दुसरी बाजू

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 3 मे 2021

किशोर काथा

किशोरवयीन मुलांना हव्या असलेल्या गोष्टीला आई-बाबा नकार देतात, तेव्हा त्यांची धुसफुस होते, राग येतो; प्रत्येक गोष्टीला नाहीच म्हणतात असंही वाटून जातं. पण नकार देण्यामागे आई-बाबांचीही काही बाजू असू शकते...

“मी  जाणार म्हणजे जाणार, तुम्ही काहीही म्हणा.” अनुज शिरा ताणून ओरडला. तो दात ओठ खात होता, त्याचे डोळे विस्फारले होते आणि चेहरा लाल झाला होता. आईला पुढे काहीही बोलायची संधी न देता तो तरातरा त्याच्या खोलीत गेला आणि त्यानं धाडकन दार लावून घेतलं. 

त्याची मोठी बहीण, मीता हळूच दार ढकलून आत आली.  “अनुज, काय रे? ठीक आहेस ना?”  “कसला ठीक? आम्ही मजा केलेली बघवते का कुणाला? सरळ नाही म्हणाले आईबाबा स्लीपओव्हरला.” अनुज अजूनही रागातच होता. काहीतरी छान हातात येता येता निसटून गेल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. “हो? वैतागच आला असेल तुला! बाय द वे, मित्रांकडे झोपायला जायची ही काही पहिलीच वेळ नाही तुमची. एवढं काय खास होतं आज?” 

“अगं, यावेळी समीरचे आईबाबा नव्हते ना घरी! फक्त आम्हीच असणार होतो मुलं-मुलं. असा चान्स कुठे मिळतो कधी? मला आठवतंय, तुला जाऊ दिलं होतं आईबाबांनी एकदा तुझ्या मैत्रिणीकडे, तिचे आईबाबा नसताना. तू लाडकी ना त्यांची!” अनुज पुन्हा चिडला.  

“वा, बरंच आठवतंय की रे तुला. पण मी तुझ्यापेक्षा मोठी होते तेव्हा. आणि सगळी स्टोरी कुठे माहितेय तुला!”

“कसली स्टोरी? काय झालं होतं?” अनुजनं कुतूहलानं विचारलं. 

मीतानं एक सुस्कारा सोडला. तिला आठवलं सगळं. त्यांची दहावीची परीक्षा नुकतीच झाली होती. निमीचे आईबाबा त्याच दिवशी गावाला गेले होते. सगळ्या मैत्रिणींनी निमीच्या घरी झोपायला जायचं ठरलं.  

“मीता, सांभाळून राहा हं, उगीच नाही ते उद्योग नका करू. तुमच्यावर लक्ष ठेवायला कुणी नाहीये तिथे. आपले नियम लक्षात आहेत ना तुझ्या?” निघताना न राहवून आई म्हणालीच. “च्, हो गं आई, झाल्या का तुझ्या सूचना चालू! मला कळतं सगळं, मी काय कुक्कुलं बाळ आहे का?” मीता केव्हाच मनानं तिकडे जाऊन पोचली होती. 

हळूहळू एक एक जणी जमल्या आणि एकच दंगा सुरू झाला. हसण्या-खिदळण्याच्या आवाजानी घर भरून गेलं. कुणीतरी मोठ्या आवाजात गाणी लावली. मीता आणि शमीका एकमेकींना जोक्स सांगून पोट धरधरून हसत होत्या. या गोंधळात फोनची रिंग वाजली. “निमी, फोन!” शमीकानं ओरडून सांगितलं. ‘आईचा फोन की काय?’ “शू:, गप्प बसा.” ओठांवर बोट ठेवत तिनं मुलींना चूप केलं आणि फोन उचलला. थोडा वेळ काहीतरी बोलून तिनं फोन खाली ठेवला. “कुणाचा फोन होता गं?” “निनादचा. तो, सोहम आणि विनीत विचारतायत की आम्ही येऊ का? मी त्याला सांगितलं पाच मिनिटात फोन करते. त्यांना कसं कळलं आपण आज भेटणार ते?” “मीच सांगितलं त्यांना. आपण मुली मुली तर काय, नेहमीच भेटतो. ते असले की जरा मजा.” आलिशा पुढे येत म्हणाली. कुरळ्या केसांची, उंचनीच आलिशा एकदम बिनधास्त म्हणून ओळखली जायची शाळेत. निमी चाचरत म्हणाली, “अगं पण, आई...” 

“चिल निमी, कुणाला काय कळणार आहे? किती बोअर आहेस तू! एक नंबरची भित्रट!”

