कोरोनाने काय शिकवले?

डॉ. सुधीर कुलकर्णी
मंगळवार, 5 जानेवारी 2021

कव्हरस्टोरी

एक संशोधक म्हणून मी जेव्हा वरील प्रश्नाचा विचार करतो तेव्हा अनेक मुद्दे समोर येतात. कोरोनामुळे माणसाला सोसाव्या लागलेल्या त्रासाबद्दल खूप काही बोललं गेलंय. पण काही चांगल्या गोष्टीही घडल्या. पहिली चांगली गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसामध्ये आरोग्यविषयक जागरूकता आली. सरकारी पातळीवर, माध्यमांमधून झालेल्या प्रचारामुळे आपल्यापैकी बरेचजण हात नीट धुवायला शिकले. अनेकांना प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांची, औषधांची, व्यायामाची नव्याने जाणीव झाली. लॉकडाउनच्या काळात प्रदूषण कमी झाले; त्याचा फायदा म्हणजे नैमित्तिक आजार कमी झाले आणि आपल्या आरोग्याचा पर्यावरणाशी असलेला संबंध लक्षात आला. प्रदूषणापासून बचावासाठी मास्क आवश्यक होताच पण तो वापरला जात नसे, पण कोरोनाने आपल्याला मास्क लावून फिरायची आणि अंतर राखून व्यवहार करण्याची सवय लावली. सामान्य माणसाच्या आयुष्यात जसे हे बदल घडले तसेच संशोधकांना देखील अनेक नवीन धडे मिळाले.

बहुतेक लोकांनी उत्सुकतेपोटी कोरोना विषाणू विषयी वाचलं असेल. या विषाणूला सार्स-कोव-२ असे नाव दिले आहे आणि तो माणसाच्या शरीरात शिरल्यावर जो रोग होतो त्याला कोविड-१९ म्हणतात. हा विषाणू दिसतो कसा, त्याची लक्षणे कोणकोणती यावरही आता बरीच माहिती उपलब्ध आहे. पण कोरोना विषाणू मानवी शरीरात कसा प्रवेश करतो याबाबत थोडी माहिती घेऊ. सार्स-कोव-२च्या पृष्ठभागावर स्पाइक (Spike) नावाचे प्रथिन असते ते माणसाच्या पेशींच्या पृष्ठभागावरील अँजिओटेनसीन कन्व्हर्टिंग एन्झाईम (ACE-2) प्रथिनाला जोडले जाऊन नंतर विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो, असे शास्त्रज्ञांना या विषाणूचा अभ्यास करताना समजले. यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या पेशीतील TMPRSS2 नावाचे प्रथिनच विषाणूला शरीरात शिरायला मदत करते, असो. विषाणूचे स्पाइक प्रथिन मानवी पेशीतील फक्त एस-२ नाही तर इतर प्रथिनांशीसुद्धा हातमिळवणी करते आणि विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश मिळवतो, असे अलीकडेच झालेल्या संशोधनातून समोर आले आहे. या इतर प्रथिनांमधील महत्त्वाचे प्रथिन म्हणजे न्यूरोपिलीन-१. हे प्रथिन आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचे व न्यूरॉन्सचे जाळे पसरवते तसेच कर्करोगामध्येसुद्धा भूमिका बजावते, हे संशोधकांना माहिती होते, परंतु न्यूरोपिलीन-१चे एक नवीन कार्य कोविड-१९मुळे लक्षात आले ते असे.

