सह्याद्रीच्या अंतरंगातील नरवीर अभिवादन यात्रा

डॉ. अमर अडके
सोमवार, 16 मार्च 2020

कव्हर स्टोरी
तानाजी मालुसरे सिंहगडावर धारातीर्थी पडले अन् त्यांचा देह पंचत्वात विलीन झाला तो उमरठला. त्यांचा देह सिंहगडावरून तिथं कसा-कोणत्या मार्गानं आणला असेल? विचार सुरू झाले आणि ठरलं... नरवीरांच्या पुण्ययात्रेच्या पुण्यमार्गाचा भूगोल शोधायचा!

किती वर्षं झाली नक्की आठवत नाही. पडत्या पावसात पारगडावर गेलो होतो. अजूनही भवानीचं जुनंच मंदिर होतं. मंदिराशेजारचा व्यासपीठाचा कट्टा जांभ्या दगडांचाच होता. व्यासपीठावर झावळ्यांचंच आच्छादन होतं. गडावर येणाऱ्या पायऱ्यांना तोच शिवकाळाचा दगडी बाज होता. पायऱ्यांच्या वरच्या अंगाच्या तोफा आणि इतर शस्त्रांना अजूनही मातीचाच चौथरा होता. हनुमंताचं छोटेखानी मंदिर होतं. त्यासमोरची दगडी समाधी ठसठशीत दिसत होती. मालुसरे, शेलार, मावळे, झेंडे यांची घरं जणू शिवकाळ जागवित होती. महाराजांचा पुतळा मात्र आज आहे तसाच होता. या साऱ्या वातावरणात मन उमरठ, गोडवली, सिंहगड, बिरवाडी, पारगड या धारातीर्थावरून फिरत होतं. पारगडाच्या मालुसऱ्यांच्या देव्हाऱ्यातले देव अजून पूर्णपणे बेळगावला गेले नव्हते. पिढ्यान्‌पिढ्याचे देव्हारे अजूनही पारगडला मंगल करत होते. पावसाळ्यातला पारगड हा निसर्गाचा विलोभनीय आविष्कार असतो. हे जितकं वास्तव तेवढंच नरवीर तानाजींच्या स्मृती जपणारा पुराण पुरुष हे त्याचं रूप अधिक भावणारं. होय! नरवीर तानाजी मालुसऱ्यांच्या देहावरची श्री. शिवाजी महाराजांनी ठेवलेली कवड्यांची माळ याच किल्ल्यानं तीनशेहून अधिक वर्षं जपून ठेवली. त्या काळची तलवारही या किल्ल्याचं वैभव. 

याच किल्ल्यावर नरवीरांचे वंशज बाळकृष्ण ऊर्फ दादा मालुसरे भेटले आणि मग या ऐतिहासिक घराण्याशी स्नेह जुळला; तो इतकी वर्षं होऊन गेली, तरी आजही तसाच आहे. याच किल्ल्यावर तानाजींच्या गळ्यातली कवड्याची माळ दादांकडूनच पहिल्यांदा पाहिली. 'पाहिली नव्हे, अनुभवली!' त्या माळेला स्पर्श केला. अंगात वीज चमकून जावी असा भास झाला. ही माळ हे माझं श्रद्धास्थान झालं. नंतर निमित्यानिमित्याने ती पाहत गेलो. रोमांचित होऊन गेलो. अवघा पारगड मालुसरे, माळवे, शेलार, झेंडे यांच्या अशा स्मृतींनी भारून गेला आहे. पारगडावर उभं राहिलं, की सिंहगड, उमरठ का आठवतो कुणास ठाऊक? 

महाबळेश्‍वराच्या खोऱ्यातल्या चंद्रगडाच्या माथ्यावर उभा होतो. समोर रायरेश्‍वराचं प्रचंड पठार, त्याचं नाखिंदा टोक न्याहाळत होतो. त्याच्या खालच्या अंगाची अस्वलखिंड शोधत होतो. चंद्रगडाच्या पायथ्याचं झाडीत दडलेलं ढवळे आणि त्याच्या पलीकडचं उमरठ अंदाजानं शोधत होतो. मनामध्ये एक विचार आकार घेत होता. तानाजी मालुसरे सिंहगडावर धारातीर्थी पडले. त्यांची समाधी प्रतापगड, महाबळेश्‍वर, चंद्रगड यांच्या पायथ्याच्या दरीतल्या उमरठमध्ये. सर्वदूर महाराष्ट्र पिढ्यान्‌पिढ्या हे ऐकत आला, समजतही आला. नरवीरांच्या देहावर अग्निसंस्कार केले, त्यांचा देह पंचत्वात विलीन झाला तो उमरठला. इतिहासाच्या या प्रेरणादायी, घट्ट धाग्यानं मनाची पकड घेतली आणि मनात विचारांचं रान माजलं. हा देह सिंहगडापासून कसा आणला असेल? कोणत्या मार्गानं आणला असेल? किती दिवसांत आणला असेल? हे विचार पाठ सोडेनात. 

