भांडू आनंदे...! 

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

किशोर काथा

(आई कामात. तिची धावपळ चालली आहे. बेल वाजते.)
आई : हं, आलीस का, ईशा? किती उशीर गं! चल, पटकन बॅग ठेवून हातपाय धुऊन घे. हे खायला ठेवलंय, खाऊन घे. आपल्याला जेवायला जायचंय काकूकडे.
ईशा : (सगळं लक्ष हातातल्या मोबाईलकडे) हं...
आई : (काम करता करता) या बायकांना पण ना, नको तेव्हा सुट्टी घ्यायचं सुचतं. आत्ता तुझा बाबा येईल आणि घाई करायला लागेल. अगं, तू अजून इथेच? 
ईशा : ....
आई : ईशा, काय चाललंय? मला ओरडायला लावू नकोस हं! फेकून दे तो फोन.
ईशा : च्च, काय कटकट आहे!
आई : काय म्हणालीस? नीट बोल हं. उगीच वाट्टेल तसं बोललेलं चालणार नाही मला. आवर पटकन.
ईशा : मी येणार नाहीये.
आई : काय? अगं, मी ऑलरेडी सांगून ठेवलंय आम्ही तिघं येतोय म्हणून!
ईशा : आई, तो तुझा प्रॉब्लेम आहे. आमचं कालच ठरलंय. संध्याकाळी सायकलिंग करायचं आणि नंतर आम्ही समोर आइस्क्रीम खायला जाणार आहोत. तीच चर्चा चाललीय आमची व्हॉट्सअॅपवर. आणि तू मला विचारलं का नाहीस आधी?
आई : हो, आता अपॉइंटमेंटच घेते तुझी प्रत्येक वेळी. आणि परमिशनसुद्धा! फार कामात असता ना तुम्ही.
ईशा : एवढं काही टोचून नको बोलायला. अगं आई, मी आधीच कबूल केलंय त्यांना. म्हणजे खरंतर मीच ठरवलंय सगळं. असं ऐनवेळी कोलता नाही येणार मला त्यांना.
आई : तू येतीयेस आमच्या बरोबर. नाहीतर बाबांना फोन करते आता.
ईशा : कर ना, मला काय? मी येणार नाही म्हणजे नाही!! 
(ईशा पाय आपटत निघून जाते)
***
(काकूच्या घरी)
काकू : या या. किती दिवसांनी भेटतोय! मला वाटतं लॉकडाउननंतर पहिल्यांदाच. आणि हे काय, ईशा कुठंय? 
आई : आजकाल बाईसाहेबांना वेळ कुठे असतो? त्यांचं मैत्रिणींचं आधीच काहीतरी ठरलं होतं म्हणे. तूच सांग, आपली टाप तरी होती का आईला नाही म्हणायची? इतकी उद्धटपणे बोलते ना! तिच्याशी कसं वागायचं काही कळतच नाही आजकाल. तू बोल एकदा तिच्याशी, तुझं ऐकते जरा. जाऊदे, चल, मला सांग, काय करायचंय?
(सगळे गप्पा मारत जेवण उरकतात. साधारण तासाभरानं)
आई : अगं इंद्रजीत दिसला नाही कुठे. इथेच आहे ना? की गेलाय कुठले गडकिल्ले धुंडाळायला?
इंद्रजीत : (तेवढ्यात बाहेरून येतो) आहे आहे, इथेच आहे. सॉरी, जरा उशीर झाला. एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. (नाटकीपणे) यावे ईशा मॅडम!
काका : अरे वा, ही कुठे भेटली तुला? काय गं, येणार नव्हतीस ना? 
इंद्रजीत : अहो बाबा, यांच्या सोसायटीच्या बाहेरच भेटली. मैत्रिणींबरोबर आइस्क्रीम खाऊन येत होती. मग काय, आलो घेऊन. काय केलंयस आई? मस्त वास येतोय!
काकू : ईशा, मजा आहे तुझी. मैत्रिणी आणि पार्टी, दोन्ही गोष्टी मिळाल्या तुला.
ईशा : मग? तुझ्या हातचं जेवण मिस करायचं नव्हतं मला!
(रात्री घरी गेल्यावर)    
ईशा : (आईच्या गळ्यात हात टाकत) आई गं, सॉरी, मगाशी खूपच ओरडले तुझ्यावर. तुला नाही म्हटलं म्हणून खरंतर मला फार वाईट वाटत होतं. बरं झालं इंद्रजीतदादा भेटला ते. मला ना, न जाऊन चालणारच नव्हतं. आधीच आमच्या ग्रुपमध्ये फूट पडलीय. नमिता आणि स्नेहाचं मोठ्ठं भांडण झालं, नमिता माझ्याकडे येऊन खूप रडली. त्यांच्यात समेट घडवून आणायचा होता.
आई : तर तर, तुझ्याशिवाय कुणी नसतंच ना असल्या कामांसाठी! चलो, ठीक आहे. माफ कर दिया!
ईशा : किती फिल्मी आहेस गं तू! ते जुने हिंदी पिक्चर कमी बघत जा जरा. 
आई : मग काय तुमची ती थिल्लर नाचगाणी बघू? का तुझ्यासारखं मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसू?ईशा : आई, मोबाईलबद्दल तर तू बोलूच नकोस. तुम्हाला ना, ....
बाबा : एक मिनिट, एक मिनिट, आपण ही चर्चा इथेच थांबवू या का? आता नवीन भांडण नको सुरू करायला, काय? आजचा कोटा पुरा 
झालाय. (सगळे हसतात)

संबंधित बातम्या