फणस 

- डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 19 एप्रिल 2021

किशोर काथा

काका पहिल्यांदाच इतके दिवस राहिले होते, आम्ही त्यांनी सांगितलेली कामं सोडली तर शक्यतो त्यांच्याजवळ थांबायचोच नाही. बाप रे, एकवेळ अभ्यास परवडला, पण काका? नको रे बाबा!... आणि आता तर आठवडाभर आम्ही दोघंच काकांबरोबर राहणार होतो, इलाज नव्हता!

परीक्षा झाली. सुट्ट्या लागल्या. उन्हाळ्याचे दिवस. दुपारचं कडक ऊन. गरम गरम हवेच्या झळा चारी बाजूंनी गुदमरून टाकत होत्या. श्वास आत घेतानासुद्धा नाक आतून भाजून निघतंय की काय असं वाटायला लागलं होतं. सुट्टी सुरू झाल्यावर आठवडाभर मजा आली खूप. एखाद्या बंदिस्त तुरुंगातून सुटका झाल्यासारखं मोकळं मोकळं वाटलं होतं. सवयीनं सकाळी दचकून जाग यायची, मग परीक्षा झालीय हे आठवून मस्त वाटायचं. पण आता हळूहळू दिवस आss वासून समोर सुस्तावल्यासारखा पसरायला लागला. माझी आणि सावनीची आईच्या मागे भुणभुण चालू झाली, ‘काय करू, बोअर होतंय..’  

आमच्या खिडकीबाहेर दोन मोठी झाडं आहेत, एक पिवळ्याधमक फुलांचं आणि एक जांभळ्या फुलांचं. मला फार आवडतात ती, म्हणून मी त्यांचे फोटो गूगल करून बघितले, त्यांची नावं टॅबुबिया आणि जॅकरांडा अशी आहेत. एके दिवशी मी असाच त्या फुलांकडे बघत लोळत पडलो होतो. फोन वाजला. मी आळशीपणा करून कुणीतरी तो घ्यायची वाट बघत तसाच पडून राहिलो. मग आठवलं, घरी माझ्याशिवाय कुणीच नव्हतं. मग काय, उठलो कसाबसा. “हॅलो!” समोरून मोठ्ठ्या आवाजात कुणीतरी बोललं, “अरे, मी भानूकाका बोलतोय....” ते इतक्या जोरात बोलत होते की सगळं बोलणं ऐकून होईपर्यंत माझे कान दुखायला लागले. त्यांच्या बोलण्याचा एकूण अर्थ असा की काही कामासाठी ते पंधरा दिवसांसाठी आमच्याकडे येणार होते राहायला. मी आईबाबांकडे त्यांचा निरोप पोचवला. 

भानूकाका म्हणजे खरंतर माझे काका नव्हेत, ते माझ्या बाबांचे काका. पण आम्ही सगळे त्यांना काकाच म्हणतो. ते एखाद्या ऐतिहासिक नाटकातल्या माणसासारखे दिसतात. त्यांच्या ओठांवर भरघोस मिश्या आहेत. कपाळावर त्यांच्या सुरवंटासारख्या भुवयांच्या बरोब्बर मधे बुक्का लावलेला असतो. कारण ते दरवर्षी पंढरपूरला चालत जातात वारीबरोबर. तोंडात तुकारामाचे अभंग -  त्यात सारखं ‘तुका म्हणे’ असं येतं, म्हणजे तुकारामांचेच असणार. गुबगुबीत शरीर, डोक्यावर काळ्या-पांढऱ्या केसांचं टोपलं आणि त्यावर बाहेर जाताना कायम शेरलॉक होम्ससारखी कॅप, ऊन असो की नसो. ते नेहमी कामात, घाईत असायचे, त्यांना फारसं कधी हसलेलं पाहिलं नव्हतं आम्ही.

ते आले, आणि मला आणि सावनीला कामं सांगून सांगून त्यांनी पार सळो की पळो करून सोडलं. आरामात सोफ्यावर बसून त्यांच्या गलेलठ्ठ वहीत ते काहीतरी लिहीत बसायचे आणि ‘हे आण, ते आण’ अशा आम्हांला ऑर्डरी सोडायचे. दर तासाला त्यांना चहा लागायचा आणि जेवणा-खाण्याच्या वेळात जरासुद्धा इकडचं तिकडं चालायचं नाही. असेच आठ दिवस गेले. आई म्हणाली, “अरे, मला आणि बाबांना नेमकं एक महत्त्वाचं काम निघालं म्हणून गावाला जायला लागतंय. दोनच दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही राहाल ना नीट?” एरवी आईबाबा आम्हाला सोडून जातात तेव्हा आम्ही खूप मजा करतो, त्यामुळे सावनी खुशीत ओरडली, “होSSS.” पण मला तेवढ्यात एक महत्त्वाचा प्रश्न पडला, “आणि काका?” “त्यांचं काय? ते आहेत आठवडाभर अजून. त्यांची काळजी घ्याल ना रे?” 

