हवामान बदलाच्या लढ्यात आपली भूमिका

डॉ. गुरुदास नूलकर
सोमवार, 24 जानेवारी 2022

कव्हर स्टोरी

हवामान बदलाचे संकट आता फक्त राजकीय आणि वैचारिक चर्चेचा विषय राहिला नाही तर हे संकट आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.  या संकटाला तोंड देण्यास अनेक पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतील आणि यात प्रत्येक नागरिकाचे योगदान अपेक्षित आहे.

पृथ्वीच्या साडे चार अब्ज वर्षांच्या इतिहासात अनेकदा 
मोठे हवामान बदल झाले आहेत. इतकेच नव्हे तर पाच वेळा ‘मास एक्सटींक्शन’चीही नोंद आहे. त्यामध्ये सत्तर ते नव्वद टक्के प्रजाती लुप्त झाल्या होत्या. नैसर्गिक हवामान बदलाचा कालावधी लाखो वर्षांचा असतो, पण आज चर्चेत असलेला हवामान बदल मात्र असा नाही. मानवाने खनिज इंधनाचा वापर सुरू केल्यापासून पृथ्वीवरील हवामानात अत्यंत वेगाने बदल होत गेला. हवामान वैज्ञानिकांना पूर्वीच याची चाहूल लागली होती. वातावरणातील ओझोन कवचाला खिंडारं पडली तर त्याचा पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होईल, 

अशी धोक्याची सूचनाही त्यांनी दिली होती. तरीही जागतिक स्तरावर याची दखल फार उशिरा घेतली गेली. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे साधारण १९८० च्या दशकात आंतरराष्ट्रीय चर्चेत येऊ लागले. त्याचे रूपांतर राजकीय अजेंड्यात होण्यासाठी अजून काळ लोटला.

गेल्या काही दशकापासून हवामान बदलामुळे होणाऱ्या घटनांची तीव्रता आणि वारंवारता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतात १९७० ते २००५ या साडेतीन दशकांच्या काळात दुष्काळ, 

पूर, चक्रीवादळं अशा अडीचशे तीव्र आपत्तींची नोंद झाली होती, तर २००५ नंतरच्या फक्त पंधरा वर्षात ३१० घटना नोंदल्या गेल्या. गेल्या दोन वर्षात तर दर महिन्याला किमान एक तीव्र स्वरूपाची घटना घडत आहे. 

पंधरा वर्षांत ७९ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी भीषण दुष्काळ पडला 
आणि सुमारे १४ कोटी लोकांवर संकट ओढवले. या शतकाच्या अखेरीस उष्ण दिवस आणि उष्ण रात्रींची संख्या ५५ ते ७० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या घटनांमुळे मानवी आरोग्य, शेती, अर्थव्यवस्था, उपजीविका, राष्ट्राचा विकास अशा सर्वांवर धोक्याचे सावट येते. हवामान बदलाचे संकट आता फक्त राजकीय आणि वैचारिक चर्चेचा विषय राहिला नाही तर हे संकट आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. याला तोंड देण्यास अनेक पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतील.  ‌आणि यात प्रत्येक नागरिकाचे योगदान अपेक्षित आहे. 

