ऑल इज वेल!

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 5 एप्रिल 2021

किशोर काथा

धनू चक्क नापास झाला होता. वर्गात पहिल्या पाचात येणारा मुलगा नापास? शाळेत केवढी नाचक्की होईल! आणि आईबाबा काय म्हणतील? त्यांच्यासमोर जायच्या कल्पनेनं त्याला भीतीच वाटायला लागली. विचार करकरून डोकं भंजाळून गेलं आणि शेवटी त्यानं निर्णय घेतला, घर सोडून जाण्याचा. 

सकाळी गावातल्या त्या हमरस्त्यावरून धनू आपल्याच तंद्रीत चालला होता. रात्रभर झोप झाली नव्हती. जवळून कर्णकर्कश हॉर्न वाजवत एक कार जोरानं गेली तसा तो भानावर आला. मान वर करून त्यानं आजूबाजूला पाहिलं. रस्ता, दुकानं, बिल्डिंग्ज; सगळंच अनोळखी, अपरिचित! जवळ एखादं मंदिर असावं. कारण त्याला फुलांची, प्रसादाची दुकानं दिसायला लागली होती. अधूनमधून घंटीचा आवाज कानावर येत होता. रस्त्याकडेच्या बाकावर बसून एक आई आपल्या छोट्या मुलीला पोळीभाजीचा घास भरवत होती, ते बघून त्याला एकदम रडू येतंय की काय असं वाटलं. डोळे चुरचुरले. त्यानं कसंबसं स्वतःला आवरलं. बटाट्याच्या भाजीच्या खमंग वास आला आणि जाणवलं की आपल्याही पोटात कावळे ओरडतायत. त्यानं आशेनं खिशात हात घातला, पण खिसा रिकामा होता. संपले पैसे? काल रात्री तिकीट काढलं आणि ट्रेनमध्ये एकदा चहा बिस्किटं खाल्ली. लगेच संपलेसुद्धा? अजून थोडे पैसे घ्यायला हवे होते आईच्या पर्समधून. पण हात किती थरथरत होते तेव्हा! शिवाय कुणाला कळायच्या आत निसटायचं होतं. 

काय करत असेल आई आत्ता? नक्कीच रडत असणार. आणि  छोटा अनुज? बाबा? धनूचे डोळे पुन्हा चुरचुरायला लागले. त्याला आठवलं आपण का घरातून निघून आलो ते. 

ते त्याला लागलेलं मोबाइलचं वेड, त्या नादात अभ्यासाकडे झालेलं दुर्लक्ष, आईबाबांचं कानीकपाळी ओरडून त्याला अभ्यासाला बसवणं....  इतका राग यायचा त्याला त्यांचा! काय सारखं अभ्यास-अभ्यास? चिडून त्यानं केलाच नाही अभ्यास. त्यांच्या नाकावर टिच्चून, लपूनछपून मोबाइल गेमही खेळले. परीक्षेचा रिझल्ट लागला आणि मार्क बघून धनूला धक्काच बसला. तो चक्क नापास झाला होता. वर्गात पहिल्या पाचात येणारा मुलगा नापास? क्लासटीचरना किती वाईट वाटेल! शाळेत केवढी नाचक्की होईल! आणि आईबाबा? ते काय म्हणतील? चिडतील? मारतील? मोबाइल काढून घेतील? की अबोला धरतील? बाप रे, त्यांच्यासमोर जायच्या कल्पनेनं त्याला भीतीच वाटायला लागली. असा प्रसंग याआधी कधी आला नव्हता. त्याला काय करावं सुचेना. विचार करकरून डोकं भंजाळून गेलं. आणि शेवटी त्यानं निर्णय घेतला, घर सोडून जाण्याचा. त्याक्षणी तरी त्याला हाच एक मार्ग समोर दिसत होता. कुठे जायचं, पुढे काय करायचं, याविषयी तेव्हा तरी काही डोक्यात नव्हतं. पैसे घेतले, दोन-चार कपडे सॅकमध्ये कोंबले, मोबाइल घ्यावा की नको ते कळत नव्हतं, शेवटी घरीच ठेवला. धनू स्टेशनवर आला आणि समोर दिसणाऱ्या ट्रेनचं तिकीट काढून त्यात बसला. 

