खारीचा वाटा

- डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 14 जून 2021

किशोर काथा

धवल आणि मनूनं चिप्स संपवले आणि ते पाकीट रस्त्याकडेला फेकून दिलं. मनूचं सहज तिकडे लक्ष गेलं आणि त्याला धक्काच बसला. रस्त्याच्या दोन्ही बाजू चिप्सच्या, बिस्किटांच्या आणि चॉकलेट्सच्या रंगीत प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी भरून वाहत होत्या. ‘हे कधी झालं? हा रस्ता किती मोकळा स्वच्छ असायचा!’ मनूच्या मनात आलं. 

“आजी, काय करतेयस?” मनूनं आजीला विचारलं. 

“अरे, नवीन साबण काढलाय ना आज, त्याला जुन्या वडीचा उरलेला तुकडा चिकटवतेय. वाया जाईल नाहीतर तो.” “अगं, एवढ्याश्शा तुकड्यानं काय होणारेय? दे ना टाकून.”

“मनू, तुझे आजोबा होते ना, तेव्हापासूनची सवय आहे ही माझी. त्यांचं फार बारीक लक्ष असायचं सगळीकडे. मागच्या अंगणातला कचरे-खताचा खड्डा त्यांनी स्वतः खणला होता. तुमचं ते बायो-डिग्रेडेबल वगैरे काय माहिती नव्हतं आम्हाला. पण कुठलीही गोष्ट उगीचच्या उगीच वाया घालवायची नाही एवढं माहिती होतं बघ. अरे, निसर्गाशी लढाई करू नये.”  

“हो, ते ठीक आहे, पण त्याचा या साबणाच्या वडीशी काय संबंध? इथे कुठला निसर्ग आलाय?”

“संबंध आहे तर, नाही कसा? साबणाची एक वडी तयार करायला किती काय काय नासधूस करतो आपण! त्याच्यासाठी भलेमोठे कारखाने बांधा, त्याला लागणारा कच्चा माल गोळा करा, मालाची ने-आण करण्यासाठी जड जड वाहनं वापरा, मग ते साबण चमकदार कागदात गुंडाळा, आणि मग पुन्हा तो माल दुकानांमध्ये पोहोचवा. त्याची किंमत असेल पंधरा-वीस रुपये, पण माझ्या मते तेवढ्यात आपण निसर्गाची कधीही भरून न येणारी हानी केलेली असते. प्रत्येकानं हा असा उरलेला साबण वापरला, तर कमी साबण तयार करावे लागतील की नाही?” 

“मला जरा हे फार ओढूनताणून आणल्यासारखं वाटतंय हं आजी. चल, चालूदे तुझं. मित्र हाका मारतायत, मी जातो खेळायला.” असं म्हणून मनू खेळायला पळाला. तो मनातल्या मनात आजीला हसत होता. 

‘काहीतरीच विचार करत बसते झालं. आजीचं नेहमी असंच काय काय चालतं. साधं वरण फोडणीला टाकताना ती पातेलं धुऊन ते पाणी त्यात घालते. चपला खराब झाल्या तर टाकून द्यायचं सोडून चांभाराकडून एकदा तरी शिवून आणते. तिच्या बाहेर जाण्याच्या साड्या जुन्या झाल्या की घरी वापरते आणि मग त्या आणखी जुन्या झाल्या की त्यांचे व्यवस्थित चौकोन कापून टेबल पुसायला वापरते. दूध संपलेल्या पातेल्यातली साय वाया जाऊ नये म्हणून त्यात कणीक मळते. माझी वार्षिक परीक्षा झाली की माझ्या वह्या घेऊन त्यातली उरलेली कोरी पानं फाडून घेते, दुकानातून त्या बाईंड करून घेते आणि तिच्या रेसिपीज लिहायला, अभंग उतरवून घ्यायला त्या वापरते. घरात इकडे तिकडे पडलेले सगळे कागद एकत्र करून व्यवस्थित गठ्ठे करून ठेवते आणि पेपरच्या गठ्ठ्याबरोबर तेही रद्दीवाल्याकडे देते.’ 

