नोकऱ्या आणि अकलेचे प्रारूप

डॉ. श्रीराम गीत
मंगळवार, 28 जुलै 2020

या वर्षात नोकऱ्या, शिक्षण, परीक्षा, परदेशात शिकण्याचे स्वप्न, साऱ्यावर प्रचंड अशाश्‍वततेचे सावट आहे. अनिश्‍चितता पूर्वीही होती, नंतरही असेल. मग सध्याच्या काळाने अस्वस्थ होऊन गडबडून जाण्याचे काहीच कारण नाही. आपण उलट्या क्रमाने या साऱ्याकडे पाहूयात. नोकऱ्या, पदव्यांदरम्यानची वाटचाल, प्रवेश परीक्षांतून काय मिळते व काय घ्यावे, त्या कोणी घ्याव्या व यंदाच दहावीचा निकाल लागण्याच्या सुमाराला त्या १६-१८ वयाच्या कॉलेजात जायला उत्सुक मुलामुलींच्या पालकांसाठी हा ऊहापोह.

नोकरी मिळणे हेच मुळात कठीण झालेल्या काळात नोकऱ्या जाण्याच्या खाईत भारतीय लोटले गेले आहेत. मिळाले तर वृत्तपत्र किंवा अन्यथा टीव्ही वा मोबाइल सुरू केला, तर आज किती गेले हा आकडा अंगावर काटा आणतो आहे. त्यातच भर म्हणून विविध वयाच्या तरुणतरुणींची चिंता त्यांना भ्रमित करून सोडत आहे. इयत्ता १२ वी ते पदवीदरम्यानच्या वर्ग प्रवेशाची काळजी, परीक्षांची काळजी, कॉलेज कधी सुरू होणार याचीपण काळजी यात ते गुंतलेले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षाचे सारेचजण पुढच्या अंधारून आलेल्या वर्षाने हवालदील आहेत. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेले मोजकेजण आपले ऑफर लेटर परत घेणार काय या चिंतेने ग्रासलेले आहेत. परदेशाची स्वप्ने पाहणारे तर पूर्णतः हताश आहेत. ज्या देशात जायचे नक्की झाले होते, त्यांची अक्षरशः विदीर्ण अवस्था ना कधी ऐकली होती ना कधी कल्पिली होती. सध्या एकूण साडेसात लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिकत आहेत. त्यांचे पुढच्या नोकरीचे काय होणार व शिक्षणासाठी घेतलेली कर्जे कोण फेडणार हा यक्षप्रश्‍न त्यातल्या निम्‍म्यांपुढे उभा ठाकला आहे. निम्मेच विद्यार्थी या गटात आहेत, कारण उरलेल्यांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुकच असते अशी त्यांची कौटुंबिक सुबत्ता आहे. 

भारतातील बेरोजगारी किमान २३ टक्के, तर शहरी बेरोजगारी ३१ टक्के एवढी पोचली आहे. अशा या साऱ्या काळ्याकुट्ट परिस्थितीकडे पाहताना एक रुपेरी किनार मला दिसते आहे. या रुपेरी किनारीला एक शाश्‍वत असे अंगभूत स्वरूप आहे. तांत्रिक भाषेत त्याला मी ‘अकलेचे प्रारूप’ असा शब्द वापरतो. 

