उत्तम आरोग्य हाच पाया

डॉ. अविनाश भोंडवे
मंगळवार, 28 जुलै 2020

करिअर निवडल्यावर समोर येणाऱ्या प्रत्येक टप्प्यातून पुढे जाताना बौद्धिक, व्यावहारिक चातुर्य, कार्यक्षमता, सातत्य, नेतृत्वगुण, आवश्यक असलेली सॉफ्ट स्किल्स अशा अनेक गोष्टींची गरज भासते. मात्र, यशस्वी कारकिर्दीतील हे टप्पे ओलांडताना, त्यातील यशापयश पचवत पुढे जाताना आणि मिळालेल्या यशाचा आनंद घेताना एका गोष्टीची नितांत गरज असते, ती म्हणजे उत्तम आरोग्य.

उत्तम करिअर निवडणे, त्यासाठी जिवापाड मेहनत घेणे, करिअरची सुरुवात झोकून देऊन करणे, पायरी पायरी चढत सर्वोच्च स्थान मिळवणे आणि यश मिळवल्यावर ते टिकवून ठेवणे हे आजच्या जीवनातले करिअरविषयक टप्पे आहेत. पैशांवर आधारलेल्या आजच्या व्यावहारिक जगात प्रत्येकालाच यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा सांगोपांग विचार करावाच लागतो.

 करिअर निवडण्याच्या टप्प्याला विद्यार्थ्याच्या बुद्धीचे पैलू, त्याचा मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक कल महत्त्वाचा असतो. अनुभवी तज्ज्ञांचे त्यासाठी मिळणारे मार्गदर्शनही महत्त्वाचे असते. मात्र, करिअर निवडल्यावर समोर येणाऱ्या प्रत्येक टप्प्यातून पुढे जाताना बौद्धिक, व्यावहारिक चातुर्य, कार्यक्षमता, सातत्य, नेतृत्वगुण, आवश्यक असलेली सॉफ्ट स्किल्स अशा अनेक गोष्टींची गरज भासते. यशस्वी कारकिर्दीतील हे टप्पे ओलांडताना, त्यातील यशापयश पचवत पुढे जाताना आणि मिळालेल्या यशाचा आनंद घेताना एका गोष्टीची नितांत गरज असते, ती म्हणजे उत्तम आरोग्य. नेमक्या या गोष्टीचा यशाची शिखरे काबीज करताना विसर पडतो. मिळालेल्या प्रत्येक यशाबरोबर प्रकृतीची एकेक तक्रार डोके वर काढू लागते आणि यश उपभोगायच्या काळात शरीर विविध आजारांचे आगार होऊन बसते. त्यामुळे उत्तम आणि भक्कम आरोग्य हा कोणत्याही यशस्वी करिअरचा पाया ठरतो. साहजिकच करिअर कोणतेही निवडा, पण त्यात यश मिळवायचे असेल, नाव कमवायचे असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल, तर त्याकरिता आरोग्याचे अचल अधिष्ठान असणे आवश्यक ठरते.

आरोग्याची पंचसूत्रे
या जगातल्या कोणालाही उत्तम आरोग्य मिळवायचे असेल, तर त्याने पाच सूत्रांचे पालन करायला हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम, योग्य काळ आणि योग्य वेळी विश्रांती, व्यसनांपासून दूर राहणे, मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे. या पंचसूत्रांचे पालन करण्यासाठी विद्यार्थी दशेपासून काही चांगल्या सवयी अंगात मुरवणे आवश्यक ठरते.

आहार  
     सकाळी नाश्ता केला पाहिजे. त्यात दूध घेतलेच पाहिजे. एखादे ताजे फळ हवे. शिवाय कार्बोहायड्रेट्ससाठी पोळी, पोहे, पाव, टोस्ट अशांपैकी काही असलेच पाहिजे. केवळ सकाळी चहा आणि बिस्किटे खाणे हा नाश्ता नव्हे. नियमित नाश्ता घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची ग्रहणशक्ती नाश्ता न करणाऱ्या मुलामुलींपेक्षा जास्त असते हे संशोधनात सिद्ध झाले आहे.

