमतीत मिळणे, ही अत्यंत निकडीची बाब आहे. आजकालची वर्कशॉप्स ही रिपेअर शॉप्स नाहीत, ती रिप्लेसमेंट शॉप्स आहेत. वाहन न मोडता अविरत चालू राहणे, ते तसे जपणे व देखभाल करणे फारच महत्त्वाचे. हे सर्व उत्तम रस्ते व योग्य मानसिकता असल्यास तुम्ही काही अंशी अवगत करू शकता.
आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे कास्ट ऑफ ओनरशिप. मी आज ५० लाख रुपये देवून गाडी घेतली. दोन वर्षांत २५ लाख रुपये रिसेल व्हॅल्यू. ५० लाखांवर १० टक्के व्याजाने दोन वर्षात १० लाख गेले. दोन वर्षांत इंधन अधिक ड्रायव्हर अधिक मेंटेनन्स. आणखी ५ लाख कमीतकमी. म्हणजेच २५+१०+५ = ४० लाख रुपये गेले. दोन वर्षांत १९,००० कि. मी. चालविल्यास प्रति कि. मी. ४००/- रुपये खर्च. घेणारा म्हणतो, मी डिझेल गाडी घेतली, कारण ती स्वस्त पडते. आणखीन एक मुद्दा. गाडी कुठली घ्यावी, हा एक वादातीत प्रश्न आहे.
बहुतांशी वेळा इंधन बचत ही सर्वांत महत्त्वाची बाब मानली जाते. सुरक्षितता, बसण्या-उठण्याची सुलभता, वेळप्रसंगी सामान नेण्याची सोय, या गोष्टींकडे कानाडोळा केला जातो. इंधन बचत हा मुद्दा इतका तग धरून आहे की, लहान व हलक्या गाड्या बनविण्याकडे खूपच कल आहे व त्या खूप प्रमाणात विकल्या जातात. आजच्या मार्केटमध्ये वाईट गाड्या कोणीच बनवत नाही. मेकॅनिकली रिलायबल असतात. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, सर्व गाड्या मागील व पुढील सीटकरिता सेफ्टी बेल्ट लावूनच विकतात. असे सांगूनसुद्धा हे बेल्ट वापरण्याकडे कानाडोळा केला जातो. परत एकदा मानसिकतेकडे बोट दाखविता येईल. आपल्या व दुसऱ्याच्या जिवाची बेपर्वाई. या बेपर्वाईला आळा घालता येऊ शकतो. बेल्ट लावल्याशिवाय गाडी सुरू न होण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. आजकाल कुठल्याही शनिवार-रविवार सुटीला शहराबाहेर गेल्यास वाहनांचा पाऊस रस्त्यावरून वाहताना दिसेल. गाड्यांचा सुळसुळाट झालेला दिसेल. बेदरकार चालक आपला व लोकांचा जीव धोक्यात घालताना दिसतील. या सर्वाला खराब रस्ते व असुरक्षित इतरत्र बांधकाम (रस्त्याचे) अपघाताला खतपाणी घालतात.
या सर्व बाबींना एक सरसकट उपाय भारतीय मोटार खरेदी करणाऱ्यांनी दाखविला आहे. तो म्हणजे शक्य असल्यास एसयुव्ही (स्पोर्टस युटिलिटी वाहने) खरेदी करणे, एसयुव्ही व तत्सम गाडी विकणाऱ्यांची तेजी आहे. नकळत सुरक्षिततेकडे बोट दाखविले जात आहे. ही खबरदारी सर्व गोष्टींमध्ये दाखविल्यास आयुष्य सुकर होईल.
आज जर तुम्ही मोटारगाड्यांची जाहिरात पाहिलीत तर असे दिसेल की, एएमटी (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन गाड्यांची) संख्या वाढली आहे. मेन क्रॉसिंगमधील ५ ते ७ वेळा हिरव्याचा लाल होणारा सिग्नल ऑटोमॅटिक गाडीकडे बोट दाखवितो. दिवसभर क्लच दाखून डाव पाय आहे की नाही, अशी शंका येऊ लागते. या गदारोळात आडवे-तिडवे जाणारा भर घालतच असतात.
