मुलांच्या डोक्‍याला खुराक

डॉ. श्रुती पानसे
सोमवार, 29 एप्रिल 2019

सुटी विशेष
 

सुटी चांगल्या प्रकारे घालवणं ही अतिशय सर्जनशील गोष्ट आहे. नुसताच टीव्ही बघत, काहीही न ठरवतादेखील सुटी जाऊ शकते आणि डोक्‍याला चालना देतही सुटी जाऊ शकते. आईबाबांनी मुलांना घेऊन आधीपासून तयारी केली, तर सुटी छान जाईल. सर्वांत आधी आईबाबांनी सुटीत काय करता येईल याचा एक कागद तयार करावा. यामध्ये घरात करता येणाऱ्या गोष्टी आणि घराबाहेर करायच्या गोष्टी वेगवेगळ्या कराव्यात. कागद हाताशी असला तर ‘आता काय करायचं,’ असा प्रश्न आयत्या वेळी पडणार नाही. काय करायचं आहे, याची योजना तयार असेल. आपल्या लहान मुलांना काय जमेल याचा अंदाज घेऊन आपापली यादी तयार करावी.
सुटीत आवर्जून करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपल्या घरात जी भाषा बोलली जाते, त्यापेक्षा इतरभाषिक कुटुंबांमध्ये मुलांना घेऊन जाणं. यामुळं अनौपचारिक पद्धतीनं ही भाषा कानावर पडेल. मुलांना लगेच भाषा कळणं आणि बोलता येणं, हे जमणार नाही पण ती ऐकणं हाही अतिशय महत्त्वाचा अनुभव आहे. मुलांना अनेक ठिकाणी घेऊन जावं. या प्रक्रियेत मार्गदर्शकाची भूमिका निभावणं चांगलं. जसा एखाद्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी गाइड असतो. तो त्या स्थळाकडे घेऊन जातो, त्याची माहिती सांगतो आणि तुम्हाला तिथं सोडून देतो. तिथले अनुभव तुमचे तुम्ही घ्यायचे. मग तिथल्या निसर्गाचा एकांत अनुभवा, फोटो काढा, गप्पा मारा किंवा सर्व बाजूंनी त्या निसर्गाचा किंवा त्या स्थळाचा आस्वाद घ्या, नाहीतर काहीच न करता आपल्या गाडीत बसून राहा. प्रश्न विचारायचे असतील, तर गाइड आहेच उत्तरं द्यायला.

झाडांची वाढ कशी होते, दाट जंगलात ऐकू येणाऱ्या पक्ष्यांची लकेर, एकच झाड उन्हाळा - पावसाळा - हिवाळ्यात कसं बदलतं, पहाटेपासून रात्रीपर्यंत दिवस कसा बदलत जातो अशा विविध गोष्टींकडं मुलांचं लक्ष वेधून घ्यावं लागतं. मुलांना नव्या जागी घेऊन गेलो (उदा. एखादा किल्ला, राजवाडा, प्रदर्शन, संग्रहालय इ.) तर आपण का आलो आहोत याची कल्पना मुलांना द्यावी. या जागेसंबंधी त्यांना प्रश्न पडायला हवेत. त्यांनी प्रश्न विचारायला हवेत. सर्व माहिती आयती हातात देण्यापेक्षा प्रश्न पडणं हे केव्हाही चांगलंच. मूल आपल्या अनुभवांशी या नव्या अनुभवाला ताडून बघायला लागेल. आपल्या माहितीत भर घालेल किंवा त्याचाजवळ जमा झालेली माहिती ते आपल्याला देईल. पण असा स्वतंत्र विचार करण्यासाठी उसंत मात्र दिली पाहिजे. 

प्रकल्प नेहमी शाळेनंच द्यायला पाहिजेत असं नाही. सुटीच्या दिवसांत मुलांना आवडेल असा कोणताही प्रकल्प हाती घेता येईल. झाडांची आवड असेल, तर अशा काही गोष्टी करता येतील. आपलं मूल ज्या वयाचं आहे, त्या वयोगटानुसार खालीलपैकी योग्य वाटतील, आवडतील त्या कृती निवडा.

