उकल 

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

किशोर काथा

“तुमच्या बोलण्यात माझं नाव ऐकून जाग आली.” रोहनच्या चेहऱ्यावर गंभीर आणि अपराधी भाव होते. “मला बोलायचंय तुमच्या दोघांशी.” आई-बाबा आणि रोहन एकमेकांकडे तोंड करून बसले. देवापुढे लावलेल्या समईचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. गुंता उकलायला हळूहळू सुरुवात झाली होती.

“रागिणी, कपाटातल्या माझ्या छोट्या पर्समधले पन्नास रुपये देतेस का धोबीकाकांना?” चिरलेला कोबी फोडणीत टाकता टाकता अर्चनानं आवाज दिला. ‘च्’ असा नापसंतीचा आवाज काढत रागिणी उठली. “आईऽऽ, या पर्समध्ये फक्त दहा रुपये आहेत.” ती आतूनच ओरडून म्हणाली. “नीट बघ, असतील. कालच मी पन्नासच्या दोन नोटा ठेवल्या होत्या.” हात पुसत अर्चना आत आली, “अरे, खरंच की. बरं मी देते, जा तू.” मोठ्या पर्समधले पन्नास रुपये काढून तिनं काकांना दिले. नंतर भाजी करताना तिचं लक्ष लागेना. ‘कुठे गेले पैसे कोण जाणे? आजकाल फार विसरभोळी होत चाललेय मी.’

तो आठवडा गडबडीचा गेला. अर्चनाच्या ऑफिसमध्ये ऑडिट होतं. रागिणीची सबमिशन्स चालू होती. रोहनची चाचणी जवळ आली होती, अभ्यासासाठी त्याच्या मागे लागायला लागत होतं; आणि मुलांचा बाबा, अजय आठ दिवसांकरिता बाहेरगावी गेला होता. 

तो परतल्यावर एकदा निवांत वेळ बघून तिनं अजयला विचारलं, “माझ्या छोट्या पर्समधले पैसे तू घेतोस का? त्यात चिल्लर ठेवते मी, घाईच्या वेळी बरं पडतं. त्यातले नको घेत जाऊस.” तो मनापासून बातम्या बघत होता. त्यानं गोंधळून तिच्याकडे पहिलं, “नाही बुवा, मला कशाला लागतायत सुट्टे पैसे? आणि लागले तर माझ्याकडे असतात.” तिचा चेहरा एकदम पडला. त्यानं ‘हो, घेतलेत’ म्हणावं अशी ती प्रार्थना करत होती मनातल्या मनात. “का गं, काय झालं?” “अरे नाही, आजकाल नेहमीच असं होतंय. आधी मला वाटलं मी विसरत असेन, पण नेहमी नेहमी असं कसं विसरेन? मला जरा काळजी वाटतेय रे.” अर्चना गंभीरपणे म्हणाली. आता मात्र टीव्ही बंद करून अजय तिच्याकडे वळला, “बस इथे. मला सांग, कसली काळजी वाटतेय?” सगळं बळ एकवटून ती म्हणाली, “आपला रोहन तर घेत नसेल? परवा मी खोलीत गेले तर तो तिथे होता. विचारलं तर म्हणाला की त्याचं पेन सापडत नाहीये, ते शोधतोय. पण तिथे कुठे पेन असणार? अर्थात, नंतर मी पर्स चेक केली, तर पैसे होते त्यात.” “हं, लक्ष ठेवायला हवं जरा चिरंजीवांकडे. आपण पैसे मोजून ठेवत जाऊया नीट आणि कपाटाला कुलूप लावूया.” तेवढ्यात रोहन बाहेरून आला. “काय झालं? एवढी कसली चर्चा चाललीय?” आईबाबांचे गंभीर चेहरे बघून त्यानं विचारलं. “काही नाही रे. तू हातपाय धुऊन खायला घे. टेबलावर दडपे पोहे ठेवलेत बघ,” अर्चना म्हणाली. “थोड्या वेळानं घेतो, आधी मला हा प्रोजेक्ट पूर्ण करायचाय.” बूट जागेवर ठेवून रोहननं खांद्यावरची जड सॅक उतरवली आणि तो थेट खोलीत गेला. अर्चना आणि अजय, दोघांनी एकमेकांकडे पहिलं. ‘किती गुणी मुलगा आहे आपला, उगीचच शंका घेतो आपण.’ असा भाव त्यांच्या नजरेत होता.  

पण सगळी काळजी घेऊनही पैसे जायचे काही थांबले नाहीत. म्हणजे पैसे खरंच गायब होत होते, तो काही अर्चनाचा विसराळूपणा नव्हता. तिनं अधिक बारकाईनं लक्ष ठेवायला सुरुवात केली. 