श्रमिक, कामगार, रोजंदारी करणारे, शेतीतील मजूर यांना वगळून अकलेचे प्रारूप साऱ्यांना लागू होऊ शकते. तसे ते अजगरासारखे सुस्त पडून असते. मात्र मंदीमध्ये ढासळत्या अर्थव्यवस्थेमध्ये, बदलत्या तांत्रिकी प्रगतीच्या काळात, अरिष्टकाळी त्या अजगररूपी प्रारूपाची भीती न बाळगता स्वतःमधली योग्य बलस्थाने, स्वतःची क्षमता, स्वतःची जागा ओळखणारे या सुस्त अजगराला गळ्यात घालून छान फोटोसाठी पोज देऊ शकतात. म्हणजेच या साऱ्या अरिष्टातून सुखरूप नाही, तरी बालबाल वाचू शकतात. गरज असते ती आपण या अकलेच्या प्रारूपातील कोणत्या गटात मोडतो याची जाणीव होण्याची. अक्कल विकणारा हा त्यामानाने अगदी छोटासा गट, मात्र साऱ्यांचीच ओढ असते त्या गटात शिरण्याची. अक्कल वापरणारा हा संख्येने सर्वात मोठा गट समजावा. साऱ्याच यंत्रणा, व्यवस्था या गटावर अवलंबून असतात. मात्र, या गटातील प्रत्येकाची समजूत असते, की यंत्रणा माझ्यामुळेच. तिसरा गट असतो अक्कल चालविणाऱ्यांचा. पहिल्या दोन गटातील प्रत्येकाला कधीना कधी तरी, कोणत्यातरी  बाबीसाठी या गटातील प्रत्येकाची गरज भासत असते. त्याच्याशिवाय त्यांचे पानही हालू शकत नाही. असे असले  तरी यांच्याकडे वरचे दोन्ही गट थोड्या तुच्छतेने पाहत असतात. असे हे मूळ प्रारूप. नोकऱ्यांची अशाश्‍वतता निर्माण होते, त्या गायब व्हायला लागतात.

त्यावेळी स्वतःची जागा, स्वतःचा गट सोडून पटकन दुसऱ्या गटात शिरकाव करून घेऊ शकणारे अजगराला खेळवणारे होतात. अन्य अनेकांना अजगर विळखा घालतो, काहींना थेट गिळून गायब करतो. 
 

आपला गट नेमका कोणता?

आता स्वतःला आपण कोण मानतो याचे उत्तर ज्याचे त्याने ठरवायचे आहे. पण वाचकांसाठी प्रत्येक गटातील व्यक्ती कामे, जबाबदाऱ्या थोड्या स्पष्ट करून सांगत आहे.  

सल्लागार किंवा कन्सल्टंट, सिनियर मॅनेजर्स, सीओओ, सीएफओ, सीईओ, एमडी किंवा सीएमडी, ॲडमिनिस्ट्रेटर्स, छोट्या कंपन्यांचे डायरेक्टर्स, फायनान्समधल्या सर्वच महत्त्वाच्या व्यक्ती, अर्थ किंवा वित्तीय सल्लागर अक्कल विकणाऱ्या गटात मोडतात. 

सर्वांत मोठ्या अक्कल वापरणाऱ्या गटामध्ये डॉक्टर्स, आयटीमधली विविध प्रकारची कामे करणाऱ्या ९८ टक्के व्यक्ती, ७०-७५ टक्के इंजिनिअर्स, जवळपास सारेच पत्रकार (अपवाद फारच थोडे), शिक्षण क्षेत्रातील अनुदानित संस्थांतील १०० टक्के तर विनाअनुदानितमध्ये ९० टक्के, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिसेस (आयचीईएस) मधल्या साऱ्याच व्यक्ती, इन्शुरन्स सेक्टरमधल्या एजंट व्यतिरिक्त सारेचजण अशांची ठळक यादी होत जाते. याशिवाय अतिभाग्यवान असा सरकारी नोकरांचा, बँकेतल्या मंडळींचा गट या साऱ्यांवर प्राबल्य दाखवून असतो. प्राबल्य हा शब्द मुद्दाम स्पष्ट करत आहे. पाचवे, सहावे किंवा सातवे पे कमिशन आल्यावर उरलेल्या साऱ्यांची चलबिचल करण्याचे सामर्थ्य फक्त सरकारी भाग्यवानांकडेच असते, तेही निवृत्तीचा दिवस येईपर्यंत. तरीही एक गंमत असतेच. सरकारी नोकरांकडे पाहताना पगाराची असूया असते, मात्र त्यांच्या कामाबद्दलची तुच्छता व्यक्त करण्याची एक प्रवृत्ती अन्य सारेजण नेहमी दाखवतात. सेवा क्षेत्रातील सर्वच व्यक्ती, मुख्यतः अक्कल चालवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गटात मोडतात. या क्षेत्रात अस्थिरता हा स्थायिभाव असल्याने अक्कल चालविल्याशिवाय, म्हणजेच जोरजोरात हातपाय मारल्याशिवाय तुमचे डोके पाण्याच्या वर राहूच शकत नाही. नोकऱ्यांसंदर्भात हे क्षेत्र सर्वात मोठे आहे. 