  • दुपारी आणि रात्री वेळेवर जेवण केले पाहिजे. सायंकाळी पुन्हा काही स्नॅक्स घ्यावेत.
  • दुपारचे जेवण मध्यम असावे. रात्री अगदी कमी खावे. आहारात पोळी, भाजी, वरण-भात असणे आवश्यक असते. नुसता भात खाणे म्हणजे जेवण नव्हे. 
  • आहारात प्रथिने अधिक हवीत. मांसाहारी किंवा मिश्र आहार घेणाऱ्या किशोरांनी अंडी, मटन, चिकन, मासे आठवड्यातून किमान दोनदा खावेत. शाकाहारी मुलामुलींनी मात्र डाळी, उसळी, मोड आलेली धान्ये, सोयाबीन, टोफू अशासारख्या पदार्थांचा समावेश रोजच्या रोज आपल्या आहारात करायला हवा. 
  • बर्गर, पिझ्झासारखे पदार्थ; भजी, वडे, वडापाव असे तळलेले पदार्थ, हॉटेलमध्ये खाणे हे सर्व पंधरावीस दिवसांतून एकदा किंवा कधीतरी ठीक असते, पण शक्यतो ते टाळावे. घरचे जेवण कधीही उत्तम. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि बाहेरगावी एकटे राहणाऱ्यांनी हॉटेलपेक्षा चांगल्या मेसच्या जेवणावर भर ठेवावा. फास्टफूड, जंकफूड, डबाबंद पदार्थ, वेफर्स, पॅक्ड स्नॅक्स शक्यतो टाळावे.
  • दिवसभरात रोज दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. चहा, कॉफी, कोल्डड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स टाळावीत.

व्यायाम 
नियमित व्यायामाची सवय ठेवावी. व्यायामाचे उद्दिष्ट फिटनेस राखणे हेच असावे. बलदंड शरीर, सिक्स पॅक्स, कमावलेले दंड वगैरे गोष्टींचा अनेक तरुणांना सोस असतो. शरीरसौष्ठव कमावणे हे वेगळे करिअर असू शकते, मात्र अन्य करिअरमध्ये एक उत्तम प्रभावी व्यक्तिमत्व कमावण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो, पण माफक प्रमाणातच. त्यामुळे नित्य व्यायामाचा पर्याय तीस मिनिटे ते एक तास रोज एवढा असावा.

व्यायामात धावणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे असे एरोबिक व्यायाम आणि जिममधील व्यायाम, वेट ट्रेनिंग, डम्बेल्स, जोर-बैठका, पुलअप्स, पुशअप्स अशा एनेरोबिक व्यायामाचे समान मिश्रण असावे. एरोबिक आणि एनेरोबिक व्यायाम दिवसाआड करणे श्रेयस्कर ठरते. परीक्षेच्या काळात व्यायाम बंद करण्याऐवजी वेळ कमी करावी. पूर्ण थकवा येण्याइतका व्यायाम करू नये. सूर्यनमस्कार, योगासने, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम हे आरोग्यासाठी हितकारी असतात. पण या गोष्टींचा एरोबिक आणि एनेरोबिक व्यायामांना पूरक म्हणून वापर करावा. शरीर कमावण्यासाठी फक्त व्यायाम आणि आहारातली प्रथिनेच वापरावीत. बाजारात मिळणाऱ्या, बलदंड मल्लांची चित्रे असलेल्या प्रोटीन पावडर्सचा वापर अजिबात करू नये.

वजन सांभाळणे 
आज जीवनशैलीचे आजार म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि यातून उद्‌भवणारे इतर विकार. यांचे मूळ कारण बेसुमार वजनवाढ हेच असते. आजमितीला शालेय विद्यार्थ्यांमध्येदेखील अतिरिक्त वजनवाढ मोठ्या प्रमाणात आढळते आहे. विशी-पंचविशीतील तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे खूप रुग्ण आढळू लागले आहेत. कोणत्याही करिअरमध्ये यश मिळवताना आणि मिळाल्यावर ते उपभोगताना या आजारांनी त्या यशाची चव दीर्घकाळ चाखता येत नाही. त्यामुळे वजन ताब्यात ठेवणे हे नितांत गरजेचे आहे. विद्यार्थीदशेपासून वजनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपले आदर्श वजन जाणून घ्यावे आणि स्थूलत्व टाळावे. समतोल आहार आणि नियमित योग्य व्यायाम यानेच वजन ताब्यात ठेवावे. कोणत्याही प्रचलित डाएटच्या किंवा वजन कमी करायच्या उपचारांना बळी पडू नये. याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला शिरोधार्य मानावा.