काही दिवस गेले, वाईतून घेरा-केंजळगडाच्या वाटेनं रायरेश्‍वर आणि केंजळगडाच्या मधल्या खिंडीत पोचलो. रायरेश्‍वराचं दर्शन घेऊन बाळू जंगमाच्या घरी पथारी पसरली. भल्या पहाटे झपाटल्यासारखा नाखिंद्याच्या टोकाकडं निघालो. रायरेश्‍वराचं पठार पार करून नाखिंद्याच्या माथ्यावर पोचलो, तेव्हा सूर्याची लाली सर्वत्र फाकली होती. त्या कोवळ्या सूर्यप्रकाशात खालची अस्वलखिंड, खालच्या डोंगर शिखरांमधला चंद्रगड, त्याच्या पायथ्याच्या गावांचा अंदाज घेत होतो. पुन्हा तोच विचार मनात उसळी मारू लागला. 'सिंहगड ते उमरठ!' 

कधी सिंहगडावर मावळतीच्या बाजूला उभा असताना, कधी राजगडावर संजीवनी माचीच्या टोकाच्या बुरुजावर चांदण्या रात्री झोपलो असताना, कधी तोरण्याच्या बुधला माचीवर राजगडाकडून आलेलो असताना, कधी केळदच्या कड्यावर उभा असताना, कधी रडतोंडीच्या घाटात जुन्या रामवरदायीनीपाशी असताना सिंहगड ते उमरठ हा विचार मनाला सैरभैर करू लागला. मग सिंहगड एका भल्या पहाटे चढून जात असताना अगदी अतकीरवाडीपासूनच या विचारांचं मोहोळ मनात फुटलं आणि सिंहगडाच्या माथ्यावर पोचेपर्यंत एक निश्‍चय पक्का झाला. 'सिंहगड ते उमरठ' नरवीरांच्या पुण्ययात्रेच्या पुण्यमार्गाचा भूगोल शोधण्याचा.. आणि सुरू झाल्या सर्व बाजूंनी या मार्गावरच्या मोहिमा. 

गेली सात वर्षं झाली, अखंड शोधमोहिमा सुरूच आहेत. जे हवं ते अगदी शंभर टक्के गवसलं असं नाही, पण सिंहगडापासून अंदाजानं, संदर्भानं, स्थानिकांच्या मार्गदर्शनानं, मौखिक इतिहासाच्या आधारानं पोचलोच. हे सगळं सांगावसं वाटलं ते एवढ्यासाठीच, की या वर्षी म्हणजे इ.स. २०२० ला नरवीरांच्या धारातीर्थी पतनाला आणि पुण्ययात्रेला साडेतीनशे वर्षं होत आहेत आणि त्यानिमित्तानं 'सिंहगड ते उमरठ' अशी सह्याद्रीच्या अंतरंगातली 'नरवीर अभिवादन यात्रा' करणार आहोत. 

या पुण्ययात्रेच्या भूगोलाच्या मागोव्याचा प्रवासही तसा प्रदीर्घ आहे. जवळजवळ पंचवीस मोहिमा त्यासाठी आखल्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं, डोंगरभटक्‍यांच्या अनुभवांचा आधार घेतला, भूमिपुत्रांकडून डोंगरपोटातले राबते घाटमार्ग धुंडाळले, पूर्वसुरींच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतला. यानिमित्तानं कोकणात उतरणाऱ्या अनेक विलक्षण वाटांवरून फिरलो. ही सारी भटकंतीच फार रोमांचक होती. अर्थात या साऱ्याच भटकंतीचा अन्योन्य संबंध पुण्ययात्रेच्या भूगोलाशी निगडित होता असंही नाही. परंतु, साऱ्या शक्‍याशक्‍यता पडताळून पहाण्यासाठी ते आवश्‍यक होतं. 