 “जाऊन या ग तुम्ही आरामात. माझी नका काळजी करू,” काका आत येत आईला म्हणाले. आमच्या पोटात गोळा उठला. एकतर ते पहिल्यांदाच इतके दिवस राहिले होते, आम्ही त्यांनी सांगितलेली कामं सोडली तर शक्यतो त्यांच्याजवळ थांबायचोच नाही. बाप रे, एकवेळ अभ्यास परवडला, पण काका? नको रे बाबा!   

पण काय करणार? इलाजच नव्हता. आईबाबा पहाटेच निघाले. त्यांना अच्छा करून आम्ही परत झोपलो, ते थेट तोंडावर ऊन आल्यावरच उठलो. खरंतर आम्हाला जाग आली ती स्वयंपाकघरातून येणाऱ्या खमंग वासानं. स्वयंपाकाच्या मावशी यायला तर वेळ होता अजून! माझ्या डोळ्यांवरची झोप उडेपर्यंत सावनी संशोधन करून आलीसुद्धा! “दादा, उठ, उठ. इकडे ये पटकन.” आम्ही हळूच दबक्या पावलांनी स्वयंपाकघरात गेलो, तर काय! तिथे काका होते, एप्रन बांधून, गॅसवर काहीतरी करत होते. बरोबरीनं त्यांच्या भसाड्या आवाजात अभंग गाणं चालू होतं. आमची चाहूल लागल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि ते दिलखुलास हसले. “चला, चला, तोंड धुवून, दात घासून या पटापटा. मी मस्त धिरडी केलीयेत.” 

आश्चर्य म्हणजे, ते दोन दिवस आम्ही चक्क धमाल केली. काका एकदम फॉर्मात होते. त्यांची जाडजूड वही त्यांनी बाजूला ठेवून दिली. आम्ही खूप खेळलो, कॅरम, पत्ते, बोर्ड गेम्स. त्यांनी आम्हाला पत्त्यांची जादू शिकवली. जेवताना आम्ही एकमेकांना जोक्स सांगितले आणि खूप हसलो. “सावनी, तुला इतके जोक्स येतात हे माहिती नव्हतं मला!” मी म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं ठरवून आम्ही झोपायला गेलो. काकांना आमचं गांव बघायचं होतं. त्यांनी विचारलं, “तुमचं तुम्ही उठाल ना?” “हो” आम्ही एका सुरात उत्तर दिलं. अलार्म लावून आम्ही चक्क उठलोसुद्धा. बाबांचा विश्वासच बसणार नाही. रोज किती त्रास देतो आम्ही त्यांना उठायला! मी चहा केला. जाताना सावनीनं दार बंद करून आठवणीनं किल्ली घेतली. ठरवल्याप्रमाणे आम्ही काकांना गावातून चक्कर मारून आणली. आम्हालाही काही भाग नवीनच कळले. 

घरी पोचलो तेव्हा काका जरा दमलेले वाटले. “काका, आता तुम्ही बसा, आज आम्ही नाश्ता तयार करणार.” आम्ही जाहीर केलं. आई करायची ते आठवून आठवून आम्ही दडपे पोहे केले. “ई!” पहिलाच घास घेतल्यावर सावनीनं तोंड वाकडं केलं. आम्ही मीठ घालायला विसरलो होतो. पण ते घातल्यावर मस्तच लागले पोहे. काकांनीपण मिटक्या मारत खाल्ले. 

दोन दिवसांनी आईबाबा परत आले. “काय रे, ठीक आहे ना सगळं? काही प्रॉब्लेम नाही ना आला? भानूकाका, तुम्हाला त्रास नाही ना दिला मुलांनी?” आईनं जरा भीत-भीतच विचारलं. “छे गं! उलट फार गुणी मुलं आहेत. खूप कामसू आणि नम्र!” काकानी केलेल्या या कौतुकानं आम्ही खुश! आईनं घाईघाईत डोळे पुसले. “काय गं आई, काय झालं?” सावनीनं विचारलं. “डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं.” ती म्हणाली आणि पटकन आत निघून गेली. आमची आई म्हणजे ना! कुणी आमचं कौतुक केलं तरी हिला रडू येतं. 

“काका तर अगदी फणसासारखे निघाले रे, वरून काटेरी आणि आतून गोड! आपण का रे इतकं घाबरायचो यांना?” सावनी मला नंतर म्हणाली. “त्यांच्या मिश्यांमुळे 

असेल!” मी हसत हसत म्हटलं.

संबंधित बातम्या