विश्रांती
नियमित झोप घेणे आणि ती आवश्यक तेवढा काळ मिळणे आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यावश्यक बाब असते. प्रत्येकाच्या आदर्श झोपेच्या काळात थोडा बहुत फरक असतोच, पण साधारणतः पंचविशीपर्यंत आठ तास आणि त्यानंतर सात तास असे झोपेचे सर्वसाधारण गणित असते. मुख्य म्हणजे ही झोप रात्रीचीच घेणे आणि नियमितपणे ठराविक वेळेला झोपणे आणि ठराविक वेळेला जागे होणे याची सवय लावून घेणे आवश्यक असते. जागरणे म्हणजे आरोग्याला एक शापच असतो. परीक्षेच्या काळातही जागरणे टाळावीत. कारण जागरणातून आम्लपित्त वाढणे, डोके दुखणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे हे घडतेच. सतत केलेल्या जागरणाचा परिणाम तब्येतीवर होऊन सर्दी, खोकला, ताप येणे असे आजार नित्य घडू शकतात. डोळ्यांचे विकारही वाढू शकतात. रात्रभर जागणे आणि दिवसा झोपणे टाळावे. तसेच आठवडाभर कमी झोपून रविवारी लोळत पडणेदेखील टाळावे. अनेकांना चारपाच दिवस जागरणे करून शिल्लक राहिलेला झोपेचा हप्ता पुढच्या दिवसांत पुरा करण्याची सवय असते, ही सवय टाळावी.

विश्रांती म्हणजे फक्त झोपच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना अधूनमधून ''ब्रेक घेणे'' हीसुद्धा विश्रांतीच असते. यामध्ये जेव्हा सतत अभ्यास करताना साधारणतः पन्नास मिनिटे सलग बसल्यावर, वाचन केल्यावर दहा मिनिटे थोडे फिरून येणे, पाणी पिणे, टॉयलेटला जाऊन येणे यासाठी वापरावा. अशाने पुढच्या कामातली एकाग्रता वाढते. 

कित्येकदा काही दिवस सतत काम केल्यानंतर, विशेषतः परीक्षा झाल्यानंतर असा एक-दोन दिवसांचा ब्रेक आवश्यक असतो. पुढच्या आयुष्यात करिअरची सुरुवात झाल्यावर, दीर्घकाळ काम केल्यावर अशाप्रकारचे ब्रेक्स घेणे हे आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना, कार्यशक्तीला आणि एकूणच तब्येतीला उत्तम ठरते. 

व्यसने टाळणे 
कोणतेही व्यसन म्हणजे आरोग्याचा शत्रूच. आज अनेक क्षेत्रांत नव्याने करिअर सुरू केलेल्या तरुणांना या व्यसनांमुळे आरोग्याचेच नव्हे, तर कामातल्या एकाग्रतेत, कार्यक्षमतेत आणि वेळेवर काम संपवण्याच्या डेडलाईन्स पाळताना गंभीर समस्या उभ्या ठाकतात. तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान या व्यसनांची सुरुवात तारुण्यात होऊ शकते. आजच्या आधुनिक जीवनात ड्रग्ज किंवा नशील्या पदार्थांचे, तसेच काही मादक औषधांचे व्यसनही पाहायला मिळते. या व्यसनांच्या आहारी जाणे तर वाईटच, पण शालेयदशेपासून ती टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. व्यसने टाळण्याबाबत विद्यार्थ्यांची मनोभूमिका पक्की होण्यासाठी शिक्षक, पालक, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि मुलांचे ज्येष्ठ मित्र यांचा सहभाग खूप गरजेचा असतो.

व्यसने केवळ नशील्या पदार्थांचीच असतात असे नव्हे, तर आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, मोबाइल, टेलिव्हिजन यांची व्यसने मोठ्या प्रमाणात दृष्टोत्पत्तीस पडतात. त्यात मोबाइल सतत वापरणे, सोशल मीडियावर सतत ऑनलाइन असणे, संगणकावर गॅम्बलिंग, पॉर्नसाईट्सच्या आहारी जाणे वगैरे सवयी या व्यसनातच मोडतात. त्यातून भावी जीवनातल्या करिअरला आडकाठी आणणाऱ्या खूप गंभीर प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकदा फास्टफूड, जंकफूड, फेरीवाल्याकडील खाणे अशी व्यसनेही आढळतात. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम नक्कीच होऊ शकतो.