कधी महाबळेश्‍वरपासून पार-अंबेनळी घाटाने उतरून कापडे फाट्याला डोंगरकुशीत वळून उमरठला तानाजी मालुसरे आणि शेलारमामांच्या समाधीचं दर्शन घेऊन ढवळ्यात मुक्काम करून भल्या पहाटे चंद्रगडाच्या माथ्यावर जाऊन चंद्रगड उतरून घसाऱ्याच्या आडव्या वाटेनं ढवळ्या घाटानं, कधी तीव्र उताराच्या तर कधी खड्या चढाच्या वाटेनं बहिरीच्या घुमटीला साक्षी ठेवून मढीमहालाच्या बाजूनं आर्थरसीट चढून गेलो. 

कधी केंजळखिंडीतून रायरेश्‍वराच्या मंदिरात दर्शन घेऊन तिथंच मुक्काम करून रायरेश्‍वराच्या पठारावरून नाखिंदा गाठला. रायरेश्‍वराच्या पठारावरच्या प्रवासात घाटघर अर्थात येसाजी कंक जलाशयाच्या पार्श्‍वभूमीवर राजगड, तोरणा किती सुंदर दिसतात याचं वर्णन शब्दातीत आहे. नाखिंद्यावरून सरळ न उतरता वळसा घालून कुदळ्यात उतरलो. मग निरेच्या पात्रातून अस्वलखिंड चढून जणू काही पृथ्वीच्या गर्भात उतरल्यासारखा खाली कोकणातल्या कामथ्यात उतरलो. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं केलेली अस्वलखिंडीची चढाई आणि नंतरची गूढगर्भ अंधारातली उतराई हा एक अविस्मरणीय अनुभव होता. अस्वलखिंडीपासून कामथ्यापर्यंत येईपर्यंत अंधारानं जणू काही सर्व सृष्टीच गिळून टाकली होती. कामथे येता येत नव्हतं. भर जंगलातल्या त्या अंधाऱ्या रात्री कामथ्याची दिशाही कळत नव्हती आणि वाटेचीही खात्री होत नव्हती. मग एका अनोख्या आवाजानं हे सगळं सोडवून टाकलं. हा अनुभव आजही अंगावर रोमांच उठवतो. अस्वलखिंडीच्या पायथ्याशी कामथ्याच्या जंगलात भरकटलो होतो. एवढ्यात त्या अंधारातून, माथ्यावरच्या कड्यावरून एक प्रकाश दिसला आणि पाठोपाठ आवाजही आला, 'उजव्या हाताला जावा, मग डावीकडं वळून सरळ चालत राहा. मधे नाला आहे, तो कोरडा असंल, त्यात उतरून पलीकडं जावा. मग भातखाचरं लागतील, तिथून उजवीकडं रुंद पायवाट लागंल. तिकडं जाऊ नका. डावीकडच्या बारक्‍या पायवाटेनं भातखाचरं चढून जाऊन मोकळ्या रानात जावा. वेळ लागंल, पण असंच चालत राहिलात, तर कामथ्यातले दिवे दिसतील.' हा प्रकाश आणि आवाज तब्बल पाऊणतास आमच्याबरोबर होता. कामथ्यात पोचल्याच्या आनंदात आम्ही क्षणभर हरवून गेलो. भानावर आल्यावर तो आवाज, तो प्रकाश आणि ती माउली शोधण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत आवाजासह तो प्रकाश कड्यावरच्या अरण्यात लुप्त झाला होता. आम्हाला वाट दाखविणारी ती माउली कोण होती कुणास ठाऊक? पण तिच्यामुळंच आम्ही कामथ्यापर्यंत पोचलो होतो हे नक्की. आम्ही साऱ्यांनीच त्या आवाजाला, त्या प्रकाशाला आणि त्या माउलीला जमिनीला मस्तक टेकून साष्टांग दंडवत घातला, मनोमन वंदन केलं आणि दुसऱ्या दिवशी उमरठमध्ये पोचलो. असे अनेक विलक्षण अनुभव पदोपदी आले. 