गटागटांमधले तटबंदीचे कठोर वास्तव
सर्वांत मोलाची गोष्ट असते ती हे सारे किमान लक्षात घेण्याची. इथेच गल्लत सुरू होते. प्रत्येक गटातील व्यक्ती दुसऱ्या गटाबद्दलच्या संपन्नता, सुबत्ता, कामाबद्दल माहिती न घेता स्वतःची क्षमता न लक्षात घेता इकडून तिकडे घुसण्याचा, शिरकाव करून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. अनेकांचे प्रयत्न थकल्याने थांबतात, काहींचे वयानुसार संपतात, तर अनेकांना निराशेने ग्रासून नोकरीलापण मुकावे लागते. हे जगभर अत्यंत निर्दयपणे घडत होते, घडत आहे. भारतात मात्र एकविसाव्या शतकातील मिलेनियल जनरेशनचे ते यानंतरचे वास्तव झाले आहे. त्याहून वाईट भाग म्हणजे या मिलेनियल म्हणजे, २००० नंतर जन्मलेल्यांच्या आईवडिलांना याची फक्त तोंडओळख होती. त्याचा तडाखा गेल्या चार-पाच वर्षांत बसायला लागला आहे. आता मात्र येती दोन-तीन वर्षे खूपजण होरपळून निघण्याची शक्यता आहे, त्याचवेळी त्याचा परिणाम शिक्षण पूर्ण झालेल्यांच्या मनावर, कामावर, वृत्तीवर व पर्यायाने साऱ्याच आयुष्यावर होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा मिलेनियल गटाचे आव्हान असणार आहे ते आपण कोणत्या गटासाठी योग्य आहोत ते ओळखण्याचे. तर त्यांच्या पालकांना स्वतःचे करिअर, स्वतःचे भविष्य पुढच्या वीस वर्षांत कसे असावे याचा एक रोडमॅप आखण्याचे. 

गट तयार कसे होतात, नोकऱ्या गायब का होतात?
अक्कल विकणारा गट कायमच अत्युच्च गुणवत्ता कायम राखून उत्तम संस्थांतून बाहेर पडणारा एक प्रॉडक्ट असतो. या प्रॉडक्टला किती किमतीला विकत घ्यायचे याचे ठोकताळे लंडन, न्यूयॉर्क, फ्रँकफर्ट, हाँगकाँग वा शांघायला ठरतात. मात्र प्रॉडक्ट व त्याचे पालक पोझिशन, पॅकेज व परदेश या त्रयीमध्ये इतके गुंतलेले असतात की हा एक लिलाव असतो हेसुद्धा त्यांना कळत नाही. वयाच्या तेविसाव्या वर्षी सुरू झालेली ही लिलावाच्या बोलीची पद्धत फारतर वीसेक वर्षे चालत राहते. नंतर मात्र टिकून राहणारे शोधावे लागतात. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वयाच्या तिशीमध्ये चमकणारा तारा कुठे निखळून पडला, याची आठवणसुद्धा कोणी काढत नाही. तरीही गमतीची बाब म्हणजे दुसऱ्या गटातील अक्कल वापरणारे सारेच वयाच्या चाळिशीमध्येसुद्धा विकणाऱ्या गटात शिरण्याचा प्रयत्न करतात. अचानक नोकरी गेलेले, सोडावी लागलेले, आता मी कन्स्लटंट म्हणून काम करतो असे सांगतात. अक्कल चालवणाऱ्या सेवा क्षेत्रात उत्तम बस्तान बसवलेल्या अनेकांना त्यातील अस्थिरता नकोशी होते व त्यांची गट बदलण्याची धडपड सुरू होते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे अक्कल चालवणाऱ्या गटामध्ये आव्हानाला थेट सामोरे जाण्याची एक उपजत वृत्ती असते. आव्हानावर उपाय म्हणून कागदी घोडे नाचवून ते घनघोर चर्चा करण्यात वेळ घालवत नाहीत. ही खासियत विकणाऱ्या गटाची. सारीच दुनिया कोरोनातज्ज्ञ मंडळींमुळे आज भरकटलेली दिसते आहे ना, ही त्यांचीच करामत.   

