खरा कलाकार 

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 12 जुलै 2021

किशोर काथा

जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची लहानपणी एकदम धडपड्या होता. त्यानं काढलेली ‘मोनालिसा’ म्हणजे जगातली सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक. पण त्याच्या पहिल्या चित्राची गोष्ट मोठी गमतीशीर आहे....  

काळ साधारण चौदाव्या शतकाच्या मध्यावरचा. लिओनार्दो दा विंची इटलीमधल्या विंची या छोट्याशा निसर्गरम्य जन्मगावात त्याच्या आजीआजोबांबरोबर आणि धाकट्या काकांबरोबर राहत होता. त्याचे वडील नोटरी होते. तो काही शाळेत गेला नाही, पण छोटा लिओनार्दो एकदम धडपड्या होता. एका जागी स्वस्थ बसणे त्याला माहितीच नव्हते. दरवेळी त्याच्या सुपीक डोक्यातून काहीतरी भन्नाट कल्पना निघायच्या. त्यातल्या काही कल्पना तर अशक्य कोटीतल्या असत. आधी कल्पना करायची आणि मग ‘ती शक्य होईल का, असेल तर कशी’ असे किरकोळ विचार तो सुरू करायचा. कुठलीही गोष्ट करायची तर तो त्याचा अगदी सांगोपांग मुळापासून विचार करायचा. 

मानवी शरीराची चित्रं हुबेहूब यावीत यासाठी त्यानं चक्क मृत शरीरांची चिरफाड केली, त्यातल्या स्नायूंच्या आणि हाडांच्या रचनेचा बारीक अभ्यास केला. चित्रांमधले डोळे अगदी खरेखुरे वाटतील असे, जिवंत यावेत यासाठी त्यानं काय केलं माहितेय? डोळ्यांवर प्रकाश पडला की तो बुबुळांमधून कसा आरपार जातो, तेव्हा डोळ्यांच्या बाहुल्यांचं कसं आकुंचन होतं, डोळ्यांभोवतीचे स्नायू कसे हलतात याचे प्रयोगच केले. कुठल्या दिशेनं उजेडाची तिरीप आली की सावली कशी सरकते हे समजून घेण्यासाठी त्यानं भूमितीच्या आकृत्या काढल्या. चित्रकला, इतिहास, शरीरशास्त्र, भूमिती, नकाशे, अभियांत्रिकी, विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या या सगळ्या नोट्स त्यानं व्यवस्थित लिहून ठेवल्यात, ज्या आपण अजूनही पाहू शकतो. त्यानं काढलेली ‘मोनालिसा’ म्हणजे जगातली सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक. इतक्या शतकांनंतरसुद्धा तिच्या हास्याचं गूढ कुणाला उकललेलं नाहीये. पण त्याच्या पहिल्या चित्राची गोष्ट मोठी गमतीशीर आहे.  

विंची बारा वर्षांचा झाला तसं त्याचे वडील पिएरो यांना वाटायला लागलं, की गावच्या संथ आयुष्यात तो आळशी बनत चाललाय. त्यांचं बहुतेक काम फ्लोरेन्स शहरात चालायचं. म्हणून ते त्याला तिथं घेऊन गेले. एकदोन वर्षं काहीबाही केल्यावर पिएरो त्याला त्यांच्या ओळखीच्या व्हेराकिओ नावाच्या एका कलाकाराकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला शिकाऊ मदतनीस म्हणून दाखल करून घेतलं. तिथं जे शिकायला मिळत होतं ते लिओनार्दोला मनापासून आवडलं. 

विंची गावात अजूनही पिएरो यांचं घर होतं, जाणंयेणं असायचं. अशाच एका फेरफटक्यादरम्यान तिथल्या एका गावकऱ्यानं त्यांच्याकडे एक लाकडी ढाल दिली. “माझं काही फ्लोरेन्सला जाणं होत नाही, तुम्ही जरा ही घेऊन जा आणि त्यावर काहीतरी चांगली कलाकुसर करून आणा.” तो पिएरोना म्हणाला. आपण हे काम आपल्या मुलाकडून, लिओनार्दोकडून करून घ्यावं असं त्यांच्या मनात आलं. ‘बघूया तरी कसं काम करतोय ते. इतक्या दिवसांत काही शिकला की नाही हे तरी कळेल. नाही चांगलं झालं तर दुसऱ्या कुणाकडून तरी पूर्ण करून घेऊ.’ त्यांनी विचार केला. 