 • बाग असेल तर झाडांना नियमितपणे रोज दहा मिनिटं पाणी देणं. बाग नसेल तर कुंड्या आणून त्यामध्ये मोहरी, मेथ्या, अळीव, शेंगदाणा यांसारखी घरगुती बिया पेरणं.
 • बागेची, कुंड्यांची रचना बदलणं.
 • बागेचा परिसर स्वच्छ ठेवणं.
 • खड्डा करून त्यात ओला कचरा टाकून खत तयार करणं.
 • या प्रक्रियेचं निरीक्षण करणं.
 • आपण वाढवलेल्या रोपांचं, फुलांचं चित्र काढणं.
 • या विषयातले अनुभव लिहिणं.
 • कॉम्प्युटरचा नाद असेल, तर बागेचे फोटो काढून त्याची कॉम्प्युटरवर फाइल बनवणं.
 • वाळलेल्या पानांचं अजून काय करता येईल, याचा विचार करणं.
 • वाळलेल्या पानाफुलांच्या रोज विविध रचना करणं.
 • बागेत पडलेली पानं उचलून आणणं, त्याला ओला रंग लावून ठसेकाम करणं.
 • पाकळ्या, पानं चिकटवून कोलाज करणं.
 • मातीत पाणी कालवून, ओल्या मातीत हात बुडवून कागदावर चित्र काढणं.
 • मातीपासून वस्तू तयार करणं.

बागेशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही मुलांना करायला सांगू शकता किंवा त्यांच्याकडून करून घेऊ शकता.

 • भारतीय पाश्‍चात्त्य पद्धतीचं नृत्य शिकता येईल, येत असेल तर दुसऱ्यांना शिकवू शकतात. वाद्य वाजवायला शिकू शकतात.
 • मुलांना पैसे साठवायची छोटी बॅंक आणून द्यावी. मुलांचं खातं असेल तर पैशांचे थोडे थोडे व्यवहार मोठ्यांच्या मदतीने करायला शिकवावेत.
 • मुलांना गणितातले सोपे कूटप्रश्‍न सोडवायला द्यावेत. गणिती कोडी सोडवायला द्यावीत. नुसती कोडी सोडवून थांबू नका. त्यातलं लॉजिक समजावून सांगा. पालकांनी घरातल्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार करावं, जमाखर्च लिहावा. त्यात मुलांना सहभागी करावं. खर्च झाला की लगेच लिहावा.
 • कोणत्याही घटनेमागं काही कारणं लपलेली असतात. ती कारणं शोधायचा प्रयत्न करायला सांगावं. उदा. आजारपण आलं, चित्रं चांगलं आलं, गणितात कमी गुण मिळाले, पेट्रोल महाग झालं, मोबाईल स्वस्त झाले, पाऊस झाला नाही, थोडक्‍यात सांगायचं तर, ‘का?’चं उत्तर शोधायला सांगावं. लॉजिक मिळेपर्यंत शोधू द्यावं.
 • विज्ञानातल्या नव्या नव्या शोधांची माहिती घ्यायला सांगावं. हे शोध लागण्याआधी कोणकोणत्या प्रक्रिया झाल्या याची माहिती घ्यायला सांगावी.
 • गुंतागुंतीच्या वस्तूंत, विषयांत लक्ष घालायला शिकवावं. रुबिक क्‍यूब खेळायला द्यावा.
 • चित्र काढायला आवडत असेल, तर बघून चित्र काढण्यापेक्षा मनाने चित्र काढायला सांगावं. त्यांच्या चित्रांचा संग्रह करावा. मुलांना चित्रांची प्रदर्शनं बघायला न्यावं. कुठल्याही साध्याशा चित्रांची निरीक्षणं करायला सांगावं. हे चित्रं कशामुळे चांगलं वाटतं आहे, या चित्रात अजून काय हवं आहे, याचाही विचार करायला भाग पाडावं. रंगसंगतीचा विचार करायला शिकवावं. अगदी काळ्या-पांढऱ्या चित्रातही राखाडी रंगाकडे लक्ष द्यायला सांगावं. गवतातल्या, झाडांतल्या हिरव्या रंगाच्या असंख्य छटा बघायला शिकवावं.
 • मनात एखाद्या वस्तूचा विचार करून ती प्रत्यक्षात तयार करायचा प्रयत्न करायला सांगावं. कागद, पेन्सिल, माती, कॅमेरा अशा आपल्याला आवडतील त्या गोष्टी त्यांनी जवळ ठेवाव्यात. याशिवाय अनेक माध्यमांचा वापर करावा. या वस्तू हाताशी ठेवाव्यात. त्याचा केव्हाही उपयोग होऊ शकतो.
 • अर्किटेक्‍टकडं असतात तसे नकाशे बघायला सांगावं. भौगोलिक, राजकीय नकाशेही बघायला सांगावं. ते काढण्याचा सराव करून घ्यावा. मुलं आपल्या घराचा प्लॅन काढू शकतात, घराचं मॉडेल तयार करू शकतात. तसंच, आवडीच्या ठिकाणाचं मॉडेल करू शकतात.
 • चित्रविचित्र पाच-सहा वस्तू गोळा करून त्यातून स्वत:च्या कल्पनेनं नवी वस्तू तयार करायला सांगावी. उदा. दोन-तीन रंगांचे कागद, रद्दी कागद, वाळू, रिकाम्या रिफिल्स, दोरा, झाकणं, रिकाम्या बाटल्या अशा काहीही वस्तू गोळा करता येतील.
 • एकच वस्तू विविध दृष्टिकोनातून काढून बघावी. म्हणजेच उदा. वही, पेन्सिल, डबा, बाटली, वर्ग, एखादं फूल समोरून कसं दिसतं, वरून, विविध बाजूंनी कसं दिसतं याची चित्रं काढायला सांगवीत.
 • जिग्सॉ पझल सोडवायला द्यावीत. मुलांना स्वत: जिग्सॉ पझल तयार करायला सांगावीत.
 • वस्तूची किंमत आणि त्यासाठी आलेला खर्च याचा ताळमेळ घालायला मुलांना शिकवावं.
 • मुलं मोठी असतील आणि त्यांना यात रुची असेल तर एखाद्या मोठ्या यंत्रणेसंबंधीची माहिती मिळवायला सांगावं. ती कशी चालत असेल यावर चर्चा करावी. नंतर प्रत्यक्ष माहिती घ्यावी. उदा. रेल्वे, पाणीपुरवठा यंत्रणा इ. 
 • पुस्तकं वाचायला आवडत असतील, तर आवडत्या पुस्तकासंबंधी एक वही करायला सांगावं. जे आवडेल ते लिहावं, आवडणार नाही तेही लिहावं. पुस्तकं, चित्रपट, एखादी व्यक्ती, कला, शिल्प यापैकी कोणत्याही वस्तूविषयी चांगलं आणि वाईट दोन्ही मुद्दे लिहून काढावेत.
 • आपल्या कामाचं मूल्यमापन वरचेवर करावं. मुलांना त्यांच्या वागण्याचं, त्यांच्या अभ्यासाचं मूल्यमापन करू द्यावं. मुलांना स्वत:पुरती छोटी छोटी ध्येयं ठरवायला सांगा. वेळेत उठणं, वेळेत अभ्यास करणं, ती पूर्ण करता येतात का, हे बघावं.
 • आपल्याला किंवा मुलांना ज्या गोष्टी आवडतात, त्याचं छंदात रूपांतर होतंय का हे बघावं.