नंतरच्या आठवड्यात अजयला थोडी स्टेशनरी घ्यायची होती, म्हणून तो लंच अवरमध्ये ऑफिसबाहेर आला. रस्ता ओलांडताना पलीकडे काही मुलं दिसली, त्यांची दंगामस्ती चालू होती. त्यांची मस्ती बघून अजयला आपले कॉलेजचे दिवस आठवले. अरेच्चा, पण ही मुलं एका बारमधून बाहेर पडत होती! ‘काय ही मुलं, अजून शेंबूड पुसता येत नाही आणि बारमध्ये जातात. आईवडील काय करतात यांचे? लक्ष कुठे असतं त्यांचं?’ तो स्वत:शीच पुटपुटला. आता ती मुलं थोडी जवळ आली होती. ‘त्यांच्यातला एक मुलगा अगदी रोहनसारखा दिसतोय. एक मिनिट, रोहनच आहे हा!’ आश्चर्य, शॉक, संताप, दुःख अशा भावनांनी अजयचं मन भरून गेलं. ताबडतोब भर रस्त्यात त्याच्या एक थोबाडीत द्यावी; कॉलर धरून जाब विचारावा; त्याला फरफटत, ओढत घरी न्यावं, असे एकापेक्षा एक हिंस्र विचार त्याच्या डोक्यात आले. इतक्यात बस आली आणि मुलं त्यात चढून निघून गेली. अजयला काही करायला वेळच मिळाला नाही. 

कसंबसं काम संपवून तो घरी आला. अर्चनाला सगळं सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दोघंही सुन्नपणे बसून राहिले. समोरचा चहा तसाच थंड होऊन गेला. अचानक कसल्याशा विचारानं अर्चनाचे डोळे चमकले, “हे बघ, तू फक्त त्याला मित्रांबरोबर बारमधून बाहेर येताना पहिलंयस, तेही एकदाच. याचा अर्थ असा नव्हे की तो दारू प्यायला लागलाय, किंवा व्यसनी झालाय. तो नुसताच गेला असेल त्यांच्याबरोबर.” अजय हसला, “तसं असतं तर किती बरं झालं असतं! पण मागच्या काही दिवसातलं रोहनचं वागणं बघ. आता अर्थ लागतोय त्या सगळ्याचा - घरातले पैसे गायब होतायत, तुझ्या कपाटाजवळ त्यादिवशी कशाला घुटमळत होता? बाहेरून घरात आल्या आल्या आधी खोलीत पळतो तो, आपल्याला टाळतो. आणि आजकाल झोपाळलेला असतो, कधीकधी त्याचे डोळे लाल दिसतात. विचारलं तर सांगतो, रात्री उशिरापर्यंत वाचत होतो. अभ्यासाचा तर आनंदच, आत्ताच्या चाचणीत त्याला तीन मार्क मिळालेत. पूर्वीचा हसरा, हजरजबाबी रोहन कुठेतरी गायब झालाय. त्याची जागा या किरकिऱ्या, चिडक्या अनोळखी मुलानं घेतलीय. आज तर बारमधून येताना दिसला. आपल्याला हे स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही अर्चना, की घरातले पैसे चोरून रोहन दारू प्यायला लागला आहे!” अर्चनानं सुस्कारा सोडला, “हं, बरोबर आहे तुझं. एक सांगू? तरीसुद्धा, त्याला विचारूया आपण आधी! मुळात आपला रोहन चांगला मुलगा आहे. काहीतरी कारण असणार त्याच्या या वागण्याला. त्याचा आत्मविश्वास कमी झालेला जाणवतोय आजकाल. हे नवीन मित्रही जरा शंकास्पदच आहेत. तो आपल्याला टाळतोय हे खरं आहे, पण आपणही एवढ्यात आवर्जून त्याच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न कुठे केलाय?” अजय म्हणाला, “ठीक आहे, बोलूया त्याच्याशी नीट. पण आता गोष्टी या थराला आल्या आहेत म्हटल्यावर आपण प्रोफेशनल मदतही घ्यावी असं वाटतंय.” कसला तरी आवाज आला म्हणून त्यानं वळून पहिलं, तर खोलीच्या दारात रोहन उभा होता. “अरे? तू घरीच होतास रोहन?” “हो बाबा, मी झोपलो होतो, पण तुमच्या बोलण्यात माझं नाव ऐकून जाग आली.” रोहनच्या चेहऱ्यावर गंभीर आणि अपराधी भाव होते. “मला बोलायचंय तुमच्या दोघांशी.”

एकमेकांकडे तोंड करून ते तिघं बसले. देवापुढे लावलेल्या समईचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. गुंता उकलायला हळूहळू सुरुवात झाली होती.

संबंधित बातम्या