“लिओनार्दो, तुला गावात आपल्या घराजवळ राहतात ते अल्बर्टो काका आठवतायत ना? त्यांना या ढालीवर काहीतरी कलाकुसर करून हवीय. तू करशील का हे काम? त्यांना फार आनंद होईल बघ.”

“हं, करू की.” लिओनार्दोनं इतक्या सहजपणे मान्य केलेलं पाहून बाबांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 

हातात ढाल घेऊन सरळ चित्र काढायला लागेल तर तो लिओनार्दो कुठला! त्याच्या डोक्यात चक्रं फिरायला लागली. ‘अल्बर्टो काकांना काहीतरी वेगळं काढून देऊया. तेच तेच घिसंपिटं नको. काय बरं काढावं? एखादा काल्पनिक प्राणी काढावा. पौराणिक कथांमध्ये असतो ना, तसा एखादा अक्राळविक्राळ प्राणी, आग ओकणारा ड्रॅगन वगैरे!’ मग त्यानं अनेक कच्ची रेखाटनं केली. पण एकही त्याच्या मनासारखं येईना. छे, हे फारच टिपिकल होतंय, हे अगदीच कुरूप दिसतंय, हे अशक्य वाटतंय.... असं करता करता चित्र देण्याची तारीख जवळ येत चालली. अजून हातात काहीच नव्हतं. एके दिवशी बाबांचा निरोप आला. ते दोनतीन दिवसांत येणार होते.  

 ‘आज काही झालं तरी पूर्ण करायचंच चित्र. त्याशिवाय उठायचंच नाही.’ असं ठरवून लिओनार्दो पडवीत ठिय्या देऊन बसला. सकाळ कलायला लागली होती. वातावरणात एक सुस्ती पसरली होती. अंगणात फुललेल्या फुलांमध्ये मधमाश्या मध गोळा करण्यात मग्न होत्या. ओल्या गवताचा वास पसरला होता. गवतातून एक लालसर अळी सरपटत चालली होती. हिरवट-मातकट रंगाचा एक नाकतोडा हिरव्या पार्श्वभूमीमध्ये बेमालूमपणे मिसळून गेला होता. तिथे साठलेल्या पाण्याच्या डबक्याशेजारी निश्चलपणे बसलेल्या एका बेडकाचं नाकतोड्याकडे लक्ष गेलं. आपली लांब जीभ फेकून त्यानं चपळपणे तो पकडला आणि गट्टम केला. गडबडीत त्या नाकतोड्याचं डोकं तुटून बाजूला पडलं. तंद्रीत बसलेला लिओनार्दो हे सगळं निरखत होता. अचानक त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. तो उठला, त्यानं एक डबा घेतला, एक जाळी आणि एक काठी घेतली, आणि निघाला मोहिमेवर. दिवसभरात त्यानं एक पाल, काही किडे, एक बिनविषारी साप, फुलपाखरं, नाकतोडे आणि एक वटवाघूळ असा खजिना जमा केला. त्या सगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे भाग त्यानं एकत्र रचले. त्याचा जो प्राणी बनला, तो बघून लिओनार्दो खूष झाला. अगदी त्याच्या मनासारखा विचित्र बनला होता तो! ‘हं, हे मस्तय. आता मजा येईल चित्र काढायला.’ 

दोन तीन दिवसांनी जेव्हा बाबा आले, तेव्हा घरभर कुबट कुजका वास सुटला होता. लिओनार्दोला मात्र याचा पत्ताच नव्हता. तो मन लावून त्याचं चित्र पुरं करण्यात गुंग होता. नाक धरून बाबा तो काम करत असलेल्या खोलीत शिरले आणि एकदम दचकलेच. त्या अंधूक उजेडात लिओनार्दोनं केलेला तो प्राणी अगदी खराखुरा आणि भयाण दिसत होता. त्यांनी त्याच्या हातातल्या ढालीकडे पाहिलं. त्यावर ते चित्र अगदी जिवंत झालं होतं. 

पिएरोंना आपल्या या जगावेगळ्या मुलाचा खूप अभिमान वाटला. एक साधं चित्र काढण्यासाठी केवढी मेहनत घेतली होती लिओनार्दोनं. तो काहीतरी थोर काम करणार याबद्दल त्यांची खात्री पटली. त्यांना ते चित्र इतकं आवडलं की त्यांनी ते ठेवून घेतलं आणि आपल्या गावकऱ्याला देण्यासाठी दुसरीच एक ढाल विकत घेतली. लिओनार्दोच्या कलेचा प्रवास आता सुरू झाला होता...

संबंधित बातम्या