आता निमाचाही आवाज चढला. “आलिशा, काहीतरी बोलू नकोस हं. मला नाही आवडत असं मुलांना राहायला बोलवायला, तेही आईबाबा नसताना.” त्यांचा आवाज ऐकून हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. कुणीतरी गाणी बंद केली. सगळ्या निमी आणि आलिशाच्या भोवती जमल्या. त्यांचे चेहरे प्रश्नार्थक होते. आलिशा म्हणाली, “निनादचा ग्रुप आला तर किती मजा येईल ना! तुम्हाला माहितेय का, त्यांच्याकडे कसल्यातरी सीक्रेट फिल्म-क्लिप्स आहेत, त्या घेऊन येणार आहेत ते पेनड्राइव्हवर. पण या निमीला पटतच नाहीये. तू तरी सांग हिला, शिवानी.”  

या स्लीपओव्हरसाठी आईची परवानगी घ्यायच्या वेळी निमीनं आधार म्हणून मीतालापण बोलावलं होतं. आधी त्या नाहीच म्हणत होत्या. “आई गं, तू का नाही म्हणते आहेस पण? सांगशील का मला?” निमीनं विचारलं. ती आणि तिची आई नेहमीच एकमेकींशी स्पष्ट बोलायच्या. 

“हे बघा निमी आणि मीता, तुम्हां दोघींविषयी मला खात्री आहे गं, पण तुमच्या इतर मैत्रिणींना मी तितकी ओळखत नाही. शिवाय जेव्हा तुम्ही सगळ्या एकत्र येता, तेव्हा जरा वेगळ्या वागता, हो की नाही? पटत नसलेल्या गोष्टी मनाविरुद्ध केल्या जातात. कुणाला त्रास देणं, दारू किंवा सिगरेटचा अनुभव घेणं, इंटरनेटवर नको त्या गोष्टी बघणं किंवा टाकणं, चिडवाचिडवी, नको ते धाडस, कुणाला तरी एकटं पाडणं... नेमक्या याच गोष्टींची मला भीती वाटते.” निमीच्या आईनं तिच्या मनातली काळजी व्यक्त केली. “आम्ही नाही गं असं काही करणार.” “हं. एक काम करूया. समजा अशी काही वेळ आली, तर काय कराल, यावर दोघी नीट विचार करा आणि मला सांगा. म्हणजे मलाही काळजी वाटणार नाही, नाहीतर माझं लक्ष लागणार नाही तिकडे.”

मीता आणि निमीनं हे चॅलेंज घेतलं. नाही तर असं नको व्हायला की पुढच्या वेळेपासून परवानगीच मिळायची नाही. इंटरनेटवर जाऊन माहिती काढली, मोठ्या ताई-दादांशी गप्पा मारल्या. काय काय विचित्र गोष्टी होऊ शकतात, तसं झालं तर काय करायचं, कुणी दबाव टाकला तर तो कसा परतवायचा, हे शोधलं. त्याचबरोबर सुरक्षितपणे काय काय धमाल करता येईल, याचंही प्लॅनिंग केलं. आणीबाणीच्या परिस्थितीत असावा म्हणून त्यांनी एक कोड-वर्ड ठरवला आणि तो दोघींच्या आईबाबांना सांगून ठेवला.   

अशी सगळी शस्त्रं पोतडीत असल्यामुळे आलिशाच्या आविर्भावानं त्या सुरुवातीला जरी घाबरल्या, तरी लवकरच सावरल्या. तशीही आलिशा सोडून बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर शंका दिसत होती. मीताला एक कल्पना सुचली, “आपण यावर चिठ्ठ्या टाकून मतदान घेऊया का?” “ए, मग ते गुप्त तरी घेऊया,” शिवानी हळूच म्हणाली. उघडपणे आलिशाला विरोध करायला जमलं नसतं त्यांना. शेवटी एकदाचा बहुमतानुसार मुलांना न बोलावण्याचा निर्णय झाला तेव्हा निमानं हळूच सुटकेचा निःश्वास टाकला. “ओके,” आलिशानं खिलाडूपणे सगळ्यांचा निर्णय खांदे उडवून मान्य केला. 

पुढचा सगळा वेळ मात्र ठरवल्याप्रमाणे छान गेला. निमीची आई सकाळी गरम गरम पराठे घेऊन पोचली तेव्हा सगळ्या मुली एकदम आनंदी, हसऱ्या आणि फ्रेश दिसत होत्या. 

मीताची ही हकिकत ऐकून अनुजचा राग काही पूर्णपणे गेला नाही, पण आईबाबांचीही काही बाजू असू शकते हे त्यानं धुसफुसत का होईना, मान्य केलं. मीताला यातच समाधान वाटलं.

संबंधित बातम्या