हवामान बदलाचा वेग वाढला कसा? 
आपण ज्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो, खरंतर ती मानवी हस्तक्षेपांची निष्पत्ती आहे. शेकडो वर्षे चालू असलेली जंगलतोड, खनिज उत्खनन, प्रदूषण आणि तीव्र रासायनिक शेती अशा हस्तक्षेपांमुळे  पृथ्वीच्या वातावरणात झपाट्याने बदल होत गेले. या सर्व गोष्टी अर्थचक्राशी निगडित आहेत. अर्थव्यवस्थेत नैसर्गिक संसाधनांचा वापर करून वस्तू आणि सेवांचे उत्पादन होते. यामध्ये हरितगृहवायूचे उत्सर्जन होते, जे वातावरणात महत्त्वाचे प्रदूषक ठरतात. सूर्यप्रकाशाच्या इन्फ्रारेड कक्षातील ऊर्जा शोषून घेऊन हे वायू वातावरणाचे तापमान वाढविण्यास कारणीभूत ठरतात. कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, फ्लूरिनेटेड वायू अशा अनेक हरितगृहवायूंचे उत्सर्जन होत असते. आर्थिक वृद्धीच्या जागतिक स्पर्धेत यांचे उत्सर्जन वाढतच गेले आणि त्याच बरोबर तापमान! झपाट्याने बदलत चाललेले हवामान निसर्गसृष्टीसाठी घातक ठरते. यामुळे नैसर्गिक परिसंस्थांची उत्पादकता आणि कार्यक्षमता कमकुवत होऊन पृथ्वीची सजीवसृष्टी पोसण्यासाठी क्षमता घटत जाते. याचा आपल्या अस्तित्वालाच थेट धोका निर्माण झाला आहे.

यावर उपाय करणार कोण? 
सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने हा एक गहन आणि क्लिष्ट प्रश्न आहे. याचे निवारण आंतरराष्ट्रीय सहकार्यातून आणि सरकारी उपाययोजनेतूनच होऊ शकते, असे वाटणे साहजिक आहे. प्रशासन, कायदे-कानून, धोरणे अशा सर्व स्तरांवर सरकारला काम करावे लागणार आहे, यात शंकाच नाही. तरीही फक्त सरकारी हस्तक्षेपातून किंवा संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमातून हा प्रश्न सुटणार नाही. त्याच बरोबर, या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय सहकार्य किती अनिश्चित आहे, हे आपल्याला प्रत्येक कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या सभेतून दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्र, धर्म, जात असे मानव-निर्मित भेदभाव बाजूला ठेऊन पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाचे यात योगदान अनिवार्य आहे. फक्त संयुक्त प्रयासांतूनच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

वैयक्तिक उपाययोजना कशी असावी? 
प्रसार माध्यमांमुळे हवामान बदलाची समस्या आज बहुतांशी लोकांपर्यंत पोहोचली आहे. परंतु यात प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका नेमकी काय असावी, याची अनेकांना कल्पना नाही. सर्वसामान्यांपर्यन्त हा मुद्दा पोचणे अत्यावश्यक आहे. दैनंदिन जीवनात बदल करून आणि पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्रचलित सवयी बदलून आपल्याला परिवर्तन घडवून आणता येईल. त्यासाठी प्रथम हरितगृहवायू उत्सर्जन कोणत्या क्रियाकलापातून होत आहे, हे जाणून घ्यायला हवे. वीज निर्मिती, शेती, दळणवळण, औद्योगिक उत्पादन, घनकचरा आणि सांडपाणी, व्यावसायिक आणि रहिवासी इमारती यातून मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत असते. हे कमी करण्यासाठी कायद्यात योग्य बदल करून त्याची अंमलबजावणी करणे हे सरकारचे काम आहे, पण असे बदल होण्याची वाट न पाहता वैयक्तिक स्तरावर आपल्याला काय करता येईल ते पाहू. 

या मुद्द्यावर परिणामकारक पावले उचलण्यासाठी खरंतर आपल्याला प्रत्येक वस्तूचा ‘कार्बन फूटप्रिंट’ माहीत असणे गरजेचे आहे. एखाद्या वस्तूच्या संपूर्ण जीवनचक्रात किती हरितगृहवायूंचे उत्सर्जन झाले आहे, त्याचा कार्बन डायऑक्साईड सममूल्य आकडा म्हणजे त्या वस्तूचे कार्बन फूटप्रिंट. हा आकडा माहीत नसला तरीही आपला वैयक्तिक किंवा कौटुंबिक कार्बन फूटप्रिंट कमी करणे शक्य आहे.  