एके दिवशी भल्या पहाटे नरवीरांच्या समाधीला वंदन करून उमरठहून निघालो. समाधीच्या शेजारीच असणारा उमरठ्याचा डोंगर पाहून त्याच्या माथ्यावर पोचलो. ऐन पावसाळ्याचे दिवस. सह्याद्रीच्या खोऱ्याचं केवढं विलक्षण दृश्य. धुक्‍यात लपेटलेला हिरवागार आसमंत. क्षणार्धात धुकं दूर झालं, की सह्याद्रीच्या हिरवाईनं सजलेल्या उत्तुंग शिखरांचं दर्शन. रायरेश्‍वर, चंद्रगडापासून ते थेट आर्थरसीटच्या कड्यापर्यंतच्या डोंगररांगा. कल्पनातीत सुंदर महाराष्ट्र अशा दऱ्याखोऱ्यांतच सामोरा येतो. मग हिरव्या गालिच्यांच्या उतरंडीवरून करंज्यात पोचलो. करंज्यातून खळाळणाऱ्या जलप्रपातांच्या विलक्षण नादात लहु‍ळश्याचा डोंगर चढलो. वाटेतले हिरवे डोंगर, हिरवाईने नखशिखांत नटलेली भातखाचरं हे पाचूसारखं सौंदर्य वर्णनाच्या पलीकडचं आहे. मग याच हिरवाईच्या साथीनं दाभीळ गावात पोचलो. मग दाभीळ तोंदीचा डोंगर चढून त्याच्या पठारावर आलो. या चढाईत काही ठिकाणी जुन्या पायऱ्याही चढून आलो. इथली पंचक्रोशी याला शिवकालीन मार्ग म्हणते. मग दाभीळतोंडीच्या पठारावरून थेट दाभीळ टोक गाठलं. आंबेनळी-पारघाटाचा रस्ता इथं लागतो. पुढं कुंभऋषी गाठून प्रतापगडी पोचलो. खरं तर असे तत्कालीन अनेक राबते मार्ग पावलांच्या प्रतीक्षेत आहेत. 

एकदा कुडपणच्या शेलारांचा सांगावा आला. या परिसरात बहुतेक सारे शेलारच. मग अरण्यवाटेनं शेलारखिंड पार करून जुन्या रामवरदायीनीचा रस्ता पकडला. या रामवरदायीनी समोरच जुन्या मूळ रडतोंडी घाटाचं देखणं अस्तित्व शिल्लक आहे. हा वळणदार घाट छोट्या बुरुजांसह थेट शिवकाळात घेऊन जातो. रामवरदायीनीपासून लांबच्या लांब पठारावरून डोंगरदांडाने आणि मग प्रतापगडाच्या पायथ्याच्या जंगलातून थेट महाद्वाराच्या अलीकडच्या गुहेपाशी पोचलो. उमरठ-महाबळेश्‍वर-प्रतापगड-रायरेश्‍वर परिसरातल्या अशा अनेक अगम्य वाटा इतिहासाची साक्ष देत आपली वाट पाहत आहेत. 

प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीचे टेंभावर अफजलखानाचं पारिपत्य केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यात दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी एकच एल्गार केला आणि अदिलशाही सैन्यावर तुटून पडले. महाबळेश्‍वरापासून ते पारघाटापर्यंत प्रतापगडाच्या भोवताली जागोजागी दडून बसलेल्या या मावळ्यांच्या ठिकाणांबद्दल विलक्षण कुतूहल मनात होतं. त्या उत्सुकतेपोटी या व्यूहरचनेच्या शोधात अवघी प्रतापगड परिक्रमा केली. या परिक्रमेत मावळ्यांच्या मोर्चांच्या विलक्षण जागा भूमिपुत्रांनी उलगडून दाखविल्या. सरदार आणि मावळ्यांच्या या मेट आणि माच्यांवरच्या दबा धरून बसलेल्या जागा प्रतापगडाच्या युद्धाच्या अंतरंगात घेऊन गेल्या. यानिमित्तानं जावळीच्या खोऱ्यातून आणि कोकणातून प्रतापगडाकडं येणाऱ्या अनेक वाटा परिचित झाल्या. मग ती कोंढवी ते प्रतापगड असो किंवा किन्हेश्‍वराकडून येणारी असो अगदी वाईपासून जोरच्या बाजूची वाट पकडून पसरणीपासून जुन्या घाटानं पाचगणीच्या पठाराशेजारी गुरेघरापाशी पोचलो. तिथून दाट जंगलातून क्षेत्र महाबळेश्‍वर, याच्यामागील बाजूनं मेट तळ्याचं जंगल ओलांडून जुन्या रडतोंडीघाटाच्या बगलेतून थेट पारची रामवरदायीनी आणि तिथून चांभारटेंभाच्या बाजूनं जनीचा टेंभ ते प्रतापगड पायथा अशी अफजलखान ज्या संभाव्य मार्गानं प्रतापगड पायथ्याशी आला त्या दुर्गम वाटेचीही कसरत केली. 