स्वयंपाकघरात करण्यासारख्या कृती

 • संध्याकाळचा एखादा छोटा पदार्थ करायला देणं. ताक घुसळणं, कोशिंबीर करणं, शेवटची पोळी करणं इ.
 • जेवायला काय करायचं, या चर्चेत मुलांचा महत्त्वाचा सहभाग असायला हवा.
 • काही स्वच्छतेची कामं सोपवणं.
 • किती माणसांना किती पदार्थ लागेल, त्यासाठी किती खर्च लागेल, याचा गणिती अंदाज बांधणं.
 • हिशोब लिहायला देणं.
 • नवीन पदार्थांच्या कृती लिहून काढणं. यातून छोटं पाककृती हस्तपुस्तक तयार होऊ शकतं.
 • पालेभाजी निवडणं
 • छोटी भांडी, चमचे धुणं.
 • छोटा रुमाल, नॅपकिन धुणं.
 • स्वयंपाकघरात मुलांनी या कृतींचं निरीक्षण करावं आणि काय होतं ते सांगावं.
 • पोळी आधी कशी होती, भाजल्यावर त्याचं काय झालं?
 • फुलका/भाकरी गॅसवर भाजल्यावर काय घडलं?
 • सरबतात साखर मिसळल्यावर तिचं काय झालं?
 • पिठात पाणी घालून ती मळल्यावर तिचं काय झालं?

या सर्व कृती करताना त्यांच्याशी त्याविषयी गप्पा मारणं फार आवश्‍यक आहे. वरील कृतींप्रमाणं ज्या गोष्टीत निरीक्षण आहे, त्या कृती मुलांना अवश्‍य करू द्याव्यात. आभाळाचं निरीक्षण, घराच्या खोलीतलं निरीक्षण, चित्रांच्या पुस्तकाचं निरीक्षण यातून कितीतरी अशा कृती काढता येतील. मुलांना नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टीत सामावून घेतलं, की मुलं खूष होतात. साधं चमचा किंवा रुमाल धुण्याचं महत्त्वाचं कामही अगदी मन लावून करतात. आपल्यासाठी ती कृती कदाचित महत्त्वाची नसेलही. पण वेगवेगळ्या कृती करणं, हेच तर सर्वांत महत्त्वाचं आहे.
 

संबंधित बातम्या