कसा कराल आपला कार्बन फुटप्रिंट कमी? 
विजेचा वापर कमी करणे हा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. एअर कंडिशनर, फ्रिज, ओव्हन, वॉटर हिटर, इस्त्री यात सर्वाधिक वीज खर्ची पडते. अशा उपकरणांचा वापर ठरवून कमी करता येतो. जुनाट यंत्रणेला जास्त वीज लागते, त्या उलट अद्ययावत उपकरणांचा कार्बन फुटप्रिंट कमी असतो. अनेकदा या वस्तूंचे विक्रेते आपल्याला जास्त क्षमतेची उपकरणे घेण्यास आग्रह धरतात. आपली गरज किती आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात किमान सात-आठ महिने तरी सौर ऊर्जेवर पाणी तापू शकते. पिण्याच्या थंड पाण्यासाठी वर्षभर माठाचा वापर करता येतो. रात्रीच्या वेळेस ओव्हन आणि टीव्ही बंद केल्यास विजेची बचत होते. चोकच्या जुन्या पद्धतीच्या ट्यूब काढून एलईडी बल्ब व ट्यूब वापरणे अधिक योग्य आहे. आज मोशन सेन्सर स्वस्त झाले आहेत. त्यांचा वापर सार्वजनिक इमारतींमधील लॉबी, पॅसेज किंवा स्वच्छतागृहातील दिव्यांसाठी करता येतो. आपला विजेचा वापर मोठा असल्यास ‘नेट मीटरिंग’ स्कीम खाली सौर ऊर्जेने वीज निर्मिती करून विद्युत मंडळाला विकत देता येते. यात वीज आणि पैशाची बचत होते. आपल्या वीज बिलावर गेल्या सहा महिन्याचा विजेचा वापर दिसतो. हा मापदंड ठेऊन पुढील सहा महिने वापर किती कमी करावा हे आपल्यालाच ठरवता येते. 

दळणवळणातून कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन सतत होत असते. वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक वापरणे, जवळच्या प्रवासासाठी सायकलचा वापर करणे किंवा चालत जाणे, असे बदल करून आपला कार्बन फूटप्रिंट कमी करता येतो. आज गूगल किंवा अॅप स्टोअर वर कारपूलिंगचे अनेक मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. आपल्या ऑफिसच्या दिशेने जाणाऱ्या खासगी वाहनांची माहिती यावर मिळते आणि एकत्र प्रवास करून एकट्यासाठी गाडीचा वापर टाळता येणे शक्य होते. चार गाड्यांऐवजी एकच गाडी रस्त्यावर धावली की इंधनाचा वापर आणि रस्त्यावरील वाहतूकही कमी होते. अनेक मोठ्या आयटी कंपनीतून आणि इंजिनिअरिंग कारखान्यातून कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा उपलब्ध असते. याचा वापर करण्यात थोडी असुविधा नक्कीच होते, पण हवामान बदलाच्या लढाईत आपल्या योगदानाची जाणीव ठेवून हा पर्याय निवडता येतो. आज इलेक्ट्रिक व्हेईकल, म्हणजे विद्युत वाहनांचे युग येऊ घातले आहे. या वाहनांमुळे आपल्या शहरातील प्रदूषण नक्कीच कमी होते, पण जर यांचे चार्जिंग कोळशावर उत्पादित विजेने केले तर विजेची मागणी वाढून तिथले प्रदूषण वाढते. त्यामुळे चार्जिंगसाठी अक्षय ऊर्जेचा वापर अधिक योग्य ठरतो. पण अजून हे तंत्रज्ञान पूर्णता विकसित नाही. 
शेतीव्यवसायातून मोठ्या प्रमाणात हरितगृहवायू उत्सर्जन होत असते. यात मोठा वाटा पशुपालन व्यवसायाचा आहे. त्यामुळे आज शाकाहारी खाद्यसंस्कृतीचा प्रसार खुद्द हवामान वैज्ञानिकांकडून होत आहे. 