मानसिक आरोग्य 
संपूर्ण आरोग्याच्या व्याख्येत मानसिक आरोग्याचा समावेश आहे. कोणत्याही करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी मानसिक स्थैर्य अत्यावश्यक असतेच. शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्यसुद्धा कमवावे लागते. मात्र, शारीरिक आरोग्यातल्या त्रुटी या बाहेरून समजतात. म्हणजे वजन कमी असणे, स्थूलत्व, चेहरा फिकट दिसणे, ताप येणे, सतत कसला ना कसला आजार होणे अशी बाह्य लक्षणे लगेच लक्षात येतात; पण मानसिक अस्थैर्य आणि मानसिक दोष हे पालकांनी आणि शिक्षकांनीच वेळेवर ओळखून त्याकरता उपाय योजना कराव्या लागतात. आजच्या जीवनात प्रत्येकालाच ताणतणावांना सामोरे जावे लागते. करिअर कोणतेही असले, तरी तणाव हा असतोच. जितक्या वरच्या पायरीवर पोचू तेवढे ताणतणाव अधिक. त्यामुळे ताणतणावांना सामोरे जाणे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे खूप आवश्यक वाटते. करिअरमध्ये कोणताही स्वभावदोष हा प्रगतीतील मोठा अडथळा ठरू शकतो. सर्वसाधारणपणे आपल्याकडे षड्‌रिपू समजले जाणारे दोष म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या दोषांना ताब्यात ठेवणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे चिंता, नैराश्य, ऑब्सेसिव्ह बिहेविअर अशा मानसिक विकारांचे वेळीच इलाज करावे लागतात. अन्यथा पुढील काळात ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

मानसिक स्थैर्य आणि प्रसन्नता मिळण्यासाठी, मानसिक ताणतणावांना काबूत ठेवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मेडिटेशन शिकून घेणे गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासाठी ज्याप्रमाणे रोज थोडा व्यायाम नियमितपणे करणे आवश्यक असते, तसेच मानसिक स्थैर्याकरिता नियमित मेडिटेशनची सवय लावून घेणे गरजेचे असते. कोणत्याही पद्धतीची ध्यानधारणा किमान १० मिनिटे केल्यास पुढील आयुष्यात त्याचे उत्तम फायदे दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर एखाद्या कलेची जोपासना करणे किंवा उत्तम छंद बाळगणे याचाही मानसिक आरोग्याला सकारात्मक फायदा होतो. 

आरोग्य शिक्षण 
दुर्दैवाने आपली शैक्षणिक पद्धती पूर्णपणे परीक्षा आणि त्यातील गुणांवर अवलंबून असते. यात आरोग्य शिक्षणावर भर दिला जात नाही. जे आरोग्याचे धडे शाळेच्या पाठ्यपुस्तकात असतात, त्यांना परीक्षेपुरते घोकले जाते आणि नंतर सोयीस्करपणे विसरले जाते. त्यामुळे आजचे विद्यार्थी पदवी मिळवतात, पदव्युत्तर शिक्षणही घेतात, पण आरोग्य साक्षरतेचा विचार केला तर त्यांच्यात निरक्षरताच जास्त आढळून येते. शाळेच्या परीक्षा, क्लासेस, मॉडेल पेपर्स, चाचणी परीक्षा यांना जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढे आरोग्यदायी सवयींना दिले जात नाही. त्यामुळे हात स्वच्छ धुणे, स्वच्छ आंघोळ करणे, कपडे रोजच्या रोज धुतलेले घालणे, घरी आल्यावर पादत्राणे बाहेर ठेवणे, बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळा पक्क्या ठेवणे, रोगप्रतिबंधक उपाय करणे याकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. आपल्या मुलाच्या करिअरबद्दल सतत दक्ष राहणाऱ्या पालकांनी इकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. शाळेतून कॉलेजात जातानाच्या वयाला पौगंडावस्था म्हणतात. यामध्ये अनेक मुलामुलींच्या वागण्यात बदल घडतो. या विषयीचे अज्ञान अनेक प्रश्न निर्माण करते. त्यामुळे अनेकदा अनेक अडचणी आणि कटू प्रसंग उद्‌भवत असतात. सबब लैंगिक शिक्षणसुद्धा शालेय वयात सर्व शाळांत देणे गरजेचे आहे.

भारताचे भविष्य घडवण्याचे कार्य आजची युवा पिढी करणार आहे. त्यांची करिअर्स केवळ त्यांच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या प्रगतीची निशाणी ठरणार आहे आणि ही पिढी जर आरोग्यसंपन्न झाली, तर त्यांचे करिअर उज्ज्वल होईलच, पण त्यांच्या कुटुंबांचे आणि पर्यायाने समाजाचे चित्र सकारात्मक बदलू शकते.

संबंधित बातम्या