मळभ सरते तेव्हा...

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 11 जानेवारी 2021

कव्हर स्टोरी

रात्रीची जेवणं झाली. उद्या रविवार म्हणून सगळे निवांत होते. आईनं तिच्या आवडीच्या जगजीत सिंहच्या गझल्सची सीडी लावली. अर्जुन त्याच्या खोलीत जायला लागला, तेव्हढ्यात बाबा म्हणाले, ‘‘अरे, बस की. जरा आमच्याबरोबरसुद्धा गप्पा मार. हल्ली आमच्या वाट्याला येत नाहीस तू.’’ त्याच्या सदा मित्रांबरोबर राहण्यावरून हा टोमणा आहे हे न समजण्याइतका तो काही दुधखुळा नव्हता. आईबाबांच्या गप्पा ऐकत तो चुपचाप बसून राहिला. ‘थोडा वेळ बसून कटूया.’ त्यानं मनातल्या मनात विचार केला.

आजकाल असंच व्हायचं. आईबाबांबरोबर काय बोलायचं असा त्याला प्रश्न पडायचा. त्यातून आज तर त्याला जाम टेन्शन आलं होतं. शाळेतल्या कालच्या गप्पा आठवल्या आणि त्याच्या छातीत धडधडलं, तळवे घामानं ओले झाले. थोड्या वेळानं तो सटकला आणि पटकन खोलीत जाऊन त्यानं दार बंद केलं. तो गेल्यावर आई बाबांना म्हणाली, ‘‘गेले काही दिवस अर्जुन फार अस्वस्थ वाटतोय रे. काही प्रॉब्लेम नसेल ना?’’

ऑनलाइन जाऊन अर्जुननं चॅट जॉईन केली. शिऱ्या, मिकी आणि चित्तू आधीच आले होते. तेवढ्यात त्यांचा लीडर, सोहमपण आला. ‘‘ए, ते फोटो मिळाले का, शिऱ्या?’’ त्यानं विचारलं. ‘‘अरे नाही ना, सिया म्हणाली उद्या देते.’’ चर्चा जवळजवळ अकरा वाजेपर्यंत सुरू होती. ‘‘ए अर्जुन, अरे तू गप्प का? तू पण आयडिया दे ना काहीतरी!’’ मधेच कुणीतरी अर्जुनला झापलं. ‘‘काय बोलू? मला सुचतच नाहीये काही.’’ अर्जुननं कसंबसं उत्तर दिलं.

नंतर कितीतरी वेळ त्याला झोप येईना. रितेशचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता. रितेश या वर्षी शाळेत नवीन आला होता. आल्याआल्याच शिक्षकांचा लाडका झाला होता. अत्यंत सिन्सिअर, हुशार आणि कष्टाळू... आणि त्यामुळेच सोहमच्या गँगचा तो नावडता झाला होता. सगळ्यांनी मिळून ठरवलं की त्याला चांगली अद्दल घडवायची. सध्या शाळेत, फोनवर हीच चर्चा सुरू होती.

शेवटी प्लॅन ठरला, की रितेशची बदनामी करायची. त्याच्या नावानं त्यांनी सोशल मीडियावर एक फेक अकाउंट उघडला. त्यावरून इतरांना घाणेरडे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली. शाळेतल्या मुलींचे, शिक्षकांचे खासगी फोटो त्यावर पोस्ट करायला सुरुवात केली. एक दिवस तर खुद्द प्रिन्सिपलसरांचं विचित्र कार्टून त्या अकाउंटवर पोस्ट झालं. आता रितेश दिसला की सगळे कुजबुजायला लागायचे. त्याच्याशी कुणी बोलेना. रितेशला कळतच नव्हतं काय चाललंय. तो हळूहळू एकटा पडत चालला. एके दिवशी प्रिन्सिपलसरांनी त्याच्या आईवडिलांना शाळेत बोलावलेलं सोहमच्या गँगनं पाहिलं आणि एकमेकांना टाळ्या दिल्या. 

आता मात्र अर्जुनला सहन होईना. तसं बघायला गेलं तर तो या ग्रुपमध्ये नवखा. या वर्षी तुकड्या बदलल्यामुळे अर्जुनचे जुने मित्र दुसऱ्या वर्गात गेले आणि तो एकटाच राहिला, त्यामुळे तो या ग्रुपमध्ये आला होता. हे सगळे एकदम बिनधास्त होते. सुरुवातीला त्याला फार मजा यायची, थ्रिल वाटायचं. पण सध्या या रितेशच्या प्रकरणात ते जसे वागत होते, ते काही त्याला बरोबर वाटत नव्हतं. शेवटी एक दिवस त्याच्या जुन्या मित्रांशी तो बोलला. हे सगळं ऐकून ते तर हादरलेच. ‘‘तू मंद आहेस का रे, अर्जुन? ती सोहमची गँग माहिती आहे ना तुला किती कुप्रसिद्ध आहे ते! तू आईबाबांशी बोल आता आधी.’’ जय म्हणाला. ‘‘अरे पण, ते ओरडतील ना!’’ ‘‘ओरडू देत. खा ओरडा आता, दुसरा काही पर्याय आहे का तुझ्याकडे?’’

खूप धाडस करून अर्जुननं आईबाबांना सगळं सांगितलं. त्याच्या लक्षात आलं की त्यांना राग येण्यापेक्षाही वाईट जास्त वाटलं होतं. पण ते तेव्हा काही बोलले नाहीत. पटापटा चक्रं हलली. शाळेत आणि रितेशच्या आईबाबांना कळवलं, तो फेक अकाउंट बंद केला. शाळेच्या कमिटीनं सगळ्या प्रकरणात लक्ष घातलं.      

अर्जुन जेव्हा रितेशला भेटायला गेला, तेव्हा त्याला खूप भीती वाटत होती आणि खूप लाजही वाटत होती. ‘‘हाय, कसा आहेस? शाळेत कधीपासून येणार?’’ अर्जुननं विचारलं. रितेश हसून म्हणाला, ‘‘हाय अर्जुन, ये ना. मी मस्त आहे. सोमवारपासून येईन मी.’’ अर्जुननं भीत भीत विचारलं, ‘‘तुला खूप राग आला असेल ना रे आमचा? फारच मूर्खपणा झाला तो. सॉरी. आता शाळेत यायला तुला पण नकोसं वाटत असणार.’’ ‘‘अर्जुन, खरं सांगू, सुरुवातीला आला होता राग. पण शाळेत जरी माझे मुठभर शत्रू होते तरी ढीगभर मित्रही होते. रोज कुणी ना कुणी मला भेटायला यायचं. आणि माझ्या काउन्सेलिंग सेशन्समधून कळलं की यात माझी काहीच चूक नव्हती. त्यांनी  

सुचवल्याप्रमाणं मी रोज संध्याकाळी खेळायला जायला लागलो आणि विचारही थोडा वेगळ्या प्रकारे करायला सुरुवात केली. दुसऱ्या कुणीतरी केलेल्या चुकीची शिक्षा मी स्वतःला का करून घ्यायची? त्यामुळं मी ठरवलंय, ताठ मानेनं शाळेत यायला सुरुवात करायची. चल, मी तुला माझी गोष्टीच्या पुस्तकांची लायब्ररी दाखवतो.’’ रितेशचा हसरा आणि आत्मविश्वासपूर्ण चेहरा पाहून अर्जुनच्या मनावरचा काळा ढग विरून गेला. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला होता आणि अर्जुनच्या मनातही!

संबंधित बातम्या