विकसित देशात ‘व्हीगन’ आणि ‘व्हेजिटेरियन’ हॉटेल्स बरोबरच ‘लोकॅलिटेरियन’ म्हणजे स्थानिक शेतमालाचा वापर करणारी हॉटेल्स दिसू लागली आहेत. शेतमालाच्या वाहतुकीत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते, ते टाळण्यासाठी आपल्या पंचक्रोशीत उगवणारा शेतमाल वापरल्यास आपला कार्बन फूटप्रिंट कमी होतो. सेंद्रिय शेतीत औद्योगिक प्रक्रियेतून बनलेली खाते आणि कीटकनाशक वापरले जात नाहीत. त्यामुळे मातीत आणि पाण्यात विषारी रसायने मिसळत नाहीत. सेंद्रिय शेतमाल जरा महाग असतो कारण या पद्धतीत कष्ट आणि खर्च जास्त आहे, पण रासायनिक शेतीपेक्षा याचा कार्बन फूटप्रिंट अत्यल्प असतो. सेंद्रिय अन्न आपल्या आहारात आले तर कुटुंबाचे आणि निसर्गाचे आरोग्य जपले जाते. 

औद्योगिक उत्पादन हा सुद्धा हरितगृहवायूंचा एक मोठा स्रोत आहे. बाजारपेठेतील मागणी वाढली की देशाची आर्थिक वृद्धी होत राहते. मुक्तबाजारपेठ अर्थव्यवस्थेत सर्वच कंपन्या आपला माल विकण्याच्या शर्यतीत उतरतात आणि उपभोगाचे युग जन्माला येते. पण अशा तीव्र स्पर्धात्मक बाजारपेठेत अनेक क्षुल्लक वस्तूंचे उत्पादन होत असते. यामध्ये मर्यादित नैसर्गिक संसाधनांचा अयोग्य वापर तर होतोच, पण घातक प्रदूषणही होत असते. आज बाजारातून किती अनावश्यक वस्तूंची विक्री होत आहे, हे मॉल आणि सुपरमार्केटमधून चालणाऱ्या ‘वीकएंड शॉपिंग’ मधून दिसून येते. अशा वस्तूंची मागणी वाढली की आपल्या जीवनशैलीचा कार्बन फूटप्रिंट वाढत जातो. हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी विवेकी उपभोग हा अत्यंत आवश्यक आणि परिणामकारक मार्ग आहे, याची वाच्यता होत नाही. आपल्या गरजा काय आहेत आणि आपण काय विकत घेत आहोत, किती प्रमाणात विकत घेत आहोत, याचे तारतम्य असणे आवश्यक आहे. आपण नवनवीन मोबाईल फोनची मॉडेल्स बदलत राहतो तेव्हा गरज नसताना मागणी वाढते. अशी मागणी हवामान बदलाला पोषक असते. घरगुती सफाईसाठी वापरली जाणारे द्रव्य, साबण, शांपू, टूथपेस्ट ही सर्व रसायने आहेत. त्यांच्या उत्पादनात हरितगृहवायु उत्सर्जन होते आणि त्यांचा वापर होऊन गेल्यावर ते आपल्या नद्या प्रदूषित करतात. त्याऐवजी स्वच्छतेसाठी रिठा, शिकेकाई, दंतमंजन, व्हिनिगर, मीठ अशा नैसर्गिक वस्तु सहज वापरता येतात. या वस्तूंची मागणी वाढली की त्याला लागणाऱ्या झाडांचे संवर्धन होते. कुटीर उद्योगातून बनणाऱ्या वस्तूंचे कार्बन फूटप्रिंट अत्यल्प असते. 