विचार करता करता मनू गल्लीत पोचला. तो आणि त्याचे मित्र रस्त्यावरच क्रिकेट खेळायचे. एक सायकलला टेकवलेली फळी म्हणजे त्यांचे स्टंप्स. पण धमाल यायची खूप. खेळता खेळता मुलं वेळ-काळाचं भान विसरून जायची. आजही असंच झालं. भरपूर आरडाओरडा करून खेळता खेळता चार कधी वाजले कळलंच नाही. मग एक-एक जण घरी गेले. धवलनं खिशातून एक चिप्सचं पाकीट काढलं, त्यातले चिप्स दोघांनी मिळून संपवले आणि ते पाकीट रस्त्याकडेला फेकून दिलं. मनूचं सहज तिकडे लक्ष गेलं आणि त्याला धक्काच बसला. रस्त्याच्या दोन्ही बाजू चिप्सच्या, बिस्किटांच्या आणि चॉकलेट्सच्या रंगीत प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी भरून वाहत होत्या. ‘हे कधी झालं? हा रस्ता किती मोकळा स्वच्छ असायचा!’ मनूच्या मनात आलं. त्यानं तो विचार झटकून टाकला आणि तो घरी गेला. पण आज काहीतरी वेगळंच वाटत होतं त्याला. आजीचं बोलणं अजून मनात होतं. आजपर्यंत लक्षात न आलेल्या कितीक गोष्टी त्याला अचानक दिसायला लागल्या. सखूमावशी पाण्याचा नळ अर्धवट उघडा सोडून गेली होती, पाणी वाहत होतं. बाहेर रस्त्यावर दोन गायी आतल्या अन्नाबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्याही चघळत होत्या. दोन घरं टाकून पलीकडे राहणाऱ्या समीराकडे चालत जायचं सोडून ताईनं स्कूटर काढली. 

संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा त्यांना गंभीर चेहऱ्यानं बसलेला मनू दिसला. “काय युवराज, कसल्या विचारात पडला आहात एवढ्या? आज खेळायला जायचं नाही का?” “जाऊन आलो.” मनूनं दोन शब्दात उत्तर दिलं. मग म्हणाला, “तुम्हाला चहा करून देऊ का?” बाबा म्हणाले, “चालेल की, कर अर्धा-अर्धा कप. आपण आजीबरोबर बाल्कनीत बसून घेऊया.” मनूला काहीतरी बोलायचंय हे त्यांच्या लक्षात आलं. चहा पिऊन आजी चक्कर मारायला गेली. बाबा आणि मनू, दोघंच राहिले. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. मग मनूनं सकाळी आजीबरोबर झालेलं बोलणं सांगितलं. “हे बघा बाबा, निसर्गाची हानी होते आहे, माणूस जरा जास्तीच ओरबाडून घेतोय, हे कबूल आहे. पण साबणाच्या वडीला जुनी वडी चिकटवून काय होणार आहे? तेल, कोळसा वगैरे तयार व्हायला लक्षावधी वर्षं लागतात. आपण कितीही काटकसर केली तरी ते कसे भरून काढू शकणार आपण? आणि काही काही गोष्टी तर गरज म्हणून लागतातच, दरवेळी काही ती चैन नसते.” 

“हं, तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणा, पण आजी म्हणते तेही काही खोटं नाही. चैन, हौस करता करता त्याची सोय, गरज कधी झाली हेच कळलं नाही आपल्याला बहुतेक. पण आपण काहीच करू शकत नाही हे नाही पटत मला. तुला त्या स्टार फिशची गोष्ट माहिती आहे?” गोष्ट म्हटल्यावर मनूचे डोळे चमकले. “नाही, सांगा ना!” बाबांनी सांगायला सुरुवात केली, “एका समुद्रकिनाऱ्यावर एक पाहुणा फिरत फिरत चालला होता. एक मुलगा वाकून काहीतरी करत होता. ‘काय करतोयस तू?’ पाहुण्यानं जवळ जाऊन त्याला विचारलं. ‘ओहोटी सुरू झालीय. हे स्टारफिश पाण्यात गेले नाहीत तर तडफडून मरतील इथेच. म्हणून परत सोडतोय त्यांना.’ मुलगा म्हणाला. पाहुणा हेटाळणीच्या स्वरात म्हणाला, ‘अरे, तू एवढास्सा, इकडे हजारो मासे पडलेत. काय फरक पडणार आहे?’ मुलानं शांतपणे एक मासा उचलून समुद्रात सोडला आणि वळून तो त्यांना म्हणाला, ‘हा बघा, या माशाला पडला फरक.’ त्या मुलानं त्याच्या पद्धतीनं काम करत राहायचं ठरवलं, आजीनं तिची पद्धत शोधून काढली.”

“हं,” मनू सुस्कारा टाकत म्हणाला, “खरंच की. आजीची कृती पटली नसली तरी तिला सुनावण्याचा मला काही अधिकार नव्हता. मला जे पटेल आणि जमेल, ते मीही करू शकतोच की.” हे म्हणताना गल्लीतले प्लॅस्टिकचे ढिगारे त्याच्या डोळ्यांसमोर आले. 

मनूनं उठून पाणी प्यायला ग्लासात 

घेतलं, थोडं पाणी प्यायला आणि उरलेलं बेसिनमध्ये ओतून देता देता एकदम थांबला. त्यानं ते जाऊन बाल्कनीतल्या कुंडीत ओतलं. बाहेरून आलेली आजी त्याच्याकडे बघून मिश्कीलपणे चष्म्याच्या आडून हसत होती.

संबंधित बातम्या