उल्टा-पुल्टा!

- डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 28 जून 2021


किशोर काथा

किरणनं लायब्ररीमधून आणलेलं पुस्तक वाचायला घेतलं. एक ऐतिहासिक पुस्तक होतं. तेव्हा म्हणे सगळीकडे पुरुषांचं राज्य असायचं. मुलं खुशाल रात्रीबेरात्री बाहेर हिंडायची आणि घरातली सगळी कामं बायका करायच्या...

पार्टी आता भरात आली होती. हातात ज्युसचा ग्लास घेऊन किरणनं एक कोपरा पकडला आणि आजूबाजूला पाहिलं. अशा मस्तीभऱ्या वातावरणाची किरणला सवय नव्हती. एका कोपऱ्यात मुलींचा घोळका होता. युगंधरला मधे घेऊन सगळ्या त्याला चिडवत होत्या. तो अगदी रडकुंडीला आला होता. “मला जरा पाणी हवंय, आलोच,” म्हणून त्यानं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. किरणला जरा टेन्शनच आलं ते बघून. 

घड्याळात अकराचे ठोके पडले आणि किरणच्या छातीत धडधड व्हायला लागली. ‘बाप रे, उशीर होतोय, निघायला हवं. आईचं एवढं काही नाही, पण बाबा काळजी करत बसतील. आजकालचे दिवस तसे वाईटच आहेत. एवढ्या रात्री रस्ते सुनसान असणार, कॅब तरी मिळेल की नाही? कॅब ड्रायव्हर बरी असेल ना? नाहीतर व्हायची पंचाईत.’ एक एक करून सगळे मुलगे निघून गेले, आता सगळ्या मुलीच राहिल्या होत्या. किरणला फार असुरक्षित वाटायला लागलं. आज मनकर्णिका पण आलेली नाही, नाहीतर तिच्या जिवावर निर्धास्त असतो आपण. कधी नव्हे ते अशा पार्टीला यायला आईनं परवानगी दिली होती. तेसुद्धा किरणनं खूप हट्ट केला आणि बाबांनी मध्यस्थी केली म्हणून. ताई जाते रोज रात्री बाहेर ते चालतं यांना, आम्हीच काय घोडं मारलंय? किरणची चुळबुळ वसंतसेनेच्या लक्षात आली. आजची पार्टी तिच्या वाढदिवसाची होती. “काय झालं? डोन्ट वरी, मी सोडेन तुला हवं तर. नाहीतर प्रियंवदा सोडेल. ती तुझ्या घराजवळच राहते. पण थांब ना, खरी मजा तर आता सुरू होणारेय. आज मी कुणाला बोलावलंय माहितेय का? देवदत्त, द ग्रेट डान्सर. चल!”

“नको, त्यापेक्षा तू कॅब मागवतेस का? मला निघायला हवं.”

वसंतसेनेनं खांदे उडवले आणि आपल्या ड्रायव्हरला हाक मारली, “चित्रांगदा, गाडी काढून सोडून ये गं किरणला.” घरी वेळेत पोचल्यावर किरणनं सुटकेचा निःश्वास सोडला.

 दुसरा दिवस नेहमीप्रमाणे उगवला. “किरण, झाल्या की नाही पोळ्या, मला निघायचंय आता. तुझा रोजचा घोळ आहे हा. आरशात बघून केसांचा भांग पाडण्यात वेळ घालवत असतोस. तेवढ्या वेळात दहा कामं झाली असती.” आई रागावलेली पाहून किरण आणखीनच गडबडून गेला आणि नेमकी तव्यावरची पोळी करपली. ओट्यावर सगळा पसारा झाला होता. आईचा चढा आवाज ऐकून वॉशिंग मशीन लावता लावता बाबा तिकडून धावत आले. “काय झालं? थांब, मी दाखवतो तुला. पोळपाटावरची आणि तव्यावरची पोळी अशी एकाच वेळी फिरवायची. नाहीतर मी करतो पोळ्या आत्ता, तू भाजी टाक पटकन. आईला दुधीभोपळा आवडत नाही, लक्षात आहे ना? जरा मसाला वाटून लाव भाजीला.” 