घनकचरा आणि सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नाही तर त्यात मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जन होते. हा वायू कार्बन डाय-ऑक्साइड पेक्षा पंचवीस पट अधिक घातक आहे. आज दुर्दैवाने भारतात कोणत्याही शहरात योग्य रीतीने व पूर्णाशांने घनकचरा किंवा सांडपाणी व्यवस्थापन होत नाही. आपली शहरे वाढत गेली पण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची क्षमता मात्र त्या प्रमाणात वाढली नाही. मूलभूत सुविधा कमी पडत गेल्या तसा शहराचा कचरा आजूबाजूच्या गावांकडे वळवला गेला आणि यापासून हरितगृहवायू उत्सर्जन चालू असते. तसेच, प्रक्रिया न करता सांडपाणी नद्यांमधून सोडले जाते. यात कधी बदल होईल याची वाट न बघता प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरांत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करणे सहज शक्‍य असते. घनकचऱ्याचे वर्गीकरण करणे, ही त्याची पहिली पायरी. नैसर्गिक कचरा (स्वयंपाक घरातील कचरा, याला ओला कचरा असेही म्हटले जाते) आणि मानवनिर्मित कचरा (प्लॅस्टिक, काच, बॅटरी, उपकरणे) असे दोन गट केले तर सर्व नैसर्गिक कचऱ्याचे कम्पोस्टींग करून उत्तम प्रतीचे खत बनते. स्वतःचा ओला कचरा स्वतःच जिरविला तर प्रशासनाचा मोठा भार कमी होऊ शकतो आणि त्या प्रमाणात मिथेन उत्सर्जन कमी होते. स्वयंपाक घरातून निघणाऱ्या सांडपाण्यावर जैविक प्रक्रिया करून त्याचा बागेत पुनर्वापर करता येतो. जैविक प्रक्रियेत प्रदूषक शोषले जाऊन हरितगृहवायू उत्सर्जन कमी होते. 

आपल्या बागेतला किंवा परिसरातील पालापाचोळा जाळून टाकणे हे तर हवामान आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. यामुळे पानात साठलेला कार्बन आपण पुन्हा वातावरणात सोडून देतो. हे तत्काळ थांबविले पाहिजे. पालापाचोळ्यापासून उत्तम प्रतीचे खत बनते. ते बागेत टाकल्यास मातीला पोषण आणि सेंद्रिय कार्बन मिळतो.  

पर्यावरण पूरक जीवनशैली - एक कौटुंबिक सोहळा 
अशा प्रकारचे जीवनशैलीत बदल करणे निश्चितच सोपे नाही. काही बदल कष्टप्रद आहेत, तर काही सोईस्कर नसलेले. काही बदल करण्यास खर्च होईल, तर काहीतून बचत. पण अशा उपक्रमाचे नियोजन करण्याचा एक सोपा मार्ग आहे. एका कोऱ्या कागदावर चार रकाने काढा. रकान्यांना, ‘नाकारणे, कमी करणे, वाढविणे, थांबविणे’ अशी शीर्षके द्या. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून प्रत्येक रकान्याची यादी बनवा. आपल्या कुटुंबात कोणत्या गोष्टी नाकारता येतील? घातक रसायनांचा वापर नक्कीच थांबवता येईल, प्लॅस्टिक पिशव्या, डिस्पोझेबल कप, प्लॅस्टिक स्ट्रॉ अशा वस्तूंचा वापर नाकारता येईल. ज्या वस्तू पूर्णपणे नाकारता येत नाहीत त्या कमी करता येतील का? उदाहरणार्थ पेट्रोल आणि वीज. आठवड्यातील एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरता येईल. वीजेचा वापर कमी करता येईल. आपल्या कुटुंबात कोणत्या सवयी वाढविल्या पाहिजेत? उदाहरणार्थ सायकलिंग, किंवा जवळपास चालत जाणे, सेंद्रिय शेतमाल विकत घेणे या गोष्टी सहज वाढविता येतात. आपण कोणत्या गोष्टी नव्याने केल्या पाहिजेत? उदाहरणार्थ एलईडी बल्ब बसविणे, पाणी तापविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे, पिण्याच्या थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणे, या गोष्टी सहज करता येतील. अशी यादी करून प्रत्येक क्रियेसमोर शक्यतो सांख्यिक ध्येय लिहा. “जे मोजले जाते, त्यातच सुधारणा होते”, हे लक्षात ठेवा! अशा पद्धतीने तीन महिन्याचा कार्यक्रम बनवून फ्रिजवर किंवा रोज बघण्यात येणाऱ्या ठिकाणी लावून ठेवा. उपक्रम राबविण्यात कौटुंबिक आनंद घ्या. असे केल्याने हा प्रवास रोचक होईल. 