कधी जोरच्या बाजूनं बहिरीच्या घुमटीपर्यंत येऊन चंद्रगडाच्या पायथ्याच्या अंगानं ढवळे गाठून उमरठपर्यंत गेलो. कधी मंगळगडावरून महादेव मुऱ्ह्याच्या डोंगरावरून चंद्रगड गाठला, तर कधी महादेव मुऱ्ह्याचं अर्धं पठार पार करून सरळ उमरठ गाठलं. 

कधी शिवथर-कावळ्या-वरंध घाट असा उलटा प्रवासही केला. प्रतापगड, उमरठ, रायरेश्‍वर, वरंध, शिवथर हा पठार खोऱ्यांमधला प्रवास हळूहळू सिंहगड, राजगड परिसराकडं घेऊन गेला आणि मग सुरू झाला सिंहगडापासूनच्या राजगड, तोरणा परिसरातल्या वाटांचा थेट केळदपर्यंतचा आणि पुढं खाली कोकणपर्यंतचा प्रवास. 

सिंहगडाच्या डोणागिरी कड्याच्या धारातीर्थापासून सुरुवात करून कल्याण दरवाजातून खाली उतरून पानगड पायथ्यानं केळदपर्यंत पोचलो. केळद, पुणे जिल्ह्यातलं भोर तालुक्‍याच्या एका टोकाचं गाव. गावच्या पश्‍चिमेला अफाट कडा आणि खाली कोकणात उतरणाऱ्या अनेक घाटवाटा. कड्याच्या खाली सांप्रतच्या रायगड जिल्ह्यातला महाड तालुका. एक कयास यातल्याच एका घाटवाटेनं नरवीरांची पालखी कोकणात उतरली असावी. कड्यापासून तब्बल पाच घाट खाली उतरतात. दक्षिणेच्या अंब्याच्या नळीची वाट, मग जुना उपांड्या घाट, त्याच्या थोडा अलीकडं नवा उपांड्या हा थोडाफार राबता. मग गोप्या घाट आणि सर्वाधिक राबता असणारा मढे घाट. तिथून थोड्या दूर किंचित उत्तर आणि पश्‍चिमेच्या बाजूला अवाढव्य आणि उत्तुंग गुगुळशीचा डोंगर आणि त्याच्या बगलेतून उतरणारा शेवत्या घाट. हा शेवते गावात उतरतो. बाकीच्या घाटवाटा मात्र वाकी-कर्णवडी-रानवडी या कोकणातल्या गावांच्या बेचक्‍यात उतरतात. या पुण्ययात्रेच्या शोधप्रवासात या साऱ्या घाटवाटा अनेक वेळेला चढलो आणि उतरलो. कधी उपांड्या किंवा गोप्या घाटानं उतरून शिवथरला गेलो, तर कधी शेवत्या घाटानं मजल-दरमजल करत वाकीपर्यंत पोचलो. कधी उपांड्या घाटानं थेट कर्णवडीत उतरलो. कधी मढे घाटातून रानवडी, तर कधी उपांड्या उतरून थेट पार माचीसुद्धा गाठली. पण या साऱ्या प्रवासात मढे घाट या नावानं कुतूहल निर्माण केलं. या शोधप्रवासात केळदच्या बाळू शिंदेसारखा अवलिया भेटला. तानाजी मालुसऱ्यांचा देह या घाटवाटेनं नेला म्हणून या घाटाचं नाव 'मढे घाट' असं छातीठोकपणे सांगणारी शिंद्यांची भावकी भेटली. मढे घाटाच्या उतरंडीच्या टोकाशी नरवीरांचा देह ठेवला. त्या जागचे विखुरलेले दगड दाखवणारे भूमीपुत्रही भेटले. खाली कोकणातल्या रानवडी-कर्णवडी-दहिवद या गावातले नरवीरांचा देह दहिवदसारख्या अमुक ठिकाणी विसावला होता असे सांगणारे बुजुर्गही भेटले... आणि मग मनात साकारू लागला सिंहगड ते उमरठ पुण्यप्रवासाचा पुण्यमार्ग आणि ठरलं या मार्गानं जमतील तितके सहकारी घेऊन जाण्याचं आणि जाऊनही आलो. एक रोमांच मनात उभा राहिला. ठरलं नरवीरांच्या साडेतीनशेव्या पुण्यदिनी या पुण्यमार्गावरून पुण्यप्रवास करायचा आणि तोही नरवीरांची पालखी घेऊन. 

