चव

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

किशोर काथा

‘‘...अगं आपल्या शरीरासारखंच मनालाही कधीकधी आजारपण येतं. त्यावर नकोत का उपचार? अं? घरगुती उपचार नेहमीच पुरे पडत नाहीत. मुख्यतः जेव्हा आपलं आपल्याला त्यातून बाहेर पडता येत नाहीये हे स्पष्ट असेल, तेव्हा तर मदत घ्यायला हवीच की.” मावशी बराच वेळ सानिकाशी बोलत होती...

पाऊस नुकताच पडून गेला होता. मस्त पिकनिकची हवा होती. अशी हवा पडली की जान्हवी आणि सानिका भटकायला जायच्या. जान्हवीनं सनिकाचा फोन फिरवला, पण कितीतरी वेळ सानिकानं उचललाच नाही. ‘‘सानिका, अगं केव्हाची फोन करतेय तुला, उचलला का नाहीस इतका वेळ? चल ना, आपण चक्कर मारून येऊयात. बोअर झालंय फार.’’ जान्हवी नेहमीच्या उत्साहानं बोलत सुटली, पण सानिका मात्र तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प! तिला कुठंही जावंसं वाटत नव्हतं. फोन ठेवून, कालच्याच कपड्यात; विस्कटलेल्या केसांनी ती तशीच आडवी झाली. आणि पुन्हा त्याच त्या विचारांच्या चक्रात गुरफटली. ‘इतकी वाईट आहे का मी? सरळ सरळ ब्लॉक करून टाकलं मला सुयशनं! आणि स्टेटस काय, तर म्हणे ‘हॅपी टू बी सिंगल’!? त्याआधी माझ्याशी एका शब्दानं बोलावंसं नाही वाटलं त्याला. माझा फोनही उचलत नाहीये तो. आता सगळे माझ्याकडे अगदी दयेनं बघणार आणि उगाच काही ना काही सल्ले देणार. काल मृण्मयीचा फोन आला. ‘कोल त्याला, याच्यासारखे छप्पन मिळतील.’ काहीही काय? आईचं काहीतरी वेगळंच चालू असतं. तिच्या मते मी उगीचच एवढं मनाला लावून घेतलंय. मग ती माझं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करत राहते. जेव, अभ्यास कर वगैरे. मला किती त्रास होतोय ते कळतच नाही तिला. कुणालाच नाही कळत खरंतर. काय अर्थ आहे या जगण्याला? मी असले काय अन नसले काय! कुणाला काय फरक पडणार आहे? सुयशला तर नक्कीच नाही.’

 टोकाचे विचार मनात येत होते. कळत होतं कुठेतरी की असा विचार नको करायला, पण आशेचा किरण कुठे दिसत नव्हता. सानिका तशीच उपाशी पोटी झोपून गेली. गालांवर अश्रू तसेच सुकून गेले. 

सकाळचे दहा वाजून गेले होते. सकाळची गडबड जरा आटोक्यात आल्यावर आई सानिकाच्या खोलीत डोकावली. दार उघडल्याबरोबर शिळा वास आला. खोली अस्ताव्यस्त पसरली होती. खरकटी प्लेट तशीच पडली होती. पुस्तकांवर धूळ जमा झाली होती. बिछान्यावर पाय पोटाशी घेऊन झोपलेल्या सानिकाकडे बघून आईला भडभडून आलं. किती वाळली होती ती! तिचं ब्रेक अप झाल्यापासून हे असंच चालू होतं. पुढे होऊन आई तिच्याशेजारी बसली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिनं हळूच हाक मारली, ‘‘सानिका, चल, जेवायला येतेस ना? गरम गरम फुलके केलेत, चल.’’ ‘‘नको!’’ सानिकाचं एकशब्दी  उत्तर. ‘‘खा ना गं बाळा. तू काल रात्रीही जेवली नाहीस.’’ ‘‘नको म्हटलं ना? जा तू.’’ सानिका चिडखोरपणे म्हणाली.

आई बाहेर गेल्यावर मात्र सानिकाचा कसाबसा चढवलेला रागीट मुखवटा गळून पडला. तिचे डोळे पाण्यानं भरून आले. अकरावीची परीक्षा जवळ आली होती पण तिनं पुस्तकांना हातही लावला नव्हता अजून. लक्षच लागत नव्हतं कशात. आता परीक्षेतही फज्जा उडणार, आईबाबा ओरडणार. काहीच चांगलं घडणार नाहीये का आपल्या आयुष्यात? 