कोविड-१९ रोगामध्ये अनेक रुग्णांना विषाणू संसर्गाची कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणजेच ते असिम्पटोमॅटिक असतात. त्यामुळे अनेकदा संसर्ग होऊन देखील लक्षात येते तेव्हा उशीर झालेला असतो.  वैज्ञानिकांच्या लक्षात आलेली आणखी एक बाब म्हणजे, ज्या व्यक्ती संधिवातासारख्या जुनाट तीव्र वेदनेचा (chronic pain) सामना करीत असतात, त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यावर त्यांच्या जुनाट वेदना गायब होतात आणि विषाणू संसर्ग गेल्यावर वेदना परत जाणवतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विषाणू मानवी एस-२ ऐवजी न्यूरोपिलीन-१शी जोडला जातो व शरीरात प्रवेश करतो त्यामुळे वेदना जाणवत नाहीत. नैसर्गिकरीत्या जेव्हा न्यूरोपिलीन-१ हे व्हीईजीएफ-ए या प्रथिनाशी जोडले जाते तेव्हा आपल्याला वेदनेची जाणीव होते. परंतु जेव्हा कोरोना विषाणूचे स्पाइक प्रथिन व्हीईजीएफ-ए च्या जागी न्यूरोपिलीन-१ला जोडले जाते तेव्हा व्हीईजीएफ-ए न्यूरोपिलीन-१ला जोडले जाऊ शकत नाही आणि वेदना नाहीशी होते, कोरोनाची लक्षणेही दिसत नाहीत, त्यामुळे आपण निरोगी आहोत असे आपल्याला वाटत राहते. मधल्या काळात विषाणू अनेक पेशींना बाधित करतो तसेच इतर अवयवांपर्यंत पोचतो. हे समजावून सांगताना एका शास्त्रज्ञाने या प्रकाराला कोकिळेच्या आणि आपल्या अंड्यातला फरक न समजल्याने दोन्ही अंडी उबवणाऱ्या कावळ्याची उपमा दिली. व्हीईजीएफ-ए आणि विषाणूचे स्पाइक प्रथिन या दोन्हीत न्यूरोपिलीन-१ त्या कावळ्याप्रमाणेच फरक करू शकत नाही. या संशोधनातून शास्त्रज्ञांनी दोन निष्कर्ष काढले एक म्हणजे अनेक विषाणू सार्स-कोव-२ विषाणूप्रमाणेच न्यूरोपिलीन-१शी जोडले जात असतील व आपला प्रसार घडवत असतील. दुसरा नवीन व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेदनेशी संबंधित असणाऱ्या न्यू्रोपिलीन-१चे व्हीईजीएफ-ए या प्रथिनाशी जोडणे थांबवले तर तीव्र वेदनेवर उपाय करता येईल, असे संशोधकांना वाटते आहे. या संशोधनामुळे वेदनांवरील उपायाची एक नवीन पद्धती विकसित होऊन वेदनेवरील नवीन औषधांची निर्मिती होऊ शकेल. त्याचबरोबर ह्या औषधांनी कोरोना विषाणूला देखील मानवी शरीरात शिरण्यापासून काही प्रमाणात अटकाव करता येणे शक्य होईल. याचा आणखी एक संभाव्य फायदा म्हणजे सध्याची वेदनाशामक औषधे अनेकदा मॉर्फीन किंवा त्याच्याशी संबंधित घटकांपासून बनवतात, ज्याचे अनेक दुष्परिणाम होतात, ते कमी करून वेदनेवर उपाय शोधता येईल.

एकुणातच गंभीर तसेच रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या कोविड -१९च्या रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले आहे. याचबरोबर ज्या स्त्रियांना अंडाशयाचा आजार म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम असतो त्यांच्यात देखील कोविड-१९चे तीव्र परिणाम दिसतात तर चौदा वर्षांखालील मुलांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपात सहसा आढळत नाही.

अनेक अभ्यासात दिसलेली आणखी एक बाब म्हणजे गंभीर कोविड-१९ मुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या पुरुषांपैकी साधारण ७० टक्के पुरुषांना टक्कल असते, तसेच कोविड -१९ रुग्णांमध्ये केस गळण्याचे प्रमाण वाढते. शोध घेताना याचा पुरुषांमधील हार्मोन्सशी संबंध असला पाहिजे असे लक्षात आले. म्हणजेच गंभीर आजारी रुग्णांमध्ये अँड्रोजेन हार्मोन अधिक प्रमाणात स्त्रवत असले पाहिजे. हे हार्मोन माणसाच्या पेशींच्या पृष्ठभागावरील एस-२ला विषाणूच्या स्पाइक प्रथिनाशी जोडायला मदत करते त्यामुळे सार्स-कोव-२ विषाणू शरीरात सहज शिरू शकतो. आधी उल्लेख झालेल्या TMPRSS2 प्रथिनाचे कार्य अँड्रोजेन हार्मोनवर अवलंबून असते त्यामुळे ज्या लोकांमध्ये हे हार्मोन जास्त असते त्यांना सार्स-कोव-२ विषाणूचा धोका अधिक संभवतो. मुलांमध्ये वयात येण्याआधी अँड्रोजेन हार्मोन कमी प्रमाणात असते त्यामुळे त्यांच्यात कोविड-१९च्या गंभीर आजाराचे प्रमाण कमी असते तर अंडाशयाचा विकार असणाऱ्या स्त्रियांमध्ये हे हार्मोन अधिक स्त्रवते त्यामुळे गंभीर आजार जास्त प्रमाणात आढळतो.

टक्कल कमी करण्यासाठी किंवा अन्य उपचारांचा भाग म्हणून अँड्रोजेन हार्मोन कमी करणारी औषधे घेणाऱ्या रुग्णांमध्ये मृत्यू तसेच गंभीर आजाराचे प्रमाण कमी असते, तसेच कमी दिवसांत आजाराची लक्षणे जातात, असेही कोविड -१९ रुग्णांचा अभ्यास करताना दिसून आले आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी आयसीयूमध्ये जावे लागण्याचे प्रमाणही ८६ टक्क्यांनी कमी होते, असे संशोधकांनी नोंदवले आहे. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये कोविड -१९ ची लक्षणे वेगळी का असतात, हे यावरून लक्षात येते. 

कोविड-१९चा अभ्यास करताना लक्षात आलेल्या या काही बाबींमुळे भविष्यातल्या वैद्यकीय संशोधनाला कदाचित आणखी मदत होऊ शकेल.

(लेखक पुण्यातील नोव्हालीड 
फार्मा येथे संशोधन विभागाचे प्रमुख आहेत.)

 

संबंधित बातम्या