सिंहगडाचा डोणागिरी कडा ते कल्याण दरवाजा, दुसऱ्या कल्याण दरवाजातून बाहेर पडून अनेक डोंगररांगा चढून आणि उतरून विंझरच्या धनगरवाडीत पोचायचं. तिथून राजगड पायथा हे मोठं अंतर काटायचं. रायगड पायथ्याच्या खंडोबाच्या माळाच्या खालच्या अंगानं भुतोंडे उजव्या हाताला ठेवून पासली पार करून केळदला पोचायचं, मग मढे घाटातून उतरून रानवडी गावठाणाच्या अलीकडं बावेच्या विहिरीपर्यंत पोचायचं. मग वाकी-दहिवद-बीरवाडी असा अंदाजानं प्रवास करून बीरवाडी महाडच्या वरच्या अंगानं पोलादपूर कापडेफाटा-उमरठ असा पुण्ययात्रेच्या पुण्यप्रवासाचा आराखडा तयार झाला... आणि रोमांचकारी मोहीम आकाराला येऊ लागली. 

 मोहिमेची पूर्वतयारी सुरू झाली. उमरठकर मंडळी, पंचक्रोशीतील मालुसरे मंडळी आणि मुख्य म्हणजे नरवीर तानाजी उत्सव समितीचे चंद्रकांत कळंबे आणि पोलादपूरचा आमचा सहकारी प्रकाश कदम या साऱ्यांनी या पुण्ययात्रेचं शिवधनुष्य आम्हा मैत्रेयांच्या खांद्यावर दिलं. दिवसही ठरला. ता. १४ फेब्रु. २०२० रोजी रात्री निघून भल्या पहाटे सिंहगडावर पोचायचं. तिथून पुण्ययात्रा सुरू करायची. लांब अंतर आणि खडतरता पालखीसहचा पहिला प्रयत्न या साऱ्याचा तणाव होताच. 

 ...आणि प्रत्यक्ष तो दिवस उजाडलाच. शनिवार, ता. १५ फेब्रु. २०२० पुण्ययात्रा सिंहगड ते उमरठ धारातीर्थ ते समाधी. भल्या पहाटे सिंहगडावरच्या डोणागिरी कड्याच्या माथ्यावरच्या धारातीर्थापाशी आम्ही उभे आहोत. थंडी फारशी नाही. सिंहगडाच्या पायथ्याचा आसमंत पथदिव्यांनी उजळला असला तरी सिंहगडाची चढण, दक्षिण-पश्‍चिम आणि काही प्रमाणात उत्तरेचीसुद्धा डोंगरबाजू पहाटेच्या अविरत अंधारात लुप्तच आहे. या अंधाराच्या साथीनंच आम्हाला सिंहगड उतरायचा आहे.. आणि नुसताच उतरायचा नाही, तर नरवीरांच्या संजीवन पालखीसह उतरायचा आहे. नरवीरांचा अर्धपुतळा, शेजारचं स्मृतीशिल्प आज फुलांच्या माळांनी सजलंय. एक वेगळं अनाकलनीय चैतन्य त्या परिसरात भरून राहिलं आहे. आमचे पुणेकर दुर्गमित्र भल्या पहाटे येऊन पोचले. आज ही मंडळी डोणागिरीच्या कड्यावर चढाई-उतराई करणार आहेत. भारलेल्या त्या वातावरणात नरवीरांची पालखी त्या धारातीर्थावर ठेवली. धारातीर्थाला साष्टांग दंडवत घातला. भरलेल्या अंतःकरणानं श्री. शिवराय आणि नरवीरांचा जयघोष केला. जणू हा जयघोष आकाश भेदून गेला. पालखी उचलून खांद्यावर घेतली. नरवीरांच्या वंशजांनीही खांद्यावर घेतली. जणू इतिहासाची प्रेरणाच आमच्या खांद्यावर विराजमान झाली. डोळे भरून आले. मनात काहूर माजलं, 'कोणतं पुण्य फळाला आलं? आज हा योग घडला. नरवीरांची पालखी वाहण्याचं भाग्य मिळालं!' 