टॉवेल खांद्यावर टाकत बाबा पटापटा हालचाली करत होते. बेल वाजली की दार उघड, मधेच बाहेर पेपर वाचत बसलेल्या आईला चहा नेऊन दे, एक बाजूला डबे भर; अशी त्यांची लगबग चालू होती. “बाबा, तुमचा चहा केव्हाचा राहिलाय, थंडसुद्धा झाला असेल.” किरणनं त्यांना आठवण केली. बाबांनी चहाचा गार कप तसाच तोंडाला लावला. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला; आजीचा, बाबांच्या आईचा होता. “अगं जरा घाईत आहे, नंतर करतो तुला फोन.” घड्याळाकडे नजर टाकत त्यांनी फोन ठेवला. ताई हॉलमध्ये मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली होती. ती बाहेरूनच ओरडून म्हणाली, “बाबा, मला आज खाऊचा पण एक डबा हवाय, माझा एक्स्ट्रा क्लास आहे. सँडविच चालेल, फक्त चीज भरपूर घाला त्यात.” सगळं उरकून बस पकडून कॉलेजला जायला किरणला उशीरच झाला. स्कूटर्स होत्या घरी दोन, पण आई आणि ताईसाठी त्या राखीव.   

‘नेहमी नेहमी त्यांचाच विचार. हे बरोबर नाही.’ लेक्चर ऐकता ऐकता किरणची मनातल्या मनात धुसफूस चालू झाली. ‘त्या दिवशी दुकानात मला ती पँट केवढी आवडली होती! बाबांना विचारलं घेऊ का, तर म्हणे, “किरssण, बरं दिसतं का असं मुलाच्या जातीला. किती घट्ट आहे ती पॅन्ट. ही बघ, ही चांगली ढगळी आहे, ही घे.” जिथे तिथे हे माझी मुलाची जात काढतात.’ किरणला एक वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवला. मुंबईच्या कॉलेजमधून त्याला मेल आला होता. बाबांना केवढा आनंद झाला होता! “अगं ऐकलंस का, किरणला मुंबईला इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळतेय, मेरिटवर.” बाबा आनंदानं ओरडले. “मुंबईला? नको गं बाई! एवढ्या लांब एकटं कसं पाठवायचं त्याला? तरुण मुलगा आहे, उगीच जिवाला घोर.. आणि कितीही शिकलं तरी शेवटी घरच सांभाळायचं आहे ना? सासरी गेला की इंजिनिअर झालाय म्हणून स्वयंपाक चुकणार नाहीये. काही नको.” आईनं निर्णायक मत दिलं. ‘शिकला तर निदान माझ्यासारखा रांधा-वाढा-उष्टी काढा यातच अडकून तरी पडणार नाही.’ बाबा पुटपुटले. “काय? काय म्हणालास?” पेपरमधून डोकं वर काढून आई उपहासानं म्हणाली, “ते गॅसवर दूध ठेवलंय तिकडे बघा आधी, मुलाला शिकवतायत!” आणि तो विषय तिथेच संपला. 

संध्याकाळी घरी आल्यावर आईनं जाहीर केलं, “आज रात्री मी जेवायला नाहीये. जरा बाहेर जायचंय.” बाबांनी चाचरत विचारलं, “अगं पण आपण जाणार होतो ना आज बाजारात? माझे शर्ट अगदी फाटायला आलेत.” आई बेफिकिरीनं म्हणाली, “अरे हो, विसरलेच मी, नंतर कधीतरी जाऊया.” पडल्या चेहऱ्यानं बाबा हातातल्या फडक्यानं फर्निचरवरची धूळ जरा जोरातच झटकायला लागले. “नाहीतर तू उद्या जा ना दुपारी. तसाही मी गेल्यावर काय उद्योग असतो तुला? तुझ्या त्या रिकामटेकड्या मित्राला, ययातीला घेऊन जा बरोबर. हं हे घे, हे क्रेडिट कार्ड ठेव.” बाबांनी घुश्श्यातच कार्ड घेतलं आणि ते म्हणाले, “ययाती रिकामटेकडा नाहीये, तो कॉलेजच्या मुलांच्या स्नॅक्सच्या ऑर्डर्स घेतो, आणि मीही आता काहीतरी काम करायचं ठरवलंय.” आई हसायला लागली, “हो का? बरं बरं, कर हं. मी एकदम लिबरल आहे तशी. फक्त ते कारण देऊन घराकडे दुर्लक्ष झालेलं चालणार नाही मला.” 

अशी बोलणी ऐकायची किरणला आता सवय झाली होती. त्यानं हातातलं काम संपवलं, स्वच्छ केलेल्या नीटनेटक्या स्वयंपाकघराकडे एक समाधानाची नजर टाकली. ‘चला, आता निवांतपणे लायब्ररीतून आणलेलं पुस्तक वाचूया.’ ते एक ऐतिहासिक पुस्तक होतं. तेव्हा म्हणे सगळीकडे पुरुषांचं राज्य असायचं. मुलं खुशाल रात्रीबेरात्री बाहेर हिंडायची आणि घरातली सगळी कामं बायका करायच्या. ते वाचता वाचता किरण अलगद सुखस्वप्नांच्या दुनियेत कधी शिरला कळलंच नाही.

संबंधित बातम्या