बाहेर बेल वाजलेली ऐकू आली. ती जागची हलली सुद्धा नाही. ‘उघडेल कुणीतरी.’ मग आईचा आनंदी आवाज ऐकू आला, ‘‘अय्या, तू? ये ये. किती दिवसांनी येते आहेस!’’ आता कोणत्याही क्षणी आपल्या दारावर थाप पडेल आणि आई आपल्याला बाहेर बोलावेल याविषयी तिला खात्री होती. पण कितीतरी वेळ झाला तरी कुणीच आलं नाही. उलट ऐकू येत राहिले खूप खळखळून हसण्याचे आवाज आणि उत्साही गप्पांची किलबिल. मग पोह्यांचा वास. सोनियामावशी की काय? नक्कीच! एवढी हसणारी म्हणजे तीच! आईची ही मैत्रीण तिची लाडकी मावशी होती. कशी काय ही हसत असते नेहमी? हिला कधी काही प्रॉब्लेम्स नसतातच की काय? थोड्या वेळानं मावशी आत डोकावली. “हाय सानिका, कशी आहेस? मगाशी आले होते मी, तुला झोप लागली होती.” उत्तरादाखल सानिका फक्त कसनुशी हसली. मावशी म्हणाली, “सानिका, मगाशी तुझी एकंदरीत स्थिती पाहिली आणि न राहवून मी तुझ्या आईला सगळं विचारून घेतलं. तुला माहितेय की मी कॉलेजमध्ये शिकवते, तुझ्या वयाचेच असतात माझे विद्यार्थी. त्यांना असे काही प्रॉब्लेम्स आले तर आम्ही त्यांना मानसतज्ज्ञांची मदत घ्यायला सुचवतो.” सानिका एकदम चिडली, “मला काय वेडबीड लागलं असं वाटतंय की काय तुम्हाला? ही आई काहीतरी बोलली असेल तसं.” मावशी शांतपणे हसून म्हणाली, “नाही गं, ती काही म्हणाली नाही. मला सांग, तुला ताप आला, खोकला आला, पोट बिघडलं; तर तू जातेस की नाही डॉक्टरांकडे?” सानिका आठ्या घालून म्हणाली, “त्याचं काय? तेव्हा जायलाच हवं.” “हो ना? अगं आपल्या शरीरासारखंच मनालाही कधीकधी आजारपण येतं. त्यावर नकोत का उपचार? अं? घरगुती उपचार नेहमीच पुरे पडत नाहीत. मुख्यतः जेव्हा आपलं आपल्याला त्यातून बाहेर पडता येत नाहीये हे स्पष्ट असेल, तेव्हा तर मदत घ्यायला हवीच की.” मावशी बराच वेळ सानिकाशी बोलत होती.  

साधारण पंधरवड्यानंतरचा शनिवार. सानिकाला सकाळी जाग आली आणि नाकात शिरला पोह्यांचा खमंग वास! तिला पोटातल्या भुकेची जाणीव झाली. पण आधी तिनं आवरून घेतलं. मग तिचा सकाळचा व्यायाम केला. काल ती आणि जान्हवी सायकलवरून फेरफटका मारून आल्या होत्या आणि उद्याचा रविवारचा खास बेत म्हणजे बाबांबरोबर ट्रेकिंग! आज सूर्यनमस्कार घालायचं तिनं ठरवलं होतं. ते झाल्यावर छान ताजीतवानी होऊन मगच ती नाश्‍ता करायला आली. मानसतज्ज्ञांच्या उपचारांनंतर ती कटाक्षानं तिच्या झोपण्या-उठण्याच्या, व्यायामाच्या, खाण्याच्या वेळा पाळत होती. तिच्या आणि सुयशच्या नात्याविषयी तिनं डायरीत लिहून काढलं होतं. त्यानंतर तिचं मन बरंच स्वच्छ झालं. ‘आपण किती कोता आणि एकांगी विचार करत होतो ना! पण कधीच विसरणार नाही मी ते नातं! खूप नव्या आणि नवलाईच्या भावना अनुभवल्या मी त्यातून, आणि खूप काही शिकले सुद्धा.’ स्वतःशी हे मान्य करताना तिच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं. 

पंधरा दिवसांपूर्वी सोनियामावशी आली होती तेव्हाही आईनं पोहे केले होते. पण तेव्हा तो वाससुद्धा तिला सहन होत नव्हता. आजच्या पोह्यांची चव खास होती. सानिकानं ती मोठ्या श्रमानं परत मिळवली होती.

संबंधित बातम्या