 पहाटेच्या त्या मंद प्रकाशात, माथ्यावरच्या वाऱ्यात ही पालखी कल्याण दरवाजाकडं निघाली. अविस्मरणीय अनुभव... 

 सिंहगडावर असं काही अनुभवायला मिळेल हे ध्यानीमनीही नव्हतं. त्याच भारावलेपणात पहिल्या कल्याण दरवाजाशी पोचलो, पायऱ्यांच्या उतरंडीनं दुसरा कल्याण दरवाजाही पार केला आणि सुरू झाला सुभेदार तानाजींच्या पुण्ययात्रेचा खडतर व रोमांचकारी पुण्य प्रवास. एव्हाना पूर्व क्षितिजाकडील रक्तवर्ण उजळू लागला होता. सिंहगडाच्या दक्षिण आणि पश्‍चिमेच्या डोंगररांगासुद्धा प्रकाशमान होऊ लागल्या होत्या. दक्षिणेकडच्या त्या अफाट डोंगरधारा ओलांडून आमची पालखी जाणार होती, दक्षिणेकडं राजगडाच्या बाजूला. उजव्या हाताला सिंहगडाचा बेलाग कडा आणि त्यावरची तटबंदी. पश्‍चिमेला अगदी पाबेखिंडीपर्यंतच्या खोल दऱ्या आणि या साऱ्या सह्याद्री शिल्पामधून राजगड पायथ्याच्या दिशेचा पालखीप्रवास. डोंगरदांडांवरची ती अंतहीन वाट कधी छातीवरची चढाई कधी दरीच्या काठावरची जेमतेम पाऊलवाट, साऱ्या परिसराला स्थानिक नावेही रोमांचकारी. मन नकळत साडेतीनशे वर्षं मागं गेलं. खंडूजी नाईक... घेरे सरनाईक, का कुणास ठाऊक आठवले. या डोंगरदऱ्यांवर त्यांचीच हुकूमत. नरवीरांना उत्तुंग डोणागिरी कडा चढून जाण्यास त्यांनीच तर मदत केली. मावळ्यांच्या डोणागिरी चढून जाण्याच्या कल्पनेनं मन थरारून उठलं. एका मागून एक डोंगरमाथ्यांची चढाई-उतराई सुरूच होती. आता दूर दक्षिणेला डोंगरांपलीकडं राजगड दिसू लागला. त्याचा बालेकिल्ला, पद्मावती माची आणि संजीवनीची धार दिसू लागली होती. अजून चढाई आणि तेवढीच घसाऱ्याची उतराई सुरूच होती. आता सूर्य चांगलाच वर आला होता. उजवीकडचा तोरणाही आता दिसू लागला होता. खाली डावीकडं विंझरची धनगरवाडीही ठिपक्‍यासारखी दिसू लागली होती. आता पालखीचा पुण्यप्रवास तीव्र उताराचा सुरू झाला होता. विराण डोंगरउतार, त्या डोंगरउतारावर वाळलेल्या गवताची दुलई आणि मधून उतरणारी घसाऱ्याची डोंगरवाट. पाठीमागचा सिंहगड डोंगररांगांच्या आड केव्हाच दडून गेला होता. आता वाडीतील लगबग जाणवू लागली होती. आम्ही अजूनही डोंगराच्या उंच माथ्यावरच होतो. जमलेले गावकरी या पालखी यात्रेकडं विस्मयानं पाहत होते हे दिसत नव्हतं, पण जाणवत मात्र होतंच. तीव्र डोंगरउतार संपून आता विरळझाडीची वाडीची वाट सुरू झाली होती. तीव्र नसला तरी अजूनही उतार होताच. फक्त पायाखाली घट्ट जमीन होती. पालखी वाडीच्या पंढरीत पोचली.

फोटो फीचर

संबंधित बातम्या