यातून मार्ग कसा काढावा?
सुरुवातीला काळ्याकुट्ट अशा सध्याच्या वातावरणाची रुपेरी कडा म्हणून ज्याचा उल्लेख केला, त्याकडे विविध वयोगटांनी कसे पाहावे, स्वतःला कसे सावरावे किंवा प्रगती कशी करावी याचा प्रोटोकॉल कुठेच शोधूनसुद्धा सापडत नसतो. नेतृत्वगुण किंवा लीडरच्या अंगभूत गुणांची चर्चा ही फक्त चर्चाच असते. मात्र काही किमान चांगल्या सवयी लावून घेणारे तीनही गटात स्वतःची प्रगती, करिअर, त्यातील सातत्य टिकवून ठेवू शकतात. त्या अशा-

  शिक्षण महत्त्वाचे; मार्क उपयुक्त, पण समग्र माहिती मिळविणे त्याहून गरजेचे. सध्याचे एक उदाहरण पाहा, आंबे तयार आहेत पण घरबंदीत पोचवायचे कसे? कॅनिंग करायचे कर कॅन कुठे मिळतात, त्यांचे उत्पादन होते वा नाही? औषधांची गरज वाढत आहे. उत्पादन तयार आहे, पण लेबल छापणारे, करून देणारे गायब आहेत. इथे पुस्तकी विद्यार्थी बिनकामाचा ठरतो किंवा याची समग्र माहिती न घेतलेला अक्कल वापरणारा मॅनेजर बाजूला सारला जातो. 

  काम करण्याची तयारी, काम शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची तयारी व अनुभवासाठी किमान वर्षे एकाच कामात राहण्याची तयारी असलेले पदवीधर दुर्मीळ होत आहेत. त्यांची येत्या काळात चलती राहणार आहे. 

  स्वतःच्या भावनांवर काबू ठेवणे व सहकाऱ्यांचे शांतपणे ऐकून घेणे हे घरबंदीमुळे, त्यातून आलेल्या ताणामुळे साऱ्यांनाच कळले आहे. पण त्यातून थोडेसे तरी आत्मपरीक्षण केलेले येत्या काळात तरून प्रगती करणार आहेत. 

  नकोसे काम करावे लागणे, शिकलोय एक पण करतोय भलतेच, हे मला येत नाही कारण शिकवलेले नाही, असे म्हणणारे कोणालाच नको आहेत. हे शब्द कायमचे विसरलेले मध्यमवयीन नोकऱ्या गमावल्या तरी त्यातून पुन्हा जोमाने उभारी धरतील. मात्र हे वरवरचे नसावे. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पदाचे गोंडस नाव विसरणे. एक्झिक्युटिव्ह, कन्स्लटंट, मॅनेजर, टीम लीडर वगैरेला फारसा अर्थ नसतो. खुर्चीला किंमत कधीच नसते. तुमच्या कामातून तुम्ही सिद्ध होत असता. Prove yourself Indispensible! 

संबंधित बातम्या