सामाजिक स्तरावर काय बदल करता येतील? 
अपार्टमेंट असो वा हाउसिंग सोसायटी, अशा ठिकाणी काही गोष्टी सहज शक्य होतात. सोसायटीमधील शाळेतील मुलांची टीम बनवून त्यांच्याकडून प्रत्येक घराचे वीज आणि पाणी वापराचे ऑडिट करून घेता येईल. असे आव्हान मुलांना आवडेल. वीजखाऊ उपकरणे आणि गळके नळ अशा गोष्टी यातून स्पष्ट होतील आणि बचतीच्या जागा सापडतील. स्वयंपाक घरातून निघणाऱ्या पाण्याचे वेगळे नळ काढून त्यावर जैविक प्रक्रिया करून त्याचा वेगळा साठा करता येतो. हे पाणी बागा तसेच लॉनसाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वापरता येते. बागेमध्ये कंपोस्टसाठी खड्डे केल्यास प्रत्येक घरातील ओला कचरा आणि बागेतील पालापाचोळा जिरविता येईल. यातून मिळणाऱ्या खतावर कढीपत्ता, मिरची, तुळस, अडुळसा, ओवा, कोरफड अशा उपयुक्त वनस्पती लावता येईल. 

प्रत्येक घरातून प्लॅस्टिकचे विलगीकरण केल्यास महिन्याअखेर मोठा साठा होतो. प्लॅस्टिकपासून इंधन बनवणाऱ्या (पायरॉलिसिस) कंपन्यांना हे विकले जाते. सार्वजनिक पॅसेज आणि जिन्यावर मोशन सेन्सरचे दिवे बसवून विजेची बचत होते. सोसायटीच्या फाटकाजवळ कापडी पिशव्या ठेवल्यास बाहेर जाताना सहज एक उचलून घेता येते, आणि दुकानाच्या प्लास्टिक पिशव्या नाकारता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिकाम्या अंगणात वृक्षारोपण करणे. झाडे दिवसभर कार्बन-डाय-ऑक्साईडचे शोषणाचे काम करत असतात. वातावरणातून हरितगृहवायू कमी करण्याचा हा विनामूल्य आणि खात्रीशीर उपाय आहे. 

आजही जगभरात लोकसंख्या, आर्थिक वृद्धी, जीवनशैली, ऊर्जेचा वापर, तांत्रिक प्रगती या गोष्टी वाढत असल्यामुळे हरितगृहवायू उत्सर्जनात वाढ होत आहे. जागतिक पातळीवर भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन फार कमी असले तरी आपल्या लोकसंख्येमुळे एकूण (अॅग्रिगेट) उत्सर्जनात आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. छोटे बदल करून प्रत्येक कुटुंबाने आपली जबाबदारी उचलली तर सरकारी उपाययोजनेला हातभार लागेल आणि या संकटातून सुटका होऊ शकेल. काही कुटुंब आपापल्या परीने छोट्यामोठ्या गोष्टी करीत आहेत. तरुण पिढीही नावीन्यपूर्ण उपाययोजना करून आपली भूमिका निभावत आहे. आता तातडीने असे परिवर्तन प्रत्येक घरातून हाती घेतले पाहिजे, तरच या भस्मासुरावर आपण मात करू शकू.

(लेखक सिंबायोसिस विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त आहेत.

संबंधित बातम्या