तो ज्या डब्यात बसला होता, त्यात पुढच्या स्टेशनवर मस्तीखोर तरुणांचा एक ग्रुप चढला. रात्रभर त्यांचा दंगा चालू होता. पॅसेजमधून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर घाणेरड्या कॉमेंट करून ती मुलं फिदीफिदी हसत होती, एकमेकांना टाळ्या देत होती. धनूला कसंतरीच झालं. मधेच त्याचं लक्ष कोपऱ्यात बसलेल्या एका मिशाळ माणसाकडे गेलं. तो केव्हाचा टक लावून धनूकडे पहात होता. धनू जरा घाबरला. त्या माणसाला आपण दिसणार नाही अशा बेतानं त्यानं जागा बदलली. थोड्या वेळानं तिकीट चेकर आला. “काय रे, तुझे आईवडील कुठे आहेत? का एकटाच भटकतोयस?” त्यानं दरडावून विचारलं. “ते दुसऱ्या डब्यात आहेत,” धनू चक्क खोटं बोलत होता, पण काय करणार दुसरं? त्यांनी पोलिसांकडे दिलं असतं तर?  

सकाळी ट्रेन या गावात पोचली. आता पुढे काय? स्टेशनबाहेर पडून तो पाय नेतील तिकडे चालत सुटला. चालून चालून त्याचे पाय थकले. समोरच हे मंदिर दिसलं. फुलांचा आणि उदबत्तीचा परिचित मंद सुवास नाकाला जाणवला. ‘लहानपणी आपण असेच आजीबरोबर देवळात जायचो.’ त्याला आठवलं. मंदिराच्या मंडपात एका खांबाला टेकून धनू बसला. भुकेनं आणि थकव्यानं त्याला  

ग्लानी आली. किती वेळ गेला कुणास ठाऊक. कुणाचे तरी प्रेमळ हात त्याला हलवून उठवत होते. शिऱ्याचा गोडसर वास त्याच्या नाकात शिरला. किलकिल्या डोळ्यांनी त्यानं पाहिलं, एक आजीबाई त्याला ‘घे बाळा, प्रसाद घे.’ म्हणत होत्या. फारसा विचार न करता त्यानं अधाश्यासारखा शिरा खाल्ला, त्यांनी दिलेलं थंडगार पाणी तो प्यायला. आता कुठे त्याच्या जिवात जीव आला. डोकं जाग्यावर आलं. दुरून रहदारीचे आवाज येत होते, आजूबाजूला अनोळखी लोकांची गर्दी होती... अरे बाप रे, कुठे आलोय आपण नक्की? आत्ताच्या आत्ता आईच्या कुशीत शिरावं अशी त्याला तीव्र इच्छा झाली.  

‘बास झालं.’ त्यानं मनाशी काहीतरी निर्णय घेतला. ‘‘आजी, प्लीज एक फोन करू का?’’ ‘‘हो, हा घे.’’ आजींच्या अनुभवी नजरेला मामला लक्षात आला होता. फोन घेऊन धनूनं आईचा नंबर डायल केला. तिचा आवाज ऐकून त्याला रडूच कोसळलं. आपण कुठे आहोत हे त्यानं तिला सांगितलं. बाबांनी लगेच त्या गावात राहणाऱ्या त्यांच्या मित्राला फोन केला आणि दहा-पंधरा मिनिटात काका तिथे पोचलेसुद्धा. आजीबाईंचे आभार मानून काकांनी त्यांचा नंबर लिहून घेतला आणि धनूला घेऊन ते त्यांच्या घरी आले. स्वच्छ आंघोळ करून, कपडे बदलून धनू बिछान्यावर पडला आणि क्षणात त्याला गाढ झोप लागली. दुपारी काकूंनी त्याला जेवायला हाक मारली, तितक्यात बेल वाजली. दारात धनूचे आईबाबा उभे होते. त्यांना बघून आत्तापर्यंत कसेबसे रोखून ठेवलेले अश्रू धनूच्या डोळ्यातून वाहायला लागले. धावत जाऊन तो त्यांच्या गळ्यात पडला. त्याला सुखरूप बघून आईबाबांना इतकं बरं वाटत होतं की बस! त्याचा एक हात बाबांनी घट्ट पकडला होता आणि दुसरा हात आईनं. आणि धनू आपला “सॉरी आईबाबा, सॉरी!” असं परत परत म्हणत होता.  

काका म्हणाले, “चला, चला, आता सगळे मिळूनच जेवूया. All is well, that ends well!” 

“खरंच! त्या आजीबाईंचे फार उपकार आहेत, त्यांना फोन करायला हवा.” बाबा म्हणाले. आई हळूच धनूकडे बघून हसली. आणि धनूला एकदम बरं वाटायला लागलं, एका कुठल्यातरी मोठ्ठ्या खड्ड्यात पडता पडता वाचल्यासारखं!

संबंधित बातम्या