तुम्ही जर एखाद्या मोटार डिलरकडे गेलात तर तुम्हाला असे निदर्शनास येईल की रेग्युलर सर्व्हिसला आलेल्या गाड्यांपेक्षा ॲक्सिडेंट रिपेअरच्या गाड्या जास्त असतात.
बहुतांशी देशांमध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचा मोटारस्पोर्टसशी घनिष्ठ संबंध असतो. एकट्या मोनॅको शहरात झालेल्या फॉर्म्युला वन रेसमुळे म्युनिसीपालिटी २०० मिलियन डॉलर्सची उलाढाल करते. संपूर्ण आठवडा शहर रेसमय असते. आपल्या देशात मोटार स्पोर्टस हा स्पोर्ट आहे की नाही? इथपासून दुमत आहे.
मोटार उद्योगात ठसा उमटविण्यास प्रचंड प्रमाणात पैसा लागतो. याला निर्यात हा एक पर्याय असू शकतो. काही उत्पादक निर्यातीकडे कल असलेले दिसतात. भारतात लेबर कॉस्ट कमी आहे, बाकी देशांच्या तुलनेत, जेणेकरून निर्यातीच्या नफ्यात वाढ करू शकते. भारतीय वाहन उद्योग परदेशी वाहन उद्योगाच्या तुलनेत खूपच लहान आहे, असे म्हणता येईल. अमेरिकेतील वाहन उद्योग डेट्रॉईट शहरात व आसपास कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांत त्याला उतरती कळा लागली आहे. गेली बरीच दशके मोठमोठाल्या गाड्या बनविण्याचे प्रमाण अमेरिकेत बघायला मिळाले. भारतातली मोटार उद्योगाची वाटचाल लक्षात घेतील तर सगळी जडणघडण ‘लहान गाड्या’ बनविणेच योग्य आहे व तशी पावले भारतीय वाहन उद्योग उचलतोय. मोटार उद्योगात क्रांतिकारी बदल घडवला तो जपानी मोटार उद्योगाने. कमी खर्चात प्रदीर्घ कालावधीकरिता उत्तम चालणाऱ्या गाड्या उपलब्ध करून दिल्या. विक्री पश्चात उत्तम सेवा कशी, त्यांनी जगाला दाखवून दिले. याच मुद्यावर मारुती-सुझुकी भारतात ४८ टक्के मार्केट काबीज करून दाखवीत आहे.
जगात यापुढील काळात अविरतपणे पेट्रोल व डिझेल उपलब्ध होणार नाही व याच कारणाकरिता साऱ्या जगाचे लक्ष्य इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळले आहे. भारतात टाटा मोटर्स व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा या कंपन्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. या सर्व प्रयत्नांना सरकारी मदत मिळणे फार महत्त्वाचे आहे. (म्हणजे रिड्युस्ड टॅक्सेस, आचरणात आणणे) तसे आत्तातरी होताना दिसत नाही. नजीकच्या काळात पर्यावरणावर इलेक्ट्रिक गाड्यांचा खूपच परिणाम दिसून येईल. यामुळे हवेचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण खूप कमी होईल यात शंका नाही. आणखीन एक गोष्ट झाली आहे ती म्हणजे दोन निरनिराळ्या मॅन्युफॅक्चरर्सची युती. (१) निसान-रेनो,
(२) फियाट क्रायस्लर व इतर. वोक्सवॅगन कंपनी स्कोडा, ऑडी, लेंबॉरडीनी वगैरे गाड्यांची निर्मिती करते. फियाट क्रायस्लरशिवाय फेरारीची पण मालक आहे. थोडक्यात काय तर मोटार जगातसुद्धा युतीला पर्याय नाही.